महाराष्ट्राची ‘मिसळ’ जागतिक पातळीवर नेणार्‍या सचिनची गोष्ट


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


मिसळ म्हटलं की डोळ्यासमोर येतो तर्रीदार रस्सा, फरसाण, बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू. महाराष्ट्रीय अनेक पदार्थ खूप चांगले आणि प्रसिद्धसुद्धा आहेत. त्यातीलच एक मिसळ. ही मिसळ आवडत नाही असा व्यक्ती विरळाच. अनेक प्रकारच्या आणि चवीच्या मिसळ मिळाल्या तर? आज आपल्याकडे पदार्पणातच अठरा प्रकारच्या चवींच्या वैविध्यपूर्ण मिसळ देणारे सचिन विंचवेकर यांचे ‘मिसळ दरबार’ आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांची दुकाने आहेत. त्यांची खासियत आहे की, तुम्ही मुंबईत अंधेरीला मिसळ खाल्ली काय किंवा पुण्यातील सदाशिव पेठेत खाल्लीत तरी चवीत फरक मिळणार नाही. मराठी पदार्थांना एक ब्रँड म्हणून लोकांसमोर आणण्याचा आणि त्यांना जागतिक पातळीवर पोहोचवण्याचे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेवून आज त्यांचा प्रवास सुरू आहे. अत्यंत प्रेरणादायी असा हा संपूर्ण प्रवास आहे.

सचिन विंचवेकर यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यांचे मन अभ्यासात कधीच लागले नाही; परंतु आपण व्यवसाय करावा हे पहिल्यापासून ठरलेले होते. सचिन यांचा जन्म जळगावला झाला आणि आठवीपासून म्हणजेच १९९६ साली ते पुण्यात रहायला आले.

उद्योगाची आवड लहानपणापासूनच. लहानपणी गोळ्या, बिस्किट विकणे, बांगड्या विकणे, पेप्सी, फटाके असे छोटे छोटे अनेक गोष्टी विकत ते मोठे झाले. काही काळ उसाच्या रसाचे गुर्‍हाळसुद्धा चालवले आहे. हे सगळे करता करता दहावी झाली; पण पुढे शिक्षणात रस नव्हता.

अशा वेळी आता हा मुलगा हातचा गेला असं कुटुंबीयांना वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. पुढे मग तासन्तास कट्ट्यावर बसून राहायचे. अशी मुले मग वेगवेगळ्या राजकीय लोकांसाठी काम करू लागतात. यातूनच सचिनसुद्धा या गोष्टीकडे ओढले गेले. निवडणुका होईपर्यंत एका राजकीय व्यक्तीसोबत काम केले.

निवडणुका झाल्यावर सचिन त्या नेत्याकडे गेले. त्यांना म्हणाले, मला आता सरकारी नोकरीत चिकटवा. त्यांनी मला विचारले, काय रे, तुझे शिक्षण काय? सचिन म्हणाले, मी दहावी झालोय. त्या वेळी ते म्हणाले, मी कोणत्या नोकरीला लावू तुला? तुझे शिक्षण कमी आहे. त्यापेक्षा काही तरी व्यवसाय कर.

समज, मी तुला नोकरीला लावले तरी महिना पंधरा हजारपर्यंत पगार असेल. तुझ्या निवृत्तीपर्यंत जास्तीत जास्त पन्नास हजार पगार होईल. उभ्या आयुष्यात काय कमावशील. त्यापेक्षा काही तरी उद्योग कर. त्यासाठी जर काही मी करू शकत असेन तर तुला नक्की मदत करीन. त्यांचे म्हणणे सचिनना पटले.

खर्‍या अर्थाने सचिन यांना त्या नेत्याने आयुष्याची  दिशा दाखवली आणि त्यांचे आयुष्य बदलले. मग सुरू झाला व्यवसाय काय करायचा याचा शोध. सचिन म्हणतात, आम्ही मित्रमंडळी नेहमी वेगवेगळ्या कामांसाठी कॉफी शॉपवर भेटायचो, चर्चा करायचो. त्यातूनच आपणच कॉफी शॉप का सुरू करू नये, असे मनात आले. यातूनच माझ्या व्यवसायाचा श्रीगणेश झाला.

