ध्येय साध्य करण्यासाठी गरजेचे आहे नियमितता व वक्तशीरपणा


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


एकदा आपण आपले ध्येय ठरवले व त्याचा आराखडा तयार केला की, नियमितपणे व सातत्याने त्यावर काम करत राहणे अत्यंत गरजेचे असते. तुमचे एक वर्षाचे ध्येय १०० वस्तू विकणे असेल, तर महिन्याला ८-१० वस्तू तुम्ही विकल्या पाहिजेत, म्हणजेच, ३-४ दिवसांत तुम्ही एक वस्तू विकली पाहिजे.

इथेच संबंध येतो नियमितता व वक्तशीरपणाचा! आता जर तुम्ही आळस, कंटाळा, सुस्ती वा इतर कारणांनी चालढकल केली, तर तुमची ती पहिली एक वस्तू विकली जाणार नाही, मग महिन्याचं कामही पुरं होणार नाही व त्यामुळे वर्षाचं ध्येयही गाठलं जाणार नाही.

हे होत असताना काम न झाल्यामुळे निराशा, भीती वाढत जातात व नंतर हे काही आपल्याला जमणारच नाही, असेही वाटायला लागते. इथे इतर गोष्टींत उत्साह दाखविणारं, धावपळ, मेहनत करणारं शरीर तेच असतं, पण केवळ मनानं न ठरविल्यामुळे तुम्ही ते करत नाही व मागे पडता आणि ही सवयही वर्षानुवर्षं आपल्यात भिणलेली असते.

ती सवय बदलण्याचा प्रयत्न आपल्या मनालाच ठरवून करावा लागतो. म्हणून, हेच ध्येय ठेवून, मनावर काही संस्कार करून, त्याचा निर्धार करून, शिस्तीने काही सवयी लावून घेऊन, या वक्तशीरपणाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवायला हवा.

चालढकल करून करायची कामे पुढे ढकलण्याच्या आपल्या सवयीने आपण जीवनाच्या बर्‍या्च क्षेत्रांत नुकसान झाल्याचे अनुभवले आहे ना?

छोट्या वेळेचा उपयोग त्या वेळी करणे. गरजेचे असलेले काम न करण्यापासून या सवयीची सुरुवात होते. नंतर करू, मग करू, होईल ना ते, अशा विचाराने, अतिशय निरुपद्रवी व सौम्य स्वरूपात या आजाराची सुरुवात होते. हळूहळू हा आजार जीवनाच्या अनेक क्षेत्रांत पसरतो. आरोग्य, शिक्षण, व्यवसाय, नातेसंबंध, आर्थिक प्रगती या व अशा अनेक ठिकाणी, केवळ वेळच्या वेळी कामे न केल्याने, पुढे मोठ्या समस्या उभ्या राहतात.

उदा. घर दररोज साफ न केल्याने बराच कचरा, पसारा व अडगळ होते, व्यायामाचा कंटाळा करून वजनावर ताबा न ठेवल्याने गंभीर आजार होतात, अभ्यास न केल्याने मार्क मिळत नाहीत व हवी तशी संधी मिळत नाही, वाचन किंवा संभाषण कला आत्मसात न केल्याने व्यक्तिमत्त्व विकास होत नाही, बचत न केल्याने पैसे उरत नाहीत, ग्राहकाकडून

ऑर्डर मिळवायची खटपट व पाठपुरावा न केल्याने ती ऑर्डर आपण गमावतो, विजेचे किंवा फोनचे बिल वेळेवर न भरल्याने दंड भरावा लागतो, कर्जाचा हप्ता वेळेवर न भरल्याने दंड भरावा लागतो व पुढे गाडी किंवा घरावर जप्ती येते, घरची कामे वेळेवर न केल्याने घरच्यांकडून बोलणी खावी लागतात, मित्र व नातेवाईक यांची वेळीच चौकशी व विचारपूस न केल्याने संबंध दुरावतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

तुम्हीही आज जे २०, ३०, ४०, ५० वर्षांचे असाल व प्रामाणिक विचार करून लिहून काढलेत, तर तुम्ही वेळेवर कामे न केल्याने झालेल्या नुकसानाची यादी करू शकाल. प्रथम, आपल्याला स्वत:ला हे पटले पाहिजे की, आपल्या कामातील व कर्तव्यातील सातत्य न ठेवण्याने आपले नुकसान झाले आहे, होत आहे व त्याला आपण स्वत:च जबाबदार आहोत.

अर्थात, हे नुकसान थांबवायचे असेल वा भरून काढायचे असेल, तर आपल्या मनालाच कामाला लावायला हवे. या प्रश्नाचेही उत्तर आपल्या मनातच आहे व ते शोधून काढून आपल्यालाच त्यावर दर मिनिट, तास, दिवस व महिने काम करावे लागेल.

