Advertisement
उद्योग कथा

शेतकरी ते राष्ट्रीय पुरस्कार विजेता उद्योजक

फक्त रु. ५०० मध्ये 'स्मार्ट उद्योजक' प्रिंट मासिक घरपोच मिळवा.

Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

आपण वर्तमानपत्र वाचायला घेतलं की, कुठे न कुठे शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचे वृत्त आपल्याला दिसतेच. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. अन्न ही आपली मूलभूत गरज असूनही अन्न निर्माण करणारा शेतकरी मात्र उपाशी आहे, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे; पण काळोखातही काजवे चमकावेत अशी काही माणसे असतात. त्यातलेच एक म्हणजे मनोज कदम. मनोज कदम यांचे जीवन, त्यांनी घेतलेले कष्ट, हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी पूर्ण केलेले आपले शिक्षण, मग नोकरी आणि अल्प काळातच आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करून घेतलेली गरुडझेप. सारे काही थक्क करणारे आहे. एखाद्या काल्पनिक कादंबरीसारखे… पण सत्यात उतरलेले…

मनोज कदम यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील आकुंदे गावात झाला. आईवडील शेतकरी. आकुंदे गाव हे तसे दुष्काळी गाव. त्यामुळे घरची परिस्थिती हलाखीचीच. त्यात मनोज यांच्या मागे तीन भावंडं. त्यांचं बालपण गरिबीत गेलं. ते चार भावंडांमध्ये थोरले असल्यामुळे त्यांच्यावर अनेक जबाबदार्‍या होत्या. दूध काढणं, गुरांना चारा देणं, शेतातील भाज्या घ्यायच्या व त्या मंडईत जाऊन विकायच्या आणि नंतर सकाळी नऊ वाजता शाळेत जायचं. जिल्हा परिषदेची शाळा आठ किलोमीटर लांब असल्यामुळे चौघे भाऊ एकाच सायकलवरून शाळेत जायचे. याशिवाय घरची लहानमोठी कामे होतीच. मनोज अगदी लहानपणी सायकलचा आणि संसाराचासुद्धा गाडा हाकत होते.

मनोज यांना लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. शाळेत नेहमी त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी सोलापूरमधील दयानंद महाविद्यालयातून पूर्ण केले आणि इंजिनीयरिंगचे शिक्षण कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले व पदव्युत्तर शिक्षण पुणे युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केलं. घरची गरीब परिस्थिती, शेतात व घरातसुद्धा काम करावं लागत असताना याचा परिणाम त्यांनी आपल्या शिक्षणावर होऊ दिला नाही.

केमिकल इंजिनीयरिंगला त्यांना 81 टक्के गुण मिळाले. इंजिनीयरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांना जर्मनीमध्ये प्रवेश मिळणार होता; पण त्यांनी जर्मनीतील ऑफर नाकारली, कारण ते जर जर्मनीत गेले असते तर घर कोणी सांभाळलं असतं? लहान भावांचं शिक्षण कसं झालं असतं. या कारणामुळे त्यांनी नोकरी स्वीकारली व नोकरी करत असताना पोस्ट ग्रॅज्युएशन केलं.


Paytm वापरकर्त्यांसाठी बंपर ऑफर

'स्मार्ट उद्योजक' मासिकाची वार्षिक डिजिटल वर्गणी

Paytm वर मिळवा आता फक्त २० रुपयांत.


इंजिनीयरिंगला असताना त्यांचं उत्पन्न तसं काहीच नव्हतं. महिन्याला फक्त पाच रुपये खिशात असायचे. त्यांना जर एखाद्या मित्राने विचारलं की, ‘चल रे वडापाव खाऊ या’ तर त्याला टाळण्यासाठी ‘मला अ‍ॅसिडिटी आहे’ असं उत्तर मनोज कदम यांच्याकडून यायचं. हे पाच रुपये ते कशाला सांभाळून ठेवायचे? तर महिन्यातून एकदा आपल्या घरच्यांना फोन करता यावा म्हणून. तरी आपल्याकडे थोडेफार पैसे हवेत म्हणून ते लोकांच्या मेसमध्ये काम करायचे. हॉस्टेलमध्ये असताना ते स्वतःच जेवण बनवायचे. त्यानंतर त्यांना एज्युकेशन लोन मिळाले व पुढील शिक्षण त्या पैशांतून पूर्ण करता आले. वडिलांचा भक्कम पाठिंबा तर होता.

