मराठी माणसा, उद्योगी हो…

आपण आपलं आयुष्य बर्‍याचदा नकारात्मक पद्धतीने जगत असतो. बरेच लोक पुष्कळ परिश्रम करतात; पण त्यांना यश येत नाही. असं का होतं? काही जण लगेच यशस्वी होतात, तर काही जणांना यशाचे शिखर चढणे कठीण होऊन बसते. यामागचं कारण काय आहे? याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

आम्ही काही सूत्रे तुमच्यापुढे ठेवणार आहोत. आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार होऊ शकतो. ही एक जादू आहे. या जादूचे रहस्य जर आपल्याला कळले तर आपलं जीवन सुखदायक होईल. आपण सुरुवात करू एका महामंत्राने. तो महामंत्र म्हणजे ‘अहं ब्रह्मास्मी’ म्हणजे मी ब्रह्म आहे.

या ब्रह्मांडात जी शक्ती आहे, ऊर्जा आहे, चेतना आहे, ते माझ्यातसुद्धा आहे. आपण जगाच्या पसार्‍याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल, हा एवढा मोठा जगाचा पसारा, त्यात अनेक देश आहेत, त्यापैकी आपण भारतात राहतो, भारतात अनेक राज्ये आहेत, त्यापैकी आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रात अनेक शहरं आहेत. समजा, आपण मुंबईत राहतो. मुंबईत कित्येक माणसं आहेत. त्यापैकी आपण एक.

केवढं मोठं हे जग? आणि या जगात आपण राहतो; पण आपण या जगाचा भाग आहोत. म्हणजे या जगात जे ब्रह्मतत्त्व आहे ते तत्त्व आपल्यातही आहे. म्हणून आपण सर्वात आधी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, मी कुणी तुच्छ नाही. मी ब्रह्म आहे. अहं ब्रह्मास्मी… आपण स्वतःला या विशाल जगाच्या पसार्‍यात महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. आपण स्पेशल आहोत. आपण अत्यंत महत्त्वाचे आहोत.

तुम्ही या जगात जन्म घेतला आहे. कारण तुम्हाला तुमच्या जीवनाचं सार्थक करायचं आहे. म्हणून आधी हा विचार मनात पक्का करा की, तुम्ही यशस्वी होण्यासाठीच जन्म घेतला आहे. या जगात येण्याचे काही तरी प्रयोजन आहे. तुम्ही उगाच इथे आलेले नाही. म्हणूनच स्वतःचा आदर करा आणि इतरांचाही आदर करा.

बर्‍याचदा होतं काय, की आपण यशस्वी माणसाबद्दल किंवा श्रीमंत लोकांबद्दल चुकीची समजूत करून घेतो. एखादा माणूस मोठा झाला तर तो काही ना काही वाईट कृत्य करतच मोठा झाला असेल किंवा कुणाची तरी हुजरेगिरी करत मोठा झाला असेल असे आपण गृहीत धरतो.

यशस्वी व श्रीमंत माणसाबद्दल आपण असूया बाळगतो. त्यामुळे आपण अप्रत्यक्षपणे पैशांबद्दल वाईट भाव मनात धरत असतो. पैसे नेहमी चांगल्या मार्गानेच कमवले पाहिजे; पण इतरांबद्दल काहीही माहीत नसताना आपण त्यांच्याबद्दल गॉसिप करत राहतो किंवा मनातल्या मनात त्यांना दूषणे देत राहतो.

यामुळे त्यांचं काही जात नाही; पण आपण मात्र अस्वस्थ होतो. आपलं मन नकारात्मकतेने ग्रासलं जातं. म्हणूनच मराठी माणसांनो, कुणाबद्दलही उगाच असूया धरू नका. लोकांकडे सकारात्मक नजरेनेच पाहा. लोक चांगले आहेत, अशीच भावना मनात ठेवा. लोकांबद्दल जर तुम्ही चांगला विचार करू लागलात तर तुम्हाला चमत्कारिकरीत्या बदल जाणवेल. लोक तुमच्याशी चांगले वागू लागतील.

