Advertisement
उद्योगोपयोगी

मोबाइल वॉलेटचा वापर करून आपला व्यवसाय कसा वाढवावा?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याची घोषणा केली आणि त्यानंतर लगेच पूर्ण देश केवळ एकाच गोष्टीची चर्चा करण्यात गुंग झाला. टीव्ही चॅनेल्स, वर्तमानपत्रे यांमध्ये बऱ्याच चर्चा रंगल्या. व्हॉट्सअॅ्प आणि फेसबुकवर जोकचा खप पडला, पण नंतर लगेच एटीएम आणि बँकेसमोर मोठमोठ्या रांगा दिसू लागल्या. मोठ्या नोटा चालत नाहीत आणि छोट्या नोटा पुऱ्या पडत नाहीत अशी विचित्र अवस्था सगळीकडे बघायला मिळाली.

आधीपासूनच मोबाइल पेमेंटचा स्वीकार करत असल्याने नरेंद्र मोदींनी अचानक घोषित केलेल्या या निर्णयाने मला रोकडची अडचण अजिबात जाणवली नाही. आमचा बिझनेस नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन हा तर पूर्णपणे ऑनलाइन पेमेंट आणि आमच्या उत्पादनाची ऑनलाइन डिलिव्हरी यामुळे जगभरात कुठूनही कोणीही आमचे ग्राहक होऊ शकतात.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

प्रत्येक व्यवसायात हे शक्य नाही; मात्र तरीही पहिला भाग म्हणजे ऑनलाइन किंवा मोबाइल पेमेंट स्वीकारणे मात्र प्रत्येक उद्योगात शक्य आहे. मोबाइल वॉलेट्स हा ऑनलाइन पैसे स्वीकारण्याचा एक उत्तम मार्ग आहे. दिवसेंदिवस मोबाइल फोन स्मार्ट होत आहेत आणि मोबाइलमध्ये इंटरनेटचा वापरदेखील वाढत आहे. मोबाइल वॉलेट वापरण्याचे ग्राहकाला आणि व्यापाऱ्याला दोघांनाही खूप सारे फायदे आहेत.

मोबाइल वॉलेटचे फायदे मी सांगणारच आहे. त्याआधी…

आपण मोबाइल वॉलेटचा मुख्य हेतू काय आहे ते समजावून घेऊ या.

याला ‘वॉलेट’ म्हणजेच पाकीट असे म्हटले आहे, कारण खरोखर आपल्या पाकिटाची जागा मोबाइल वॉलेट्सना घ्यायची आहे. आपण आपल्या पाकिटात रोख पैसे ठेवतो, बँकेचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स ठेवतो. या सर्व गोष्टी आपल्याला मोबाइल वॉलेटमध्ये ठेवता येतात.

मोबाइल वॉलेटमध्ये हे सर्व encrypted असतात. यामुळे चोरी होण्याची अथवा हरवण्याची भीती नसते. बरेच लोक क्रेडिट कार्ड चोरी होईल या भीतीमुळे वापरतच नाहीत. मोबाइल वॉलेट्सने त्यांचा हा प्रश्न सोडवला आहे.

मोबाइल वॉलेट्सचे ग्राहकांसाठी फायदे :

१) वापरण्यास सोपे :

वॉलेटमुळे ग्राहकांना एकाच क्लिकमध्ये पैसे देता येतात. यामुळे सतत क्रेडिट-डेबिट कार्ड पिन टाइप करणे, वेगवेगळे पासवर्ड्स लक्षात ठेवणे, क्रेडिट कार्ड स्वाइप करण्यासाठी कुणा अनोळखी व्यक्तीच्या हातात देणे या सर्व गोष्टींपासून ग्राहकांची सुटका होते.

२) हाताळण्यास सोपे :

खूप सारे क्रेडिट कार्ड्स आणि रोख रक्कम सोबत बाळगण्याची गरज नाही. डिजिटल वॉलेटमुळे पाकीट हलके झाले आहे.

३) त्वरित पैसे मिळवण्याची सोय :

मोबाइल वॉलेटमध्ये पैसे दिल्याची तसेच पैसे मिळाल्याची त्वरित पोच मिळते. पैसे लगेचच आपल्या अकाऊंटमध्ये दिसू लागतात.

४) सर्व बँकांची कार्ड्स एकाच ठिकाणी :

मोबाइल वॉलेटमध्ये सर्व बँकांची कार्ड्स एकाच ठिकाणी दिसतात, त्यामुळे पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट सहज शक्य होते.

५) सुट्टे पैसे जवळ बाळगण्याची गरज नाही :

मोबाइल वॉलेट्सच्या वापरामुळे आपल्याला हवे तेवढेच पैसे देता किंवा घेता येतात. त्यामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्नच येत नाही.

