आजचे युग हे बदलांचे, नवनव्या शोधांचे युग आहे. आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञान यामुळे उद्योग-व्यवसाय करण्याच्या पद्धतीत जगभरात कमालीचे बदल झालेले दिसतात. Today Idea is capital! मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, अॅपलचे स्टीव्ह जॉब्स आणि फेसबुकचे झुकेरबर्ग यांनी उद्योजकता ही मोजक्या लोकांची मक्तेदारी नाही हे आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. उद्योजकतेची परिभाषा त्यांनी पुरती बदलून टाकली आहे. उद्योजक बनण्यासाठी कुठल्याही विशिष्ट धर्माचे वा विशिष्ट प्रदेशातील असण्याचीही गरज नाही. थोडक्यात आजच्या काळात उपयुक्त पडेल असे ज्ञान कल्पकतेने कृतीत आणू शकलात तर कुणीही एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो.
आजच्या तरुणांना इंटरनेटमुळे प्रत्येक क्षेत्राची जगभरातील माहिती उपलब्ध आहे; नव्हे आज माहितीचा महापूरच आला आहे. म्हणूनच त्यांच्या विचारांना एक निश्चित दिशा दिसते. स्वतः काही तरी करण्याची मनीषा दिसते. त्यातच सेवा क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत. म्हणूनच आजच्या तरुणांचा नोकरी करण्यापेक्षा काही तरी स्वतः निर्माण करण्याकडे कल दिसतो.
या क्रांतिकारी बदलाला एक नेमकी दिशा मिळावी यासाठी ‘रोल मॉडेल’ ठरलेल्या नवउद्यमींचा आदर्श तरुण पिढीसमोर ठेवत त्यांच्यात उद्योजकीय मानसिकता निर्माण करण्याचे काम गेली पाच वर्षे ‘मॅक्सेल फाऊंडेशन’ व्यापकतेने करत आहे. २०१२ साली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रख्यात कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांच्या पुढाकाराने आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या उपस्थितीत ‘मॅक्सेल’चा पाया रचण्यात आला. लोकांकडून जे मिळते ते पुन्हा लोकांकडेच जायला हवे… हा जे. आर. डी. टाटा यांचा विचार या संकल्पनेचा मुख्य प्रेरणास्रोत!
‘मॅक्सेल’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योग आणि कॉर्पोरेट जगतात आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने यशाची शिखरं गाठणार्या मान्यवरांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी ‘मॅक्सेल अॅवॉर्ड्स’ म्हणजेच महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलंस अॅवॉर्ड्सची संकल्पना पोतदार यांनी मांडली. या उपक्रमाला जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, लार्सन टुब्रोचे ग्रुप सी.ई.ओ. व संचालक वाय.एम. देवस्थळी, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, निवृत्त न्यायाधीश अरविंद सावंत, ज्येष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट शैलेश हरिभक्ती, बोईंगचे उपाध्यक्ष दिनेश केसकर व अमेरिकेतील उद्योगपती सुनील देशमुख असे संचालक मंडळ लाभलेले आहे.
सुरुवातीपासूनच सर्वांच्या केंद्रस्थानी बनलेला हा उपक्रम दरवर्षी मोठ्या दिमाखात पार पडतो. उद्योजकता क्षेत्रात स्वबळावर वेगळे मानदंड प्रस्थापित करणार्या मान्यवरांचा जाहीर गौरव करून ‘मॅक्सेल’ एक प्रकारे आजच्या तरुणांमध्ये उद्योजकीय चैतन्य फुलवण्याचे काम करीत आहे.
सुरुवातीपासूनच सर्वांच्या केंद्रस्थानी बनलेला हा उपक्रम दरवर्षी मोठ्या दिमाखात पार पडतो. उद्योजकता क्षेत्रात स्वबळावर वेगळे मानदंड प्रस्थापित करणार्या मान्यवरांचा जाहीर गौरव करून ‘मॅक्सेल’ एक प्रकारे आजच्या तरुणांमध्ये उद्योजकीय चैतन्य फुलवण्याचे काम करीत आहे.
अर्थात मॅक्सेल म्हणजे संस्था नाही, की निव्वळ एक पुरस्कार सोहळाही नाही. तर मराठी विश्वातील उद्योजकतेचा उज्ज्वल वारसा पुढच्या पिढीसमोर ठेवून दूरदृष्टी आणि कल्पक प्रयोग करणारे भावी उद्योजक घडवण्यासाठी झटणारी ही एक उद्योजकीय चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला खतपाणी घालण्याचे महत्त्वपूर्ण काम यातून आपोआपच घडते आहे.
