देशभरातील रेल्वे स्थानकांवर देशी आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची आणि भारतीय कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीसंबंधी दुकाने उभारून या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘एक स्थानक, एक उत्पादन’ या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली आहे.
ही उत्पादने म्हणजे त्या त्या परिसराचे वैशिष्ट्य असतील आणि त्यामध्ये देशी जातीजमातींनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, स्थानिक विणकरांनी विणलेली हातमागाची उत्पादने, जगप्रसिद्ध लाकडाच्या कोरीवकाम केलेल्या वस्तू, कापडावरील चिकनकारी आणि जरी-जरदोजीसारखी कलाकुसर किंवा मसाल्याचे पदार्थ, चहा, कॉफी तसेच स्थानिक परिसरात स्वदेशी पद्धतीने लागवड करण्यात आलेल्या आणि संपूर्ण प्रक्रिया केलेल्या अथवा अर्ध-प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थांचा अथवा उत्पादनांचा समावेश असेल.
स्थानिक उत्पादकांची कौशल्ये तसेच उपजीविकेमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांची जाहिरात आणि विक्री करण्याच्या उद्देशाने निवडक रेल्वे स्थानकांवर स्टॉल, किऑस्क आणि दुकाने उभारण्याची योजना भारतीय रेल्वे विभागाने आखली आहे. सध्या या संदर्भातील प्रायोगिक तत्वावरील उपक्रमांच्या अंमलबजावणीचे काम सुरु असून या पातळीवर आवश्यक निधीचे मूल्यमापन करण्यात आलेले नाही.
रेल्वेच्या प्रत्येक विभागामध्ये २५ मार्च २०२२ पासून हे प्रायोगिक प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. प्रत्येक स्थानकासाठी संदर्भित परिसर अथवा प्रदेशातील एक स्वदेशी उत्पादन निश्चित करण्यात आले असून या उत्पादनाच्या विक्रीसाठी त्या स्थानकावर जागा उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.
नागपूर रेल्वे स्थानकावर बांबूपासून निर्मित उत्पादने ठेवण्यात आली आहेत. केंद्रीय रेल्वे, दळणवळण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.
– वृत्तसंस्था
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.