स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
नोकरीचा इतका कंटाळा आला आहे, बॉसची आरडाओरड, कामाचं प्रेशर, टार्गेट, घरी आल्यावर घरचं बघा, प्रवासात म्हणाल तर ही तोबा गर्दी, वाढणारा खर्च जीव मेटाकुटीला आला आहे. पण सांगताय कोणाला हा घराचा इएमआय आहे ना! माथ्यावर लिहिलेलाच आहे करतोय काय? करा काम नुसतं काम नाही तर १२-१४ तास काम व भरत बसा इएमआय. त्यासाठीच जन्म आपला. हा संवाद मनात म्हणा किंवा मित्रांच्या घोळक्यात म्हणा नेहमीच ऐकायला येतो.
काही उपाय आहे का यावर?
आहे. नक्कीच आहे, पण त्यासाठी या विषयाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. पण यासाठी वेळ कोणाकडे आहे? इथेच सर्व चुकत. जास्त उशीर न करता सरळ मुद्यावर येऊ. तुम्हीसुद्धा गृहकर्जाने त्रस्त आहात का?
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
कर्ज घेणे चांगले की वाईट हा वादाचा विषय आहे व तो प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. पण 20-25 लाख खिशातले मोडण्यापेक्ष्या काही वेळा कर्ज घेणे नक्कीच फायदेशीर ठरते. हे 20-25 लाख जमा करायला आपल्याला 10-12 वर्षे गेलेली असतात. अर्थात तुम्हाला तसे मासिक उत्पन्न असल्यास.
आपण साधारण किती कर्ज घेतले व इएमआय किती येतोय हेच बघत आलो आहोत, पण कर्ज कालावधीत व्याज किती जाते, हे पाहतो का? सुरुवातीच्या काळात इएमआयमध्ये मुद्दल किती व व्याज किती हे आपण बघतो का? अनेकांना तर व्याजदर किती हेही माहीत नसते, ही शोकांतिका आहे.
उदाहरण म्हणून 30 लाखांच कर्ज आपण 30 वर्षांसाठी साडेसात टक्के व्याजाने घेतले असेल तर त्याचा इएमआय 20 हजार 976 रुपये येईल व यामध्ये आपण घेतलेल्या मुद्दलीपेक्षा 45 लाख व्याज देतोय.
या आकडेवारीकडे आपण दुर्लक्ष करतो व इएमआयच्या जाळ्यात अडकतो. बाजूच्या रकान्यात हे दिले आहे. इएमआय कमी हवा म्हणून आपण कर्ज परतफेडीचा कालावधी जास्तीत जास्त घेतो व या जाळ्यात आणखी अडकतो. आपण 30 लाखांसाठी 75 लाख मोजत आहोत तेही 30 वर्षे इएमआयचे जोखड घेऊन.
याला काही उपाय आहे का?
नक्कीच आहे. हा उपाय सांगण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करू ईच्छितो की हे उपाय प्रत्येकालाच लागू पडतील असे नाही. पण प्रयत्न सगळे करू शकतात. तसेच 30 टक्के आयकर भरणार्यांचे आर्थिक गणित वेगळे असू शकते.
आता या कर्जाच्या इएमआयची आपण फोड करूया बघूया खरी गंमत त्यात आहे. कर्ज घेतले इएमआय सुरू झाला आता दुसर कोष्टक आपण बघू ज्यात इएमआय काय म्हणतोय.
रु. 20,976 इएमआयमध्ये सुरुवातीचे काही महिने किंवा वर्षे रु. 2,200 ते 2,400 मुद्दल आहे व व्याज साधारण 18 हजार रुपयांच्या आसपास आहे. सुरुवातीला साडेसात टक्के दिसणारे व्याज प्रत्यक्षात काही महिने बघाल तर 8 पट जास्त पैसे व्याजात जाते. काय यावर काय उपाय?
