माणसं घडवणाऱ्याची गोष्ट

माधवराव भिडे यांनी सुरू केलेल्या सॅटर्डे क्लबने अनेक मराठी उद्योजकांना एकत्र येऊन उद्योगात प्रगतीची वाटचाल करण्याचे धडे दिले. माधवराव भिडे यांच्या 82 वर्षांच्या कारकिर्दीवर नुकतेच त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले.

हे आत्मचरित्र अनेक नवोदित उद्योजकांना प्रेरणादायी व मार्गदर्शन असे आहे. या आत्मचरित्राची ओळख करून देण्यासाठी कुमार केतकर यांची याला लाभलेली प्रस्तावना पुनर्प्रकाशित करत आहे.

माधव भिडे आणि माझा परिचय सुमारे 25 वर्षांचा आहे, म्हणजे तेव्हा नुकतेच ‘साठा’ उत्तरांची कहाणी पूर्ण करून एकसष्टीत आले होते. ते मला भेटले तेव्हा हा माणूस ‘साठी’चा नाही तर तिशीतला आहे असे वाटावे इतक्या प्रचंड उत्साहाने ते बोलत होते.

मी ‘डेली ऑब्जर्वर’ या अर्थविषयक इंग्रजी दैनिकाचा ‘रेसिडंट एडिटर’ ऊर्फ मुंबईचा स्थानिक संपादक होतो. आमचे सूर आणि मूड लगेच जुळले, कारण होते रेल्वे प्रवासाची आवड. तशी आमची जुजबी ओळख मी ‘इकॉनॉमिक टाइम्स’चा विशेष वार्ताहर होतो तेव्हा झाली होती.

त्यांच्या वडिलांच्या, नानांच्या स्मृतिदिन व शिष्यवृत्त्या वितरणाच्या एका कार्यक्रमाला मुख्य पाहुणा म्हणून त्यांनी मला बोलावले होते तेव्हा; पण त्या भेटीच्या वेळेस त्यांच्या वडिलांचे शिक्षणअध् यापनप्रेम हाच आमच्या गप्पांचा मुख्य विषय होता. (या आत्मचरित्रातून माधव भिडेंच्या वडिलांचे त्रिमितीयुक्त चित्र आणि चरित्र आपल्यासमोर उभे राहते.) म्हणूनच वर म्हटले की, आमचे सूर व मूड जुळले ते नंतर, म्हणजे रेल्वे प्रवासाविषयी आम्ही बोलू लागलो तेव्हा.

मी युरोपच्या दौर्याशवर जाणार होतो आणि ‘यूरेल’च्या संबंधात कुणाशी तरी फोनवर बोलत होतो. माझे फोनवरचे ते संभाषण संपताच भिडेंनी युरोप, तेथील रेल्वे आणि यूरेल या विषयावर लगेचच प्रवचन सुरू केले. ते प्रवचन-प्रबोधन सुमारे दोन तास चालू होते. ते बोलत होते – मी ऐकत होतो आणि अधूनमधून त्यांच्या प्रवचनातील काही माहिती-मुद्द्यांची नोंद करीत होतो. खरे म्हणजे त्यांच्या प्रवचनातून माझा एक युरोप-यूरेल दौरा बराचसा पूर्ण झाला होता!

प्रत्येक वास्तू आणि वस्तू, तेथील माणसं आणि त्यांची जीवनशैली, तेथील शहरांची वैशिष्ट्ये आणि तेथील प्रेक्षणीय स्थळे, रेल्वे प्रवासात लक्षात ठेवायच्या गोष्टी आणि मुख्य म्हणजे या सर्वांतून आनंदानुभव कसा घ्यायचा याचे प्रशिक्षण त्या दोन तासांत त्यांनी मला दिले होते. (त्यांचा या आत्मचरित्रातील एक मोठा भाग त्यांच्या विलक्षण रेल्वे प्रवासाच्या अनुभवांबद्दलचाच आहे. विशेष म्हणजे ज्यांना प्रवास व प्रदेश माहितीचा आहे, त्यांनाही त्या अनुभवातून पुन:प्रत्ययाचा आनंद मिळेल!)