‘मॅक्सेल’चे संस्थापक नितीन पोतदार याविषयी विस्ताराने सांगतात,
“मॅक्सेल पुरस्कारांचा अर्थ आणि उद्दिष्ट थोडक्यात सांगायचे झाल्यास ‘One recognition, billion inspiration’ असे म्हणता येईल.
लोकांना केवळ निरीक्षण करण्यास प्रवृत्त करण्यापेक्षा अंतर्मुख बनवणे हा आमचा हेतू आहे. एका व्यक्तीचा सन्मान केला तरी त्यामध्ये आणखी लक्षावधी जणांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य असते, असे आमचे ब्रीदवाक्य सुचवते. केवळ प्रोत्साहन या एकाच गोष्टीच्या आधारे यश खेचून आणता येत नाही. प्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांनी म्हटले आहे की, विद्वान किंवा प्रतिभाशाली व्यक्तीच्या यशामागे प्रोत्साहनाचा वाटा केवळ एक टक्का असतो, बाकी ९९ टक्के त्याच्या मेहनतीचे फळ असते.
मॅक्सेलच्या चळवळीची ही नुकतीच सुरुवात आहे. जास्तीत जास्त लोकांसाठी आणखी बरेच काही करण्याची गरज आहे. पण त्यासाठी मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग आणि प्रयत्न आवश्यक आहेत. भांडवल, सहयोग, ब्रँडिंग अशा अनेक विषयांवर भर देता येईल. आमचे याकडे बारकाईने लक्ष असून योग्य वेळी आम्ही एक एक विषय निश्चित समोर आणू.”
‘मॅक्सेल’चे उपक्रम
पुढील पिढीने ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेचा पुरेपूर लाभ घ्यावा यासाठी एक-‘इको सिस्टीम’ निर्माण करणे हे मॅक्सेल फाऊंडेशनचे व्हिजन आहे. या दृष्टीने मॅक्सेलने तीन कलमी अजेंडा हाती घेतला आहे. यातील पहिला म्हणजे एक्सप्लोरिंग आंत्रेप्रीनरशिप-तरुणांमधील उद्योजकतेचा शोध घेण्यासाठी मुंबई विद्यापीठातील लाइफ लाँग लर्निंग अॅण्ड एक्सटेंशन यांच्या सहकार्याने ‘मॅक्सेल’ने तो प्रत्यक्ष अमलात आणला. विशेष म्हणजे पहिल्या वर्षातच मुंबई व ठाणे जिल्ह्यातील तीस कॉलेजेसमधील बाराशे विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचला. यामुळे विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करणे, कल्पकता दाखवणे आणि उद्योगाच्या बाबतीतील कल्पना प्रत्यक्षात आणणे यात मदत झाली. त्याचा पुढचा टप्पा म्हणून पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, कोल्हापूर आणि रत्नागिरी, कोकण विभाग अशा महाराष्ट्राच्या इतर भागांतही याचा विस्तार करण्यात येत आहे.
उद्योजकतेसाठी अभ्यासक्रम हा आहे दुसरा अजेंडा.
त्याचाच भाग म्हणून या वर्षी ‘मॅक्सप्लोअर-No Syllabus! No teacher’चा श्रीगणेशा करण्यात आला. त्यामागची पार्श्वभूमी सांगताना पोतदार म्हणतात, “२०२० पर्यंत भारत जगातील सर्वात तरुण देश असेल. एकीकडे देशातील हजारो शैक्षणिक संस्थांमधून दरवर्षी ३० लाख विद्यार्थी कला, वाणिज्य आणि शास्त्र या विषयांत पदवीधर होतात आणि हजारोंच्या संख्येने इंजिनीअर, डॉक्टर आणि शास्त्रज्ञ तयार होतात, त्यातील अनेक मात्र बेरोजगार राहतात किंवा आवश्यक ते कौशल्य किंवा क्षमता त्यांच्याकडे नसल्याने ते रोजगारास पात्र असत नाहीत.
आपल्या बेरोजगारीच्या प्रश्नाचा आपण नीट तपास केला तर पाठ्यपुस्तकांतून विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच उद्योजकतेचे धडे मिळणं गरजेचे आहे असे लक्षात येते. मात्र भारतात उद्योजकतेचे धडे देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम किंवा पुस्तक नसल्याची खंत अनेक दशकांपासून होती. जरी आपण पुस्तक तयार केलं तरी त्याला प्रशिक्षक शिक्षक कसे मिळणार, हा प्रश्न होताच.
‘मॅक्सप्लोअर’ या प्रक्टिकल प्रोजेक्ट बेस्ड पुस्तकाच्या निर्मितीतून त्याला ठोस उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.”
या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख व ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांच्या हस्ते झाले होते. इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून तयार केलेले हे पुस्तक पुणे-मुंबईस्थित ठराविक शाळांमध्ये निःशुल्क वाटली जात आहे. मॅक्सप्लोअर प्रोजेक्ट पूर्ण करणार्या निवडक मुलांसाठी ‘एअरबस’ कंपनीतर्फे अभ्यास-सहलीचे आयोजन करण्याचा ‘मॅक्सेल’चा मानस आहे.
तिसरा अजेंडा आहे उद्योग खात्याबरोबर उपक्रम – शिक्षणव्यवस्था व उद्योगजगत यांचा एकमेकांबरोबर निकटचा संबंध असणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यभर इंटर्नशिप प्रोग्रॅम सुरू होणे गरजेचे आहे. यामुळे बहुविध चांगल्या गोष्टी घडतील; विद्यार्थ्यांना थेट कौशल्य शिकण्याची संधी मिळेल, त्यांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि उद्योगजगताला प्रशिक्षित/कौशल्यपूर्ण मनुष्यबळ मिळेल. मॅक्सेल फाऊंडेशन उद्योग खात्याच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या इंडस्ट्रियल लॉअंतर्गत इंटर्नशिप अॅक्टचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे.
येणारं शतक ज्ञानाधिष्ठित सेवा क्षेत्राचं!
उद्योजकीय विकासाच्या दृष्टीने आगामी काळाचा वेध घेताना पोतदार म्हणतात,
“येणारं शतक हे ज्ञानाधिष्ठित सेवा क्षेत्राचं असणार आहे.”
१९५० साली देशाच्या जीडीपीत सर्व्हिस सेक्टरचा वाटा फक्त १५ टक्के होता, तो गेल्या वर्षी म्हणजे २०१० साली ५६ टक्के इतका झपाट्याने वाढला आहे. त्यात रियल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी (हॉटेल्स, टुरिझम), आयटी, मीडिया व एण्टरटेन्मेंट (टीव्ही चॅनेल्स, चित्रपट ते इव्हेंट मॅनेजमेंट), कम्युनिकेशन व पब्लिक रिलेशन्स, वित्तीय सेवा (बँकिंग, इन्शुअरन्स) आणि रिटेल (शॉप्स, मॉल) अशा सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सर्व्हिस सेक्टरच्या क्षेत्रात बुद्धिमत्ता आणि कौशल्य हेच मोठं भांडवल असतं.
सुदैवाने आपल्या मराठी समाजात शिक्षणाला आपण जास्त महत्त्व देतो; त्यात टेक्निकल ज्ञान असणार्यांनी जर एका महत्त्वाकांक्षेने पावले टाकली तर नक्कीच ते मोठं यश मिळवू शकतात. आता नुसतं डॉक्टर आणि इंजिनीयरच्या पदव्या घेऊन नोकरीसाठी परदेशी जाण्यापेक्षा इथं राहून सर्व्हिस सेक्टरमध्ये स्वत:चं अस्तित्त्व निर्माण करायला पुढे आलं पाहिजे. नोकरी मागणारे हात तयार करण्यापेक्षा नोकरी देणारे हात निर्माण करण्याकडे आपला कल असला पहिजे आणि ते आजच्या युगात शक्य आहे.”
प्रोग्रेसिव्ह थिंकिंग आणि अॅग्रेसिव्ह मार्केटिंग
मराठी उद्योजकांना मोठं होण्याचा कानमंत्र देताना नितीन पोतदार शेवटी म्हणतात, “व्यवसायात यशस्वी होण्यासाठी प्रोग्रेसिव्ह थिंकिंग आणि अॅग्रेसिव्ह मार्केटिंग केल्याशिवाय पर्याय नाही. मोठ्या यशासाठी ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार करता आला पाहिजे. तसेच भांडवल पाहिजे, मार्केटिंगला मदत पाहिजे, ब्रॅण्ड पाहिजे, पण पार्टनर नको, ही मानसिकता बदलावी लागेल. येणार्या काळात जिथं आपण कमी पडू तिथं इतरांकडून सहकार्य घेण्याची मनाची तयारी ठेवावीच लागेल. त्याचबरोबर इंटरनेटच्या मदतीने आपला प्रांत आणि देश सोडून जगाची बाजारपेठ शोधणे तितकेच गरजेचे आहे.