आपल्या परिस्थितीची चिंता करण्यापेक्षा आपली परिस्थिती स्वीकारून त्यांनी कार्य केले आहे. म्हणूनच त्यांना भरारी घेता आली. आपण बर्‍याचदा पुढे काय होईल याची चिंता करत बसतो आणि वर्तमानही खराब करून बसतो; पण मनोज कदम यांच्यासारखी माणसे वर्तमानात जगतात व भविष्याचे आराखडे आखतात.

त्यांना सुरुवातीपासूनच व्यवसाय करण्याची इच्छा होती. 2003 साली पुण्याला पॅनकार्ड क्लबच्या एका ट्रेनिंगमध्ये त्यांनी अगदी आत्मविश्‍वासाने सांगितलं की, ‘दहा वर्षांनंतर मी केमिकल इंजिनीयर असणार आहे आणि त्या इंडस्ट्रीसाठी चांगलं काम करण्यासाठी चांगला कंन्सल्टंट बनणार आहे.’ असं त्यांनी म्हटलं होतं व त्यांचं म्हणणं त्यांनी आज सत्यात उतरवलं आहे. जगात खूपच मोजके लोक असतात जे इतकं सखोल प्लॅनिंग करून आपलं टार्गेट ठरवतात आणि यशस्वी होतात. त्या मोजक्या लोकांपैकीच मनोज हे एक आहेत. दोन्ही विद्यापीठांमधील सुवर्ण पदक विजेते असल्यामुळे त्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली.

चिकाटी, कष्ट घेण्याची वृत्ती, आपल्या क्षेत्राबद्दल अद्ययावत असणे आणि कमालीचं कर्तृत्व या गुणांमुळे ते 32व्या वर्षी एका मोठ्या अमेरिकन कंपनीचे जनरल मॅनेजर झाले. हिंदुस्थान अँटिबायोटिक्स, आर.पी.जी. लाइफ सायन्स, आय.सी.आय. इंडिया, झायड्स कॅडीला, अल्बनी मॉलियुलर रिसर्च इन्कॉर्पोरेशन अशा बड्या कंपन्यांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

खेड्यातील मुलांना बर्‍याचदा इंग्रजी बोलण्यात अडचण असते, त्यामुळे बर्‍याचदा या क्षेत्रातील वातावरणात त्यांना टिकून राहता येत नाही. म्हणून या स्पर्धेच्या क्षेत्रातून त्यांना माघार घ्यावी लागते; पण मनोज यांनी माघार घेण्यापेक्षा नव्या गोष्टी आत्मसात केल्या. नोकरी करत असताना त्यांना नेहमी वाटायचं की, या खेड्यातल्या मुलांसाठी विशेषतः शेतकर्‍यांच्या मुलांसाठी टेक्निकल या क्षेत्रात काही काम करता आलं पाहिजे. व्यवसाय करण्याची इच्छा तर त्यांना पूर्वीपासून होती; पण ते योग्य संधीची वाट पाहत होते. आपण योजिलेल्याप्रमाणे आता उच्चपदावर येऊन पोहोचलो आहोत. महिन्याला अडीच लाख पगार, कामानिमित्त 5 स्टार हॉटेलमध्ये राहणं, औरंगाबाद, हैदराबाद आणि मुंबई अशी महत्त्वाची शहरे त्यांच्या आधिपत्याखाली होते.