तसे पाहिले तर या घडीला सुमारे अडीच कोटी अनिवासी भारतीय आहेत. अगदी आखाती-अरब देशांपासून अमेरिकेपर्यंत आणि आफ्रिकेतील अनेक देशांपासून ऑस्ट्रेलियापर्यंत सर्वत्र या ‘एन.आर.आय.’ ऊर्फ अनिवासी भारतीयांचे वास्तव्य आहे. अर्थातच युरोपातही; परंतु त्या त्या देशातील जीवनशैली आणि लांबचे वा जवळचे रेल्वे प्रवास, भिडेंनी जसे केले आहेत तसे फार जणांनी केलेले नाहीत. (कदाचित असे म्हणता येईल की, आता गेल्या 20-25 वर्षांत बर्याीच जणांनी केले असले तरी भिडेंनी जेव्हा युरोप पादाक्रांत केला तेव्हा तसा प्रवास केलेले वा करणारेही फारसे कुणी नव्हते.) भिडेंनी केलेले ते एक साहस होते असेच म्हणावे लागेल.

स्वत:च्या हिमतीवर, स्वत:चे पैसे खर्च करून, स्व-मार्गदर्शन घेऊन माधव भिडेंनी कशी योजना केली, ठिकठिकाणी त्यांच्या प्रदीर्घ रेल्वे अनुभवाचा त्यांना कसा लाभ झाला, जागोजागच्या रेल्वे व्यवस्थापनांनी भिडेंची कशी (रॉयल!) बडदास्त ठेवली, त्यांना विशेष (मोफत) पास देऊन प्रवास सुखाचा व सुलभ केला याचे वेधक वर्णन या आत्मचरित्रात आहे. (ते वाचताना मला वाटत होते की, या आत्मचरित्रात दोन ग्रंथ आहेत – एक जीवनप्रवासाचा आणि दुसरा रेल्वे प्रवासाचा. असो.)

माधव भिडेंचा जीवनप्रवासही अतिशय लोभस, जिव्हाळास संपन्न आणि आत्मविश्वाास परिपूर्ण आहे. त्यांचा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक व सदानंदी दृष्टिकोन आणि त्यांची मूल्ये व आदर्श याचे प्रगल्भ दर्शन यातून आपल्याला होते; पण त्यांच्या आत्मचरित्राला एक ‘नायिका’ही आहे. ती नायिका म्हणजे त्यांची आई.

माधवच्या जीवनाला दिशा दिली ती आईने, आत्मविश्वाभस आणि प्रेम दिले तेही आईने, दृष्टिकोन आणि तत्त्वज्ञानही दिले ते आईनेच; किंबहुना आई हीच त्यांच्या जीवनाची दीपस्तंभ आहे. (या पुस्तकाचे नाव ‘श्यामची आई’च्या चालीवर ‘माधवची आई’पण चालले असते.)

निदान पूर्वार्ध तर पूर्णत: आईमय आहे; पण उत्तरार्धातसुद्धा, अगदी युरोपच्या दौर्याेवर जातानासुद्धा आईचाच दृष्टिकोन व आशीर्वाद महत्त्वाचा ठरला. म्हणून पुस्तकाचा पहिला भाग ‘माधवची आई’ने व्यापला असला तरी उर्वरित भागही त्या आईच्या शिकवणीतून तयार झालेल्या माधवरूपी आविष्कारात आहे, असे म्हणता येईल!

माधव भिडेंनी त्यांच्या जीवनात आलेली सर्व जवळची (आणि काही दूरचीसुद्धा) माणसे इतक्या प्रभावीपणे रंगवली आहेत की, वाचताना ती सर्व माणसे आपलीही निकटची नातेवाईक होतात. मला तर वाचताना प्रत्येक व्यक्तिचित्र, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक गाव वा शहर – उरण असो वा इंदूर – प्रत्येक अनुभव आपलाच वाटू लागला होता – इतका जिवंतपणा त्यांच्या शैलीत व दृष्टीत आहे.

माधवची ही आत्मकथा त्याच्या स्वत:च्या जन्माअगोदरपासून सुरू होते. म्हणजेच वाचक एक प्रकारे त्यांच्या कुलवृत्तान्तातच प्रवेश करतो. महाराष्ट्रात एकूण ब्राह्मण उणेपुरे साडेतीन टक्के. त्यात चित्पावन फार तर अर्धा/पाऊण टक्का – म्हणजे जेमतेम! त्यात भिडे वंशावळ म्हणजे संख्याशास्त्राच्या भाषेत अत्यल्प.

