पुस्तक परिचय : प्रत्येकाला हवाहवासा असलेल्या पैशाबद्दल बरंच काही सांगणारं पुस्तक

मानवजातीच्या इतिहासात मानवनिर्मित ज्या काही कल्पना मांडल्या गेल्या त्यांपैकी काही कल्पनांनी मानवजातीवर दूरगामी परिणाम केले. ज्ञात मानवाच्या इतिहासात हजारो वर्षे ह्या कल्पनांचे परिणाम मानवाच्या जीवनावर होत राहिले व राहतीलही. पैसा ही अशीच एक कल्पना.

ह्या पृथ्वीतलावर जेव्हा केव्हा मानवनिर्मिती झाली असेल तेव्हा प्रथमत: मानवानं इतर प्राण्यांचं अनुकरण करण्यास सुरुवात केली असेल; पण इतरांपेक्षा शारीरिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍या प्राण्यानं आपल्या डोक्याचा वापर करत जेव्हा शिकारीसाठी भटकंती करणं सोडून देत शेती करायला सुरुवात केली असेल, तेव्हा त्याने वस्त्या, गावं वसवली असतील.

शेती करून आगीचा उपयोग करत आपलं अन्न आपणच शिजवत असत. माणसानं स्वत:चं डोकं व हात वापरत अवजारं, शस्त्रं निर्माण केली असतील. एकदा अशा जीवनाची घडी बसल्यावर आपल्याला लागणार्‍या वस्तूंची निर्मिती केली असावी. आवश्यकतेपेक्षा जास्त असणारं धान्य, वस्तू, अवजारं ह्या गोष्टी ज्यांना पाहिजेत त्यांना देऊन आपल्याला हव्या असणार्‍या गोष्टी आणत असत.

हा विनिमय जेव्हा मोठ्या प्रमाणात होऊ लागला, तेव्हा विनिमयासाठी काही तरी सामायिक परिमाण असणं माणसाला गरजेचं वाटायला लागलं.

‘पैसा’ ह्या संकल्पनेचा जन्म कदाचित ह्या गरजेपोटी झाला आणि बघता बघता ह्या संकल्पनेनं सकल मानवजातीचं विश्व व्यापून टाकलं ते आजपर्यंत. ह्या पैशाचा इतिहास अतुल कहाते ह्यांनी फार काळजीपूर्वक, पण रंजनात्मक पद्धतीनं आणि अभ्यासपूर्वक ‘पैसा’ ह्या पुस्तकात मांडला आहे.

आज माया, ममता आणि नैतिकता अशा काही वेचक गोष्टी सोडल्या, तर इतर कोणत्याही वस्तूचं मूल्य हे पैशाच्या रूपात मोजता येतं. विनिमयाच्या उद्देशानं निर्माण झालेल्या ह्या संकल्पनेला पुढे सामाजिक, धार्मिक आणि राजकीय रंग चढत गेले.

१७७६ मध्ये अ‍ॅडम स्मिथनं लिहिलेल्या आणि आजही वाचल्या जाणार्‍या ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ ह्या पुस्तकात त्यानं म्हटलं आहे की, ‘देवाण-घेवाण हा इतर सर्व प्राणिजगतापेक्षा वेगळा असणारा गुणधर्म माणसाच्या अंगी आहे.’

कामाची विभागणी आणि विशेषीकरण ह्यामुळे माणसानं स्वत:च्या गरजेपेक्षा जास्त व चांगल्या वस्तूंची निर्मिती केली व ह्यामुळेच विनिमयाची गरज भासली. हा विनिमय सुकर करण्यासाठी पैसा आला. हे पुस्तक म्हणजे ह्या पैशाचा इतिहास.