प्रचंड पैसे, मानसन्मान आणि आरामदायक सुरक्षित आयुष्य कुणाला नको असेल? असं आयुष्य जगत असतानाही त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. का? तर व्यवसाय करण्याची आवड होतीच; पण ज्यांना व्यवसायात यायचं आहे, व्यवसाय करायचा आहे त्यांना कोणतीही अडचण येऊ नये व आपल्या ज्ञानाचा लाभ त्यांनासुद्धा मिळावा यासाठी… त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘खजुराचं झाड होऊन जगण्यापेक्षा दुसर्‍यांना सावली देता आली पाहिजे. आजपर्यंत मी जे काही कमावलं, मिळवलं ते स्वतःसाठी. आता दुसर्‍यांसाठी करायचं आहे.’

त्यांनी पदाचा राजीनामा दिला तेव्हा कंपनीने राजीनामा स्वीकारला नाही. कारण त्यांनाही इतका चांगला व हुशार माणूस गमवायचा नव्हता. कंपनीने मनोज कदम यांना अनेक आमिषे दाखवली. लंडन, अमेरिकेमध्ये स्थायिक होण्यापासून ते विदेश दौर्‍यांपर्यंत; पण मनोज यांचा निश्‍चय झाला होता. अखेर 2012 साली त्यांनी नोकरी सोडली व स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

‘एस. व्ही. इंजिनीयरिंग अ‍ॅण्ड कंसल्टंसी सर्व्हिसेस’ औरंगाबाद ही कंपनी स्थापन केली. व्यवसाय सुरू करताना टिपिकल मराठी माणसाला ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्या समस्या मनोज कदम ह्यांच्या आडही आल्या. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा आपल्या बायकोला म्हणजे अश्‍विनीला सांगितलं की, आपण नोकरी सोडली असून आता व्यवसाय सुरू करणार आहे, तेव्हा तिलाही थोडा त्रास झालाच; पण एका भारतीय नारीप्रमाणे त्या मनोज यांच्यामागे उभ्या राहिल्या. सुरुवातीला मनोज यांनी या निर्णयाबद्दल आपल्या आईवडिलांना सांगितलं नाही; कारण त्यांना धक्का बसला असता; पण जेव्हा त्यांनी याबद्दल कल्पना दिली तेव्हा वडील नाराज झाले.

चांगलं आयुष्य सोडून धंदा का करायचा? सोप्पं आहे ते? धंदा करणं हे काही आपलं काम नाही. नोकरी करणे जणू मराठी माणसाचं परमकर्तव्यच आहे, अशीच सर्वांची धारणा आहे. त्यांच्या मित्रांनीही त्यांना विरोध केला. बरेचसे व्यवसाय मुंबईत आहेत आणि मुंबईत उत्तमोत्तम कन्सल्टंसी आहेत. मग मुंबईचे लोक मुंबईतील कन्सल्टंसी सोडून तुझ्याकडे औरंगाबादमध्ये का येतील? असा एकंदर मित्रांचा सूर होता; पण मनोज मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांचं म्हणणं असं की, ‘आपण जर उत्तम सेवा देऊ शकलो तर लोक नक्कीच येतील. आपण नाही का उत्तम तंत्रज्ञानासाठी भारतातून परदेशी जातो, कारण ते उत्तम देतात. तसे लोक औरंगबादमध्येसुद्धा येतील.’

व्यवसाय सुरू करताना भांडवलाचा प्रश्‍न होताच. मग कमीत कमी भांडवलात व्यवसाय सुरू करायचा. तीस हजारांचा लॅपटॉप घेतला आणि ऑफिस म्हणून घराच्या वरची रूम रिकामी होतीच. नवीन ऑफिस घ्यायचे तर 15 ते 20 लाखांची गुंतवणूक हवी. सुरुवातीला हा खर्च टाळून घरातून व्यवसाय करता येईल. सुरुवातीला दोन प्रोजेक्ट्स केले. माणसे नव्हती म्हणून घरातल्या लक्ष्मीने उत्तम साथ दिली. अश्‍विनी कदम ग्रॅज्युएट झाल्यात; पण तांत्रिक ज्ञान फारसे नव्हते. आपल्या नवर्‍याला सहकार्य करण्यासाठी त्यांनी ते ज्ञान बर्‍यापैकी आत्मसात केले. आधीची तीन वर्षे पुष्कळ मेहनत करावी लागली. कुटुंब सांभाळून व्यवसायात मदत करणे अश्‍विनीताईंसाठी कठीण काम होतं; पण त्यांनी ते केले.

पाहता पाहता औरंगाबादमध्ये तीन ऑफिसेस थाटली गेली. त्यांनी जपानचा एक प्रोजेक्ट केला. लोक तंत्रज्ञानासाठी जपानकडे पाहतात; पण इथे जपानने भारताची मदत घेतली. या काळात मनोज कदम यांनी भारतभर 35 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स पूर्ण केले. आता औरंगाबादमध्ये तीन ऑफिसेस तर आहेतच; पण आता मोठ्या ऑफिसचं काम सुरू झालं आहे. 6 हजार स्क्‍वेअर फूटच्या जागेवर हे भव्य दीड करोडचं ऑफिस उभं राहत आहे. घरातून सुरू केलेला व्यवसाय प्रचंड कष्टाने वाढला आहे. यामुळे देशाच्या अर्थकारणालाही चालना मिळाली आहे.

त्यांच्या या कार्याची दखल भारत सरकारने घेतली आहे. तरुण उद्योजकांसाठी भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने पहिल्यांदाच सुरू केलेला ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार’ मनोज व अश्‍विनी कदम यांना जानेवारी 2017 मध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व राजीव प्रताप रुडी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी भारतातून 447 लोकांकडून नॉमिनेशन मागवण्यात आले होते. त्यानंतर सरकारचा ई-मेल आला की, तुम्ही शॉर्टलिस्टेड आहात; पण विजय अजून दूर होता. त्यानंतर सरकारची टीम त्यांना रात्री फोन करून प्रश्‍न विचारायची, व्यवसाय उभारणी आणि त्यांच्या ज्ञानाबद्दल खात्री करायची होती.

दोन-दोन तास हा प्रश्‍नोत्तरांचा कार्यक्रम चालत असे. मुळात हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार असल्यामुळे सरकारला व्यवस्थित खातरजमा करायची होती. हा पुरस्कार योग्य व्यक्तीच्याच हाती पडला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती आणि तो क्षण आला… मनोज कदम यांना ई-मेल आला, की पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे. तो ई-मेल पाहिल्याबरोबर त्यांना विश्‍वासच बसेना, की आपली निवड झाली आहे. त्यांनी पुन: पुन्हा तो ई-मेल पाहिला.

त्यानंतर मनोज कदम यांना उद्योजक निर्माण करणारा उद्योजक म्हणून ‘राजीव गांधी एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’ दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या हस्ते देण्यात आला. त्यानंतर पाठोपाठ चार पुरस्कार मिळाले. अश्‍विनी कदम यांना ‘ग्लोबल वुमन अचिव्हर अ‍ॅवॉर्ड’ व ‘सिलिकॉन इंडिया-टेन मोस्ट प्रॉमिसिंग कन्सल्टंट 2017’ हा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. त्याचबरोबर मनोज यांना ‘50 फास्टेस्ट ग्रोव्हिंग सीईओज इन इंडिया’ व ‘बेस्ट प्रोजेक्ट डिझाईन अ‍ॅण्ड प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंसी सर्व्हिसेस इन इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

इतकंच नव्हे तर दिल्लीमध्ये फुड प्रोसेसिंगसंदर्भात झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समक्ष तीन मिनिटांत आपले मत मांडण्याची संधी मनोज यांना मिळाली होती. या वेळी मोदी यांनी ‘अच्छा काम कर रहे हो, देश के लिये काम करो’ असा शुभाशीर्वाद स्वरुप संदेश दिला. महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमात मनोज कदम हे सर्वात तरुण उद्योजक होते.