मराठी माणूस आता खर्‍या अर्थाने जागा झाला पाहिजे. अर्थात जागा होणे म्हणजे काळाची गरज ओळखून आपण आपली आक्रमक शैली बदलून, ती आक्रमकता कामात दाखवली पाहिजे. कर्म हेच सर्वश्रेष्ठ आहे. आता मराठी समाज जागृत झाला पाहिजे. त्यासाठी मराठी माणसाने समाज म्हणून सकारात्मक भावना मनात रुजवली पाहिजे. तुमचा प्रत्येक दिवस चांगला जाऊ शकतो.

अर्थात आयुष्य म्हटलं की अडचणी आल्याच; पण या अडचणींना आपण अडचणी न म्हणता संघर्ष म्हटलं तर अडचणींचा प्रभाव थोडासा कमी होऊ शकेल. कारण आयुष्यात संघर्ष करावाच लागतो. जन्माला येण्याआधीपासून ते मरेपर्यंत माणूस संघर्षच करत राहतो. त्यामुळे संघर्ष हा जीवनाचा नियम आहे. आता आपण आपल्या दिवसाची सुरुवात आणि रात्री झोपताना काय करायला पाहिजे हे जाणून घेऊ.

आपला प्रत्येक दिवस स्मार्ट घालवण्यासाठी सकाळी उठल्यावर मी आजचा दिवस पाहिला यासाठी मी अत्यंत आभारी आहे असं म्हणा आणि रात्री झोपताना दिवसभरात ज्या ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. उदा. आज माझी क्लायंटसोबतची मीटिंग उत्तम झाली याबद्दल मी कृतज्ञ आहे, असे आपल्या प्रत्येक चांगल्या घटनांबद्दल म्हणा.

हे दररोज, न चुकता म्हटलं पाहिजे. काहीही झालं तरी खंड पडता कामा नये. कारण या गोष्टींसाठी तुम्हाला वेगळा वेळ खर्च करायची गरज नाही. झोपेतून उठल्यावर अंथरुणातच तुम्ही आभार मानू शकता आणि रात्री झोपण्यासाठी पहुडल्यावर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता.

आपण आतापर्यंत पाहिले की, स्वतःचा आणि इतरांचा आदर करावा. श्रीमंत, यशस्वी लोकांबद्दल वाईट बोलू नये. पैसे चांगले असतात यावर विश्वास ठेवावा. सकाळी उठल्यावर हा दिवस पाहिल्याबद्दल आभार मानावे आणि रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या चांगल्या बाबींबद्दल आभार मानावे. आज आपण लोकांना प्रभावित करण्याच्या किमयेबद्दल शिकणार आहोत.

तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या लोकांना प्रभावित करायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे कोण? तर ते तुमचे नातेवाईक असू शकतात, व्यवसायाशी निगडित लोक असू शकतात आणि मित्रही असू शकतात; पण आपण इथे व्यवसायाशी निगडित व्यक्तींबद्दल चर्चा करणार आहोत.

बर्‍याचदा काय होतं की, कोणत्या तरी कारणांमुळे आपले व्यावसायिक संबंध बिघडतात. आपण ज्या क्लायंटसना भेटायला जाणार असतो, तो आपल्यावर नाराज होतो किंवा आपलं प्रपोजल, प्रेजेंटेशन त्याला आवडत नाही. आपण खूप चांगली तयारी केलेली असते, दिवस-रात्र झटलेलो असतो. पण तरीही आपला क्लाईंट आपल्याला रिजेक्ट करतो?

असं का होतं? याचा आपण कधी विचार केला आहे का? आपण जर बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, आपण किती उत्तम तयारी केली तरी मनात कुठे तरी नकाराची घंटा वाजत असते.

मनात कुठे तरी आपल्याला भीती वाटत असते. मी या क्लायंटला भेटायला चाललोय, तो जर मला नाही म्हणाला तर? माझं प्रेजेंटेशन, माझी ऑफर त्याला नाही आवडली तर? माझ्या आधीच्या क्लायंटलासुद्धा माझं प्रपोजल आवडलं नव्हतं. अशा अनेक नकारघंटा वाजवणार्‍या प्रश्नांचं काहूर आपल्या मनात माजत असतं. एखाद्या व्यवसायिक मित्राशी आपले चांगले संबंध असतात, पण अचानक ते बिघडतात. ते का बिघडतात?

