अर्जुन पाटील आणि निवेदिता पाटील दोघेही मायक्रोबायोलॉजीमध्ये एम.एस्सी. पूर्ण केलेले आणि औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये अनुभव असलेले. त्यांनी लग्नानंतर काही दिवसांतच आयुष्याला कलाटणी देणाऱ्या प्रसंगाला सामोरे जावे लागले.
निवेदिताला अर्धांगवायूचा झटका आला, पण या संकटाला न घाबरता, त्यांनी शहर सोडून मूळ गावी परतण्याचा आणि तिथे व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आजारपण हे त्यांचे कमकुवत बिंदू असले, तरी त्यांनी त्यालाच आपली ताकद बनवले.
निवेदिता यांच्या नावातून प्रेरणा घेत ‘निवा’ हे ब्रँड नाव तयार झाले. २०१२ मध्ये ‘निवा हायड्रॉलिक्स’ या नावाने त्यांनी पहिला व्यवसाय सुरू केला. यात त्यांनी सर्व प्रकारच्या हायड्रॉलिक होजेसचे असेंब्ली मॅन्युफॅक्चरिंग सुरू केले.
या होजेसचा उपयोग JCB, पोक्लँड, बोरिंग मशीन, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आदी क्षेत्रांत होतो. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या या कंपनीने स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीला चालना दिली.
अनेक ब्रँडेड कंपन्यांनी कोट्यवधी रुपये खर्चून हायड्रॉलिक मशीन्स खरेदी केल्या, पण छोट्या होजेसअभावी त्या बंद पडायच्या. ही गरज ओळखून अर्जुन आणि निवेदिताने अत्याधुनिक मशीन शॉप उभारले. री-इंजिनीअरिंगद्वारे उच्च दर्जाचे होजेस त्वरित उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी सुरू केले. यामुळे व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला.
२०१६ मध्ये ‘निवा इंडस्ट्रीज’चे ‘निवा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये रूपांतर झाले. JSW सारख्या नामांकित ब्रँडसाठी इलेक्ट्रिकल्स उत्पादनांचे अत्याधुनिक दालन, पेंट शॉप आणि हायजिन प्रॉडक्ट्स अशा नव्या शाखा सुरू झाल्या.
हायजिन प्रॉडक्ट्सची सर्व जबाबदारी निवेदिता यशस्वीपणे सांभाळत आहेत. सांगली जिल्ह्यातील वास्तुनिर्मिती करणाऱ्यांना एकाच छताखाली सर्व वस्तू उपलब्ध करून देण्याच्या दिशेने कंपनी वाटचाल करत आहे.

अत्याधुनिक होजेस निर्मिती शॉपमुळे कंपनी आता देशभरातील अनेक कंपन्यांसाठी व्हेंडरशिप मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन, केंद्र शासनाच्या पंचतारांकित कंपनीकडे नोंदणी करून, देशभरातील सरकारी कंपन्यांना विविध प्रकारचे होजेस पुरवण्याचा प्रयत्न चालू आहे.
अर्जुन पाटील हे लघुउद्योग भारती, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर (मुंबई), मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर अशा औद्योगिक संघटनांचे सदस्य आहेत. नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या रोजगारनिर्मिती व कौशल्य विकास मंत्रालयाने त्यांची कवठे महांकाळ आयटीआयवर इंडस्ट्री प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली आहे.
अर्जुन आणि निवेदिता पाटील यांनी ‘निवा’च्या माध्यमातून संकटाला संधीत बदलले. ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार उत्पादनांद्वारे त्यांनी व्यवसायाला नवे परिमाण दिले. आज ‘निवा हायड्रॉलिक्स’ केवळ एक ब्रँड नाही, तर प्रेरणा, दृढनिश्चय आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे.
संपर्क : ९७६६९३०११७