चार लोकांमध्ये ठळकपणे दिसून येईल असे त्याचे व्यक्तिमत्त्व नाही किंवा त्याच्या आजूबाजूला, त्याच्या मागेपुढे करणाऱ्या लोकांची भाऊगर्दी नाही. खरं सांगायचं तर तो तुमच्या-आमच्यापैकीच एक वाटेल असा तरुण आहे आणि तरीही त्याने असं काही केलं आहे की ज्यामुळे त्याचं नाव सर्वात युवा उद्योजकांमध्ये आवर्जून घेतलं जातं. यासाठी कारणदेखील तसंच आहे.
जगभरातील अनेक प्रवासी काही ना काही कारणाने प्रवास करत असतात. म्हणजे हाॅटेलमध्ये राहणं ओघानेच आलं. हाॅटेलमध्ये राहायचं म्हणजे मुळात आयत्या वेळी मनासारखं हाॅटेल मिळेल का ही चिंता. त्यात बऱ्याच जणांना अव्वाच्या सव्वा पैसे खर्च करायचं जीवावर येतं.
लोकांची ही अडचण त्या तरुणाने हेरली आणि सुरू केले एक स्टार्टअप. पुढे हे स्टार्टअप भारतातील एक युनिकाॅर्न झाले. ओयो रूम्स, ज्याला ओयो हॉटेल्स आणि होम्स या नावानेदेखील ओळखले जाते. तो तरुण म्हणजे ‘ओयो’चा संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल.
रितेशचा जन्म ओरिसातील बिसम कटक येथे एका व्यावसायिक कुटुंबात झाला आणि त्याचं शालेय शिक्षण ओरिसाच्या रायगडा येथील सेक्रेड हार्ट स्कूलमध्ये झालं. तो लहान असताना रायगडामध्ये त्याचं आयुष्य इतर सर्वसामान्य मुलांसारखं होतं, पण एव्हढं मात्र खरं की त्याची विचार करण्याची पद्धत इतर मुलांप्रमाणे नव्हती.
कॉम्प्युटरवर मुशाफिरी करणे, अशा काही संधींचा शोध घेणे ज्यातून नवीन काहीतरी शिकता येईल आणि चुका झाल्या तरी त्यातून उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे मार्ग शोधणे असं करत करत तो लहानाचा मोठा झाला.
काही वर्षांनी त्याला सॉफ्टवेअरमध्ये प्रचंड रस निर्माण झाला. सॉफ्टवेअरबद्दल अधिक माहिती मिळावी यासाठी त्याने आपल्या मोठ्या भावाची प्रोग्रॅमिंगची पुस्तकं मागून घेतली. बेसिक आणि पास्कलसारख्या काही मूलभूत भाषा शाळेतच शिकवल्या गेल्या आणि बाकीच्या तो गुगलवरून शिकत गेला. विशेष म्हणजे तो अवघ्या आठ वर्षांचा असताना त्याला कोडिंग करता येत होतं. त्यामुळे साहजिकच सॉफ्टवेअर हे त्याचं पहिलं प्रेम बनलं होतं.
तो दहावीत असताना त्याने ठरवलं की सॉफ्टवेअर क्षेत्रातच करियर करायचं. २००९ मध्ये रितेश आयआयटीमध्ये जाण्यासाठी कोटाला रवाना झाला आणि काही दिवसातच त्याच्या लक्षात आलं की कोडिंग शिकण्यासाठी ही जागा योग्य नाही. त्यामुळे कोडिंगचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. कोटामधील बन्सल ट्यूटोरियलमध्ये त्याची ट्यूशन मात्र चालू होती.
त्याने एक पुस्तकसुद्धां लिहिण्यास सुरुवात केली आणि त्याचं नांव ठेवलं – ‘भारतीय अभियांत्रिकी महाविद्यालये : १०० अत्युत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयांचा संपूर्ण विश्वकोश’. हे पुस्तक फ्लिपकार्टवर प्रचंड गाजलं आणि काही वेळातच त्याच्या बऱ्याच काॅपी विकल्या गेल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो ज्या बन्सल ट्यूटोरियलमध्ये शिकत होता, तिथेदेखील हे पुस्तक होतं. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर त्याचा फोटो होता त्यामुळे तिथे इतर विद्यार्थ्यांना हा तोच आहे हे समजलं.
जेव्हा तो सोळा वर्षांचा होता, तेव्हा मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आयोजित आशियाई विज्ञान शिबिरामध्ये भाग घेतलेल्या २४० मुलांमधून त्याची निवड करण्यात आली. हे शिबिर प्री-कॉलेजिएट विद्यार्थ्यांसाठी एक वार्षिक मंच होता ज्याचे उद्दिष्ट होते भारतात वैज्ञानिक विकासासाठी चर्चेला चालना देणे.
उरलेला वेळ तो नुसता बसून असायचा, पण रिकामा वेळ सत्कारणी लावण्यासाठी तो पर्यटन करू लागला. त्या काळात तो कधी पीजी शेअरिंग, तर कधी बजेट हॉटेल्समध्ये राहायचा आणि उद्योजकांना भेटता यावं म्हणून वेगवेगळ्या इव्हेंट्स आणि कॉन्फरन्समध्ये हजर असायचा. अर्थात बरेचदा त्याला नोंदणीचा खर्च परवडत नसल्यामुळे तो अशा इव्हेंट्सना फक्त धावती भेट देत असे. तेव्हाच त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली.
