Advertisement
उद्योग कथा

१० x १० च्या जागेत सुरू केलेला व्यवसाय आज कोटींमध्ये वाचा सेन्सरमॅन म्हणून जगभर ओळख असलेल्या मनोज टेंबेंची यशोगाथा


दरमहा संपूर्ण ‘स्मार्ट उद्योजक’ मासिक मिळवा तुमच्या WhatsApp वर । वार्षिक वर्गणी फक्त रु. ८०

आजच वर्गणीदार व्हा : https://imjo.in/YSMSQK


इंजिनीअरिंगपर्यंत शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर चार वर्षं नोकरी केली. केवळ मार्केटिंग करत होतो. संपूर्ण महाराष्ट्र आणि वेस्टर्न region ला काम असायचं, फिरतीचं काम होतं. बोलायची सुरुवातीपासून आवड होती. त्यामुळेच माणसं जोडली गेली. संपूर्ण गुजरात पालथं घातलं. हार्डकोर मार्केटिंग मी करत होतो. दीड वर्षात संपूर्ण सेगमेंट त्यांनी मला दिली होती. संपूर्ण गुजरात. त्या कंपनीचाही सुरुवातीला बिझनेस काहीच नव्हता. मी तो बिझनेस दीड वर्षात १५ लाखांवर नेऊन ठेवला. त्यानंतर मला बंगळुरूला दीड महिन्यासाठी ट्रेनिंगला पाठवलं आणि मॅनेजर म्हणून नियुक्त केलं. बंगळुरूत कन्नड शिकलो. तो एक वेगळा चांगला अनुभव मिळाला. देशाच्या कानाकोपर्यात फिरायची माझी तयारी होती व फिरण्याची आवडही होती.


WhatsApp द्वारे ‘स्मार्ट उद्योजक’ वर्षभर मिळवा फक्त रु. ६० मध्ये : http://imojo.in/2eucnd


सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे वेल्डिंग मशीन होती. त्याचं मला काहीही ज्ञान नव्हतं. कॉलेजमध्ये असताना वेल्डिंग केलं होतं; पण त्याच्याबद्दल फारसं काही ठाऊक नव्हतं. पण काही तरी विकायचंच, एक सुरुवात करायची म्हणून हे विकायला सुरुवात केली. त्यातील एकही मशीन मी वर्षभरात विकू शकलो नाही. त्या वेळी मी उद्योग आणि नोकरी दोन्ही करत होतो. माझ्या बॉसला हे कळलं, त्या वेळी त्याने मला सल्ला दिला की, मनोज, उद्योग किंवा नोकरी दोन्हीपैकी एक काही तरी कर. मग मी त्याच क्षणी नोकरी सोडली आणि उद्योग करायचा निश्चय पक्का केला. त्या वेळी लग्नही झालं होतं. परिस्थिती खूप वाईट होती, पण काही विचार केला नाही. सरळ व्यवसायात उडी मारली. समोर फक्त एकच व्हिजन होतं ते म्हणजे मला ‘उद्योजक’ व्हायचं आहे.

लहानपणापासूनच माझं स्वत:चा व्यवसाय करायचं स्वप्न होतं. माझे वडील सरकारी नोकरी करत होते. आमच्या कुटुंबात कोणीही व्यवसाय केला नव्हता. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचं माझं स्वप्न होतं, त्यामुळे मी व्यवसायात उडी घेतली. ‘नोकरी कर. त्यातही सरकारी नोकरी कर’, अशी वडिलांची अपेक्षा होती. त्यांची मानसिकता नकारात्मक होती, पण अप्रत्यक्षरीत्या त्यांनीच मला पाठिंबा दिला. ऑर्डर मिळाली, पैसे नाहीत, तर त्यांनीच वेळोवेळी मदत केली. पण मला खूप मागे लागावे लागे. घेतलेले पैसे परत केले, की जेव्हा गरज पडायची तेव्हा ते द्यायचे. आजही मला पैशाची गरज पडल्यास वडिलांच्या पैशाची साथ असते.

हातात भांडवल काहीच नव्हतं. पाचशे रुपयांपेक्षाही कमी भांडवलाने मी व्यवसायाची सुरुवात केली. १० x १० चं छोटं ऑफिस घेतलं. सकाळी ऑफिसला जायचं, थोडा वेळ थांबायचं. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असं काही नव्हतं. फक्त एक टेलिफोन होता. त्या वेळी टेलिफोन डिरेक्टरी असायची, त्यातून वेगवेगळ्या कंपन्यांना फोन करायचे. अपॉइंटमेंट मिळवणं खूप जिकरीचं काम होतं. कोणी दिली तर प्रत्यक्ष भेटीला जायचो. सोबत फक्त व्हिजिटिंग कार्ड्स होती.


