उधारी बंद करून अशाप्रकारे करसनभाईंनी नफ्यामध्ये आणली ‘निरमा’

‘दूध सी सफेदी निरमासे आए,
रंगीन कपडा भी खिल खिल जाये।
सब की पसंद निरमा, वॉशिंग पावडर निरमा…

सत्तरच्या दशकात टीव्हीवरील जाहिरातीतील एक अग्रगण्य आणि लोकप्रिय जाहिरात. आजही प्रत्येकाच्या मनावर गारूड करून राहिलेला ‘निरमा’ हा ब्रॅण्ड आहे. स्पर्धेच्या युगात आपल्या उद्योगात कठीण काळात स्वत:ला टिकवताना काही धाडसी निर्णय घेण्याची वेळ प्रत्येक उद्योजकावर एकदा तरी येतेच; परंतु उद्योजक त्या कठीण काळात काय निर्णय घेतो त्यावर त्याच्या उद्योगाचे भविष्य ठरतं.

‘निरमा’ या ब्रॅण्डच्या जन्माच्या मुळाशीही अशाच धाडसी निर्णयाचा पाया आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे राहणारे करसानभाई पटेल हे एका सरकारी खात्यात कामाला होते. वरखर्चासाठी जोडधंदा म्हणून त्यांनी १९६९ मध्ये आपल्या घराच्या अंगणात डिटर्जंट बनवण्याचं काम सुरू केलं. करसानभाई स्वतः बीएस्सी केमिस्ट होते. त्यांनी फॉस्फेटमुक्त कृत्रिम डिटर्जंट पावडर बनवायला सुरुवात केली.

‘निरमा’चे प्रणेते करसानभाई पटेल

आपल्या मुलीच्या नावावरून त्यांनी या डिटर्जंट पावडरला ‘निरमा’ हे नाव दिलं. दररोज कामावर जाताना आणि परत घरी येताना करसानभाई घरोघरी जाऊन निरमा डिटर्जंट पावडर विकू लागले. जेव्हा भारतात इतर डिटर्जंट पावडर १३ रु. किमतीला मिळत तेव्हा करसानभाई यांची निरमा पावडर ३ रु. ला मिळू लागली.

हळूहळू या स्वस्त आणि उत्तम गुणवत्ता असलेल्या डिटर्जंट पावडरची मागणी वाढायला लागली. काही वर्षे अशा तर्‍हेने त्यांनी काम चालू ठेवलं, परंतु मागणी बर्‍यापैकी असतानाही करसानभाईंना एक मोठी अडचण भासू लागली. ती म्हणजे दुकानदार विक्री झालेल्या मालाची पूर्ण रक्कम द्यायला तयार नसत.

जेव्हा निरमा डिटर्जंटचे सेल्समन विक्री झालेल्या मालाची रक्कम आणायला जात तेव्हा दुकानदार एक तर अर्धी रक्कम द्यायचे किंवा उरलेला माल परत करून पुन्हा न येण्यास सांगायचे.

करसानभाईंना या गोष्टीवर तोडगा काढायचा होता. यावर उपाय म्हणून काही धाडसी निर्णय घेण्याचे त्यांनी ठरवले. एकदा त्यांनी आपल्या सर्व सेल्समन आणि सहकारी यांना बोलावून घेतले व प्रत्येक दुकानदाराकडून आपला विक्रीसाठी दिलेला माल किंवा त्याची किंमत घेऊन या असे सांगितले. करसानभाईंच्या या निर्णयामुळे बाजारपेठेतील निरमा डिटर्जंटचा सर्व माल जवळजवळ संपला. त्याच वेळी या परिस्थितीत त्यांनी टीव्हीवर निरमाच्या जाहिरातीच्या प्रसारणावर जोरदार भर दिला! जाहिरातीचे महत्त्व करसानभाईंना माहीत होते!

काही आठवड्यांतच ग्राहक दुकानदारांकडे निरमा डिटर्जंटची मागणी करू लागले; पण दुकानदार अडचणीत आले. त्यांच्याकडे निरमाचा माल नव्हता. निरमाचे सेल्समन माल द्यायला येत नव्हते!

करसानभाईंना हेच अपेक्षित होतं! बर्‍यापैकी बाजारात निरमाची मागणी वाढल्याबरोबर त्यांनी परत आपल्या सेल्समन आणि सहकार्‍यांना बोलावून घेतले आणि त्यांनी एक निर्णय जाहीर केला की, यापुढे ‘निरमाचा माल उधारीवर दिला जाणार नाही; दुकानात माल पोहोचला की लगेच त्याची रक्कम घ्यायची.’

हा ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चा झालेला बदल निरमा डिटर्जंटसाठी खूप लाभदायी ठरला. करसानभाईंनीं नेहमी ‘कमी किमतीत जास्त गुणवत्ता’ या गोष्टीवर कटाक्षाने भर दिला. उद्योगवाढीसोबतच उद्योगातील आधुनिकीकरणावरही लक्ष केंद्रित केले.

सत्तरच्या दशकात भारतात डिटर्जंट पावडर क्षेत्रामध्ये मोठमोठ्या कंपन्यांचा दबदबा होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत करसानभाईंनीं आपल्या छोट्या उद्योगाचं रूपांतर एका प्रचंड उद्योगात करून दाखवलं. कालांतराने डिटर्जंट पावडरसोबत निरमा साबणाचे उत्पादनही त्यांनी बाजारात आणले.

पद्मश्री करसानभाई पटेल यांचा एक धाडसी निर्णय त्यांच्या उद्योगाला नव्या क्षितिजावर घेऊन गेला. छोटा उद्योग एक मोठा ब्रॅण्ड म्हणून उदयाला आला आणि आज ‘निरमा’ हे नाव डिटर्जंट उद्योगात आघाडीवर आहे.

अभिमन्यू काटकर
abhikat32@gmail.com

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?