मन : इच्छित मिळवण्याचे साधन

एखादे अढळ ध्येय ठेवून जेव्हा तुम्ही अविरत काम करता, तेव्हा तुम्ही एक चुंबक बनता.
तुम्हाला प्रत्येक ठिकाणी संधी दिसू लागते.
तुम्हाला आवश्यक अशी माहिती, माणसं, संस्था, साधनं, पैसा, वस्तू सारं काही तु्मच्याकडे येऊ लागतं.
एरवी तुम्हाला अशक्य वाटणार्‍या गोष्टी सहज तुमच्या बाबतीत घडून येतात!

ध्येय म्हणजे तुम्हाला ठरावीक काळात काय हवे आहे? काय मिळवायचे आहे?

ध्येय, उद्दिष्ट, goal, target या सर्वांचा हा सोपा अर्थ आहे. एखादी गोष्ट घडवून आणण्यासाठी तिचा ध्यास घ्यावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो.

आपण, मन: माझा भागीदार किंवा साथीदार, असा या विषयाचा अभ्यास करत आहोत. त्यामुळे मनाचा निरनिराळ्या अंगांनी व संदर्भाने विचार करीत आहोत. खरे तर या विषयावर कोणाला काही सांगायची वा शिकवायची गरज नाही, कारण साध्या विचाराने हे कळू शकते की आपण आदिमानवाच्या अवस्थेपासून जी काही आजची प्रगतीची अवस्था प्राप्त केली आहे, ती सर्व मनाच्या प्रगत वापरामुळेच.

आपण शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हणतो, त्याचाही तोच अर्थ होतो. आपण आपल्या जीवनात घडणार्‍या घटनांची जबाबदारी घेतली पाहिजे. भूतकाळात होऊन गेलेल्या घटना बदलता येत नाहीत. तुम्ही आता काय विचार व कृती करत आहात त्यानुसार तु्म्हीच तुमचे भविष्य घडवीत आहात.

तुमचं शरीर, आरोग्य, स्वभाव, संपत्ती, शिक्षण, नातेसंबंध या सार्‍यांना तुम्हीच जबाबदार आहात. दुसर्‍या कोणालाही त्यासंबंधी दोष देणे थांबवा. शरीर, मन व बुद्धी हेच आपले मुख्य भांडवल आहे. त्याच्या वापराने, ध्येय ठेवून काम केल्यास आपण कोणतीही गोष्ट करू व मिळवू शकतो.

काही उदाहरणे पाहू

  • ज्ञानेश्‍वरांनी भगवद‍्गीतेसारख्या ग्रंथाचे मराठीत भाषांतर करून, ज्ञानेश्‍वरी लिहिली, तीही १६-२० व्या वर्षी. ते काही मराठीतील एम.ए. पदवीधारक नव्हते. तरीही प्रतिकूल परिस्थितीत, एका ध्यासाने-ध्येयाने प्रेरित होऊन हे काम त्यांनी केले.
  • एडिसनने दिव्याचा शोध लावला तेव्हा सर्वात आधी काय उपलब्ध होते? ना कोणते पुस्तक, ना शास्त्र, ना कॉलेज, ना कच्चा माल. होती ती फक्त त्याच्या मनातील कल्पना व विश्वास. त्याच्यावर त्याने केलेल्या अथक व अभ्यासपूर्ण प्रयत्नाने दिव्याचा शोध लागला.
  • आजही, एखादी भव्य इमारत किंवा पूल बांधलेला आपण पाहतो, तेव्हा तो एका इंजिनिअरच्या मनात आधी तयार होतो, मग कागदावर त्याचे रेखाटन होते, मग शेकडो लोक काही महिने त्यावर काम करतात व मग ती इमारत वा पूल आपल्याला दिसतो.
  • आज सर्व क्षेत्रांत आपण पाहिले तर, मानवी जीवनातील कोणती ना कोणती समस्या सोडवून व्यक्ती व संस्था नाव, यश, संपत्ती मिळवत आहेत. औद्योगिक, मनोरंजन, आरोग्य, घर-संसार, धार्मिक, आध्यात्मिक, गुंतवणूक, कोणत्याही बाबतीत हेच बघायला मिळतं.

तर आता प्रश्न आहे की तुम्ही जगाचा कोणता प्रश्न सोडवू इच्छिता? तुम्हाला काय आवडेल करायला? तुमच्यावर कोणाचीही सक्ती नाही. आवडेल ते करा व यश मिळवा. लक्षात ठेवा, छोटा विचार करू नका, कारण तुम्ही मोठे यशस्वी होऊ शकता. आयुष्यात काय करायचे हे न ठरवल्यामुळे लोक निरस जीवन जगून लवकर म्हातारे होतात. असे ९९% लोक कायमच १% लोकांवर अवलंबून राहतात. आपलं जीवन आपल्या हातात घ्या, त्याला तुम्हाला आवडेल अशी दिशा द्या.

आता, स्वतःच्या सोप्या उदाहरणाकडे बघा. आपण ४-५ महिन्यांचे असताना चालूही शकत नव्हतो; पण २-३ महिने प्रयत्न करून, तीव्र इच्छा मनात ठेवून, धडपडत का होईना, आपण चालायला शिकलो. अशाच पद्धतीने खायला, बोलायला, वाचायला शिकलो. लहान असताना मी पडलो, म्हणून मी आता चालतच नाही, असं कोणी म्हणतं का?

मी लहानपणी ळिूूर खाल्ला नाही, आता मी तो कसा खाणार, असं कोणी म्हणतं का? मनाची शक्ती आपल्यात वयाच्या पहिल्या १-२ वर्षांत होती, ती आता नाहीशी झाली का? तर, अजिबात नाही. आपण तिचा वापर करायला विसरलो आहोत. आपण घाबरायला, शंका-संशय घ्यायला लागलो आहोत. आपण ध्येय ठेवत नाही.

आपल्या मनावर आपलं शिक्षण, नातेवाईक, पालक, शेजारी, शिक्षक, परिस्थिती अनुभव, संगत, सवयी, जाहिराती, मनोरंजन अशा अनेक गोष्टींचे परिणाम होत असतात, त्यातून आपल्या स्वतःविषयी व जगाविषयी काही समजुती व श्रद्धा बनून जातात. त्या चष्म्यातूनच मग आपण सगळ्या गोष्टी पाहतो; पण, ९९% वेळा आपल्याला कळते किंवा वाटते ते सत्य नसतेच.

दुसर्‍या कोणाला वाटतं किंवा झालं म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट करता येईल किंवा येणार नाही, असा काही नियम नाही. अनुकरण करू नका तुम्हाला काय आवडतं, कशात रस आहे, काय करायची इच्छा आहे, ते आधी शोधून काढा.

एखाद्या व्यक्तीविषयीचे आपले जसे विचार असतात, तशीच ती व्यक्ती आपल्याशी वागते, असे आपल्याला वाटते. एखादी वस्तू, पदार्थ तुम्हाला आवडत नसतो, भले जगात करोडो लोकांना आवडत असो. तुम्हाला काय करता येईल किंवा करता येणार नाही, याबाबत तुमचे विचार ठाम असतात, तेही तुम्ही त्याबाबत पुरेसे प्रयत्न करण्याआधीच!

बरं, दुसरीकडे तुमचं ध्येय काय, तुम्हाला काय करता येते, काय आवडते, याबाबतही स्पष्ट विचार व भूमिका नसते. तर मग जीवनात एखाद्या विषयात यश मिळविण्यासाठी आपण मनाचा वापर कसा करीत आहोत किंवा करीत नाही, हे तुमच्या लक्षात आले का?

‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’, ‘बुडत्याचा पाय खोलात’ किंवा ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’, या म्हणी आपल्याला आपण मनाने कसा आपला अनुभव तयार करतो ते दर्शवितात. शेकडा २% भीती किंवा चिंता केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात येतात, ९८% वेळा आपण जो विचार करतो, तसल्या कोणत्याही गोष्टी प्रत्यक्षात येत नाहीत.

भीती, चिंता व शंका हे आपले तीन मुख्य मानसिक शत्रू आहेत आणि तेच आपल्या मनात ठाण मांडून बसले आहेत. अगदी झुरळाच्या भीतीपासून ते पाणी, उंची, वेग, आजार, संकटे अशा अनेक गोष्टींची भीती आपण बाळगून असतो. त्यावर बराच वेळ कल्पना व विचार करून ती आपल्या मनात घट्ट बसवतो. महागाई, असुरक्षितता, टंचाई, भविष्यात कसं होणार इथपासून ते सर्व जागतिक प्रश्नांची आपण चिंता करतो.

काही रास्त शंका अभ्यासाच्या दृष्टीने काढणे, हे ठीक; पण जर आपण सर्व गोष्टींत शंका व संशय घेत राहिलो, तर प्रत्येक वेळी आपण नकारघंटाच वाजवू व नकारात्मक विचारच करत राहू. तर, या भीती, चिंता व संशय यापासून शक्य तेवढे दूर राहून, आपण आपल्याला काय हवे आहे, आपले ध्येय काय आहे त्याकडे जर जास्त लक्ष दिले, त्याचा विचार केला व ते कसे साध्य होईल त्याची चित्रे मनात रंगविली व त्यासाठी आवश्यक गोष्टी शोधल्या तर जीवनात हवी ती गोष्ट आपण नक्की मिळवू शकू.

मनाने आपल्या इच्छित गोष्टीचे वर्णन करा, चित्र तयार करा, ते प्रत्यक्षात येईपर्यंत बदलू नका किंवा त्याविषयी, शंका घेऊ नका. आपण एका दिवसात ५०,००० विचार करतो. आता स्वतःला प्रश्न विचारा की मला काय हवंय? मिळवायचंय ते मी ठरवलंय का?

नसेल तर ते ठरवा. आता विचारा की, जे मला हवंय, जे माझं मुख्य अढळ ध्येय आहे, त्याचे विचार माझ्या मनात किती असतात, दिवसातील ५० हजार विचारांपैकी? किती विश्वास आहे माझा माझ्या ध्येयावर? किती तीव्रता आहे माझ्या विचारांची व कृतींची? माझं उद्दिष्ट, ज्वलंत उद्दिष्ट आहे का? किती वेळ, लक्ष, पैसा, मेहनत, विचार मी त्यासाठी खर्च करतो?

प्रत्येक यशाची किंमत मोजावी लागते. मोठं लक्ष्य, मोठी किंमत! म्हणूनच एकदा तुम्ही उद्दिष्ट ठरवलंत, की दुसरा कोणताही विषय आपल्यासाठी महत्त्वाचा नाही. ध्येयसिद्धी होईपर्यंत ते सोडता कामा नये. इतरांचे सल्ले जरूर ऐकावेत, त्यांतील तथ्य तेवढे घ्यावे, चर्चा/वाद करत बसू नये. आपल्या ध्येयावरील विश्वास ढळू देऊ नये. कोणतीही गोष्ट न करण्याची किंवा घडण्याची शंभर कारणं शोधण्यापेक्षा, ती गोष्ट करण्याचे वा घडण्याचे एक कारण शोधा. त्यामुळे वेळ वाचतो व कामही होते.

मनाचा चुंबकासारखा वापर

एखादे अढळ ध्येय ठेवून जेव्हा तुम्ही अविरत काम करता, तेव्हा तुम्ही एक चुंबक बनता. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी संधी दिसू लागते. तुम्हाला आवश्यक अशी माहिती, माणसं, संस्था, साधनं, पैसा, वस्तू सारं काही तु्मच्याकडे येऊ लागतं. एरवी तुम्हाला अशक्य वाटणार्‍या गोष्टी सहज तुमच्या बाबतीत घडून येतात.

२०-२० क्रिकेटमध्ये, पाचवर सेट झाल्यावर, आत्मविश्वास वाढल्यामुळे सलग ३-४ षटकार मारणारा क्रिस गेल तुम्ही बघितलाय? काय वेगळं असतं त्याच्याकडे त्या वेळी? बॅट, बॉल, पॅड, बॉलर, सर्व काही तेच असतं. वेगळं असतं ते यशासाठी चुंबक बनलेलं त्याचं मन, जे त्याच्याकडे चौकार, षटकार आकर्षित करतं!

अशा तर्‍हेने तुम्ही आपोआप सकारात्मक बनता. कोणत्याही संकटाला घाबरून न जाता त्याचा आव्हान म्हणून स्वीकार करता. तुम्ही दुसर्‍यांना सहकार्य करता. तुम्ही संयमी व सहनशील बनता. या सर्वांचं कारण एकच. ते म्हणजे तुमच्या मनामध्ये तुमच्या ध्येयाला पूर्ण झालेले तुम्ही पाहता, तुमच्या मानसिक जगात तुमचं स्वप्न तुम्ही जगता.

एका अर्थाने, तुम्हीच तुमचं जग घडवता. मग, लागताय ना कामाला?

– सतीश रानडे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top