तुमचं मन ध्येयाने प्रेरित केलं की, ते मन आणि तुम्ही ध्येय कधीही विसरत नाही. तुमच्या आराखडा व नियोजनानुसार तुमच्या एकंदर वर्षाच्या ध्येयापैकी, या महिन्यात, आठवड्यात व आज काय करायचे आहे, ते तुम्ही करायलाच पाहिजे. ते केल्याशिवाय तुम्ही दुसरे काहीही करता कामा नये. या ठरवलेल्या कामापासून विचलित करणारी दुसरी कामे, प्रलोभने, आकर्षणे तुम्ही निश्चयाने टाळायला हवीत. अशा वेळेला नाही म्हणायला तुम्ही शिकले पाहिजे.

तुमचं ध्येयासाठी ठरवलेलं आजचं, आत्ताचं काम हेच तुमचं प्रथम प्राधान्य असलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही तुमच्या उद्योगात ठरविलेली कामे वेळेवर होतील, जसे की, ग्राहकांशी ठरलेल्या वेळी भेट घेणे, तुमच्या उत्पादनाची आखणी व त्याची अंमलबजावणी, पैशांची महिनावार आवश्यकतेप्रमाणे व्यवस्था, जनसंपर्क वगैरे.

तुम्ही दिवसभर हाच विचार केला पाहिजे की, मी आज करायचं ठरविलेलं किंवा करू शकतो असं काम शिल्लक राहिलेलं नाही ना? ते काम सोडून मी दुसरंच काही करत नाही ना? माझ्या वेळेचा मी योग्य वापर करत आहे ना? इतर गप्पा, अवांतर भेटीगाठी, नाहक मनोरंजन, भूतकाळ किंवा भविष्यकाळाचा विचार, आठवणी, चिंता यात रमणे, दिवास्वप्ने बघणे, मजा मारणे, झोप अशा अनेक कारणांनी आपण चालढकल करतो.

वक्तशीरपणासाठी या सर्व गोष्टी टाळायला हव्यात. हे सर्व करूनही काही आणीबाणीच्या प्रसंगी आपले वेळापत्रक आपल्याला बदलायला लागू शकते, पण, आपण ठरविलेली कामं जशी जास्त करायला लागतो, तशी आणीबाणीची कामंही कमी कमी होत जातात, कारण आपण सतत मनाने बघत असलेलं चित्र प्रत्यक्षात येऊ लागतं. मग, ज्या गोष्टी आपण मनाने बघत नाही, त्यावर विचार करत नाही, त्या घडतही नाहीत!

लिखित ध्येयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुम्हाला जे साध्य करायचे आहे, ते सर्व बारकाव्यानिशी तुम्ही लिहून किंवा चित्राच्या स्वरूपात बनविले, सर्व आवश्यक आकडेमोड, तपशील लिहिला, तर तुमच्या मनात शंका, भीती, काळजी राहात नाही. तुमचा तुमच्याच ध्येयावरचा विश्वास वाढतो.

तुम्ही जेव्हा ते परत वाचता, विचार करता, तेव्हा त्याबाबत काम करण्यात नियमितता व सातत्य असण्याची सवय तुम्हाला लागते. टाळाटाळ, आळस, कंटाळा, चालढकल या सवयी कमी होतात. तत्परतेने तुम्ही तुम्हाला ध्येयाकडे नेणार्‍या गोष्टी करता, सतर्क राहता. जशी कामं उरकतात तसा तुमचा उत्साह आणखी जास्त वाढतो.

तुम्हाला दिलेल्या वेळेत काय करायला प्राधान्य द्यायला हवे हे लक्षात येते व तुम्ही वायफळ गोष्टींपासून दूर राहता, त्यांना तुमच्या मनात स्थान देत नाही. कोणतेही काम करताना अडचण आली तर ध्येयवादी माणूस त्या अडचणीतून मार्ग काढतो, तो समस्येचा फेरविचार करतो, आल्या परिस्थितीत ध्येयाच्या दिशेने कोणते पाऊल उचलता येईल ते उचलतो. तो खचून जात नाही, थांबून राहत नाही किंवा जमलं तर करू, असेही म्हणत नाही. तो, ते करणे जमवतोच.

जे काम ज्या वेळी करायचे ठरविले असेल ते कोणत्याही परिस्थितीत करायचेच, असे जास्तीत जास्त वेळा करणे, एवढेच करायचे असतेे. असे करण्याची सवय ही स्वत:ची स्वत:शी असलेली बांधीलकी व वचनबद्धता आहे. ती पाळणे, यशस्वी होण्यासाठी व ध्येयपूर्तीसाठी आवश्यक आहे. अशा तर्हे ने यशस्वी होणारा माणूस, चालढकल करण्यावर मात करतो.