अगदी कवड्या-लाकडांपासून पैशाचं रूप बदलत गेलं. जेव्हा ते सोन्या-चांदीच्या रूपात आलं तेव्हा त्याच स्वरूपात कित्येक शतकं टिकून राहिलं; पण ह्या मौल्यवान धातूंच्या रूपामुळे जगभराच्या अर्थकारणात काय काय अनर्थ घडले त्याची नोंद कहाते यांनी फारच रंजक स्वरूपात मांडली आहे.

इ. स.पूर्व १६०० सालापासून ते आजपर्यंत पैशाला अनेक रूपं मिळाली. त्यामुळे ‘पैसा म्हणजे काय?’ ही व्याख्या पटकन करणं कठीण आहे. ह्या पुस्तकात पैशाची ही अनेक रूपं, त्यांचे सामाजिक व राजकीय संदर्भ ह्यांचं फार सुरेख विवेचन केलं आहे.

पैशाचा धार्मिक संबंध म्हणजे, बर्‍याच धर्मांत पैसा व्याजावर देण्यात बंदी होती. युरोपात त्याचमुळे पैसा व्याजावर देण्याचं काम फक्त ज्यू धर्मीय करत, कारण त्या धर्मात बंदी नव्हती. त्या धार्मिक संदर्भामुळे जगभरात ज्यू लोकांकडे वित्तसंस्था व ऋणकोंची भूमिका आली.

सावकारी अधिकारांमुळे त्यांनी केलेल्या व्यवहारांच्या संदर्भात शेवटी ज्यू समाज हा युरोपमध्ये तिरस्कारास प्राप्त झाला. दुसर्‍या महायुद्धाच्या आधीच्या परिस्थितीला कदाचित हा पैशाचा धार्मिक संदर्भ कारणीभूत असावा. पैशाचा सामाजिक संदर्भही खूप मोठा आहे.

‘पैसा म्हणजेच सर्व काही’ इथपासून ‘पैसा म्हणजे माया’ इथपर्यंतच्या इतक्या तत्त्वव्याख्या गेली कित्येक शतकं लोकांच्या माथी मारण्यात आल्या की, ‘पैसा’ या गोष्टीबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनात पूर्णत: संभ्रम निर्माण झाला आहे.

माझ्या मते ‘पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे’ हे तत्त्वज्ञान बरोबर आहे; पण ते कधी म्हणायचं वा अंगीकारायचं हे समजणं आवश्यक आहे. चांगल्या मार्गानं भरपूर पैसा कमावल्यावर म्हणायचं हे वाक्य आहे. पैसा नसलेल्या माणसानं हे तत्त्वज्ञान सांगितलं, तर ते गरिबीचं निमित्त वाटतं व म्हणूनच परिणामकारक वाटत नाही!

पैशाच्या सामाजिक संदर्भामध्ये माझ्या मते सत्ता, अधिकार व पैसा ह्यांचं अतूट नातं आहे. जगाच्या इतिहासात आपली सत्ता बळकट करण्यासाठी प्रत्येक सत्ताधार्‍याने पैशाचाच आधार घेतला आहे. मानवाच्या इतिहासात गरीब राज्यकर्ता मला तरी माहीत नाही.

सत्ता वाढवण्यासाठी सैन्य हवं व सैन्य चालवण्यासाठी पैसा हवा, हे सोपं समीकरण अगदी रामायणापासून आजपर्यंत प्रत्येक सत्ताधारी मनसोक्त अंगीकारत आहे. अगदी देवाला खूश करण्यासाठीही सर्वसामान्य माणूस पैशाचाच आधार घेतो.

‘देव भावाचा भुकेला’ वगैरे अभंगात येणारी वाक्यं ही फक्त तिथंच शोभून दिसतात, व्यवहारात नाहीत. अन्यथा आयुष्यभर फकिरासारखं राहून समाजकार्य करणार्‍या बाबांना मरणोत्तर सोन्याची आसनं व मुकुट चढवण्यात आले नसते.

आज लोकशाहीच्या काळात सत्ताधारी होण्यासाठी व सत्ता कायम टिकवण्यासाठी पैशाची काय गरज असते, हे आपण अगदी अमेरिकेपासून भारतापर्यंतच्या महान लोकशाही व्यवस्थांमध्ये दररोज पाहत आहोत. सुरुवातीला गरीब वाटणारे व कदाचित असणारे हे सत्ताधारी सत्तेच्या पहिल्या काही वर्षांत, पुढील सत्ता टिकवण्यासाठी पैशाचा कसा संचय करतात, हे आता गुपित राहिलेलं नाही.

आपण सर्वसामान्य लोक त्याला भ्रष्टाचार म्हणत असू; पण पैशाचा हा हव्यास हे सत्ता टिकवण्याची गरज असल्याचा ठाम विश्वास जगातील सर्वच राजकारण्यांचा झाला असल्याचा प्रत्यय आपल्याला प्रतिदिनी येत असतो. पूर्वी राज्यकर्ते सत्ताविस्तारासाठी सैन्य घेऊन इतर मुलखांची, राज्यांची, बंदरांची लूटमार करायचे. आजच्या जगात हे शक्य नाही. त्यामुळे आपल्याच लोकांची लूटमार करण्यात सत्ताधार्‍यांची किंचितही द्विधा मन:स्थिती नसते.

पैशाचा हा सामाजिक व राजकीय संदर्भ लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. सत्ता व पैसा हे हळूहळू कदाचित समानार्थी शब्द वाटावेत, इतकं त्यांचं नातं घट्ट होत चाललं आहे. पैसा आणि नैतिकता ह्यांचंही नातं आहे, पण ते व्यस्त आहे. पैशाचा उपयोग विनिमयाच्याही पुढे गेला. संपत्ती साठवण्याचं एक साधन म्हणून जेव्हा पैशाचा उपयोग होऊ लागला, तेव्हा मात्र ‘येनकेनप्रकारेण हावरटाप्रमाणे माणूस पैसा जमवून त्याचा संचय करू लागला.

ह्याच कारणानं पैसा मिळवण्यासाठी नीतिमूल्यं पायदळी तुडवण्यात माणसाला जराही खंत वाटेनाशी झाली आणि म्हणूनच नैतिकता व पैसा ह्यांचं व्यस्त नातं जुळलं. जसं पैसा व सत्ता ह्यांचं एकमेकांबरोबर वाढीचं नातं जमलं, तसं पैसा व नीतिमत्ता ह्यांचं व्यस्त नातं जुळलं. हे त्रैराशिक सोडवल्यावर उमगतं की, सत्ता व नीतिमत्ता ह्यांचंही व्यस्त नातं जुळलं व आजच्या जगातही ते प्रकर्षानं जाणवू लागलं आहे.

आज पैसा-सत्ता-नीतिमत्ता हे त्रैराशिक खूप गुंतागुंतीचं झालं आहे. आज जगभरात असलेली सत्तेची व पैशाची हाव आणि नसलेली नीतिमत्तेची चाड ह्या चरकात सर्वसामान्य माणूस मात्र भरडला जातो आहे. ‘पैसा’ ही संकल्पना मुळात कुठून आली हे अजूनही गूढच असलं, तरी पैशाचा मूळ विनिमयाचा उपयोग हा मुख्य उद्देश न राहता संपत्ती संचयाचा मुख्य उद्देश बनला आहे. अतुल कहाते यांच्या ह्या पुस्तकात ह्या बदलत्या उद्देशांचा इतिहासही सांगितला आहे.

सोन्याच्या मूल्याबरोबर सांगड घातलेला हा पैसा, सोन्याची साथ सोडून स्वत: खूपच पुढे गेला आहे. आज जगात मूल्यवान असणारं सोनं, खनिज तेल ह्या व अशा नैसर्गिक संपत्ती प्रमाणांना हरवत मानवनिर्मित पैसा स्वत:चं वेगळं स्थान पटकावून बसला आहे.

