स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी स्वदेशीच्या पुरस्कारावर भर दिला होता. त्यामुळे स्वदेशी व्यवसाय कल्पनांना बाजारात वेग आला आहे. लोक स्वदेशी उत्पादनांचा अवलंब करीत आहेत त्यामुळे देशी उत्पादनांची मागणीही वाढली आहे.
देश व परदेशात महामारीच्या काळात आयात व निर्यातीत घट हे त्याचे मुख्य कारण आहे. संपूर्ण जग आज या दृष्टचकरातून जात आहे. अशावेळी लोक स्वदेशी व्यवसाय सुरू करण्याच्या मागे लागले आहेत. या लेखात आम्ही काही कल्पना तुम्हाला सुचवतोय ज्याचा तुम्हाला फायदा होईल.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox
स्वदेशी खाद्यपदार्थ म्हणजेच स्नॅक्स
आपल्या देशातील लोकांना खाण्यापिण्याची खूप आवड आहे. विशेषत: स्नॅक्स. स्नॅक्स म्हणजे काय तर दोन जेवणाच्या मधल्या वेळेत खाण्याचे खाद्यपदार्थ. परदेशात बऱ्याच प्रकारचे पदार्थ खाल्ले जातात. आपल्याकडे परदेशी अनुकरण जास्त केले जाते. त्यामुळे त्यांच्याकडचे अनेक पदार्थ आपल्या देशातही रूढ झाले आहेत.
जसे की, लेज, चिप्स, पेप्सी, इ. आपल्याकडे या पदार्थाना खूप मागणी आहे पण ही उत्पादने बनवणारी कंपनी ही एक परदेशी कंपनी आहे. याच गोष्टीचा विचार केला तर आपल्या लक्ष्यात येईल की आपण आपल्याकडे हे पदार्थ आणि यापेक्षा भारतीय चवीचे इतरही अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवू शकतो त्यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.
भारतात सध्या बिकानो नमकीन, हलदीराम, बिकाजी अशा भारतीय कंपन्याही चांगला जम बसवून आहेत. जर तुम्हाला चांगले स्नॅक्स आणि स्नॅक्स कसे बनवायचे माहीत असेल तर विविध चवदार स्नॅक्स बनवून आपली स्वत:ची कंपनी सुरू करू शकता.
स्वदेशी टॉनिक
भारतीय बाजारपेठेत अनेक प्रकारची टॉनिक्स उपलब्ध आहेत. अनेक परदेशी कंपन्या बुस्ट, बॉर्नविटा, हॉर्लिक्स बाजारात आहेत. विशेषत: लहान मुले, खेळाडू हे यांचे लक्ष्य असतात. प्रत्येकाला निरोगी आयुष्य आणि प्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असते. हेच हेरून या कंपन्यांनी मोठी बाजारपेठ काबीज केलेली आहे.
या परदेशी कंपन्यांसोबत भारतीय कंपन्या उदाहरणार्थ पतंजली, डाबर, सांडू, इत्यादी या क्षेत्रात आहेत. त्यांची विविध उत्पादने वापरणारा आणि मागणी असलेला मोठा ग्राहकवर्ग आपल्याकडे आहे. आपणही यातील ज्ञानी असाल अथवा शिकण्यात उत्सुक असाल तर अशी उत्पादन तयार करून विकू शकता.
स्वदेशी संगणक / टॅब्लेट
आपण हार्डवेअर अभियंता असाल किंवा याविषयी आपल्याकडे ज्ञान असेल तर आपण स्वत:च आपल्या देशात संगणक आणि लॅपटॉप बनवू शकता. आपल्या स्वत:च्या ब्रॅण्ड नावाने हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता.
ही देशी व्यवसाय कल्पना असेल. एचपी, कॉम्पॅक, डेल, मायक्रोसॉफ्ट, आयपॅड, सॅमसंग, मोटोरोला, सोनी आणि एलजी इत्यादी बऱ्याच परदेशी कंपन्यांचे संगणक व लॅपटॉप लोकांच्या घरात वारंवार दिसतात. परंतु एचसीएल, मायक्रोमॅक्स, स्पाइस, रिलायन्स, कार्बन, अमर पीसी आणि चिराग अशा काही भारतीय कंपन्या आहेत, ज्या अतिशय लोकप्रिय आहेत. स्वयंपूर्ण होण्याची ही उत्तम संधी असू शकते.