२०१२ मध्ये रितेश अग्रवालने बजेट हाॅटेल्सची यादी आणि त्यांचे बुकिंग करण्यासाठी ‘ओरावेल स्टे’ ही कंपनी स्थापन केली, पण २०१३ मध्ये त्याने तिचे नाव बदलून ‘ओयो’ असे केले. ‘ओयो’ने सर्व शहरांमध्ये प्रवाशांना अत्युत्तम अनुभव मिळावा म्हणून काही हॉटेल्ससोबत भागीदारी केली. रितेश अग्रवालला ‘पे-पॅल’चे सहसंस्थापक पीटर थील यांच्याकडून दोन वर्षांच्या थील फेलोशिपचा भाग म्हणून १ लाख अमेरिकन डॉलरचे अनुदान मिळाले.
‘ओयो’ ही भाडेतत्त्वावरील आणि फ्रांचाईज्ड हॉटेल्स, घरे आणि राहण्याच्या जागांची भारतीय बहुराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे. रितेश अग्रवाल यांनी २०१२ मध्ये स्थापन केलेल्या ‘ओयो’मध्ये सुरुवातीला प्रामुख्याने बजेट हॉटेल्सचा समावेश होता.
जानेवारी २०२० पर्यंत भारत, मलेशिया, युएई, नेपाळ, चीन, ब्राझील, मेक्सिको, यूके, फिलिपाईन्स, जपान, सौदी अरेबिया, श्रीलंका, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि अमेरिका अशा ८० देशांमधील ८०० शहरांमध्ये ४३ हजारहून अधिक मालमत्ता आणि १ दशलक्ष राहण्याच्या जागा उपलब्ध आहेत.
जवळपास ३६० कोटींचे मूल्य असलेली ओयो रूम्स जगावेगळं काहीच करत नाहीत, परंतु प्रवाशांसाठी कोणत्याही अतिरिक्त चार्जेसशिवाय सर्वात स्वस्त, तरीही सर्वात आरामदायी खोल्यांची व्यवस्था करतात. ओयो हा “ऑन यूवर ओन” ह्याचे संक्षिप्त रुप आहे.
‘ओयो’ खूप न चालणाऱ्या बजेट हॉटेलांना ओयो फ्रँचायझी म्हणून rebranding करते. त्यानंतर कंपनी त्यांना आरक्षण पद्धती आखून देते, किंमत आणि तंत्रज्ञान सेवा व्यवस्थापित करते, स्वच्छतेपासून वाय-फाय उपलब्धतेपर्यंत अनेक मानकांचे परीक्षण करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा हाॅटेलचं बुकिंग ‘ओयो’च्या ॲपद्वारे करावे लागते. त्याबदल्यात ‘ओयो’ त्यांच्या मासिक कमाईतून काही टक्के घेते.
कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये साॅफ्टबॅंक ग्रुप, दिदी चक्सींग, ग्रीन ओक्स कॅपिटल, सिक्वोया इंडिया, लाईटस्पीड इंडिया, हिरो एंटरप्राइज, एअरबीएनबी आणि चायना लॉजिंग ग्रुप यांचा समावेश आहे.
२०१९ मध्ये ‘ओयो’चे संपूर्ण जगात १७ हजारपेक्षा जास्त कर्मचारी होते, त्यापैकी अंदाजे ८ हजार भारत आणि दक्षिण आशियामध्ये आहेत. ओयो हॉटेल्स अँड होम्स ही एक परिपूर्ण हॉटेल चेन आहे, जी मालमत्ता भाडेतत्त्वावर आणि फ्रँचायझी म्हणून देते.
एप्रिल २०१९ मध्ये कंपनीने “ओपन” हा कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली. त्यांच्या भागीदार हॉटेल्सना त्यांच्या व्यवसायाची उद्दिष्टे गाठण्यात मदत करण्यासाठी हा एक उपक्रम आहे. जून २०२१ मध्ये ओयो रूम्सने यात्रा, एअरबीएनबी आणि मेक माय ट्रिप या कंपन्यांसोबत सहकार्य करून कॉन्फेडरेशन ऑफ हॉस्पिटॅलिटी, टेक्नॉलॉजी अँड टुरिझम इंडस्ट्री ही उद्योग संस्था भारताच्या पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी स्थापन केली.
ऑक्टोबर २०२१ मध्ये ओयोने पॅरालिम्पियन दीपा मलिक यांची कंपनीच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली आणि डिसेंबर २०२१ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष रजनीश कुमार यांना त्यांचे धोरणात्मक गट सल्लागार म्हणून नियुक्त केले.
जुलै २०२१ मध्ये मायक्रोसॉफ्टने त्याच्या आयपीओ पूर्वी ओयोमध्ये गुंतवणूक करण्यास स्वारस्य व्यक्त केले आणि सप्टेंबर २०२१ मध्ये बहुवर्षीय धोरणात्मक करारावर स्वाक्षरी झाली. ऑक्टोबर २०२१ मध्ये कंपनीने प्रारंभिक सार्वजनिक ऑफरद्वारे १.२ अब्ज अमेरिकन डॉलर उभारण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा मसुदा दाखल केला.
आज जगभरातील प्रवासी पारंपरिक हाॅटेल्समध्ये राहण्याऐवजी ओयो रूम्सच्या निवडक स्वच्छ आणि आरामदायी हाॅटेलमध्ये राहण्याला प्राधान्य देतात हेच रितेश अग्रवालच्या ओयो रूम्सचं खरं यश आहे.
– चंद्रशेखर मराठे
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.