एका क्लिकसरशी दारात येऊन उभी राहणार्‍या OLA ची यशोगाथा!


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


एखाद्या यशस्वी उद्योग किंवा प्रगतिपथावर असलेल्या स्टार्टअपचे नाव घेतले की, आपण वेगवेगळे चित्र रंगवत असतो. अनेक वेळा नवीन स्टार्टअप म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे अस्ताव्यस्त ऑफिस किंवा त्या स्टार्टअपचे संस्थापक हे कमी शिकले किंवा शिकताच आले नाही किंवा शिक्षण सोडलेले असतील असेच आपल्याला वाटत असते.

भाविश अगरवाल हा आय.आय.टी.मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक. झालेला आणि बंगळुरूमधील मायक्रोसॉफ्ट रीसर्च येथे मोठ्या पगाराची नोकरी करत होता, तर त्याचा भागीदार अंकित भाती हा मुंबईच्या आय.आय.टी.मधून एम.टेक. पूर्ण केलेला. अनेक स्टार्टअप्समध्ये कामाचा भरपूर अनुभव असलेला. हेच ते दोन तरुण ज्यांनी हे सर्व सोडून स्वत:चा स्टार्टअप सुरू करायचे ठरवले. हा स्टार्टअप म्हणजेच आज एक बटण दाबताच दारात येऊन उभी राहणारी ‘ओला’.

भाविश हा बंगळुरूमध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये काम करत असताना त्यासाठी त्याला बर्‍याच ठिकाणी फिरावे लागत असे. तेव्हा टॅक्सीशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता. अस्वच्छ गाड्या, गबाळे चालक, मनाला येईल तो भाव या सर्वानी भाविश त्रासला होता. आपली ट्रिप डिझाईन करण्याची वेबसाइट बंद करून लोकांना त्यांच्या सोयीनुसार टॅक्सी कशी मिळेल याबद्दल काही तरी सुरू करायला हवे असे भाविशला वाटले.

डिसेंबर २०११ मध्ये भाविश आणि अंकित यांनी ओला कॅब सुरू केली. ओला पहिली मुंबईत चालू लागली, परंतु ती बंगळुरूकेंद्रित होती.

आपण बर्‍याचदा ऐकतो की, मोठ्यात मोठा उद्योग हा भरपूर पैसे ओतून नाही तर एका मोठ्या कल्पनेतून उभा राहतो. त्याचप्रमाणे भाविश आणि अंकित यांनी कर्ज घेऊन भरपूर गाड्या विकत घेऊन मग चालकांना कामावर ठेवून ओला सुरू केली नाही. त्यांनी तल्लख बुद्धीचा वापर करून साध्या टॅक्सीचालकांना ओलाची संधी दिली.

त्या चालकांच्या टॅक्सींची थोडी डागडुजी आणि नूतनीकरण केले. तसेच टॅक्सीचालकांना पगार न देता कमिशन ठेवले. म्हणजेच जितके जास्ती पैसे टॅक्सीचालक कमवणार त्यातले ठरावीक टक्के ओलाचे आणि बाकी सर्व टॅक्सीचालकांचे असे ठरले. त्यामुळे टॅक्सीचालकसुद्धा प्रामाणिकपणे आपले काम करू लागले.

सुरुवातीला ओलाला फार पैशांची गरज नव्हती, परंतु जसजसा विस्तार वाढू लागला तसतशी पैशांची गरजही वाढू लागली. सुरुवातीला दोन एंजल गुंतवणूकदारांकडून ओलाला पहिल्या फेरीची गुंतवणूक मिळाली. आजपर्यंत एकूण आठ फेर्‍यांमार्फत ओलाने गुंतवणूक मिळवली आहे. टायगर ग्लोबल मॅनेजमेंट, स्टेडव्हिऊ कॅपिटल, सेक्विया कॅपिटल, सॉफ्टबँक कॅपिटल, डी.एस.टी. ग्लोबल आणि बाली गिफॅर्ड हे ओलाचे मुख्य गुंतवणूकदार आहेत.

जेव्हा या दोघांनी रग्गड पगाराची नोकरी सोडून उद्योजकतेत पाऊल ठेवायचे ठरवले तेव्हा दोघांनाही घरून प्रचंड विरोध होता; पण जेव्हा ओला कॅब देशात बर्‍याच ठिकाणी फिरताना दिसू लागली तेव्हा घरच्यांनीसुद्धा त्यांचे कौतुक केले. म्हणजेच आपल्या कल्पनेवरील ठाम विश्वास आणि प्रचंड मेहनत घेण्याची तयारी हा ओलाचा मुख्य आधारस्तंभ बनला आहे.

तसेच भाविश अगरवाल म्हणतो,

“आम्ही नवीन माणसे कामावर ठेवताना हवा तितका वेळ घालवतो; परंतु योग्य, चिकाटी असलेला आणि आपल्या कामावर प्रेम करणारा माणूस मिळेपर्यंत अजिबात कुणालाही आमच्या ओलामध्ये घेत नाही.”

खरोखर, एखादा उद्योग म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून त्यातील संस्थापक आणि कर्मचारी हेच असतात. त्यामुळे योग्य कर्मचार्‍यांची निवड हा उद्योजकतेतील यशाचा एक गुरुमंत्रच आहे. २०११ मध्ये भाविश अगरवाल आणि अंकित भाती यांच्या डोक्यात असलेली कल्पना आज चांगली प्रगती असलेल्या स्टार्टअप्सच्या यादीत धरली जाऊन १.२३ अब्ज इतकी त्या कल्पनेची किंमत झाली आहे आणि एक बटण दाबताच ती कल्पना ओलाच्या रूपात अनेक लोकांच्या दारात येऊन उभी राहत आहे.

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?