तरुणांना उद्देशून मनोज कदम म्हणतात की, ‘तरुणांनी उद्योगात उतरले पाहिजे. नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा. धोका स्वीकारण्याची क्षमता तरुणांमध्ये अधिक असते म्हणून तरुणांनी व्यवसाय करावा.’ खेड्यात वाढलेल्या या तरुणाचे स्त्रियांबद्दलचे मत अत्याधुनिक आहे. ते म्हणतात की, स्त्रियांनी ‘चूल आणि मूल’ या संकल्पनेतून बाहेर पडण्याची गरज आहे. माझी बायकोसुद्धा सर्वसामान्य स्त्री आहे. तरीही ती माझ्यासोबत व्यवसायात आली आणि तिने करून दाखवलं. प्रत्येक स्त्रीने हा आदर्श घेतला पाहिजे.’

‘एस. व्ही. इंजिनीयरिंग अ‍ॅण्ड कन्सल्टंंसी सर्व्हिसेस’कडे आता सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अशा सर्व सेवा प्रदान करण्यासाठी तज्ज्ञ इंजिनीअर्सची टीम सज्ज असल्यामुळे त्यांचे सर्व प्रकल्प अतिशय गुणवत्तापूर्ण आणि योग्य वेळेत पूर्ण होतात. यामुळे ग्राहक संतुष्ट आहेत व काम वाढत आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आसाम, ओडिसा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांत त्यांचे प्रोजेक्ट सुरू आहेत. त्यांना जपान आणि टांझानिया या बाहेरच्या देशांतील कंपन्यांकडूनही कामे मिळत आहेत.

त्यांचं पुढचं ध्येय जगातील सर्वात मोठी कन्सल्टंसी होण्याचे आहे. त्याचबरोबर ते लवकरच फूड प्रोसेसिंगच्या व्यवसायात उतरत आहेत. एसव्हीएएम अ‍ॅग्रोफुडेक्स प्रा. लि. या कंपनीच्या उभारणीला सुरुवात झाली आहे. यातून दोनशे ते अडीजशे महिलांना रोजगार मिळेल. ते शेतकर्‍याचा मुलगा असल्यामुळे व शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठीच या व्यवसायात उतरत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, आज भारतात फूड प्रोसेसिंगमध्ये मागे आहे. फिलिपाइन्ससारखे देश 65 टक्के फूड प्रोसेसिंग करत आहेत आणि आपण भारतीय अन्न वाया घालवत आहोत. या व्यवसायामुळे भारतीय अर्थकारणाला चालना तर मिळणारच आहे, त्याचबरोबर रोजगारही उपलब्ध होणार आहे तसेच भारतातील अन्न वाचणार आहे.

या व्यवसायासाठी विद्यमान सरकारसुद्धा सकारात्मक असल्यामुळे ते इतरांनाही या व्यवसायात येण्याचे आवाहन करत आहेत. शेतकर्‍यांसाठी काही तरी करावं म्हणून या माध्यमातून ते शेतकर्‍यांना सहकार्य करणार आहेत, तसेच सेंद्रिय शेतीसाठी मदत करणार आहेत. फुड प्रोसेसिंगसाठी लागणारे रॉ मटेरियल शेतकर्‍यांच्या गटाकडून उगवून घेणार आहेत. यासाठी मोबाइल अ‍ॅपद्वारे शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येईल. ‘सक्षम अन्नदाता, विषमुक्त शेती, रोगमुक्त भारत’ हा उद्देश त्यांनी समोर ठेवला आहे.

कोणतेही काम केवळ स्वतःसाठी करू नये, तर समाजासाठी आणि देशासाठी करावे, अशी त्यांची धारणा आहे. आपल्या कामामुळे देशाचे भवितव्य ठरत असते. म्हणून ते प्रत्येक कार्य देशाला अर्पण या भावनेने करतात. यासोबत मनोज कदम सामाजिक जीवनातही सक्रिय आहेत. मुलींचे शिक्षण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नव-उद्योजकांना व तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी मार्गदर्शनसुद्धा करत आहेत.

अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊनही त्यांनी जी यशस्वी झेप घेतली आहे ती सर्वांसाठीच आदर्श ठरणारी आहे. त्यांचा हा जीवनप्रवास एखाद्या कादंबरीसारखा उलगडत जातो; पण ही कादंबरी केवळ मनोरंजक नसून प्रेरणादायीसुद्धा आहे.

संपर्क : मनोज कदम – 9881074051

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: