मन : तुमचा व्यवस्थापक


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आपणा सर्वांकडे मन, शरीर, बुद्धी हे भांडवल असून आपण त्याचा योग्य वापर करून हवे ते उद्दिष्ट साध्य करू शकतो, हेही आपण समजलो. आता प्रश्‍न हा आहे की, आपल्याला मनाची जाणीव आहे का? मन कुठे आहे? ते कसे काम करते?

आपण सोप्या पद्धतीने ते समजावून घेऊ. तुम्ही म्हणता ना, माझा हात, माझा पाय, तसेच तुम्ही म्हणता, माझं मन लागत नाही, माझं मन आनंदी वा दुःखी आहे. तर, यांतील ‘मी’ म्हणजे तुम्ही जे कुणी असाल, अजित वा अनिता. आता परत त्यात जायला नको की, मी म्हणजे आत्मा वगैरे. तो वेगळा विषय होईल.

एवढेच समजा की माझं मन म्हणताना आपण आपल्या मनाचे अस्तित्व मान्य केले आहे. तर मग, जर आपण आपल्या हाताचा, नाकाचा, कानाचा वापर करतो, तसा मनाचा करतो का? हा विचार इथे सुरू करायचा आहे.

मन, शरीर, बृद्धी हे आपल्याकडील महत्त्वाचे भांडवल आहे, हे आपण जाणतो. त्याचा वापर करून आपण कोणतीही गोष्ट करू शकतो, मिळवू शकतो. व्यायाम, आहारविहार, उपचार यातून आपण शरीराची काळजी घेतो, डागडुजी करतो. जशी आपण आपल्या गाडीची काळजी घेतो तशी शरीराची न घेतल्यास आपले नुकसान होऊ शकते. त्यावर बराच वेळ, पैसा, कष्ट खर्च होतो, हे आपल्याला माहीत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

बुद्धीच्या विकासासाठी आपण वाचन, चिंतन, श्रवण अवलोकन करत असतो, कारण बुद्धीचा विकास करता येतो; पण मनाकडे आपलं लक्ष आहे का? आपल्याला मनाची जाणीव झाली आहे का? कसा वापर करतोय आपण त्याचा? काय विचार करतोय आपण प्रत्येक क्षणाला? त्याचा काय परिणाम वा फायदा-तोटा होतोय, याचा विचार करतो का आपण?

तुम्ही हे अनुभवलं असेल की, शरीराने धट्टाकट्टा माणूसही त्याला इच्छा झाल्याशिवाय एक काडी इकडची तिकडे करीत नाही. एकदा परीक्षेत अपयश आलं की, हुशार विद्यार्थीही खचून जातो. आळशी व्यक्ती हाती आलेल्या संधी गमावून बसतात. केवळ ‘मूड’ नाही म्हणून आपण किती वेळा जे करायला पाहिजे ते करत नाही. आपल्याला जे करणं गरजेचं आहे, ते करायला आपल्याला आवडत नाही, कंटाळा येतो. तिथेच, अगदी तिथेच यशाची गुरुकिल्‍ली आहे.

एखादा विद्यार्थी अभ्यासाला बसतो किंवा व्यावसायिक काही काम करायला सुरुवात करतो. मध्येच फोन घेणे, ऐकू आलेल्या गाण्याकडे लक्ष जाणे, व्हॉट्सअ‍ॅपकडे लक्ष जाणे, भूतकाळातील काही आठवणी व प्रसंगांचा विचार करीत राहाणे, झोप, आळस, कंटाळा येणे, अशा अनेक विचलित करणार्‍या घटना घडतात व आपण जे चालू काम आहे ते थांबवतो, पुढे ढकलतो, टाळतो.

त्या वेळेचा नीट विचार केला तर ‘तुम्हाला’ काम करायचं असतं, पण ‘मन’ मध्येच येऊन तुम्हाला चालू काम थांबवण्याची ‘चांगली’ कारणं सांगतं व तुमच्या शरीराला व बुद्धीला मूळ विषयापासून दूर नेतं. होतं ना असं? मग हा गुंता, ही सवय सोडवायची कशी?

यावरचा एकमेव व सोपा उपाय म्हणजे, आपलं ध्येय ठरविणं, त्याने सतत प्रेरित राहाणं व त्या दिशेने कार्यरत राहाणं.

ध्येय आयुष्याचं- दहा वर्षांचं, एक वर्षाचं, एक महिन्याचं वा दिवसाचं. ध्येय शिक्षणाचं, व्यवसायाचं, प्रगतीचं, आरोग्याचं, आर्थिक विकासाचं, कोणतंही असू शकतं. तुम्हाला नक्की काय आवडतं, काय हवंय ते ध्येय ठरवा. एकदा आवडीचं ध्येय ठरवलं, की पडणार्‍या कष्टांविषयी तक्रार करावी लागत नाही.

उदा. स्वातंत्र्यसैनिकांना ध्येयापुढे कष्टांचीच काय प्राणांचीही पर्वा नव्हती. संशोधकांना व कलाकारांना कामात ‘मग्‍न’ असताना तहानभुकेचे भान नसते. लता मंगेशकरांना एकदा गाण्यात करीअर करायचं ठरविल्यावर, रियाझ करण्याचे कष्ट करावे लागलेच. त्यांनाही सकाळी लवकर उठून रियाझ करणं आवडलं नसणार.

सुरुवातीला सचिन तेंडुलकरलाही एवढा कष्टप्रद सराव कंटाळवाणा वाटला असणार. मग अशा सर्व यशस्वी मंडळींनी कशी मात केली? आळस, सुस्ती, कंटाळा, वाईट मूड वगैरेवर? कसं वापरलं त्यांचं शरीर, मन व बुद्धीचं भांडवल, जे आपल्या सर्वांकडे सारखेच आहे.