पण माधव लिहितात ते पाहता संस्कार आणि वातावरण यांचा किती सखोल परिणाम होतो हे लक्षात येते. तसे भारतातील प्रत्येक माणसाला जातीचे कोंदण लाभतेच. काहींच्या नशिबी ते कोंदण जन्मापासून लाभकारक असते. काहींच्या नशिबी सामाजिक-सांस्कृतिक उपेक्षा येते. माधव जरी चित्पावन ब्राह्मण म्हणून जन्माला आले तरी लौकिक श्रीमंतीत नव्हे; परंतु शिक्षक वडील (ज्यांचा खरा संसार म्हणजे शाळा) आणि कर्तव्यदक्ष, कष्टाळू आणि काटकसरी आई – जिने चार भावंडांना चारित्र्यसंपन्न केले.

अगदी बालवयापासून हुशार व चुणचुणीत माधवने आपली चमक दाखवायला सुरुवात केली होती. माधवला ‘ग’ची बाधा झाली नाही आणि आत्मविेशासाचे रूपांतर औद्धत्यात झाले नाही याचे कारण आई. लोभ पैशाचा नाही तर माणसांचा. आकर्षण चंगळ-चैनीचे नाही, तर आदर्शांचे आणि कमालीची सहनशीलता असूनही आत्मकरुणेचे भांडवल न करता जीवनात रमण्याची शैली – ही आईची वैशिष्ट्ये.

किंबहुना असेही म्हणता येईल की, माधव भविष्यात प्रख्यात ब्रिज इंजिनीअर ऊर्फ ‘पूलतज्ज्ञ’ झाले त्याचीही सुरुवात वेगळ्या प्रकारे आईनेच करून दिली होती.

आईने माणसा-माणसांमध्ये, नातेवाईकांमध्ये, शेजार्यांनच्या नात्यांना जोडण्यासाठी जे पूल बांधले तोच संस्कार माधववर असावा. पूल बांधताना त्यांना पाया कधी कच्चा असल्याचे, काही खांब अशक्त असल्याचे, ‘मेटल’ कमी क्षमतेचे असल्याचे अनुभव आले. त्यावर मात कशी करायची याचेही प्रशिक्षण वेगळ्या संदर्भात आईनेच दिले होते. प्रत्येकाच्या जीवनात जसे चांगले अनुभव येतात तसे वाईटही येतात.

जशी चांगली माणसे येतात तशी विकृत, दुष्ट आणि खलनायकी माणसेही येतात. सहनही करावी लागतात ती माणसे – आणि अनेकदा गप्प बसून, अपमान गिळून, राग जिरवून! कोणत्याही परिस्थितीत पुलाचे संतुलन बिघडू द्यायचे नाही, आपल्याला त्रास झाला तरी आपल्या चारित्र्याचा खांब भक्कम ठेवायचा, हे शिक्षण माधवने आईकडून घेतले.

नानांचे, म्हणजे वडिलांचे संस्कार तितकेच खोल, पण वेगळ्या बाजाचे. त्यांचे ध्येय शिक्षणाचे होते. वेळप्रसंगी (म्हणजे बरेच वेळा!) कौटुंबिक गरजा व स्वास्थ्य याकडे दुर्लक्ष करून नानांनी शाळा वाढवल्या, विद्यार्थ्यांची ‘ज्ञान-सेवा’ केली, स्वत:चा मुलगा व इतर विद्यार्थी यात इतर विद्यार्थ्यांना झुकते माप दिले!

शिक्षणप्रसार व शिस्त याचा ध्यास इतका की, आय.सी.एस. कलेक्टरलाही त्यांनी अधिकारवाणीने चार शब्द सुनावले (आणि त्यानेही ते कृतज्ञतापूर्वक पाळले!) नानांच्या आयुष्यातही अडचणी व विकृत माणसे आली नाहीत असे नाही; पण त्यांची दृष्टी व ध्येय कधीही विचलित झाले नाही. खरे म्हणजे आई आणि वडील दोघेही प्रेमळ असले तरी दोघेही एकत्र राहूनही ‘एकला चलो रे’ वृत्तीने चालत होते.

