लक्ष्मीशी तुमचे नाते काय?

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे।
उदास विचारे वेच करी ॥

आपले पैशाची नाते काय, यावर आपण कसे व किती पैसे कमवाल, आपल्याकडे ते किती काळ टिकतील, या गोष्टी अवलंबून असतात. याच नात्यावर तुम्ही तुमचे पैसे कसे खर्च कराल, कशासाठी खर्च कराल आणि किती खर्च कराल, मिळवलेल्या पैशाचा उपभोग कसा घ्याल इत्यादी गोष्टीदेखील अवलंबून असतात.

आपल्या सगळ्यांनाच पैसे पाहिजे असतो. पैसेवाल्या माणसाला मान आपसूकच मिळतो. आपल्याला पैसा नेहमी पाहिजेच असतो. जितका जास्त मिळेल तेवढा कमीच कधीच समाधान होत नाही. त्यावरती आपल्याला पाहिजे तेव्हडा मिळाला तरी जर आपल्या शेजार्‍याला जास्त मिळाला तर आपला पोटशुळ वाढतो.

कित्येक वेळी श्रीमंत माणसाला पाहून आपण कुजबुजतो काहीतरी भानगड केली असली पाहिजे नाहीतर याला एवढा पैसा कसा मिळणार, परंतु आपले पैशाशी असलेले बहिस्थ नाते आणि अंतस्थ नाते हे अतिशय वेगवेगळे असू शकते आणि तेथेच ग्यानबाची मेख असते. अंतस्थ आणि बहिस्थ नाते म्हणजे काय ते आधी थोडक्यात पाहू.

माझ्या वर्तन विज्ञान आणि देहबोलीच्या शिबिराला एक मध्यमवयीन स्त्री आलेली होती. एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये ती मोठ्या जागेवर काम करत होती. तिने बोलताना आपली व्यथा समूहासमोर मांडली . तिच्या म्हणण्याप्रमाणे तिला लोकांची फार आवड.

ती लोकांमद्ये मिसळायला आतुर असते, समाजामध्ये , नौकरीमध्ये , सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये, इतर नेटवर्किंग संघटनांमध्ये ती मुद्दाम जबाबदारी घेते, परंतु लोक काही तिला जवळ येऊ देत नाहीत. विश्वासात घेत नाहीत. काम झाले कि दूर दूर जातात किंवा दूर दूर राहतात.

मी त्यांना पुढे बोलाविले. एका खुर्चीत बसवले. आणि सांगितले आता तुमचे डोळे बंद करा आणि सगळ्या लोकांना जवळ बोलवा किंवा तुमच्या इच्छा व्यक्त करा. त्या शांतपणे बसल्या. त्यांनी डोळे मिटले आणि म्हणायला लागल्या सगळ्यांनी माझ्याकडे यावे, सगळ्यांनी माझ्याकडे यावे. त्याबरोबरच त्या हातवारे करीत होत्या.

गम्मत अशी होती कि हातवारे त्यांच्या शरीरापासून दूर दूर जात होते. त्यांना डोळे उघडायला सांगितले. समूहातील इतरांनी जेव्हा त्यांना त्याच्या वर्तनाबद्दल सांगितले तेव्हा त्यांच्या आश्चर्यास पारावार राहिला नाही.

त्यांची मुखबोली आणि देहबोली या अक्षरशः एकमेकींच्या विरुद्ध होत्या. जेव्हा त्या मुखबोलीने लोकांना आपल्या जवळ बोलवत होत्या त्याचवेळी त्या देहबोलीने त्यांना दूर लोटत होत्या. आपली देहबोली नेहमीच जास्त वजनदार, परिणामकारक असते आणि इतर लोक त्यांच्या सुप्त मनाने त्यांच्या देहबोलीचाच अविष्कार पाहत होते आणि त्यालाच प्रतिसाद देत होते.

नानाचा चहा आणि अण्णाचा चहा यामध्ये जो फरक असतो तोच येथे दिसून येत होता. यालाच म्हणतात सुप्त नाते. हे तुमचे सुप्त नाते संपत्तीबरोबर काय आहे यावरती तुमच्याकडे संपत्त्ती आकर्षित होईल किंवा कसे हे अवलंबून असते. त्यामुळे हे नाते जाणून घेणे महत्त्वाचे.

आपण म्हणतो कि पैशाकडे पैसा जातो, त्यापेक्षा आपण असे म्हणू जेथे पैशाला नाते मिळते, मान मिळतो तेथे पैसे जातो आणि आपल्या भाऊ बांधवाना घेऊन जातो, रुजतो आणि बहरतो.

हैदराबादच्या शेवटच्या नबाबाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. जेव्हा हा निजाम अकरा वर्षांचा युवराज होता त्यावेळी एकदा दरबारात काही नाच गाणे चालू होते. त्यावेळी त्या नर्तिकेच्या कपड्याला लावलेला एक मोती जमिनी वर पडला आणि घरंगळत युवराजाकडे आला. युवराजाने पटकन वाकून तो मोती उचलून घेतला आणि खिशात घातला.

हे पाहून त्याचे वडील, निजाम, यांनी भविष्यवाणी केली, हा मुलगा पैसे उत्तम कमावणार आणि टिकवणार आणि खरेच, जवळ जवळ पन्नास वर्षे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून या निजामाचे नाव घेतले जात असे. हैदराबादपेक्षा मोठी अनेक संस्थाने होती, त्याच्यापेक्षा अधिक उत्पादनाची साधने असलेले अनेक संस्थानिक होते, अनेक व्यापारी होते, परंतु श्रीमंत होता. निजामचं.त्याने उत्पन्न वाढवीत नेले आणि आलेल्या पैशाची उत्तम व्यवस्था लावली आणि ते पैसे वाढवत नेले.

उस्मान अली खानकडे इतकी विपुल संपत्ती होती की २२ फेब्रुवारी १९३७ च्या टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर भारतातील सगळ्यात श्रीमंत गृहस्थ म्हणून त्यांचा फोटो होता. निजामाचा नातू मुकरराम जहा बहादूर याला त्याच्या आजोबांची विखुरलेली संपत्ती किती हे समजावून घेण्यासाठी तब्बल एक महिना लागला.

हा पैसा त्याच्याकडे फक्त नशिबाने आलेला नव्हता तर त्यामध्ये त्याचे स्वतःचे कर्तृत्वदेखील होते. त्यांनी पैशाची अशा प्रकारे व्यवस्था लावली होती की त्याचा प्रधान सालारजंगदेखील अतिशय श्रीमंत होता. आता हैदराबादला जे सालारजंग संग्रहालय आहे ते याच सालारजंगच्या खजिन्याचा एक छोटा भाग होता.

याविरुद्धदेखील आपल्याला उदाहरण दिसून येते. अमेरिकेत जॅकपॉट नावाची एक लॉटरी निघते. यात एका नंबरला जवळ जवळ १० मिलियन डॉलर्स चे बक्षीस असते. म्हणजे जवळ जवळ ७० कोटी रुपये.

तेथे एका माणसाचा महिन्या भराचा साधारण खर्च १ हजार डॉलर्स धरला म्हणजे हे पैसे खर्च करावयाचे झाल्यास त्या माणसाला जवळजवळ ७ हजार महिने लागले असते, म्हणजेच सहाशे वर्षे. थोडक्यात एखाद्या मध्यमवर्गीयांसाठी एवढा पैसे की सात पिढ्यांमध्ये खर्च करू शकणार नाही.अशा शंभर व्यक्तींचा त्यांनी शोध घेतला ज्यांना वीस वर्षांपूर्वी जॅकपॉट लागला होता आणि त्यांच्या वर्तमान सांपत्तिक स्थिती बद्दल चर्चा केली.

अहो आश्चर्यम. यातील ९३ टक्के लोकांची वर्तमान सांपत्तिक स्थिती त्यांना जॅकपॉट मिलेण्या पूर्वीची जी स्थिती होती त्यापेक्षादेखील खालच्या पातळीस गेलेली होती. त्यांना एवढा पैसा मिळाला होता कि त्यांनी दररोज रस्त्यावर फेकला असता तरीदेखील तो संपला नसता असे असताना देखील केवळ वीस वर्षांमध्ये ते कफल्लक झालेले होते.

अशी आपल्याकडेदेखील अनेक उदाहरणे मिळतात. प्रकल्पासाठी जमीन जाते, त्याचे १०-१२ करोड मिळतात, काही वर्षे गाडी घोडा, गावजेवण, सोनसाखळ्या इत्यादी हौस होते आणि नंतर नातू त्याच प्रकल्पावर रखवालदार होतो किंवा आजच्या वर्तमानपत्रातील बातमीनुसार, एक भारतीय उद्योगपती जो दहा वर्षांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक गणला जायचा तो दिवाळखोरी जाहीर करण्याच्या मार्गावर आहे.

– आनंद घुर्ये
9820489416
(लेखक उद्योग ज्योतिषी आहेत.)

Author

  • आनंद घुर्ये

    आनंद घुर्ये हे लौकिकदृष्ट्या अभियंता व एमबीए असून अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्यांनी वरिष्ठ पातळीवर नोकरी केली आहे. थायलंड येथे नोकरीनिमित्ताने असताना अनेकांनी त्यांना भारतीय प्राचीन संस्कृतीबद्दल प्रश्न विचारले. यातून प्रेरणा घेऊन त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञानाचा अभ्यास सुरू केला. तसेच ते ज्योतिषी म्हणूनही कार्यरत आहेत. उद्योग ज्योतिष हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

    View all posts

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?