कोरोनापश्चात भारतीय उद्योजकांना निर्यातीच्या मोठ्या संधी


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


संपूर्ण जगातील समस्त आबालवृद्धांच्या छातीत धडकी भरवणारा, भारतासहित जगातील अनेक निष्पाप लोकांचे प्राण निष्ठुरपणे हरण करणारा एक अतिसूक्ष्म परंतु तितकाच विघातक विषाणू. संपूर्ण विश्व आज जणू या साध्या डोळ्यानंही न दिसणार्‍या अतिसूक्ष्म विषाणूच्या कह्यात चालले आहे.

याच कोरोनामुळे काही देशांनी अंशत: तर काही देशांनी पूर्णतः १०० टक्के संचारबंदी लागू केली आहे आणि त्यात आपल्या देशाचाही समावेश आहे. लोक स्वत:च्याच देशात स्वत:च्याच घरात आज भयभीत होऊन बंदिस्त आहेत. संपूर्ण शहरेच्या शहरे बंदीमुळे ओस आहेत. काही देश तर याच बंदीमुळे भयंकर आर्थिक नुकसानीच्या गर्तेत चालले आहेत. या सर्व गोष्टींचा आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होणार हे नि:संशय.

कोरोनाची पार्श्वभूमी आणि भारतीय निर्यात :

नाण्याची दुसरी बाजू पण बघा. एखाद्या होतकरू तसेच व्यावसायिक व व्यावहारिक मानसिकतेच्या भारतीय निर्यातदाराच्या दृष्टिकोनातून या गोष्टीकडे नीट डोळे उघडे ठेऊन सकारात्मकतेने पाहिल्यास आपल्याला समजेल भारतीय निर्यातवृद्धीच्या दिशेने अत्यंत आशादायी काल येऊ पाहतो आहे.

हे वाचून क्षणभर तुम्ही कदाचित आश्चर्यचकित व्हाल, विरोधाभासही वाटू शकेल, अतिशयोक्तिही वाटेल; पण ही अत्यंत सत्य परिस्थिती आहे. कसे ते आता आपण बघू.

कोरोनाने सर्वदृष्टीने वाताहत केलेल्या देशांपैकी मुख्य देश चीन आहे. हा त्या विषाणूचा जनक देश तर आहेच, पण सर्व जगाला या विषाणूच्या संसर्गाने बाधित करणारा कारक देशही ठरला आहे. याच एका विषाणूमुळे चीनचे स्वत:चे देशपातळीवरील एकंदर आरोग्यमान तर बिघडलेच आहे, पण मुख्य म्हणजे त्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था सपशेल ढासळली आहे.

चीनला फार पूर्वीपासून संपूर्ण जगाचा पुरवठादार (supplier) देश म्हणून ओळखले जाते. चीन हा जगभर वापरल्या जाणार्‍या महत्त्वाच्या तसेच नित्योपयोगी अशा बर्‍याच वस्तूंचा उत्पादक व पुरवठादार (Manufacturer & Supplier) देश आहे.

जगातील बरेच महत्त्वाचे देश हे त्यांना लागणार्‍या बर्‍याचशा उत्पादनांसाठी चीनवर अवलंबून आहेत. चीनची आजच्या घडीची एकूण निर्यात तेरा टक्के आहे. तर भारताची सध्याची एकूण निर्यात फक्त आणि फक्त १.६७ टक्के आहे. ही आकडेवारीतील तफावत खूपच बोलकी आहे.

चीनच्या या आर्थिक स्थितीचा फायदा थेट भारतीय निर्यातदारांना येणार्‍या काळात होऊ शकतो. फक्त हा फायदा करून घेता आला पाहिजे. त्यासाठी उद्योजकाने डोळे उघडे ठेवले पाहिजेत व जागतिक व्यापारातील होणार्‍या घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेऊन असले पाहिजे. आपण निर्यातदार म्हणून हा फायदा कसा घेऊ शकतो ते पाहू.

आधीच सांगितल्याप्रमाणे चीन आपली विविध उत्पादने परदेशी बाजारपेठांमध्ये निर्यात करतो, परंतु या कोरोना संक्रमणामुळे चीन वैश्विक पातळीवरील असलेली त्याची व्यावसायिक विश्वासार्हता ज्याला इंग्रजीत goodwill असे म्हणतात, ती गमावून बसला आहे; याचा परिणाम म्हणून आता चीनवर अवलंबून असलेले त्यांचे आयातदार ग्राहक देश त्या सर्व उत्पादनसामुग्रीसाठी पर्यायी निर्यातदार देश शोधत आहेत. कारण त्या सर्व देशांमध्ये (बाजारपेठांमध्ये) मागणी तर कायम आहे; (उलट वाढतेच आहे) परंतु ती पूर्ण करण्यास चीन सध्याच्या घडीला अगदीच असमर्थ आहे.

म्हणतात ना ‘संकटामध्येच संधीची द्वारे खुली होतात’, हे अगदीच खरे आहे. आजमितीला चीन ज्या ज्या देशांमध्ये आपली उत्पादने वितरित करतो, ती सर्वच उत्पादने भारतीय निर्यातदारांना त्या सर्व ग्राहक देशांमध्ये मागणीनुसार वितरित करता येतील. ही एक आयती संधी भारतीय निर्यातदारांसाठी अनायासे चालून आलेली आहे.

चीन मुख्यत्त्वे निर्यात करतो ते देश पाहूया :

अमेरिका, हाँगकाँग, जपान, कोरिया, व्हिएतनाम, जर्मनी, नेदरलँड, इंग्लंड, सिंगापूर, तैवान, रशिया, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, मेक्सिको, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपिन्स, ब्राझील, इटली, फ्रांस, यूएई, स्पेन, पोलंड, टर्की, बांग्लादेश, सौदी अरेबिया, बेल्जियम, साऊथ आफ्रिका, चिली.

कोरोना सर्व जगाभोवतीचा आपला विळखा घट्ट करू पाहतोय त्यामुळे वर उद्धृत केलेले सर्व देश तसेच इतर देशही भारतीय निर्यातदारांसाठी संभाव्य ग्राहक देश ठरू शकतात; कारण येणार्‍या काळात हे सर्व देश कोरोनाच्या धास्तीने चीनकडून आयात करणे अंशत: अथवा पूर्णत: बंद करणार हे सुज्ञास सांगणे न लगे, पण जास्तीत जास्त भारतीय निर्यातदारांनी या सुवर्णसंधीचे सोने केले पाहिजे व आपली स्वत:ची तसेच राष्ट्राची निर्यातवृद्धी साधली पाहिजे.

हे येथे नमूद करणे आवश्यक वाटते. होतकरू निर्यातदारांनी आता उल्लेखीत देशांमध्ये व त्याव्यतिरिक्त इतर देशांमध्येही कोरोनापश्चात लागणाऱ्या सर्व उत्पादनांच्या वाढीव मागणीचा अभ्यास करून त्या कशा पुरवता येतील हे पाहिले पाहिजे व तत्अनुषंगिक उत्पादने निर्यात करण्यास प्राधान्य दिले पाहिजे.

तेव्हा उद्योजकांनो, लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू करा संपूर्ण जग आपलीच वाट बघत आहे.

– सौरभ दर्शने
(लेखक निर्यातदार व विदेश व्यापार सल्लागार आहेत.)
संपर्क : ८१०४०५५४८९

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?