मराठी भाषा ही सधन भाषा आहे ती या भाषेतील साहित्यामुळेच. आपण आजकाल अनेक चर्चासत्रे ऐकतो- मराठी भाषा टिकली पाहिजे त्यासाठी मुलांना मराठी शाळेत पाठवले पाहिजे, पण एखाद्या भाषेचा खरा प्रसार होतो तो त्या भाषेतील साहित्यामुळे, पुस्तकांमुळे.
काही वर्षांपूर्वी मराठी पुस्तके मिळवणे हे खूपच कठीण काम होते, कारण मराठी भाषेतील पुस्तके ही फक्त पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर अशा काही निवडक शहरांमधील निवडक दुकानांमधेच उपलब्ध होती. मग अशा परिस्थितीत मराठी साहित्याचा भाषेचा प्रसार कसा होणार? लहान मुलांनी मराठी पुस्तके वाचलीच नाहीत तर त्यांना मराठी भाषेचे महत्त्व कसे समजणार.
सुहास शिरवाळकर, रत्नाकर मतकरी यांच्या गूढ कथा कित्येक इंग्रजी कथांपेक्षाही सरस आहेत, पण हे समजण्यासाठी आपण ही पुस्तके वाचली पाहिजेत आणि त्यासाठी ही पुस्तके उपलब्ध झाली पाहिजेत. या एकमेव संकल्पनेतून ‘मराठीबोली डॉट कॉम’ची निर्मिती झाली.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
मी स्वप्निल समेळ. मी संगणक तंत्रज्ञ आहे आणि माझा मित्र सुमित खेडेकर हा वाणिज्य शाखेचा पदवीधर राहणार खोपोली, त्यामुळे अभ्यासाची पुस्तके सोडून इथल्या दुकानांमध्ये काहीच मिळत नाही. ही समस्या फक्त खोपोलीची नव्हती ही महाराष्ट्रातील अनेक छोट्या शहरांची अथवा गावांची समस्या होती. म्हणूनच आम्ही मराठीबोली डॉट कॉमची निर्मिती करण्याचा निश्चय केला. ते साल होते सन २०११.
तेव्हा मी ‘बायर इंडिया’ या कंपनीमध्ये ठाण्याला नोकरी करत होतो, त्यामुळे खोपोली ते ठाणे रोजचे जाऊन येऊन पाच तास प्रवासात जायचे, त्यामुळे वेळ खूपच कमी होता, तरी हे संकेतस्थळ म्हणजे एक जुनून होता. त्यामुळेच वेळेचा किंवा पैशांचा अडथळा मध्ये आला नाही. उद्दिष्ट एकच होते मराठी वाचकांपर्यंत मराठी पुस्तके पोहोचवणे.
मी संगणक अभियांत्रिक असल्याने संकेतस्थळ बनवणे तसे काही अवघड काम नव्हते, पण अवघड कामे सुरू झाली. त्यानंतर सर्वप्रथम आम्ही वकिलाच्या मदतीने पार्टनरशिप डीड बनवली. त्यानंतर नगरपालिका कार्यालयाकडून दुकानाची नोंदणी केली, आमचे तसे कधीच दुकान नव्हते, पण ही नोंदणी आवश्यक होती.
आता संकेतस्थळ तयार होते आणि सर्व सरकारी कामेपण झाली होती, प्रश्न होता पुस्तके? मग आमच्या पुण्यातील प्रकाशकांकडे फेर्या सुरू झाल्या. काहींनी मदतीचे आश्वासन दिले तर काहींनी फक्त छापील पुस्तकांची सूची हातात दिली. दोन-तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये आम्ही एकूण 5 हजारहून अधिक पुस्तके आणि दहाहून अधिक प्रकाशक मराठीबोलीशी जोडले.
शेवटी तो दिवस ठरला ११-११-११. म्हणजेच ११ नोव्हेंबर २०११ रोजी खोपोलीतील ऋशीवन या एका नामांकित हॉटेलमध्ये खोपोलीतील शंभर मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते मराठीबोली डॉट कॉमचे उद्घाटन करण्यात आले. प्रसिद्ध शिव व्याख्याते प्रशांत देशमुख हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
फक्त २० हजार रुपयांच्या भांडवलावर मराठीबोली डॉट कॉमची निर्मिती करण्यात आली होती. मराठीबोली डॉट कॉम हे ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर आधारित असल्याने आमची जाहिरात आमचे ग्राहकच करत होते. पहिल्या सहाच महिन्यांमध्ये आम्ही गुंतवलेल्या भांडवलाएवढा नफा आम्ही मिळवला आणि पूर्णपणे स्वयंपूर्ण संकेतस्थळ सुरू झाले.
‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.
मराठीबोलीमधून मिळवलेला नफा पुन्हा संकेतस्थळासाठीच वापरण्याचे आम्ही ठरवले आणि २०१४ मध्ये मराठीबोलीला पुन्हा एकदा नवीन रूपात नवीन तंत्राच्या मदतीने अद्ययावत करण्यात आले. दरम्यानच्या कालावधीमध्ये मराठीबोली डॉट इन हे मराठी लेखकांसाठी असलेले संकेतस्थळ आणि त्यानंतर मराठीब्लॉग्स डॉट इन हे मराठी ब्लॉगर्ससाठी असलेले संकेतस्थळ आम्ही सुरू केले.
अनेक मराठी ब्लॉगर्सना त्यांच्या ब्लॉगमधून उत्पन्न कसे मिळवावे याचे विनामूल्य मार्गदर्शन मराठीब्लॉग्स डॉट इनमार्फत करण्यात येते. लवकरच मराठीबोली डॉट कॉमवर ५० हजारहून अधिक मराठी पुस्तके उपलब्ध करून मराठी पुस्तकांचे सर्वात मोठे ऑनलाइन संकेतस्थळ सुरू करण्याचा आमचा मानस आहे.
आता तुम्ही म्हणाल नफा मिळवायचा नव्हता तर व्यवसाय कशाला सुरू करायचा? तर याला माझे उत्तर असेल नफा कमावणे हे आमचे उदिष्ट नव्हते आणि नसेल, पण जेव्हा तुम्ही एक उंची गाठता तेव्हा नफा कमावण्याचे अनेक पर्याय तुमच्यासमोर उभे राहतात. पहिल्या दिवसापासून नफ्याचा विचार केला तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
आज ‘मराठीबोली’ जाहिरातींच्या माध्यमातून नफा मिळवत आहे, त्यामुळे मराठी पुस्तके सर्वात कमी दरात मराठी वाचकांपर्यंत पोहोचवणे हे उद्दिष्ट असूनदेखील मराठीबोली नफ्यामध्ये आहे. लवकरच आमचे कपड्यांचे ऑनलाइन दुकान सुरू होत आहे.
नवीन उद्योजकांना एवढेच सांगेन, तुमचे उद्दिष्ट नक्की ठेवा. नफा कसा होणार याचा विचार आता नको. आधी उद्दिष्ट गाठा, नफा होणारच. जे काही कराल त्यामध्ये काही तरी वेगळे करा. इतर उद्योजक जे करत आहेत तेच तुम्ही केलेत तर तुमच्यात आणि त्यांच्यात फरक तो काय? तुमचा त्यांच्यासमोर टिकाव कसा लागणार? म्हणूनच स्वत:ची आयडियाची कल्पना घेऊन या, उद्योगात नक्कीच विजेते व्हाल.
– स्वप्निल समेळ
९०४९३४७३४७४
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.