उद्योजकीय चैतन्य फुलवणारा ‘Explorer’
‘मॅक्सेल’ या तरुणांमध्ये उद्योजकीय मानसिकता जागवणार्या चळवळीचे प्रणेते म्हणजे नितीन पोतदार. गेली पाच वर्षे पुण्या-मुंबईशिवाय महाराष्ट्रभर मॅक्सेलच्या माध्यमातून उद्योजकीय तरुण पिढी घडवण्याचे मोलाचे काम करीत आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा थोडक्यात परिचय.
कमर्शिअल लॉयर या क्षेत्रात मराठी माणसाची मान उंचावणारं व्यक्तिमत्त्व म्हणून नितीन पोतदार यांची खास ओळख आहे. कॉलेजमध्ये शिकत असतानाच वकिलीत करीअर करायचे हे नितीन पोतदार यांनी पक्के ठरवले होते. रुईया कॉलेजमधून १९८७ मध्ये बीए (इकॉनॉमिक्स) केल्यानंतर गव्हर्न्मेंट लॉ कॉलेजमधून त्यांनी वकिलीची सनद मिळवली व पुढे ते १९९१ मध्ये सॉलिसिटर झाले.
‘क्रॉफेड अॅण्ड बेली’ फर्ममध्ये त्यांना कामाची पहिली संधी मिळाली.
तिथे तब्बल दहा वर्षांच्या काळात त्यांनी कमर्शिअल लॉयर होण्याचे सगळे हातखंडे आत्मसात केले. यानंतर ‘अमरचंद मंगलदास’ फर्ममध्ये भागीदार म्हणून काम केले. आज ते ‘जे. सागर असोसिएट्स’मध्ये वरिष्ठ भागीदार आहेत. ‘जे. सागर’ ही भारतातील सगळ्यात मोठी दुसरी फर्म आहे. साठ भागीदार आणि तीनशे वकिलांची भारतातील एक अग्रगण्य लॉ फर्म म्हणून तिची खास ओळख आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरूसह दुबईत तिच्या शाखा कार्यरत आहेत.
गेल्या चोवीस वर्षांपासून पोतदार यांनी जगातील मोठमोठ्या मल्टिनॅशनल कंपन्यांना भारतीय कंपन्यांबरोबर आर्थिक, तांत्रिक, ब्रॅँडिंग वा उद्योगाला लागणारे तत्सम करार व परदेशी कंपन्यांना भारतात उद्योग सुरू करण्यासाठी लागणारा व्यावसायिक व कायदेशीर सल्ला देण्याचे काम यशस्वीपणे केले आहे. नितीन पोतदार ‘गांधी फिल्म फाऊंडेशन’चेही अध्यक्ष आहेत.
काही तरी नवीन करून दाखवण्याची जिद्द बाळगणार्या तरुण उद्योजकांसाठी नितीन पोतदार ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकमत’, ‘दै. सकाळ’ अशा विविध वृत्तपत्रांतून नियमित मार्गदर्शनपर स्तंभलेखन करत असतात. आपल्या www.myniti.com या ब्लॉगवरही ते आपल्या उद्योजकीय विचारांचा गुणाकार मांडत असतात.
कळेल ती भाषा, मिळेल ते काम, पडेल ते कष्ट तेव्हाच होईल.. जय महाराष्ट्र!
हे ब्रीद असलेले त्यांचे ‘प्रगतीचा एक्स्प्रेस वे’ हे पुस्तकदेखील आवर्जून नमूद करावे असे. उद्योगाचा शुभारंभ, भांडवल उभारणी, बिझनेस नेटवर्किंग, यशाचं गमक, ह्युमन रिसोर्स, उद्योगाचा वारसदार अशा अनेक प्रश्नांकडे बघण्याचा मराठी माणसांचा दृष्टिकोन आणि मानसिकता कशी असते आणि त्यावर नेमकं काय करायला पाहिजे याचं उत्तर शोधण्याचा आणि तो सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न पोतदार यांनी या पुस्तकाद्वारे केला आहे. यशासाठी राइट टर्न घ्यायचा असेल तर उद्योजकांप्रमाणेच प्रत्येक होतकरू तरुणाने हे पुस्तक वाचायला हवे असेच आहे.
– प्रतिभा राजपूत
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.