मराठी धंदे बंद पडण्याची कारणं

काल एका मित्राशी बोलणं झालं. आम्ही दोघांनी साधारण एकाच काळात जॉब सोडून स्टार्टअप सुरू केलेले. पार थकून गेल्यासारखा वाटत होता. स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये एक अलिखित नियम आहे हसरा-चेहरा बाळगत फिरण्याचं!

माझं स्टार्टअप आहे, आम्ही एकदम रॉकिंग फेजमध्ये आहोत, आमचे आकडे धमाकेदार घोडदौड करत आहेत. हे सतत भासवत राहावं लागतं. अर्थात, हे बहुतेक वेळा खरंच असतं; पण ते साध्य होत असताना येत असलेला तणाव दिसू देता येत नाही. हसरा चेहरा सतत मेंटेन ठेवणं मजाक नसतं. बिझनेस गोल्स साध्य करत असताना २४ तास मेंदू सतत तणावाखाली असतो, पण तो तणाव दिसू द्यायचा नसतो.

उद्योगात नव्याने मुसंडी मारणार्‍याने ती तयारी केलेलीच असते. त्रास तेव्हा अनावर होतो जेव्हा बिझनेस प्रेशरशिवाय इतर कटकटी सुरू होतात. नोकरी सोडून बिझनेस करायचा निर्णय घेताना हा मित्र घरी व्यवस्थित बोलला होता. पुढे दोन-अडीच वर्षे कठीण असतील.

मुव्हीज, शॉपिंग, हॉटेलिंग, ट्रॅव्हलिंग ही मध्यमवर्गीय हौस बाजूला ठेवावी लागेल. घरात इन्व्हॉल्व्हमेंट कमी असेल. ही सर्व कल्पना त्याने दिली होती, (मला हे माहितीये, कारण आम्ही दोघांनी ही पावलं एकमेकांशी चर्चा करत करतच उचलली होती.)

तेव्हा होकार देणारी फॅमिली आज मात्र सैरभैर झाल्यासारखी वागतेय. बायकोने तेव्हा दाखवलेला सपोर्ट बारा महिन्यांत उडून गेलाय. घरात सारखी किरकिर होतेय आणि हा रोज बिझनेस टार्गेट अचिव्ह करण्याच्या टेन्शनमध्ये.

त्याच्या प्रॉडक्टला प्रतिसाद उत्तम आहे, पण अपेक्षित होता तेवढा पैसा उभा राहात नाहीय. त्यामुळे बिझनेस प्लॅनिंग, फ्युचर अ‍ॅप्रोच सर्व काही बदलावं लागणार आहे. तो ती लढाई लढायला तयार आहे. मला पक्कं माहितीये; पण ही घरातली लढाई कशी लढेल? एकाच वेळी दोन फ्रंटवर कसं लढणार? ज्या सैन्याच्या जोरावर लढायचं होतं, ते सैन्यच कुरबुरी करत असेल तर साम्राज्य कसं उभं राहणार?

हा माझा मित्र एकदम रॉकस्टार आहे. ह्या अडचणीतून तो पुढे जाईल यात शंकाच नाही; पण अशा अडचणी अनेकांना येत असणार. त्यात किती तरी जण अडकून जात असणार ही कल्पना त्रासदायक आहे.

मराठी धंदे बंद पडतात त्याची काही महत्त्वाची कारणं

१) वरील उदाहरणात ‘बायको’ हा फॅक्टर आहे, परंतु नेहमी पत्नीचीच चूक असते असं नाही. एकूण कुटुंबाच्या सपोर्टची गरज असते, हा मूळ मुद्दा आहे.

२) दुसरा मुद्दा असा की, नोकरी सोडून व्यवसाय सुरू करणे हा खूप मोठा निर्णय असतो. तो सर्वांनी मिळून घ्यायचा असतो. जर भक्कम समर्थन देण्याची मानसिक तयारी नसेल, तर असा निर्णय घेण्याआधीच कुटुंबाने स्पष्ट सांगायला हवं. निर्णय घेतल्यावर मग मानसिक ताण देऊ नये. त्याने अपयशाची शक्यता वाढते.

३) कौटुंबिक समर्थन, घरातील वातावरण हे व्यवसायातील यश-अपयशामागच्या अनेक कारणांपैकी एक आहे. ‘केवळ’ यामुळेच अपयश येतं असा अर्थ अजिबात नाही.

४) एक तर स्वत:चा व्यवसाय करण्याची इच्छा कमी, इच्छा असेल तर कुटुंबाचं समर्थन नाही आणि समर्थन असेल तर केवळ होकार देण्यापुरतं पाठीशी उभं रहाणं नाही. असं सर्वसाधारण चित्र मराठी कुटुंबात दिसतं. या निरीक्षणावरून ‘मराठी धंदे बंद पडतात ते उगीच नाही’ हा निष्कर्ष आहे. जर ही परिस्थिती आता बदलत असेल तर सोन्याहून पिवळं. जर बदलत नसेल तर आपण बदलायला हवी, हे मात्र नक्की.

– ओेंकार दाभाडकर
(लेखक ‘इनमराठी डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे संस्थापक आहेत.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?