कोल्हापुरातली एक सामान्य तरुणी झाली दुबईची ‘बिझनेस अचिव्हर’

महेक ही कोल्हापूर शहरात सामान्य मुस्लीम कुटुंबात जन्माला आलेली तरुणी. वयाच्या सतराव्या वर्षी तिला लग्न करून पुण्याला जावं लागलं. लग्नाच्या वेळी ती बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षाला होती. लग्न झालं तरी तिला आपलं शिक्षण पूर्ण करायचं होतं. तेव्हा त्या समाजात मुलींच्या शिक्षणाला तितकं प्राधान्य दिलं जात नव्हतं, त्यामुळे तू आता शिकून काय करणार?

असे प्रश्न तिला सगळीकडेच विचारले जायचे; तरीही तिच्या मनात शिक्षण आणि स्वतःच्या करिअरबद्दल एक ज्योती सदैव तेवत होती. त्यामुळे ती नुसती घरी बसू शकली नाही. तिने डिस्टन्सद्वारे आपलं उर्वरीत शिक्षण पूर्ण केलं आणि ती पदवीधर झाली.

घर, नवरा आणि संसार एवढंच सुरुवातीला महेक यांचं जग होत. मात्र लग्नाच्या तेरा वर्षांनंतर त्यांना कौटुंबिक कारणांमुळे अर्थार्जन करण्याची आवश्यकता भासली. या तेरा वर्षांत फक्त मुलं आणि घर सांभाळली त्यामुळे आता नोकरी म्हणून तरी आपण काय करणार? आपल्याला तर मुलं संभाळण्याशिवाय येतंच काय?

अशा विवंचनेत असूनसुद्धा त्यांनी पुण्यात नोकरीसाठी मुलाखती द्यायला सुरुवात केली. इंग्रजीची अडचण, शिक्षणानंतर तेरा वर्षांचा अवकाश अशा अडचणी असल्या तरी त्यांनी जिद्द सोडली नाही आणि त्यांना एका आयटी कंपनीमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी मिळाली.

आता महेक विलासकुमार कक्कर या मागे राहणाऱ्या नव्हत्या. त्यांनी स्वतःचं इंग्रजी सुधारलं. व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला. उत्तम करिअरसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्या शिकू लागलय. नवऱ्याची नोकरी जिथे जिथे, महेकचाही प्रवास तिथे तिथे. नवरा नोकरीनिमित्त मुंबईला आला.

महेकना मुंबईत शैक्षणिक संस्थेत नोकरी लागली. एका इन्स्टिटयूटच्या त्या कोर्स कोऑर्डिनटर झाल्या. तिथेच त्यांच्या दुबईमधल्या उज्ज्वल व्यवसायाचं बीज रुजलं.

पुढे नवऱ्याच्या बदलीमुळे महेक आणि कुटुंबाला दुबईला शिफ्ट व्हावं लागलं. दुबईमध्ये येऊनही महेक वर्क फ्रॉम होम पद्धतीने मुंबईच्या इन्स्टिटयूटमध्ये नोकरी सांभाळून होत्या. पण पुढे दुबईत स्वतःची इन्स्टिटयूट सुरू करावी, असा विचार त्यांच्या डोक्यात आला.

नवऱ्याच्या मित्रांनी गुंतवणूक करण्याची इच्छा दाखवली, पण महेकला स्वतःचं विश्व स्वतःच्याच हिंमतीवर उभं करायचं होतं. बचत केलेल्या पैशातून त्यांनी दुबईमध्ये Prime Easy Learn Training Institute (PELTI) ची स्थापना केली.

तंत्रज्ञान आणि सॉफ्ट स्किल्समध्ये लागणारे जवळजवळ सर्व प्रकारचे कोर्सेस Prime Easy Learn Training Institute मध्ये शिकवले जातात. यामध्ये महेकची भूमिका शिक्षिकेची नाही तर एका उद्योजिकेची आहे. त्या विद्यार्थ्यांना स्वतः शिकवत नाहीत, तर वेगवेगळे विषय शिकवण्यासाठी त्यांनी ट्रेनर नियुक्त केले आहेत. त्या फक्त व्यवसायाचा डोलारा सांभाळतात आणि त्याच्या वाढीकडे लक्ष देतात.

कोल्हापूर शहरात एक पारंपरिक मुस्लीम कुटुंबातून सुरू झालेला महेक यांचा प्रवास त्यांना दुबईमधील एक प्रतिथयश महिला उद्योजकपर्यंत घेऊन आला. त्यांनी दुबईनंतर शारजाह येथे आपल्या इन्स्टिटयूटची दुसरी शाखा सुरू केली आहे.

दोन्ही शाखांमध्ये १२ ट्रेनर सध्या कार्यरत आहेत आणि हजारो विद्यार्थी विविध कोर्सेस करून बाहेर पडले. २०१७ साली महेक यांना दुबईमध्ये ‘बिझनेस अचिव्हर्स’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.

मूळच्या कोल्हापूरकर असल्यामुळे महेक यांचं कोलापूर शहरावर आणि तिथल्या लोकांवर खूप प्रेम आहे. कोल्हापूरच्या तरुण मुलींना त्यांचं आवाहन आहे की त्यांनी नवनवीन गोष्टी करण्यामध्ये कच खाऊ नये. हिम्मतीने स्वतःच्या पायावर यशस्वी व्हाव. पुरुषांबद्दलही मुलींच्या मनात एक भीती असते. ती मनातून काढून टाकून खुल्या मानाने जगात वावरावं आणि स्वतःची प्रगती करावी.

महेक यांना त्यांच्या उद्योजकीय प्रवासात पती, मुलं आणि आईवडिलांचा मोलाची साथ मिळाली. मुलं मोठी झाल्यामुळे त्या आता कामावर जास्त लक्ष केंद्रित करू शकत आहेत. त्यामुळेच त्यांनी अबुधाबी, मुंबई आणि कोल्हापूर अशा तीन ठिकाणी नवीन शाखा सुरू करण्याची योजना करून त्यावर काम सुरू केलं आहे.

कोल्हापूरातली एक तरुणी ते दुबईमधील यशस्वी उद्योजक असा महेक विलासकुमार कक्कर यांचा प्रवास फक्त कोल्हापूरकरांसाठीच नाही सर्वच मराठी वाचक आणि विशेषतः महिला यांच्यासाठी प्रेरणादायी आहे.

संपर्क : +971567312942
Email: mahek@easylearnuae.com
Website: www.easylearnuae.com

Author

  • हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण घेऊन २००७ साली पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार, असा विचार करून यावर उपाय म्हणून २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

    View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?