स्वदेशी वाहन
भारतात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला मोठी मागणी आहे. आज प्रत्येक घरात एक दुचाकी किंवा चारचाकी असतेच. शेतीसाठीसुद्धा अनेक प्रकारची वाहने वापरली जातात. त्यामुळे त्यासाठी संधी आहे. ‘हाँडा’, ‘यामाहा’सारख्या काही परदेशी कंपन्या आहेत, ज्या दुचाकी बनवतात, ज्यांची वाहने लोक खूप वापरतात, पण भारतात हीरो, बजाज आणि टीव्हीएससारख्या काही कंपन्या आहेत ज्या परदेशी कंपनीशी स्पर्धा करत आहेत.
भारतात टाटा, महिंद्रा, हिंदुस्तान मोटर्स आणि मारुतीसारख्या काही कंपन्या गाड्या बनवतात आणि करोडो कमवतात. हे काम करण्यासाठी आपणदेखील तज्ज्ञ असल्यास आपण परदेशी कंपनीबरोबर स्पर्धेत स्वत:चा एक ब्रॅण्डदेखील तयार करू शकता. ही एक चांगली स्वदेशी व्यवसाय योजना असू शकते, परंतु यासाठी आपणास त्याविषयी चांगले ज्ञान आणि गुंतवणूक असणे आवश्यक आहे.
स्वदेशी शूज-चप्पल ब्रॅण्ड
चप्पल, शूज ही प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. जीवनावश्यक गोष्टीत हिचाही सहभाग असतो. विशेषत: खेळाडूंना याची अत्यंत गरज असते. जर आपण आरामदायक आणि चांगले शूज / चप्पल बनवण्याचा व्यवसाय करू शकत असाल, तर आपल्या स्वत:च्या ब्रॅण्डची सुरुवात करण्याची ही चांगली संधी असू शकते. कारण आजकाल स्वदेशी आणि ‘मेक इन इंडिया’ची बरीच जाहिरात केली जात आहे. म्हणूनच लोक स्वदेशी उत्पादनेदेखील अधिक वापरत आहेत.
नाईके, रीबॉक, आदीदास आणि कॅनव्हाससारख्या परदेशी कंपन्यांच्या शूजचा वापर आणि मागणी खूप असते, परंतु भारतात अशा काही स्वदेशी कंपन्या आहेत; जसे की पॅरागॉन, लखानी, चवडा, खादिम, विक्सी प्राइड ज्या फुटवेअर उत्पादनाची निर्मिती करतात आणि त्या चांगल्या प्रसिद्धही आहेत. या कंपन्यांची मदत घेऊन किंवा स्वत:हून आपण स्वत:चे ब्रॅण्ड चप्पल आणि शूज बनवू शकता आणि स्वदेशी व्यवसाय सुरू करू शकता.
देशी कोल्डड्रिंक्स
परदेशी कंपन्यांनी तयार केलेला कोको कोला, फॅन्टा, स्प्राइट, पेप्सी ही शीतपेये भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची मागणीही दिवसेंदिवस वाढते. अगदी खेडोपाडीही ही परदेशी पेये पोहचलीत, पण यापेक्षा आपली स्वदेशी पेये प्रकृतीसाठी जास्त चांगली असतात. पण आपण याकडे दुर्लक्ष करतो.
स्वदेशी पेये जर अभ्यासपूर्वक बाजारात उतरवली तर मात्र आपल्याला मोठी बाजारपेठ खुणावतेय. ही संधी हेरून आपण यात उतरायला हवे. लिंबू सोडा, रुहाफझा, शरबत, बदाम शेक, दूध, लस्सी, ही आणि अशी अनेक प्रकारची पेये आपण ग्राहकाला देऊ शकतो. विविध फळ, नारळपाणी आणि अशा इतर गोष्टींसह आपण चांगले देशी कोल्ड ड्रिंक बनवू शकता आणि त्याला स्वत:चे एक ब्रॅण्ड नावदेखील देऊ शकता.