तुमचं जीवन, व्यवसाय ही एक कंपनी आहे. तुम्ही (जे काही तुमचे नाव आहे- अजित, अनिता वगैरे) त्या कंपनीचे मुख्य मालक (समजा सीईओ वगैरे) आहात. तुमचं मन म्हणजे तुमच्या हाताखालील व्यवस्थापक (मॅनेजर) आहे. तुमचं शरीर आणि बुद्धी हे कर्मचारी (स्टाफ) आहेत. यांतील सर्व जण महत्त्वाचेच आहेत. एकदा तुमचं ध्येय ठरलं, काय करायचं ठरलं, की ‘तुम्ही’ तुमच्या ‘मनाला’ सूचना देता आणि तुमचं मन (मॅनेजर) तुमच्या शरीर व बुद्धीकडून हवं ते काम करून घेतं.

लक्षात घ्या, की काय करायचे आहे हे मालकालाच माहीत नसेल, तर व्यवस्थापक काय करेल?

कर्मचारी काय करतील? यांत कंपनीचा वेळ, पैसा, साधनं यांचा योग्य वापर न होता नुसता गोंधळ माजेल. त्याने काहीच साध्य होणार नाही. तर, ‘मन’ या आपल्या व्यवस्थापकाला आपण मोकळा सोडला, तर आपल्या जीवनाची कंपनी चालू शकणार नाही, तिला यश मिळणार नाही.

विचार करा, की जेव्हा जेव्हा माणसं किंवा संस्था एखादे ध्येय वा उद्दिष्ट ठरवितात व त्यावर लक्ष केंद्रित करतात, तेव्हा अशक्यप्राय वाटणारी कामेही झाली आहेत. कोणी दिव्याचा शोध लावला, कोणी औषधांचा शोध लावला, यंत्रं तयार केली, क्रीडा क्षेत्रात विक्रम केले.

आपल्या आयुष्यातही बघा. एक महिन्यानंतर असणार्‍या सहलीची आपण किती वाट पाहतो, कशी तयारी करतो? सहा महिन्यांनंतर असलेल्या लग्‍नाची आपण कशी तयारी करतो? कसं नियोजन करतो? सिनेमाची तिकिटं रांगेत उभं राहून किती उत्साहाने काढतो?

या सर्व गोष्टींत आपण, आपल्या मॅनेजर ‘मनाला’ कामाला लावतो व हवी ती गोष्ट करून घेतो. मुद्दा एवढाच आहे की,एखादी गोष्ट करण्याची आपली पुरेशी ज्वलंत इच्छा आहे का? आपल्याला नक्की काय हवं आहे ते माहीत आहे का? ते का हवं आहे?

जे हवं आहे त्याची किंमत मोजायची तयारी आहे का? जर वरील प्रश्‍नांची उत्तरं ‘हो’ असतील, तर आपण मनाला योग्य सूचना देऊन कामाला लावू शकतो. नाही तर मनच आपल्याला कामं न करण्याची कारणं सांगू लागतं आणि आपल्याला ते पटू लागतं आणि मनाला एखाद्या गोष्टीचा सातत्याने विचार करायची सवय लागली, की तेच खरं वाटू लागतं.

एखादा फलंदाज टिकला व धावा करू लागला, की त्याचा आत्मविश्‍वास वाढतो, त्याला बाद करता येत नाही, त्याचा धावांचा वेग वाढतच राहतो. हे तुम्ही बघितलंत ना? यशस्वी व्यक्ती यशाकडेच जात राहते. एकदा यश मिळवण्याचा विचार तर करा, मग सवयच लागेल!

एकदा पाच मिनिटे शांत बसा, कागदावर हिशेब लिहा. गेल्या आठवड्याचाच विचार करा. तुम्हाला काय हवं आहे? तुम्ही काय करीत आहात? तुमचे किती विचार तुम्हाला काय हवं आहे त्याचे असतात? तुमचा किती वेळ इतर गोष्टींत फुकट जातो?

चला, असा विचार करा की, तुम्ही आठवड्यातील 167 तासांपैकी, ऐशी तास जागे असता व प्रगतीसाठी काम करीत असता. आता अंदाजे किती वेळ तुम्ही आनंदाने व उत्साहाने तुमच्या ध्येयाचा विचार करीत असता? जर हा वेळ वीस तास असेल, तर तुमच्या यशाचे प्रमाण 25 टक्के असेल.

मग, 25 टक्क्यांनी आपण पास कसे होणार? ध्येयाचे एवढेच महत्त्व, तीव्रता व प्राधान्य असेल, तर ते कसे साध्य होणार? कुठे गेला बाकीचा वेळ? काय करीत होतात तुम्ही शरीराने, मनाने व बुद्धीने? प्रामाणिक विचार केला तर लक्षात येईल की,आपण निरुपयोगी बाबींचे विचार, भूतकाळातील वा भविष्यकाळातील विचार, चिंता, काळज्या, एकमेकांविषयी राग, मत-मतांतरे या कामांतच आपल्या मनाला अडकविले आहे?

मग ध्येयाचा, उपयुक्त कामाचा, प्रगतीचा विचार मन कधी करणार व शरीर-बुद्धीला कामाला कधी लावणार? शंभर टक्के एकाग्रता जरी आदर्शवत वाटली आणि जमली नाही तरी साठ टक्के एकाग्रतेनेही आपण बरेच काही करू शकू. तर, ध्येय ठरवून, मनाचा व्यवस्थापक म्हणून वापर करून, कसे यशस्वी होता येईल याविषयी आपण आज विचार केला.

– सतीश रानडे
sssdadar@gmail.com

error: Content is protected !!
Scroll to Top