तुम्ही क्रिकेटचा खेळ पाहता. खरं म्हणजे बरेच जण आपलं साध्य करायच्या ध्येयाचा बळी देऊनही टी.व्ही.वर क्रिकेटचे सामने पाहात असतात, पण त्यातूनही ध्येयासाठी वक्तशीरपणा, नियमितता व सातत्य कसे महत्त्वाचे आहे, हे शिकण्यासारखे आहे. कसोटी सामन्यांमध्ये काही निर्धाव षटके टाकलेली आपण पाहतो.

त्यापेक्षा कमी निर्धाव षटके पन्नास षटकांच्या सामन्यात टाकली जातात व २०-२० सामन्यांत तर अभावानेच एखादे निर्धाव षटक दिसते. असे का होते? त्याचप्रमाणे कसोटीमध्ये तर Run Rate चा उल्लेखही होत नाही, ५० षटकांच्या सामन्यांत तो महत्त्वाचा असतो व २०-२० मध्ये तर Run Rate वर-खाली होत असताना कित्येकांचा रक्तदाबही वर-खाली होतो!

खेळाडू, मैदान, चेंडू, प्रेक्षक हे सारे वरील तिन्ही प्रकारांत सारखेच असतात, पण ध्येयाची तीव्रता व त्यासाठी करावे लागणारे काम व त्या भावनेची तीव्रता, ही कमी षटकांच्या सामन्यात अतिमहत्त्वाची होते, ठरविली जाते व त्यानुसार कार्य करण्यास व्यक्ती तयार होतात.

धावा काढण्याची क्रिया तीच असली तरी त्यातील सतर्कता, तत्परता, कल्पकता, वेग, निकड आपल्याला वेगळी कळते, दिसते, जाणवते. मग, आपल्या जीवनातही हे वेळेवर काम करण्याचे गुण व सवयी आपण आत्मसात करायला हव्यात ना? आपल्या Required Run Rate चं काय? तुमचे निश्चित ध्येय ठरवून, त्यानुसार आराखडा तयार करून, तुमचा Run Rate तुम्ही ठरवून, त्याप्रमाणे व्यवसायाचा व जीवनाचा सामना जिंकणे शक्य आहे, हे तुम्हाला पटले का?

आपली कामे वेळच्या वेळी करताना, भावना अनावर होण्याचाही अडथळा येतो. कोणत्याही भावनेच्या आहारी गेल्यामुळे, आपले मन ध्येयापासून विचलित होते.

बहुतेक वेळा चिंता, राग, द्वेष, दु:ख, निराशा अशा नकारात्मक भावना आपण जास्त वेळ बाळगल्याने मन कमकुवत होते व मनात शंका, भीती उत्पन्न होतात व हातातील काम सोडून आपण त्या विचारांच्याच मागे लागतो. याऐवजी, आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून उत्साह, आनंद, प्रेम, सहकार्य असे विचार मनात आणावेत.

नकारात्मक, विध्वंसक विचारांपासून दूर व्हा. तुम्ही पूर्ण केलेल्या कामाबद्दल स्वत:चे कौतुक करा, आनंद व्यक्त करा, करायचे शिल्लक काम तुम्ही करू शकाल, असा विश्वास निर्माण करा व त्याचे चिंतन करा.

अडचणींचा बाऊ करू नका, त्यातून मार्ग काढत असताना तुम्ही नक्की काही तरी शिकतच असता. नवीन गोष्टी शिकण्यासाठी, नवीन अनुभव घेण्यासाठी, आव्हानांचा सामना करण्यासाठी असलेला तुमच्या मनातला अंतर्विरोध ओळखा व त्याकडे दुर्लक्ष करा. त्याच्याशी झगडू नका!

त्याने जास्त मानसिक शक्ती खर्च होईल. नेहमी हे लक्षात ठेवा की, जे व्हायला हवे आहे, जे काम करायचे आहे, जे साध्य करायचे आहे, फक्त त्याचेच विचार व चित्र मनात बाळगा, म्हणजे जे नको आहे त्याच्या विचारांचे मनातील स्थान हळूहळू कमी होईल.

सारांश, आपल्या ध्येयाकडे जाण्याच्या रस्त्यावर आपल्याला शेकडो कामे करायची असतात. त्यामध्ये काही सबबी सांगून आपण ती करायची टाळतो. त्यामुळे चालढकल केल्याने आपण अपयशी होतो. हे टाळण्याचा मार्ग आपल्याच मनात आहे. तर, आता तुमच्याच मनाचा हा चांगला वापर करण्यात चालढकल करू नका! काय आहे तुमचा Required Run Rate आणि Current Run Rate? जिंकायचाय ना उद्योगीय यशाचा सामना?

सतीश रानडे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?