याचे उदाहरण म्हणजे अतिशय विखारी व दुष्ट अशी काकू दिवसरात्र छळवादी दृष्टीने वागत असतानाही आईने कमालीची सहनशीलता दाखवली होती. (पुढे एकदा माधवनेच ती सहनशीलतेची मर्यादा, अति झाल्यावर ओलांडली आणि काकूला ‘सरळ’ केले – तेव्हा आईने नानांना फक्त इतकेच सुनावले की, तुम्ही जे एकदाही केले नाही ते माधवने तडफेने व न्यायबुद्धीने केले!) असो.

माधव ‘ब्रिज इंजिनीअर’ होण्याची मानसिक तयारी अशा रीतीने आईने घरातूनच करून घेतली होती. त्याचप्रमाणे पुलातील ‘मेटल’ कसे हवे याचा ‘वस्तुपाठ’ वडिलांच्या कमालीच्या सदसद्विवेकबुद्धी व ध्येयनिष्ठेतून माधवला मिळाला होता. म्हणून माधवने इंजिनीअरिंग कॉलेजला जाणे, तेथे कायम वरच्या क्रमांकावर राहणे, शिष्यवृत्त्या मिळवून आपले बौद्धिक तेज दाखवून देणे हे सर्व काही घरातल्या संस्कारातूनच झाले होते.

संस्कारांची ती नेपथ्यरचना सर्वांनाच लाभते असे नाही वा सर्वच ब्राह्मण वा इतर कुटुंबांत ती असते असेही नाही. सर्व जाती-जमाती-धर्मांत अशी कुटुंबे, अशा व्यक्ती, अशी जिद्द, अशी ध्येयनिष्ठा व अभिमान असलेली माणसे असतात.

माधवचा असा सर्वसमावेशक दृष्टिकोन लहानपणापासूनच होता. अगदी बालवयापासून त्याच्या मित्रवर्तुळात मुस्लीम मुले होती आणि इतर जातींमधली मुले होती. आई व वातावरण सावरकरवादी विचाराचे होते. खुद्द सावरकर जातपातीच्या पूर्ण विरोधात त्याचप्रमाणे ‘गाय हा उपयुक्त पशू’ असा विचार मानणारे, त्यामुळे पुढे माधवला मांसाहार घेताना फार मोठे मानसिक पूल ओलांडावे लागले नाहीत. मैत्र जोडताना आहार वा जात आडवी आली नाही.

किंबहुना म्हणूनच पहिल्या विवाहाचा पूल, पहिल्या पत्नीच्या निधनानंतर कोसळला; पण माधव ती वेदना मनात जिरवू शकले. पुढे काही वर्षांनी त्यांनी पुनर्विवाह केला, तोही एका स्वयंभू व कर्तबगार घटस्फोटितेबरोबर. फारसा गाजावाजा न करता माधव व त्यांची पत्नी.

डॉ. इरावती यांनी ते पुनर्विवाहित जीवन समाजालाच समर्पित केले आहे. इरावतीबाईंचा दवाखाना म्हणजे सामाजिक वैद्यकसेवा आहे. स्वत:चे आयुष्य व वृत्ती निर्लेप आहेत. माधव व डॉ. इरावती यांची विचार-वृत्तींची कुंडली इतकी जुळली आहे की, आकाशातील ग्रहताऱ्यांनासुद्धा स्वत:ची पुनर्मांडणी करावी लागली असेल!

माधवरावांच्या अनेक सामाजिक उपक्रमांत मी सहभागी झालो आहे. ते उद्योजकतेचा, भांडवली उद्योजकतेचा, नफा मिळवण्याच्या व्यापार-उदिमाचा प्रसार व प्रचार करतात, तरीही त्यांच्या ‘सॅटर्डे क्लब’ला मी ‘समाजवादी भांडवलशाही’ असेच संबोधतो. माधवच्या उद्योगशीलतेत जेवढे भांडवल, तंत्रज्ञान व नफा आहे तेवढाच सामाजिक दृष्टिकोन व सेवावृत्ती आहे. (ती पण आईचीच देणगी.)

माधवचा मित्रपरिवार अक्षरश: अचाट आणि अफाट आहे. अशा या अनोख्या, विलक्षण, साहसी, लोकसंग्रही ‘ब्रिज इंजिनीअर’ ऊर्फ सामाजिक सेतू बांधणार्याखचे हे आत्मचरित्र म्हणजे एक जीवनविषयक विचार आहे. आपल्याला अंतर्मुख आणि बहिर्मुख करू शकेल असा.

कुमार केतकर


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?