२०-२५ वर्षांपूर्वी कधी आपणास स्वप्नातसुद्धा वाटले नसेल की, फुकट मिळणारे पाणी १५ रु. लिटरने विकले जाईल; पण आज मिनरल वॉटर इंडस्ट्री बारा हजार कोटी रुपयांची झाली आहे. वेळोवेळी पडणारा दुष्काळ, अशुद्ध पाण्यामुळे वाढणारे आजार, यामुळे फिल्टर्ड वॉटरची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे, आता अगदी ग्रामीण भागात सुद्धा मिनरल वॉटरचा चांगला खप होऊ लागला आहे.
आज बाटलीबंद एक लिटर पाण्याचा खर्च फक्त ३ रुपये आहे, पण ती मार्केटमध्ये १५ रुपयांना विकली जाते. तर रस्ते, पर्यटन स्थळ इत्यादी ठिकाणी ती २० रुपयांना विकली जाते. मिनरल वॉटर प्लांट ३ लाखांत तयार होतो, त्यातून एक लिटर मिनरल वॉटर मिळवण्यासाठी फक्त ३० पैसे खर्च येतो. मोकळी बॉटल १ रुपयाला येते. मजुरी खर्च प्रति बॉटल ९० पैसे येतो. प्लांटपासून दुकान, हॉटेलपर्यंत पोहोचवण्याचा वाहतूक खर्च १ रुपयापर्यंत येतो. म्हणजे आज आपण जरी एक लिटर पाण्याची बाटली विकत २० रुपयांना घेतो तरी त्याची खरी किंमत आहे फक्त ३ ते ४ रुपये!
१ डझन बाटल्यांचा एक बॉक्स पॅकिंग करून ६० ते ७० रुपयांना विकला जातो. म्हणजे उत्पादक प्रति बॉटल २ रुपये नफा कमवितो, तर किरकोळ दुकानदार तीच बॉटल १५ रुपयांना तुम्हाला विकतो व तब्बल नऊ रुपये नफा कमवितो. १५ ते २० रुपये ही पाण्याची किंमत खूप जास्त असल्याने अजूनसुद्धा भारतातील ९०% ग्राहकांना ती परवडत नाही म्हणून ते पॅक्ड वॉटर घेत नाहीत.
यावर उपाय? एक खूप मोठे मार्केट आहे ते म्हणजे पाऊच्ड मिनरल वॉटर म्हणजे ज्याप्रमाणे दूध प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक करून येते तसेच पाणी पाऊचमध्ये, एक लिटरच्या पॅकमध्ये विकले जाऊ शकते. आफ्रिकेत बर्याच भागांत अशा पाऊच्ड पाण्याचा व्यवसाय चालू आहे. त्याचा उत्पादन खर्च खूप कमी आहे. पाणी ४० पैसे, पाऊच २० पैसे, वाहतूक ५० पैसे, कारण हे प्लांट लहान असतात, जवळच असल्याने वाहतूक खर्च फार येत नाही. शिवाय यात बॉक्स पॅक करण्याचा खर्च नसतो.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
क्रेटमध्ये किंवा कापडाच्या मोठ्या पिशवीतून थ्री व्हीलर गाड्यांतून याचे रिटेलरपर्यंत वितरण केले जाते. हे पाऊच्ड अर्धा लिटरचा पॅक २ ते अडीच रुपयांना, १ लिटरचा ४ रुपयांना विकूनसुद्धा रिटेलरला १ रुपया व उत्पादकाला १ रुपया फायदा राहतो. हा उद्योग अगदी प्रत्येक तालुक्यात ३ ते ४ लाखांच्या भांडवलात सुरू करू शकतो. एक प्लांटमधून रोज पाच हजार लिटर पाण्याचे उत्पादन शक्य आहे.
– प्रा. प्रकाश भोसले
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.