२००६ साली आम्ही पुणे शहरात बालाजी नगर येथे ‘साई कॅफे कट्टा’ नावाने कॉफी शॉप सुरू केले. सुरुवातीला अनंत अडचणी आल्या. आम्ही ज्या भागात कॉफी शॉप सुरू केला होता त्या परिसरातील लोकवस्ती ही ग्रामीण भागात येऊन तिथे वसली होती. त्यामुळे त्यांचा या कॉफी शॉपकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित होता. अनेकांनी आम्हाला ते बंद करा, असा सल्ला दिला; तर काहींनी उसाचे गुर्‍हाळ सुरू करा किंवा लस्सी, लिंबू सरबत सुरू करा. असे सांगितले, पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो.

काही ग्राहकांनी आम्हाला सांगितले होते की, तुम्ही व्यवसायात नवखे आहात तेव्हा लगेच काही निर्णय घेऊ नका. थोडा वेळ द्या. त्यांचे म्हणणे खरे ठरले. आम्ही पाय रोवून उभे राहिलो आणि सुरुवातीला आम्ही १० ग्लास कॉफी विकायचो तेच आज दिवसाला ८०० ते १२०० कॉफी विकतो. पुढे आम्ही फ्रंचायझी द्यायला सुरुवात केली आणि आज संपूर्ण पुणे शहरात आमची पंधरा आऊटलेट आहेत.

हे करत असताना आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की, संपूर्ण जगात मराठी मेनू मोठा करण्यासाठी कोणीच काम करत नाहीय. ही एक खंत होती. जेव्हा आम्ही याबाबत संशोधन केले तेव्हा असे समोर आले की; सर्वसामान्य अनेक लोक वडापाव तेलकट म्हणून खात नाहीत. पण समोसा खातात.

दोन्ही पदार्थांत बटाटा असतो; पण ते समोसाला प्राधान्य देतात. मग आम्ही मिसळचा अभ्यास केला. मिसळ ९०% लोकांना आवडते; पण म्हणावा तसा मिसळचा विकास झाला नाही. २०१० साली आम्ही मिसळ या मराठी खाद्यपदार्थांवर रिसर्च करायला सुरुवात केली.

२०१४ पर्यंत आम्ही विविध मसाले बनवले. जवळपास सत्तर प्रकारचे मसाले बनवले होते. म्हणजेच सत्तर प्रकारच्या मिसळ. त्याच वर्षी आमचे मिसळवरचे संशोधन पूर्ण झाले होते. आमच्या मिसळमध्ये आम्ही खाण्याचा रंग वापरत नाही. प्रिझरवेटिव्हज नाहीत किंवा आम्ही फ्रोझान मिसळही देत नाही.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


हे आमचे वैशिष्ट्य आहे. हेच आम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवतात. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी आमची मिसळची चव सारखीच राहणार. यात काही बदल होणार नाही हे आम्ही पाहिले.

पुढे २०१४ ते २०१७ या काळात आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड या परिसरात ओळखीचे लोक, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया माध्यमातून १,२०० ते १,५०० कुटुंबांना वेगवेगळ्या चवीच्या  मिसळ टेस्ट करण्यासाठी दिल्या. ट्रायल अँड एरर असे करता करता बहुतांश लोकांना चायनीज मिसळची चव आवडली नाही. मग ती आम्ही बाद केली; पण मनात अजूनही प्रश्न होते.

हे लोक आपल्याला ओळखतात अथवा ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून आपण त्यांच्या घरी गेलो तर मन न मोडण्यासाठी त्यांनी आवडले असे म्हटले असेल तर? म्हणून मग आम्ही एका मिसळ महोत्सवात भाग घेतला. तीन दिवस मिसळ महोत्सव होता. आम्हाला वाटले दोन ते तीन हजारपर्यंत विक्री होईल; पण झाले वेगळेच. आमची विक्री झाली बहात्तर हजार रुपये आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्याकडून बेस्ट मिसळ म्हणून पुरस्कारही मिळाला.

मिसळ महोत्सवात भाग घेण्याचा आमचा उद्देश साध्य झाला. आम्हाला पटले की, आता लोकांना मिसळ आवडते. आता आपण बाजारात उतरू. सात वर्षं आम्ही या सगळ्यासाठी दिली होती. उद्योगात उतरताना आपण किती तयारीनिशी उतरतो हे खूप महत्त्वाचे आहे. त्यावरच तुम्ही किती दूरचे प्रवासी आहात हे लक्षात येते. आम्ही अ‍ॅपलची रणनीती अवलंबली होती. अ‍ॅपल एक जागतिक पातळीवरचा नावाजलेला ब्रँड.

त्यांचे कोणतेही उत्पादन  बाजारात आणण्यापूर्वी कमीत कमी एक वर्ष लोकांचे अभिप्राय घेतात. जे जे बदल ग्राहक सुचवतील ते स्वीकारतात. लोकांना काय हवयं हे समजून आपले प्रॉडक्ट बाजारात उतरवते. अशाप्रकारे आमच्या ‘मिसळ दरबार’ची सुरुवात डिसेंबर २०१७ मध्ये धनकवडी पुणे येथे झाली.

आता इथे जे आहे ते आमचे प्रीमियम मॉडेल आहे. या ठिकाणी आम्ही अठरा प्रकारच्या मिसळ देतो. २०३५ पर्यंत आमची रणनीती तयार आहे. २०२० पर्यंत आम्ही आमचे सिल्व्हर मॉडेल तयार करणार आहोत.

प्रीमियम, सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम असे आमचे चार मॉडेल्स आहेत. चौथे मॉडेल हे २०२७ ला सुरू होईल आणि त्या वेळी कमीत कमी ४००० स्क्वेर फीटचा गाळा असेल आणि त्या ठिकाणी सत्तर रुपयांपासून बाराशे ते तेराशे रुपयापर्यंतची मिसळ असेल.

या ठिकाणी संपूर्ण सत्तर प्रकारच्या मिसळ उपलब्ध असतील. हायवेला चालणारे जे मॉडेल आहे ते आहे ‘गोल्ड मॉडेल.’ त्या ठिकाणी कमीत कमी २००० स्क्वेर फीटचा गाळा असेल, आणि त्या ठिकाणी सत्तर रुपयांपासून ६५० रुपयांपर्यंतची मिसळ असेल. या ठिकाणी पस्तीस प्रकारच्या मिसळ उपलब्ध असतील.

पुणे, मुंबई, बारामती, फलटण, कोल्हापूर आदी शहरी भागांत आमचे  मिसळ दरबारचे प्रीमियम मॉडेल चालू आहेत. मुंबईत कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, नालासोपारा, अंधेरी तर पुणे येथे धनकवडी, कोंडवा, सदाशिव पेठ, पिंपरी, मुळशी, प्रति शिर्डी, आदी ठिकाणी आहेत. पुण्यात लवकरच अजून  पाच ठिकाणी मिसळ दरबारच्या शाखा सुरू होत आहेत.

चव हा खाद्यपदार्थाच्या विक्रीत महत्त्वाचा वाटा असतो.

सचिन म्हणतात,

आमच्या मिसळची चव सर्वत्र सारखीच असते. याचे कारण असे की, आम्ही  ‘सेंट्रलाइज किचन’ ठेवलंय. मिसळ ही एकाच जागी बनवली जाते. आपल्याला फक्त ती गरम करून विकायची असते.  आमच्याकडे कोणीही कुठेही फ्रँचायझी घेतली तरी आम्ही त्यांना तयार मिसळ पाठवतो. म्हणूनच आम्ही संकल्पनेपासून प्रत्यक्ष सुरुवात करण्यासाठी सात वर्षांचा भलामोठा कार्यकाल घेतला.

एखादा व्यक्ती जेव्हा आमच्याकडे फ्रँचायझी घेतो तेव्हा त्याला काही रक्कम गुंतवावी लागते. अशा वेळी मग त्याच्याकडे कामासाठी ठेवण्यात येणार्‍या मिसळ कशी बनवायची याची ट्रेनिंग द्यावी लागते. व्यवसायात जम बसू लागतो आणि काही कारणाने माणूस सोडून गेला तर पुन्हा व्यवसाय डबघाईला येतो. अशा वेळी नुकसान फ्रँचायझी घेणार्‍यांचे होते. त्यामुळे आम्ही त्यांचाही या सर्व प्रक्रियेत विचार केलाय. आम्ही 18 देशांमध्ये आमची मिसळ टेस्टिंगसाठी पाठवल्या आहेत.

आपल्याकडे बहुतांश ठिकाणी मिसळ ही दुपारी तीनपर्यंतच मिळते; पण असे का? याचे उत्तर मला अजून मिळाले नाहीय. मराठी उद्योजक स्वतःच ठरवतो की, दुपारी तीनच्या पुढे कोणी मिसळ खाणार नाही. आम्ही मात्र आमच्याकडे सकाळी आठ ते रात्री कमीत कमी आठपर्यंत मिसळ विकतो. मुंबईत काही जागी रात्री दहापर्यंतसुद्धा मिसळ उपलब्ध आहे.

आमच्याकडे फॅक्टरीत काम करणारी पंधरा मुले आहेत आणि मिसळ दरबारसोबत २७ मुले आहेत. आम्ही प्रत्येक वर्षीचे टार्गेट ठरवून काम करतोय. मागील वर्षी आम्ही दहा आऊटलेट सुरू करणार होतो प्रत्यक्ष सुरू झाली पंधरा. या वर्षी आमचे टार्गेट आहे २५. आणि २०३५ पर्यंत संपूर्ण जगात १००० शाखा सुरू करण्याचे आमचे ध्येय आहे.

मिसळचा प्रभाव मागील काही वर्षांत नक्कीच वाढलाय. आता लोक जेव्हा आमच्याकडे  फ्रँचायझी घ्यायला येतात तेव्हा आम्ही त्यांना विचारतो की, त्यांना आमची फ्रँचायझी का घ्यायची आहे? त्यावर त्यांचे उत्तर असते की, सध्या फूड इंडस्ट्रीला चांगले दिवस आलेत. त्या वेळी मला वाटते आपल्या राज्यात ढोकळा, बंगाली मिठाई, पंजाबी पदार्थ कधी आले हे कोणालाच माहिती नाही.

प्रत्येक राज्याचे पदार्थ आपल्या राज्यात आलेत पण आपले मराठी पदार्थ महाराष्ट्रबाहेर पडलेच नाहीत. कोणी त्यांना बाहेर नेलेच नाही. कोणीच आजपर्यंत धाडस केले नाही. याची मला सतत खंत वाटते. मिसळ लोकांपर्यंत पोहचलीय; पण ब्रँड म्हणून नाही. मी त्यासाठी प्रयत्न करतोय.

अजून सहा मराठी मेनूच्या ट्रेडमार्कची प्रक्रिया चालू आहे. मिसळमध्येच अजून २०२१ नंतर मिसळ दरबारच्याच मिसळच्या वेगळ्या प्रकारच्या टेस्ट आम्ही बॉक्स पॅकिंगमध्ये लोकांसाठी घेऊन येणार आहोत. घरी न्या आणि फॅमिलीसोबत खा किंवा प्रवासातसुद्धा न्या. या सगळ्यासाठी आम्ही काम करतोय.

पुणे शहरात दोन ते तीन ठिकाणी आमच्या मल्टिप्लेक्सवर जाहिराती चालू आहेत. त्याचसोबत फेसबुक, ट्विटरवरूनही आम्ही लोकांकडे पोहोचतोय.

मी कोणाही मिसळ विक्रेत्याला माझा प्रतिस्पर्धी समजत नाही. मला वाटते, या प्रत्येकाने पुढाकार घ्यावा आणि त्यांच्या मिसळही वाढवाव्यात. एक ब्रँड म्हणून मला ‘मिसळ’ला मोठं करायचंय. यातून मराठी माणसासाठी रोजगार वाढेल.

माझ्या वडिलांचा व्यवसाय करायला विरोध होता; पण आईचा मला पूर्ण पाठिंबा होता. सुरुवातीच्या काळात आमचे मित्र, उद्योगाच्या सुरुवातीपासून माझ्यासोबत काम करणारा माझा स्टाफ, आम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे दिशा दाखवणारे आमचे नगरसेवक अशा प्रत्येकाने खूप मदत केलीय. मसाले बनवून देणार्‍या व्यक्तीपासून ते रॉ मटेरियल पुरवणार्‍यांपर्यंत, तर आमचे सर्व कायदेशीर बाबी पाहणारे आमचे मित्र असोत सारे माझा परिवार आहेत.

यातला प्रत्येक व्यक्ती रात्रीअपरात्रीसुद्धा मदतीला तयार असतो. सध्याचेच उदाहरण पाहू. नुकताच आमच्याकडे पूर आला होता. आमचे रॉ मटेरियल भिजले, काही वाहून गेले. या सर्व काळात आमचा स्टाफ चार दिवस तहानभूक विसरून दिवसरात्र काम करत होता. सुखादुखात ते नेहमी सोबत करतात.

उद्योग करताना अनेक समस्या येतात. सध्याचे एक उदाहरण सांगतो. धनकवडीत आम्ही दुकान सुरू करताना जागा पाहिली. त्याचे मालक मुंबईचे होते आमचा व्यवहार झाला. दोनेक लाखांची गुंतवणूक केली आणि आम्हाला कळले ते त्या जागेचे मालक नाहीत. पोलिसांकडून नोटीस वगैरे आल्या आणि आमचे दुकान काम थांबववावे लागले.

पुढे मूळ मालकाची भेट झाली आणि त्यांच्यासोबत अ‍ॅग्रीमेंट झाले आणि दुकान सुरू झाले; पण वर्षभरातच त्यांनी जागा विकली आणि आम्हाला जागा रिकामी करावी लागली. आम्ही पंधरा लाख तोट्यात आहोत; पण व्यवसाय म्हटले की, अशा अनेक समस्या येतात. त्यांना सोबत घेऊन पुढे जायचे. आपला इथला प्रवास एवढाच होता.

आता पुढे पहावं असा विचार मी करतो. भविष्याकडे पाहायचे. येत्या जानेवारीपर्यंत आम्हाला स्वतःची मोठी फॅक्टरी सुरू करायची आहे. ते काम वेळेत पूर्ण करण्याचे आमचं लक्ष्य आहे. त्यामुळे अशा अनेक समस्या येतात; पण त्यावर मात करून सकारात्मक विचार करत पुढे जायचे हे आमचे लक्ष्य आहे. या फॅक्टरीचे काम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानदंड लक्षात घेऊन आम्ही करतोय. फॅक्टरीचे काम पूर्ण झाले की मग ‘मिसळ दरबार’ आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले उत्पादन घेऊन उतरणार आहे.

शिक्षणात प्रत्येकालाच गती नसते, त्या वेळी आपण स्वतःला चाचपून पाहावे. तिथे वेळ आणि पैसा न घालवता आपली आवड शोधून त्यात काम करावे. घरच्या प्रत्येकाचा पाठिंबा उद्योगात उतरणार्‍यासाठी महत्त्वाचा असतो आणि नेहमी सकारात्मक विचारसरणीच्या लोकांसोबत राहा. आर्थिक भांडवल ही प्रत्येक उद्योजकांसाठी धंद्यात आवश्यक गोष्ट आहे.

नव्याने उद्योगात उतरणार्‍या अनेकांना भांडवल कसे उभे करू किंवा माझ्याकडे पैसा नाही, मग मी काय करू, धंदा कसा करू, असे प्रश्न असतात; पण सचिन आपल्या अनुभवाने सांगतात, सर्वप्रथम ‘हे होणारच नाही ही भावना मनातून काढा.’ मग न घाबरता व्यवसायात उतरा. धाडस करा, पैसा उभा राहतो.

जेव्हा मी उद्योगाची सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे तीन हजार रुपये होते. कोल्ड कॉफी हे आमचे प्रॉडक्ट होते; पण आमच्याकडे फ्रिज घ्यायलाही पैसे नव्हते. अशा वेळी आम्ही थर्माकोलमध्ये बर्फ टाकून टाकी ठेवून दूध थंड करायचो आणि कॉल्ड कॉफी लोकांना सर्व्ह करायचो. काम सुरू केले की अडचणी सोडवता येतात आणि लवकरच आपण त्यातून पुढे जातो.

माझे नवीन नवीन शॉप सुरू झाले तेव्हापासून रोज साडेतीन किलोमीटर प्रवास मी चालत करायचो. सकाळी नऊ वाजता दुकान उघडायचो आणि रात्री दीड वाजता बंद करून पुन्हा तेवढेच अंतर पायी घरी यायचो. माझ्याकडे सायकल घ्यायलाही पैसे नव्हते. त्याच कॉफी शॉपमुळे आज मी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिसळ दरबार सुरू करू शकतोय.  मी अशा प्रकारे पै पै जोडून पैसा उभा केलाय.

२०३५ पर्यंत मला पाच प्रकारचे आस्थापना सुरू करायचे आहेत. फूड इंडस्ट्रीत साई कॉफी, मिसळ दरबार, व्हेज, नॉनव्हेज हॉटेल सुरू करायचे आहे. याशिवाय स्वत:चे २५० बेड असलेले हॉस्पिटल सुरू करायचे आहे. विंचवेकर फूड प्रा. लि. म्हणून कंपनी आम्ही रजिस्टर केलीय. सोबत आमचे अनेक गुंतवणूकदार आज आमच्यासोबत जोडण्यासाठी उत्सुक आहेत.

मी एकटा असतो तर मी कधीच मोठा झालो नसतो. माझा स्टाफ माझ्यासाठी देव आहे. सोबत कुटुंबीय आहेत. या सार्‍यांची एक टीम माझ्यासोबत आहे. कामाच्या व्यवधानामुळे अनेकांना अनेक वेळा मी वेळ द्यायला कमी पडतो. मग अशा वेळी थोडे ते दुखावले जातात. माझा नाइलाज असतो. व्यवसायात हे प्रसंग येतात. आपल्याला त्यासाठी खंबीर असावे लागते.

उद्योगात उतरू इच्छिणार्‍या म्हणण्यापेक्षा मला वाटते जास्तीत जास्त लोकांनी उद्योगात उतरावे असे माझे मत आहे. अनेक लोक गफलत करतात आणि एका गोष्टीवर ठाम न राहता वेगवेगळे पर्याय एकाच वेळी हाताळत असतात. मला वाटते, असे न करता एक तर एकाच प्रॉडक्टवर जास्त लक्ष केंद्रित करावे, जेणे करून आपण व्यवसायाला प्राधान्य आणि न्याय देऊ शकू.

आपली क्षमता अगोदर ओळखा. आपण कुठपर्यंत जायचंय हे तपासा. आणि आपण किती उडी घेऊ शकतो ते अभ्यासा. मार्केटमध्ये काय चालले आहे ते पहा. तुमच्या मनाला काय आवडते ते पहा. अमुक व्यक्ती हे करतो म्हणून मी हे करतो असे केले तर तो तात्पुरता व्यवसाय झाला. नावीन्य शोधा.

सचिन विंचवेकर
९९६०३३३३७४


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?