’मेक इन इंडिया’ने प्रभावित होऊन अमेरिकेतून भारतात परतलेल्या निलेशची कथा


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


निलेश लेले हा मुंबईस्थित तरुण शिक्षण पूर्ण करून अमेरिकेला गेला. अमेरिकेत उच्चपदस्थ पदावर नोकरी करून पुढे काही काळाने स्वत:चा व्यवसाय उभा करण्याच्या उद्देशाने मायभूमीत परतला. भारतात येऊन सुरुवातीला स्वत:ची कन्सल्टन्सी सुरू केली, ज्याद्वारे एम.एस.एम.ई.ला मार्गदर्शन करून त्यांच्या सिस्टम्स आणि प्रोसेसेस सुधारणं हा उद्देश होता.

हे करत असताना लवकरच त्याच्या लक्षात आलं की, नुसत्या मार्गदर्शनाने काही होणार नाही. इथे प्रत्यक्ष मैदानात उतरून कृती करून दाखवण्याची गरज आहे. हे लक्षात आल्यावर त्याने स्वत: ब्रेव्हरेजेसनिर्मितीला सुरुवात केली. वेगवेगळ्या प्रकारची सरबते व सोडा यांचे उत्पादन सुरू केले. कोक आणि पेप्सीसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांना जी भारतीय उत्पादने बाजारात सक्षमपणे तोंड देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यात निलेशच्या ‘फ्रिग्जो’ ब्रॅण्डचंही नाव आवर्जून घ्यावंच लागेल.

अशा या स्वदेशाभिमानी, कर्तृत्ववान उद्योजकाच्या स्टार्टअपच्या आजवरच्या प्रवासाबद्दल त्याच्याशी झालेल्या मोकळ्या गप्पांचा हा गोषवारा…

मी निलेश लेले. ऐेंशी वर्षे जुन्या, जिथे मुकेश अंबानी, आशू दानिया अशा बर्‍याच दिग्गजांनी शिक्षण घेतलं अशा ‘युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी’मधून केमिकल इंजिनीअरिंग पूर्ण केलं. माझे बाबा आयआयटीमधून, पण माझी आईसुद्धा याच संस्थेतून केमिकल इंजिनीअर झाली. इंजिनीअरिंग पूर्ण करून थेट अमेरिकेला गेलो.

२००० साली तिथे एम.एस. आणि त्यापाठोपाठ एमबीए पूर्ण केलं. पुढची सात-आठ वर्षं अमेरिकेतच इनव्हेस्टमेंट बँकिंग क्षेत्रात नोकरी केली. अमेरिका सोडली त्या वेळी मी ‘बार्कलेस कॅपिटल’मध्ये व्हाइस प्रेसिडंट इनव्हेस्टमेंट मॅनेजर म्हणून होतो.

भारतात परतल्यावर करीअरमध्ये एकूणच पूर्ण बदल नको म्हणून प्रथम काही काळ इथे खासगी बँकेत नोकरी केली. अमेरिकेतल्या आणि इथल्या बँकिंगमधला फरक त्या वेळी प्रामुख्याने लक्षात आला. अमेरिकेत फायनान्स क्षेत्र जेवढं विकसित आहे, तेवढं भारतात नाहीय. त्यामुळे भारतात बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्यात तेवढं मन रमलं नाही. दुसरीकडे मनात स्वत:चं काही तरी सुरू करायचं हे विचार पक्के होत होते.

सामान्यपणे भारताबाहेर राहणार्‍यांपैकी ९० टक्के भारतीयांना मनाने भारतात परत यायचेच असते; पण बरेच जण आर्थिक नुकसानाचा विचार करून परत येण्याचा निर्णय घेऊ शकत नाही.

आर्थिक बाबतीत माझं सोपं गणित होतं. इथे येऊन दुसरं काही करता आलं नसतं तरी बारावीचे क्‍लासेस घेतले असते. आजकाल विद्यार्थ्यांची फी ३० ते ४० हजार रुपये असते. १०० मुलं घेतली असती तर ४० लाख रुपये वार्षिक उत्पन्न झालं असतं. दुसरी गोष्ट, माझी पत्नीसुद्धा व्यवस्थित नोकरी करणारी असल्यामुळे तितकी आर्थिक चिंता नव्हती. एका पगारातसुद्धा आमचं घर अगदी अमेरिकन पद्धतीने नाही, पण भारतीय पद्धतीने चालू शकेल असं होतं.

परदेशात राहणार्‍या प्रत्येकाची परिस्थिती ही माझ्यासारखी असेलच असं नाही, त्यामुळे मी त्यांनी इथे यायलाच हवं, अशा आग्रही मताचा नाहीय.