देशी साबण
भारतात बर्याच साबण कंपन्या आहेत. आपल्याला माहीतच असेल की, आपण विविध नैसर्गिक औषधी वनस्पती आणि वनस्पतींपासून वेगवेगळे साबणदेखील बनवू शकता, जे खूप फायदेशीरदेखील आहेत. कारण परदेशी कंपन्यांनी बनवलेल्या साबणामध्ये बर्याच प्रमाणात रासायनिक पदार्थ आढळतात, शरीराला हानिकारक ठरू शकतात.. म्हणूनच, आपण नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेले स्नान साबण व कपडे धुण्यासाठी साबण बनवण्याचा व्यवसाय स्वत: करू शकता आणि चांगले उत्पन्न मिळवू शकता.
देशी चहा आणि कॉफी
चहा आणि कॉफी असे एक पेय आहे, जे आपल्या देशातील जवळजवळ ९९ टक्के लोकांना आवडते किंवा भारतातील प्रत्येक घराची सुरुवात चहा अथवा कॉफीच्या कपाने होते. त्यामुळे आपण अंदाज बांधू शकतो की किती मोठी बाजारपेठ आहे. परदेशी ब्रॅण्डसोबत अनेक स्वदेशी ब्रॅण्डही आपल्या देशात लोकप्रिय आहेत. आपण या क्षेत्रात उतरून स्वत:ला सिद्ध करू शकतो, कारण बाजारातही त्याची मागणी खूप जास्त आहे.
देशी शेव्हिंग क्रीम आणि ब्लेड
सकाळी पुरुषांना शेव्हिंगसाठी शेविंग क्रीम आणि ब्लेडची आवश्यकता असते. भारतात गॅलंट, पुखराज, लेझर, प्रीमियम, गोदरेज, इमामी, निविआसारख्या काही कंपन्या शेविंग क्रीम आणि ब्लेड तयार करतात. आपण अशी उत्पादन सुरू करून व्यवसाय प्रारंभ करू शकता. याचा उपयोग प्रत्येक पुरुष करतो, म्हणूनच या व्यवसायात उतरायला खूप संधी आहे.
स्वदेशी वस्त्रोद्योग
आपल्याकडे गुजरात राज्यात एक फार मोठा कापड उद्योग आहे जो खूप प्रसिद्ध आहे. याचसारखे आपल्या देशातील अनेक राज्यात स्वतंत्र कापडउद्योग आणि बाजारपेठ आहेत. तिथल्या वस्त्रांची स्वत:ची ओळख आणि वेगळेपण आहे. जर आपल्याला कपड्यांच्या उत्पादनामध्ये रस असेल तर आपल्यालाही कपड्यांच्या उत्पादनाचा व्यवसाय सुरू करून नफा मिळेल.
लोकांना ब्रॅण्डेड कपडे घालायला आवडतात, जर तुम्हाला चांगले कपडे कसे डिझाइन करायचे हे माहीत असेल तर तुम्ही खास प्रकारचे कपडे डिझाईन करून व्यवसाय सुरू करू शकता. भारतात अशा अनेक कपड्यांच्या कंपन्या आहेत, ज्या स्वत:चे उत्पादन करून ब्रॅण्डद्वारे स्वत:चा व्यवसाय करत आहेत आणि लक्षणीयरीत्या अधिक नफा कमावत आहेत.
या काही वानगीदाखल दिलेल्या उद्योगसंधी आहेत. भारत हा भौगोलिक आणि लोकसंख्येनेही मोठा देश आहे. त्यामुळे खूप मोठ्या आणि अनेक प्रकारच्या उद्योगसंधी इथे आहेत. गरज आहे आपण पुढाकार घेऊन जोखीम उचलून उतरण्याची.
– प्रतिभा राजपूत
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.