‘स्मार्ट उद्योजक’चे सर्व अंक (एकूण ३४ अंक) डाउनलोड करा फक्त रु. ३०० मध्ये : http://imojo.in/ei26fd


प्रथम मला जेव्हा मोठी ऑर्डर मिळाली तेव्हा मी बँकेत जाऊन माझं पी.पी.एफ. खात्यातून पैसे काढायला गेलो. तर दुबे म्हणून बँकेचे मॅनेजर होते ते म्हणाले, तू का पैसे काढतोस? मला ते कँटीनमध्ये घेऊन गेले आणि माझी विचारपूरस केली. त्या वेळी मी त्यांना सांगितले, मी सेन्सर ऑटोमेशन क्षेत्रात काम करतो. मला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. या क्षेत्राला भविष्यात खूप मागणी असणार. त्याला मरण नाही, हे ऐकून त्या मॅनेजरने के्रडिट विभागामधून एका व्यक्तीला बोलावले आणि यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व्हे करून ये, असे सांगितले आणि त्यांनी त्यानंतर विश्वास बसणार नाही, पण लगेच मला पाच लाखांचे कॅश क्रेडिट लिमिट मंजूर केले. मी माझे पी.पी.एफ. मोडायला गेलो होतो त्याऐवजी मला 5 लाखांचे सीसी मंजूर झाले होते. त्यातूनच मला आज बँकेत दीड कोटीपर्यंत सी.सी. लिमिट मिळू शकेल अशी तरतूद त्यांनीच माझ्यासाठी केली आहे. एकूणच बँकेनेही चांगले सहकार्य केले.

१५ ऑगस्टला जसा देश स्वतंत्र झाला तसं मीही १५ ऑगस्ट १९९० ला उद्घाटन केलं आणि ‘लीलावती इंजिनीअर्स’ म्हणून सुरुवात झाली. लीलावती हे माझ्या आईचं नाव. माझ्या वयाच्या अठराव्या वर्षी ती गेली. तिचा माझ्यावर खूप जीव होता. म्हणून कंपनीला तीचं नाव दिलं. या १५ ऑगस्टला कंपनीने आपला रौप्य महोत्सव पूर्ण केला.

नवीन असल्यामुळे बर्याच ठिकाणांहून नकार यायचा. माझी प्रथम विक्री झाली ती गोदरेज आणि ग्लॅक्सो कंपनीत. त्यांनी पहिल्यांदा मला जे बिल दिलं ते विक्री कर कापूनच. आमची कंपनी नोंदणीकृत नव्हती, त्यामुळे त्यांनी सांगितलं की नोंदणी करा अन्यथा काम मिळणं कठीण आहे. त्या वेळी विचार केला आपला सेल्स टॅक्स नंबर घ्यायचा. सेल्स टॅक्स रजिस्ट्रेशन मिळवले.

त्या वेळी मी स्कूटरवरून सकाळी पुण्याला निघायचो व रात्री मुंबईला परतायचो. अशा जवळजवळ शंभरेक फेर्या झाल्या असतील. तिथल्या काही प्रिन्सिपल कंपन्यांना भेट द्यायची. आपलेही नवीन प्रॉडक्ट सुरू करायचे, पण स्थानिक कंपन्या अनेकदा धोका देतात, असा वाईट अनुभव आला. तुम्ही त्यांचा व्यवसाय विस्तारून दिलात की ते तुम्हालाच बाजूला करून स्वत: सुरू करतात.

मग मी तेव्हा मनाशी ठरवलं, कोणत्याही स्थानिक कंपनीशी व्यवहार करायचा नाही. पुढे मी इम्पोर्ट (युरोपियन आणि जपानी) कंपन्यांशी व्यवहार करायला सुरुवात केली. ते आमच्या व्यवसायाबाबत प्रामाणिक असतात. तुम्हाला जी माहिती हवी ती वेळोवेळी देतात. तुमच्याकडे ते सकारात्मक भूमिकेतून पाहतात. आयातदार कंपन्यांपैकीही काही कंपन्या टार्गेट देतात. टार्गेट पूर्ण केलं नाही, तर त्या दुसरा वितरक शोधतात. अशांपैकी काही देश म्हणजे जर्मनी. त्यांना खूप जलद निकाल हवा असतो. तुम्ही जर निकाल देऊ शकला नाहीत, तर ते वितरक बदलतात. मग आपली मेहनत वाया जाते. म्हणून मी केवळ वितरण न करता सोबत कन्सल्टन्सी सुरू केली.

‘सेन्सरमॅन’ ही नवी ओळख

काय घ्यावे, कोणाकडून घ्यावे इत्यादींबाबत कंपन्यांना सल्ला द्यायचो. बरेच जण मित्र झाले होते. मग ते माझ्याकडे विविध सेन्सरची मागणी करायचे. मग मी ते मागवून त्यांना द्यायचो. मला इंडस्ट्रीमध्ये ‘सेन्सरमॅन’ असे नावच पडले. प्रथम माझी ही ओळख कॅडबरीत झाली. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असे अनेक मित्र जोडले गेले. फार्मसी, फूड इंडस्ट्री, पेप्सी, कोला, कॅडबरी इ. अनेक हिंदुस्थान लिव्हर, रेमन्ड. लोकांना अपेक्षा नसताना जास्त काही दिले, की आपोआप व्यवसाय वाढत जातो.

सुरुवातीपासून माझ्या बायकोची चांगली साथ लाभली. मी रात्री परतेपर्यंत साध्या इलेक्ट्रिकल टाइपरायटरवर सर्व लेटर्स टाईप करून तयार ठेवायची. क्वोटेशन, बिलं तयार करायची.