भारतात उद्योजकीय प्रवासाची सुरुवात करताना मी प्रथम स्वत:ची कन्सल्टन्सी सुरू केली. कुटुंबआधारित उद्योगांना, त्यातही विशेष करून अन्नप्रक्रिया क्षेत्रातील कंपन्यांना मी माझी कन्सल्टंसी देऊ लागलो. या कंपन्यांच्या वेगवेगळ्या प्रश्‍नांचा अभ्यास करत असताना मी बर्‍याच गोष्टी शिकलो. त्यातून मी स्वत:चं फूड प्रॉडक्ट मार्केटिंग सुरू केलं. फूड प्रॉडक्ट कंपन्यांचे प्रश्‍न सोडवणं आणि त्यांचं मार्केटिंग या अनुभवातून मी स्वत: अन्नप्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला.

माझा हा निर्णय ऐकून सगळे मला हेच सांगू लागले की, उत्पादन खूप कठीण आहे. त्यात पडू नको; पण जे कठीण आहे, त्यातच मला संधी दिसू लागली, कारण कठीण आहे, त्यामुळे त्यात यायला सगळेच मागे राहणार.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


सामान्यपणे लोक माल पिकवतात आणि मग त्यांना तो विकायला अडचण येते. माझं मात्र असं नव्हतं. माझा आधीचा फूड प्रॉडक्ट मार्केटिंगचा अनुभव मला स्वत:चं प्रॉडक्ट विकण्यासाठी कामी येणार होता. भारतात अन्नप्रक्रिया उद्योगाला भरपूर संधी आहे. भारतात फक्त तीन ते सात टक्के अन्नावर प्रक्रिया होते. मलेशियासारख्या देशात हेच प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत आहे. अन्नप्रक्रियेचा सगळ्यात मोठा लाभ हा शेतकर्‍याला होणार आहे.

आज भारतीय शेतकर्‍याची जी अवस्था आहे ती या क्षेत्रामुळे नक्कीच खूप सुधारू शकेल. देशात होणारी शेतकी मालाची नासाडी ही खूप हानिकारक आहे. कोकणात दरवर्षी सुमारे ८० टक्के फणस दरवर्षी वाया जातो. हे खूप मोठं पाप आहे. जर काही तरी हालचाल करून त्याला वाचवता आलं तर, त्याच्यात काही Value addition करता आलं तर. हापूस आंबा सोडला तर इतर आंबेसुद्धा वाया जातात. कोकणातली सगळी फळं साधारण एकाच काळात येत असल्यामुळे सगळ्यांचं प्रोसेसिंगचं लक्ष्य फक्त हापूस आंबा असल्यामुळे कोकम, करवंद, जांभूळ, फणस याला थोडंसं दुर्लक्ष झाल्यासारखं होतं.

या गोष्टीचा मी असा विचार केला की, इथेच खरी किंमत आहे. ते जर वाया जातं, तर ते वाचवलं तर अप्रत्यक्षपणे हे समाजाचं भलंच आहे. एक उद्योजक म्हणून हीच खरी समाजसेवा आहे.

त्यामुळे आम्ही कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील जी फळं आहेत त्यांचा वापर करून आम्ही कोकम, लेमन, जिरा, जामून वापरून वेगवेगळे सोडा आणि सरबत बनवतो. आताच्या आमच्या फॅक्टरीमध्ये आम्ही दर मिनिटाला वीस बाटल्या कार्बोनेटेड सोडा बनवतो.

सध्या आम्ही आमच्या नवीन फॅक्टरीचे सेटअप करतो आहोत, जिथे सध्याच्या क्षमतेपेक्षा पाचपट उत्पादन होऊ शकेल. तिथे प्रामुख्याने वेगवेगळ्या फळांची सरबते बनवली जातील. त्यात आंबा, पेरू, अननस अशा प्रादेशिक फळांची सरबते केली जातील. अननसासारखं फळ हे सावंतवाडीत बाराही महिने मिळतं; पण ते प्रामुख्याने वायाच जातं.

फळांसोबत आम्ही भाज्यांचेही बेव्हरेजेस बनवणार आहोत. यात मुख्य आव्हान हे आहे की, फळं ही आम्लयुक्त (अॅजसिडिक) असतात, त्यामुळे त्यांना शेल्फ लाइफ देणं सोपं असतं. मात्र भाज्या या अल्काइन असतात, त्यामुळे त्या टिकणं कठीण असतं.

त्यामुळे प्रिझर्व्हेटिव्हचा उपयोग न करता ते टिकवण्यासाठी आम्ही काही प्रयोग करतो आहोत. जसे की कोकम आणि दुधीचं कॉम्बिनेशन केलं, की ते चांगल्या प्रकारे टिकवता येतात. अशी काही आगळीवेगळी आणि पौष्टिक उत्पादनं आम्ही बाजारात आणणार आहोत.

तंत्रज्ञानाच्या बाबतीत सध्या आम्ही हीट प्रोसेस या पद्धतीचा वापर करतो, ज्यामध्ये पदार्थाला उकळवून त्याच्यावर प्रोसेस केली जाते. आता आम्ही प्रेशर प्रोसेस या तंत्रज्ञानावर काम करत आहोत ज्यामध्ये पदार्थातील घटकांची गुणवत्ता कमी होत नाही.

आसव म्हणजे वाइन उत्पादन यावरही काम सुरू आहे. आम्ही त्याचंसुद्धा उत्पादन करणार आहोत. आंबा व जामूनपासून तयार केलेली वाइन ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुणकारी आहे. अगदी थोड्या प्रमाणात घेतले तर सर्वांसाठीच ती उपयुक्त आहे.

एकूण बेव्हरेजेसच्या मार्केटमध्ये आमचा शेअर खूप कमी म्हणजे अगदी नगण्य आहे; पण २०२४ पर्यंत हजार कोटीला टच करण्याचे माझे लक्ष्य आहे. त्या दृष्टीने आतापासून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आमच्याकडे यंत्रणा आहे, जागा आहे, पाणी आहे, पुरेसं भांडवलही आहे. आता फक्त एक टीम बनवून टप्प्याटप्प्याने आम्हाला प्रगती करायची आहे. यामध्ये तीन प्रकारच्या प्रॉडक्ट्सवर भर देतोय, ज्यात एक म्हणजे ज्यूसेस, दुसरे कार्बोनेटेड ज्यूसेस आणि तिसरे कॅन्स. कॅन्सची निर्यात जास्त होऊ शकेल, कारण विदेशात कॅन्सना जास्त मागणी असते. मध्य-पूर्व, दक्षिण आशिया आणि आफ्रिका यांवर आमचा जास्त भर असणार आहे. त्यासाठी आमची नवी फॅक्टरी ‘आयएसओ २०००’ या अत्याधुनिक मानांकनाने प्रमाणित असणार आहे.

आम्ही एफडीआयसाठीसुद्धा प्रयत्न करणार आहोत, कारण हजार कोटींची कंपनी करायची असेल, तर आतापासून मोठ्या पातळीवर काम करणं गरजेचं आहे. तुम्ही मोठा विचार करता तेव्हाच तुम्ही मोठे होत असता. आपण मराठी आहोत म्हणून आपणच कशाला नकारात्मक विचार करून मागे का राहायचं? देशात बर्‍याच गोष्टींची मुहूर्तमेढ ही मराठी माणसानेच केली आहे. मराठी माणूस करू शकत नाही असे काही नाही. मराठी माणूस सुशिक्षित असतो, हुशारही असतो, पण स्वत:च्याच या संकुचित वृत्तीमुळे आपण मागे राहतो.

व्यापारउदिमांत अग्रणी असलेले अन्य समुदायातील लोक असा विचार करतात की, आपण सुशिक्षित नाही, पण धंदा करण्यापेक्षा आम्ही दुसरं काहीच करूच शकत नाही. यामुळे ते नेटाने धंदा करू शकतात. आपण असा विचार केला पाहिजे की, ते अशिक्षित असूनसुद्धा धंदा करू शकतात, तर आपण सुशिक्षित असल्यामुळे त्याहूनही चांगला धंदा केला पाहिजे.

आपण काय विचार करतो, सुशिक्षित होऊ या कुठे तरी, काही तरी अकाऊंट्समध्ये वगैरे नोकरीला लागू या. या आपल्या गेल्या तीस-चाळीस वर्षांत जी अशी मानसिकता झाली आहे, त्यामुळेच आपण मागे आलोय, पण हे चित्र नक्की बदलेल. आपली पुढची पिढी असं म्हणणार नाही.

उद्योग करण्यात अमेरिका आणि भारत यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. प्रत्येक ठिकाणाची आव्हानं वेगळी असतात. आपण म्हणतो की, अमेरिकेत व्यवसाय करणं सोप्पं आहे; पण तिथे एकही चूक करून चालणार नाही. इथे तुमच्या किती तरी गोष्टी सांभाळून घेतल्या जातात.

आपण आपल्याकडच्या सकारात्मक गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. आज देशात उद्योगपूरक वातावरण निर्माण झालं आहे. याचा लाभ घेऊन अधिकाधिक तरुणांनी आजच उद्योगात येण्याची गरज आहे.

– निलेश लेले
९९३०४०५५४२


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?