६) भरपूर सवलती आणि ऑफर्स :

मोबाइल वॉलेट्सचा वापर वाढवा आणि जास्तीत जास्त लोकांनी या पद्धतीचा स्वीकार करावा म्हणून मोबाइल वॉलेट्स कंपन्या ग्राहकांना खूप साऱ्या सवलती व ऑफर्स देत आहेत. पुढील काही वर्षे या सवलती ग्राहकांना नक्कीच मिळत राहतील.

मोबाइल वॉलेट्सचे व्यापाऱ्यांना फायदे :

१) ग्राहकांच्या पसंतीची पेमेंट सुविधा :

मोबाइल वॉलेट्स हे त्यांच्या अनेक फायद्यांमुळे ग्राहकांच्या पसंतीचे ठरत आहेत. जास्तीत जास्त लोक त्या वर्षात मोबाइल वॉलेट्सद्वारे पेमेंट करतील, त्यामुळे व्यापाऱ्यांना यापासून जास्त दिवस दूर राहता येणार नाही.

२) व्यवसायात वाढ :

मोबाइल वॉलेटमुळे पैसे देणे सोपे असते. एका क्लिकसरशी पेमेंट, त्यामुळे जे व्यापारी मोबाइल वॉलेट्सने पैसे स्वीकारतील त्यांना जास्त ग्राहक मिळतील आणि व्यवसायात वाढ होईल.

३) सुरक्षित सेवा :

व्यापाऱ्यांना खोट्या किंवा चोरीच्या क्रेडिट कार्ड्सचा नेहमी खूप मोठा फटका बसतो. मोबाइल वॉलेट्समुळे व्यापाऱ्यांना हा धोका नसतो.

४) नवीन मार्केटिंग पद्धती :

मोबाइल वॉलेट्स फक्त पैशांची देवाणघेवाण करण्यापुरतेच मर्यादित नसून एक चांगले मार्केटिंग सोल्यूशन आहे. मोबाइल सतत लोकांच्या हातात असतो. त्यामध्ये लोकल ऑफर्स, कॅश बॅक, नोटिफिकेशन्स इत्यादी पाठवून ग्राहकांना आणखी खरेदीसाठी प्रवृत्त करता येते.

सध्या paytm, मोबीक्विक, ओला मनी, रिलायन्स जिओमोनी आणि फ्रीचार्ज ही काही आघाडीची मोबाइल वॉलेट्स भारतीय बाजारात आहेत. त्याचप्रमाणे आयसीआयसीआय बँकेचे पॉकेट्स आणि एचडीएफसी बँकचे पेझअॅप हे वॉलेटदेखील उपलब्ध सेवा पुरवू लागतील.

व्यापाऱ्यांनी मोबाइल वॉलेट कसे वापरावे?

मोबाइल वॉलेटच्या माध्यमातून पैसे स्वीकारणे खूपच सोपे आहे. आपल्या व्यवसायाची जुजबी माहिती दिल्यावर काही तासांतच तुम्ही मोबाइल वॉलेटमधून पैसे स्वीकारू शकता. (ऑनलाइन उद्योगासाठी काही तासांतच स्वीकृती मिळते आणि जर ऑनलाइन म्हणजे दुकान, ऑफिस अशा ठिकाणी पैसे स्वीकारणार असल्यास दोन दिवसांनंतर स्वीकृती मिळते.) मोबाइल वॉलेटमधून पैसे स्वीकारण्यासाठी तुमची कंपनी असणे आवश्यक आहे असेही नाही.

यामध्ये peer-to-peer transaction शक्य असते. म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पैसे देऊ शकते. यासाठी फक्त दोन्ही व्यक्तींच्या मोबाइलवर त्या मोबाइल वॉलेटचे अप असणे आवश्यक आहे. ज्यांनी पैसे पाठवायचे आहेत त्यांनी आपला मोबाइल नंबर दिला की, ती व्यक्ती मोबाइल वॉलेटमधून आपल्या मोबाइल वॉलेटवर पैसे पाठवू शकते.

मित्रांनो,

येत्या काळात सर्व क्रेडिट/डेबिट कार्ड आणि मुख्य म्हणजे रोख रकमेचे व्यवहार इतिहासजमा होणार आहेत. जास्तीत जास्त व्यवहार ऑनलाइन किंवा मोबाइल वॉलेट्सनेच होणार आहेत. त्यामुळे आपण यापासून इच्छा असूनही दूर राहू शकत नाही.

जे आपल्याला उद्या नाइलाजास्तव करावेच लागणार आहे ते स्वखुशीने, पुढाकाराने आजच केलेले बरे! नाही का?
– सलील चौधरी


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!