आपण स्वतः किंवा तो कुणी तरी परस्पराबद्दल नकारात्मक विचार करायला लागतो. हा माणूस चांगला नाही. याचा हा स्वभाव मला आवडत नाही. काय समजतो काय स्वतःला? असे नकारात्मक विचार मनात येतात आणि पाहतो काय, पुष्ट असलेले संबंध अचानक बिघडतात.

या सर्व गोष्टींचे मूळ आपल्या मनात असते. आपले मनच आपल्याला खात असते. म्हणून अशा गोष्टी आपण टाळाव्यात. नकारात्मक विचार करणे आपण आधी बंद केले पाहिजे. ते सहजासहजी होणार नाहीत हे खरे आहे; पण नकारात्मक गोष्टींचा विरोध करायचा असेल तर सर्वात सोपी आणि महत्त्वाची पद्धत म्हणजे सकारात्मकता निर्माण करणे; सकारात्मक विचार, कृती करणे. सकारात्मक कृती करायची म्हणजे काय हे आपण पुढे पाहणार आहोत.

सर्वात आधी ज्यांच्याशी आपले संबंध बिघडले आहेत व आपल्याला बिघडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करायचे आहेत अशा व्यक्तींची यादी बनवा; परंतु यादी ५ पेक्षा अधिक लोकांची नसावी. जर यादी मोठी असेल तर आपल्याला आपल्या स्वभावाचा विचार करावा लागेल. आपले कुणाशीच पटत नसेल तर मात्र प्रसंग मोठा कठीण आहे असे समजा. असो. आपण आपल्या मुद्यावर येऊ. तर कमाल ५ जणांची यादी तयार करा.

त्यांचे फोटो तुमच्या समोर असतील तर एका निवांत ठिकाणी बसून ते फोटो समोर ठेवा आणि तुमचे संबंध का बिघडले याचे कारण सांगा व मी यासाठी क्षमस्व आहे आणि मला तुमच्यासारखा मित्र गमवायचा नाही, मला तुमच्याशी पुन्हा संबंध प्रस्थापित करायचे आहेत असे फोटोसमोर बोलत राहा. एका वेळेला एकच फोटो घ्या.

दुसरा सराव असा करा की, एक तक्ता बनवा. ज्यांच्याशी संबंध बिघडले आहेत त्यांचे नाव एका बाजूला लिहा, दुसर्‍या बाजूला त्यांच्याशी संबंध का तुटले हे लिहा, तिसरीकडे मी तुम्हाला क्षमा करीत आहे असे लिहा. चूक तुमच्याकडून झाली असेल तर मी तुमची क्षमा मागतोय असे लिहा. जर एखाद्या व्यक्तीशी आपल्याला कधी संबंध तोडायचे नसतील, ती व्यक्ती अत्यंत महत्त्वाची असेल, तिच्यामुळे तुम्हाला कामे मिळत असतील तर त्या व्यक्तीचा फोटो समोर धरा.

त्या व्यक्तीमुळे तुम्हाला कोणती मदत झाली आहे हे बोला आणि त्याबद्दल आभार माना. त्याच प्रकारे या प्रकरणातही तक्ता बनवता येईल. एका बाजूला नाव लिहा. दुसर्‍या बाजूला कशा प्रकारे मदत झाली आहे लिहा आणि तिसरीकडे आभारी आहे असे लिहा.

जर तुम्ही एखाद्या क्लायंटला भेटायला जाणार असाल तर भेटायला जायच्या आधी एका कागदावर किंवा डायरीत लिहा की, मी आता माझ्या क्लायंटला भेटायला जाणार आहे. त्याला माझे प्रपोजल आवडेल आणि तो मला कामे देईल. माझा प्रत्येक क्लायंट माझ्या कामामुळे खूश असतात व मला अनेक कामे देतात. सर्व क्लायंटसोबत माझे संबंध चांगले आहेत. आम्ही एकमेकांचा आदर करतो.

हा सराव करून पाहा आणि आम्हाला खात्री आहे की, तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल दिसून येईल. जर असे चांगले बदल झाले तर आम्हाला नक्की कळवा. पुढच्या लेखात काही तरी वेगळी कियमा शिकू या…

– जयेश मेस्त्री

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?