हळूहळू माणसं जोडायला सुरुवात केली. सुरुवातीला माझ्याकडे कोणी इंजिनीअर कामाला नव्हते, कारण १०x१० च्या खोलीत कोणी इंजिनीअर कामाला तयार नसे. जेमतेम आठवी ते दहावीपर्यंत शिकलेली मुलं-मुली माझ्याकडे येऊ लागली. सुरुवातीला त्यांना ट्रेन करणं, सेन्सर्सबद्दल सांगणं, मग कॉम्प्युटर्स आले. त्याच ट्रेनिंग देणं चालू होतं. असं करत प्रवास चालू केला. आताही माझ्याकडे बारा ते अठरा वर्षे जुने कर्मचारी कामाला आहेत. त्यांनी ही शून्यातून केलेली सुरुवात काही कोटींच्या घरात नेऊन ठेवली आहे. त्यांची आणि माझ्या पत्नीची तेव्हापासूनची साथ आत्ताही आहे. आम्ही डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये आय.एस.ओ. 9001 आणि क्रिसिल, स्मेरा, एम.एस.एम.ई., एन.एस.आय.सी. नोंदणी केल्यामुळे खूप फायदा झाला. तुमची सिस्टीम जर चांगली डेव्हलप झाली, तर संपूर्ण कामावर त्याचा फरक पडतो.

सुरुवातीचा काळ जो म्हणतो ना आपण म्हणजे दहा वर्षांचा काळ हा खूप खडतर होता. १९९४ पासून चांगला जम बसला, पण २००० मध्ये धक्का बसला तो एवढा मोठा होता की, या मधल्या काळात माझी २५ लाखांची ऑर्डर कॅन्सल केली. त्या वेळी माझी एकच कंपनी आणि एकच प्रॉडक्ट होते. आपण एका माणसासाठी एवढं जीव तोडून काम करतो आणि ती व्यक्ती अशी वागते यावर विश्वासच बसत नाही. मी त्याच वेळी घर घेणार होतो. त्याचे डिपॉझिट मला परत घ्यावं लागलं. त्या कंपनीची मॅनेजमेंट बदलली आणि त्यांनी स्वत:च काम करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मग मी माझे जुने कॉन्टॅक्ट वापरायला सुरुवात केली. त्यातून मग जर्मनी, इटली वगैरे. आता तर एवढ्या कंपन्या आहेत की, युरोपमधील चार ते पाच कंपन्या, जपानमध्ये चार ते पाच. भारतातील खूपच कमी कंपन्यांना मी हात घालतो. भारतात ज्या परदेशी कंपनी स्वत:च्या शाखा सुरू करताहेत त्या आम्हाला संपर्क करू लागल्या आहेत. आमचं तुम्ही मार्केटिंग करा. असं ते म्हणतायत. सध्याच लार्सेन अॅन्ड टुब्रोसोबत मीटिंग झाली. आता मी माझे नियम आणि अटी ठेवतो. ते पटत असल्यास मी काम करेन. मी तुमच्या अटींवर काम करणार नाही.

‘लिलावती ऑटोमेशन’चे व्हिजन २०२०

भविष्यात मला माझी कंपनीला आजच्यापेक्षा दहा पट पुढे न्यायचं आहे. माझी २०२० पर्यंत उलाढाल २० कोटींपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. माझ्या कंपनीचा प्रत्येक कर्मचारी, त्याचं कुटुंब आणि माझं कुटुंब यांना मला आनंदात पाहणं हेच माझं स्वप्न आहे. आता माझ्या व्यवसायात माझी मुलगीही सोबत जोडली गेली आहे. तिने एम.कॉम. आणि ‘वेलिंगकर इन्स्टिट्यूट’मधून एम.बी.ए. (एफ.एम.बी.) पूर्ण केले आहे.

गेल्या वर्षभरात माझा बिझनेस नेटवर्किंग या संकल्पनेशी परिचय झाला. सतीश रानडे या मित्रामुळे मी ‘मराठी इंटरनॅशनल क्लब’ या बिझनेस नेटविर्किंग क्लबशी जोडला गेलो. बिझनेस नेटवर्किंगच्या निमित्ताने अनेक नवे-जुने उद्योजक भेटतात. त्यांच्याकडून बरचं काही शिकायला मिळते. तसेच आपल्या अनुभवांचा आणि संपर्काचा त्यांना फायदा करून देता येतो. ‘दिल्यानेच वाढते’ हे खर्या अर्थाने बिझनेस नेटर्किंगमध्ये पाहायला मिळाले. सतीश रानडे, संदीप नेमळेकर, आनंद घुर्ये अशा कितीतरी चांगले मित्र नेटर्किंगमध्ये भेटले. अशांच्या साथीने माझे जे २०२० चे लक्ष्य आहे, ते नक्की पूर्ण होणार याची खात्री आहे.

– मनोज टेंबे
९८२००६२९०६
manoj@leelavati.com


Smart Udyojak | e-Magazines | All Issues


FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: