बिझनेस करण्यासाठी पैसाच लागतो, ही एक अंधश्रद्धा

श्रीमंत लोक त्यांच्याकडे असलेल्या पैशाला कामाला लावतात आणि अधिकचा पैसा कमावतात; सामान्य लोक आपला वेळ विकतात आणि ठरलेल्या दरानुसारच पैसा कमावतात.

जास्त पैसे कमावण्यासाठी किंवा बिझनेस करण्यासाठी तुमच्याकडे आधीच खूप सारा पैसा असावा लागतो, अशी कित्येक लोकांची समजूत असते; परंतु आजच्या काळात ही गोष्ट कालबाह्य झाली आहे. कसं हे आपण एका उदाहरणाद्वारे पाहू.

पुणे विद्यापीठाचं ते एक इंजिनीअरिंग कॉलेज होतं. दिवाळीच्या थोडा आधीचा तो काळ होता. नेहमीप्रमाणे कॉलेजने क्लास चुकवणार्‍या विद्यार्थ्यांची डिटेन लिस्ट तयार केली होती. डिपार्टमेंटला आता सबमिशनची आणि त्याहीपेक्षा जास्त डिटेन पेनल्टीची ओढ लागली होते.

तुमच्या माहितीसाठी सांगतो, इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये पंचाहत्तर टक्के उपस्थिती नसणार्‍या विद्यार्थ्यांना ‘डिटेन’ केलं जातं. या विद्यार्थ्यांना परत ‘रिटेन’ करण्यासाठी पाचशे ते हजार रुपये (कॉलेजनुसार) प्रति एक टक्का या भावाने त्या विद्यार्थ्यांना उपस्थिती विकली जाते.

पैसे घेऊन उपस्थितीची टक्केवारी वाढवणे व विद्यापीठाला पाठवणे हा भारतीय शिक्षणाच्या बाजारातला एक छोटासा टिझर आहे! तर अशीच एकंदरीत परिस्थिती याही कॉलेजमध्ये होती.

दिलीप आपल्या मित्रांसोबत शिक्षणासाठी गुजरातहून पुण्यात त्या कॉलेजमध्ये आला होता. तिथे राहण्याचा खर्च निघावा आणि स्वतःचा एक इन्कम सोर्स असावा म्हणून दिलीप कॉलेजसोबतच स्टेशनरी विकण्याचा साइड बिझनेस करायचा. त्यात त्याचा खर्च बर्‍यापैकी निघायचा.

हे करत असताना कॉलेजमध्ये बर्‍याच वेळेस त्याची अनुपस्थिती राहिली आणि तो डिटेन झाला. सबमिशन पूर्ण करण्यासाठी त्याला आता तब्बल पंधरा हजार रुपयांची आवश्यकता होती. व्यवसायाचा सर्व खर्च जाऊन त्याच्याकडे फक्त एक हजार रुपये नफा शिल्लक होता.

इतक्या कमी वेळेत बिझनेस करून पैसे उभे करणे हे जवळपास अशक्य होते. त्याला आता कमी वेळेत अधिक पैसे देणारा धंदा शोधायचा होता आणि तेही एक हजार रुपयांच्या भांडवलात. लवकरच त्याला तो सापडलाही. त्याने दिवाळीसाठी फटाके विकण्याचा धंदा करण्याचे ठरवले.

त्याने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तसेच पॅम्प्लेट, पोस्टर्स या ऑफलाइन माध्यमांतून अशी जाहिरात केली, की मार्केट दरापेक्षा वीस टक्क्यांनी स्वस्त फटाके त्याच्याकडे मिळतील; परंतु त्यासाठी ऑर्डर बुक करणे आणि अगोदर पेमेंट करणे गरजेचे आहे.

पाचशे रुपये त्याने या जाहिरातींवर खर्च केले आणि तीनशे रुपयांचे सॅम्पल फटाके तो मार्केटमधून घेऊन आला. कॉलेज, हॉस्टेल आणि मित्रांच्या घराच्या परिसरातील वस्तीमध्ये तो स्वतः जाऊन ऑर्डर बुक करू लागला. काही लोक ऑनलाइन ऑर्डर बुक करू लागले. फक्त चार दिवसांत त्याच्याकडे साठ हजारच्या ऑर्डर्सची नोंदणी झाली.

फटाक्यांच्या क्षेत्रात कोणी व्यवसाय केला असेल तर त्याला माहीत असेल की, या व्यवसायात 50 ते 60 टक्के मार्जिन राहते. जमा झालेले पैसे घेऊन तो होलसेल विक्रेत्याकडे फटाके खरेदीसाठी गेला. तिथेही बरीच बार्गेनिंग करून त्याने खरेदी किंमत अजूनही कमी करून घेतली.

चाळीस हजारांत त्याने स्टॉक उचलला आणि माल घरोघर पोचवून आला. प्रवासाचा खर्च आणि इतर छोटे मोठे खर्च वजा केल्यानंतर त्याच्याकडे अठरा हजार रुपये शिल्लक राहिले आणि ही सर्व माया त्याने फक्त एका आठवड्यात जमा केली.

व्यवसायासाठी दिलीपने जे तत्त्व वापरलं त्याला ‘अ‍ॅसेट लाइट’ किंवा ‘ग्रेगेटर मॉडेल’ असं म्हणतात. यामध्ये फक्त ग्राहक शोधायचे असतात. मोठ्या संख्येने ग्राहक शोधल्यानंतर त्यांना हवी असलेली वस्तू किंवा सेवा योग्य विक्रेत्यांकडून घेऊन पुरवायची असते. यामध्ये तुमचे प्रॉडक्शन हाऊस, स्टोरेज हाऊस किंवा सर्व्हिसिंग सेंटर काहीही वापरायचे नसते. या सर्व गोष्टी आऊटसोर्स केलेल्या असतात.

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्या, झोमॅटो-स्विगी या फूड कंपन्या, ओयो रूम्स-फॅब हॉटेल्स या हॉटेल क्षेत्रातल्या कंपन्या किंवा ओला-उबेर या कॅब सेवा देणार्‍या कंपन्या याच तत्त्वावर चालतात. बलाढ्य अशा या कंपन्या लाखो ग्राहकांना सर्व्हिस देतात. ग्राहकांची संख्या अधिक असल्याने तसेच ते ग्राहक वारंवार प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस घेत असल्याने या कंपन्या कोट्यवधींची उलाढाल करतात.

या कंपन्या ज्या गोष्टींची विक्री करतात त्या मुळात त्यांच्या नसतातच! त्या फक्त मोठ्या संख्येने ग्राहक आणि विक्रेत्यांना जवळ आणतात आणि भरघोस कमाई करतात. या तत्त्वावर नवनवीन बिझनेस उदयाला येत आहेत. बिझनेस करण्यासाठी पैसाच लागतो ही एक अंधश्रद्धा आहे!

– रियाज शेख
(लेखक सौरऊर्जा क्षेत्रात उद्योजक आहेत)
7378926295

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?