पार्ट पेयमेंट (हा पर्याय योग्य, अयोग्य हा वादाचा विषय आहे. मागे सांगितल्याप्रमाणे 30 टक्के कररचनावाल्यांसाठी याचे नियम वेगळे असू शकतात.) हो पार्ट पेयमेंट. कर्ज काढल्यावर तुम्ही मोठ्या रक्कमेची गुंतवणूक 5 टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने किंवा धोका पत्करून गुंतवणूक करत असाल तर थांबा. कारण 5 टक्के व्याजने काही होणार नाही, कारण तुम्ही कर्ज समजा 7 टक्के घेतले आहे.
तर किमान 8/10 महिने इएमआय 8/9 महिनाभरचा घरखर्च, आपत्कालीन खर्च बाजूला ठेवून कुठेही गुंतवणूक न करता कर्जाच्या पार्ट पेयमेंटवर लक्ष केंद्रित करा. कर्जाचे साधे गणित आहे, जेव्हा तुम्ही पार्ट पेयमेंट म्हणून काही रक्कम जमा करता, तेव्हा तुमच्या कर्जाच्या मुद्दलीतून सरळ ती रक्कम वजा होते. थोडक्यात मुद्दल कमी झाली तर त्यावरील व्याज कमी झाले.
आपण असे गृहीत धरू की दोन महिन्यात तुम्हाला 50 हजार रुपये मिळाले. तर ही रक्कम बचत खाते, मुदत ठेव, विमा असे कुठेही न गुंतवता सरळ कर्ज खात्यात भरून मुद्दल कमी करा. याने काय होईल?
याने तुमची मुद्दल 50 हजार रुपयांनी कमी होऊन 29 लाख 50 हजार होईल. आता तक्यात बघा 29 लाख 50 हजार म्हणजे कुठे पोहचलो आपण? बरोबर ऑक्टोबर 2022 मध्ये. म्हणजे आपले किती महिने कमी झाले. मोजून बघा? जवळपास 20 महिने कमी झाले.
आलं का लक्षात? आपला इएमआय किती 20,976 20 (महिने कमी झाले) = 41,9520. हे कसं झाले तर आपण ते 50,000 कुठेही गुंतवणूक न करता आपल्या मुद्दल कमी करण्याकरता वापरली व त्याचा फायदा असा झाला की 20 महिने कमी झाले. आहे की नाही गंमत!
हा लेख अशांसाठी आहे, जे इएमआयला कंटाळले आहेत, ज्यांना त्यातून बाहेर पडायचे आहे, घरी एकटे कमावणारे आहेत, जबाबदारी आहे. थोडक्यात अशाप्रकारे आपण ठरवून आपले कर्ज 30 च्या ठिकाणी 20 वर्षात संपवले तर झाली सुटका. अशक्य असे काहीच नाहीये त्यासाठी थोडा अभ्यास करणे आवश्यक आहे. चला गरजेचे पैसे ठेवून इतर पैशांनी कर्ज फेडणे आधिक चांगले हे आपण बघितले, पण आता खरी सुरुवात इथून होणार.
आपली दहा वर्षे कमी झाली म्हणून खुशीत मांडे न खाता आपण आता सावध व्हायला हवं. कर्ज तर संपलं मग आता? इएमआयच्या पैशाने मजा, मस्ती करायची का? तर बिलकुल नाही, कारण आपण योग्य निर्णय घेऊन कर्ज संपवलं आहे त्यामुळे कर्ज जरी संपलं असलं तरी कर्ज सुरू आहे असे गृहीत धरून तुम्ही इएमआयचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.
लेख थोडा तांत्रिक आहे, पण दोन-तीनदा वाचला तर नक्की लक्षात येईल. लेखात दिलेले समीकरण सर्वांनाच लागू पडेलच असे नाही. तक्त्यामधील आकडेवारी उदाहरण म्हणून वापरली आहे प्रत्यक्षात थोडीफार वेगळी असू शकते. गुंतवणूक म्हणून कुठलाही प्रकार सुचवत नाही आहे. एक सर्वसामान्य व्यक्ती इएमआयच्या जाळ्यातून मुक्त व्हावी व त्याची भरभराट व्हावी ही माफक इच्छा आहे.
– दीपक जोशी
संपर्क : 9967072125
(लेखक म्युच्युअल फंड वितरक आहेत.)
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.