वेगवेगळ्या राज्यपद्धतींमध्ये एक समानता दिसून येते, ती म्हणजे पैशाची अव्याहत हाव! ह्याचमुळे अमेरिकेसारख्या देशातही कागदी चलनाचा पैसा छापून आलेलं आर्थिक संकट टाळण्याचा प्रयत्न होत आहे; पण बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर पैशाचं स्वरूपही आता बदलत चाललेलं दिसतं.

क्रेडिट कार्ड हे काही दशकांपूर्वी जन्माला आलेलं पैशाचं नवीन स्वरूप ‘प्लास्टिक मनी’ म्हणून प्रचलित आलेल्या पैशामुळे, न कमावलेला पैसा आजच खर्च करण्याची व त्यायोगे अर्थबाजारात आणखी पैसा ओतण्याची किमया जगभरातील अर्थतज्ज्ञ व वित्तसंस्थांनी करून दाखवली.

आपल्याकडे असणार्‍या सोन्याच्या साठ्याएवढंच चलन छापण्याची शिस्त तर मागे पडलीच; पण भविष्यातील आमदनी वर्तमानात खर्च करण्याची किमया असलेली ‘प्लास्टिक मनी’ आज जगभरात महागाईच्या आगीत जणू तेलच ओतते आहे.

आता मात्र येणार्‍या काळात ‘प्लास्टिक मनी’ही मागे पडेल. इंटरनेटच्या महाजालामुळे व्हर्च्युअल, म्हणजेच आभासी पैशाची निर्मिती झाली आहे. आभासी तिजोर्‍यांमध्ये हा पैसा ठेवता येईल, प्रकाशाच्या वेगानं हा पैसा जगभरात फिरू शकेल.

जसा तो श्रीमंतांना सुरक्षित तिजोर्‍या निर्माण करेल तसाच ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग भारतातील गरीब माणसाला सरकारी मदत थेट पोहोचवण्यासही मदत करेल. येणार्‍या नवीन पिढीला कदाचित चलनी नोटा वापरायलाही लागणार नाहीत आणि ह्या महाजालावरच्या ह्या आभासी पैशाच्या रूपानं एके दिवशी आपले सर्व व्यवहार पूर्ण करणं शक्य होईल.

पैशाची एक खासियत मात्र सांगणं गरजेचं आहे. पैसा पाण्यासारखा नितळ असतो. त्याला रंग नसतो. तो चांगला किंवा वाईट नसतो. जीवनाकरिता तो अत्यंत आवश्यक असतो. शरीरातील रक्ताप्रमाणे तो समाजात-देशात वा जगभरातील अर्थव्यवस्थेत प्रवाही राहणं हे अत्यंत गरजेचं असतं.

माणूस हा पैसा कशासाठी साठवतो वा वापरतो त्यानुसार त्याला रंग येतो. मग तो कधी काळा ठरतो, कधी हिरवा ठरतो. पैशाचं स्वरूप हे सुराचं आहे की असुराचं, हे त्याच्या उपयोगाप्रमाणे ठरतं.

सर्वसामान्य माणूस मात्र त्यालाच देव मानू लागला आहे. लक्ष्मीपूजन केवळ दिवाळीत न करता दररोज करू लागला आहे. अतुल कहाते ह्यांचं हे पुस्तक आजच्या काळाशी सुसंगत आहे आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनानं ते अत्यंत वाचनीयही झालं आहे. पैसा नसलेल्या जगापासून येणार्‍या आभासी पैशाच्या जगाचा इतिहास खचितच रोचक आहे.

– दीपक घैसास
(‘जेनकोव्हल स्ट्रॅटेजिक सर्व्हिसेस प्रा. लि.’चे संस्थापक-अध्यक्ष व ‘आयफ्लेक्स सोल्यूशन्स’चे माजी सीइओ)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow