स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
एक व्यक्ती जिच्या चेहर्यावर कायम स्मितहास्य असते; सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने ही व्यक्ती वागते, खुद्द रतन टाटा यांनी स्वत:हून या व्यक्तीच्या उद्योगात गुंतवणूक केली, अशी व्यक्ती कोण तर नोटबंदीनंतर आपल्या सगळ्यांचा पैशाचा बटबा झालेल्या PayTMचा संस्थापक विजय शेखर शर्मा.
“माझा पहिला उद्योग विकून मी टी.व्ही. विकत घेतला,” हे अभिमानाने सांगणारा विजय आज भारतातील सर्वात मोठ्या मोबाइल पेमेंट कंपनीचा संस्थापक म्हणून ओळखला जातो.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox
एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला विजय, शाळेतील हुशार मुलांमध्ये मोजला जाई. शाळा संपवून सतरा वर्षांचा विजय इंजिनीअरिंगसाठी दिल्लीसारख्या मोठ्या शहरात पहिल्यांदाच गेला. तेव्हा त्याला साधे इंग्रजीसुद्धा नीट कळत नव्हते. वर्गात सुरुवातीला तो पहिल्या बाकावर बसायचा, परंतु शिक्षकांनी इंग्रजीत केलेल्या प्रश्नांच्या भडिमाराचा अर्थच न समजल्याने हा विजय आता शेवटच्या बाकावर दिसू लागला. कसे तरी इंजिनीअरिंग संपवून ५-१० हजाराची नोकरी करून घर चालवायचे, इतकेच स्वप्न त्या वेळी विजयचे होते.
नंतर इंग्रजी शिकण्यासाठी वेगवेगळे अंक, वर्तमानपत्रे तसेच कॉलेजच्या संगणक कक्षात बसून इंटरनेटवरील विविध लेख वाचू लागला. त्यातून त्याच्या लक्षात आले की, जर मी भारतात काही तरी नवीन आणून माझा उद्योग सुरू करू शकतो, तर मग मी नोकरीरूप चाकरी कशासाठी करू?
‘त्याचा पहिला उद्योग एक्स कॉर्पोरेशन (XIS Corp.) सुरू केला; परंतु ९/११ च्या दुर्घटनेमुळे हा उद्योग बंद पडला आणि त्याला तो विकावा लागला. या पैशातून त्याने एक टी.व्ही. आणि आईसाठी काही साड्या विकत घेतल्या. नंतर पोट भरण्यासाठी काही काळ त्याने नोकरी केली आणि पगारातून २ लाख रुपये जमताच पुन्हा नोकरी सोडून व्यवसायाकडे वळला.
विजय शेखर शर्माने २०१० मध्ये ‘वन ९७’ नावाची कंपनी सुरू केली. यात राजीव शुक्ला यांनी विजयची साथ दिली. ते राजीव आज PayTM चे सहसंस्थापक आहेत. “त्या वेळी बी.एस.एन.एल.चा नंबर १९७ असा असल्याने आम्ही आमच्या मोबाइल सर्व्हिस कंपनीचे हे नाव ठेवले.”, असे विजय सांगतो.
यातूनच पुढे PayTM चा जन्म झाला. Pay Through Mobile याचे संक्षिप्त रूप म्हणून PayTM असे नाव ठेवले. सुरुवातीला PayTM ही एक मोबाइल रिचार्ज करणारी वेबसाइट होती. प्रथम PayTMसाठी कुणीच गुंतवणूकदार नव्हता, कारण हे एक पूर्णपणे नवीन मार्केट होते.
गुंतवणूकदार मिळवण्यासाठी PayTMमधील विजयची १ टक्के इक्विटी त्याने समोर आणली जी जवळजवळ २ दशलक्ष डॉलर इतकी होती आणि गुंतवणूकदारांना सांगितले की, ही संधी जर तुम्ही चुकवलीत, तर हे सर्व पैसे फुकट जाणार. ह्यानंतर विविध छोटे-मोठे गुंतवणूकदार PayTM मध्ये गुंतवणूक करू लागले.
यापुढे PayTM चा विस्तार जोरदार होऊ लागला. याचे कारण म्हणजे इतर कुठलीही नवीन गोष्ट आणण्याआधी विजयने PayTM च्या ग्राहकांसाठी २४x७ कस्टमर केअर सुविधा सुरू केली. असलेल्या ग्राहकांना सोबत घेऊन पुढे गेले तरच उद्योग मोठा होतो असे विजयचे मत होते.
“आम्ही संपूर्ण पैशांतील ३० टक्के पैसा आणि संपूर्ण वेळेतील ३० टक्के वेळ हा ग्राहकांमधील नाते घट्ट करण्यासाठी वापरतो,” असेही विजय म्हणतो. एक व्यक्ती PayTM वापरणे चालू करी. मग तो आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना त्याबद्दल सांगे, मग ते सर्व जण वापरून बघत. अशा प्रकारे PayTM चे जाळे वाढतच आहे. विश्वास हा PayTM च्या प्रगतीचा पाया बनला.
PayTM हा ऑनलाइन उद्योग असल्यामुळे त्याला प्रचंड अशी गुंतवणूक अजूनपर्यंत लागली नाही. PayTM ने अजून फक्त गुंतवणुकीची एकच फेरी घेतली आहे. ती म्हणजे ‘अलिबाबा’, ‘सेफ’ आणि ‘अली-पे’ यांच्याकडून गुंतवणूकदारांशीसुद्धा विजय आपुलकीनेच वागतो. हे तिघंसुद्धा PayTMचे संस्थापकच आहेत, असे तो सांगतो.
एखादा उद्योग सुरू करणे बर्यापैकी सोपे असते, परंतु पत्त्यांच्या किल्ल्याप्रमाणे तो हळुवार उभा करून दगडी भिंतीसारखा भक्कम बनवणे मात्र कठीण. यासाठी PayTM चा पहिला कानमंत्र म्हणजे चांगल्या लोकांची निवड. PayTM कुणालाच कामगार म्हणत नाही, तर सर्वांना एका गटाचे सभासद/सहकर्मचारी असे म्हणते. दहा लोकांमधील एकाच व्यक्तीकडे चिकाटी असते.
अशांनाच PayTM त्यांच्या टीममध्ये सहभागी करून घेते. तसेच जेव्हा एखादे काम करण्यात किंवा नवीन काही तरी चालू करण्यात PayTM अयशस्वी ठरते तेव्हा ते एक विद्यार्थी बनून नवनवीन गोष्टी शिकते. PayTM चा आणखी एक प्रगतीचा मंत्र म्हणजे इतरांच्या प्रगती कथा वाचून त्यांची नक्कल न करता त्यातून योग्य तो बोध घेऊन आपली वेगळी प्रगती कथा बनवणे.
एका छोट्याशा कल्पनेतून आज PayTM भारतातील सर्वात मोठी मोबाइल कॉमर्स कंपनी झाली आहे. मोबाइल रिचार्ज करण्यावरून चालू झालेले PayTM आज त्यांच्या App द्वारे 10 दशलक्ष लोकांना बटण दाबताच अनेकविध सुविधा पुरवत आहेत.
२०१६ च्या नोटबंदीनंतर PayTM कडे छोट्या व्यापार्यांचा आणि सामान्य ग्राहकांचा कल मोठ्याने वाढला. लोकं खिशातल्या पाकिटातल्या पैशांप्रमाणे PayTM wallet मध्ये पैसे ठेऊन फिरू लागले. विजय शेखर शर्माने सुरू केलेल्या PayTM च्या यशातील आणखी मोठे यश म्हणजे आता PayTM ला रिझर्व्ह बॅंकेने Payment बॅंकेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे PayTM हे निव्वळ wallet नसून ते तुमचं बॅंकेतील बचत खाते झालं आहे. एकूणच भविष्यात PayTM आणखी बरीच प्रगती करणार याबाबत शंका नाही.
– शैवाली बर्वे
shaivalibarve@gmail.com
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.