सकारात्मक दृष्टिकोन हीच यशाची गुरुकिल्ली


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


तुमचा दृष्टिकोन काय आणि कसा आहे यावर तुमचा  रोजचा दिवस, आठवडा, महिना आणि पुढील आयुष्य अवलंबून असतं. विश्वास बसत नाहीये ना? पण तेच सत्य आहे मित्रांनो. आयुष्य आपलं आहे आणि ते कसं जगायचं हेसुद्धा आपणच ठरवायचं.

तुमचा दृष्टिकोन दिसत नाही, पण तुमची दृष्टी यातून व्यक्त होते. तुमच्या यशात आणि अपयशात याचा फार मोठा वाटा असतो आणि दुर्दैवाने ते आपल्या मात्र लक्षात येत  नसतं. एखादी गोष्ट वा घटना घडते आणि लगेच आपण त्यावर प्रतिक्रिया देतो आणि ती दहापैकी आठ वेळा नकारात्मकच असते.

आपलं मन अचानक व अनपेक्षित अशी घडलेली घटना स्वीकारू शकत नाही व त्यात आपले मन फार गुंतून राहते. सारखा त्याच गोष्टींचा विचार मनात येत राहतो. माझ्या बाबतीतच हे नेहमी का घडते? मी असं कोणाचे काय वाईट केले आहे? माझे नशीबच मेलं खराब आहे.

आमच्या नशिबात सुखच लिहिलेले नाही. कशाला केला एवढा उद्योग. आधीच्या नोकरीत बरा होतो इत्यादी. उदाहरण द्यायचे झाले तर तुमचा अ‍ॅक्सिडन्ट होतो व तुमच्या गाडीचे नुकसान होते. चूक समोरच्या माणसाची असते. तुम्ही सुरक्षित असता; तुम्हाला काही झालेले नाही.

तुम्ही सुरक्षित आहात व तुम्हाला लागलेले नाही, तुमचा इन्शुरन्स आहे याकडे न बघता माझ्याच गाडीचा अ‍ॅक्सिडन्ट का झाला? यात तुम्ही अडकता, हा झाला नकारात्मक दृष्टिकोन. बरं झालं मला काही झालं नाही. गाडीचा इन्शुरन्स आहे की, हा झाला सकारात्मक दृष्टिकोन.

प्रसंग तोच आणि व्यक्तीदेखील तीच, पण त्या घडलेल्या प्रसंगाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन यावर ठरते की तुम्ही या प्रसंगात किती अडकून पडाल की यातून लवकर बाहेर पडाल. जर मी हरलो तर आणि आम्ही जिंकणारच हाच असतो हरणारी टीम आणि जिंकणारी टीम यातील फरक.

समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन ओळखण्याची एक सोपी पद्धत म्हणजे त्याचे इतरांशी व विशेष करून आपल्यापेक्षा कनिष्ठ वा घरातील आपल्या छोट्या भावंडांबरोबर वागणे, बोलणे व त्यांना समजून घेणे. जी व्यक्ती सकारात्मक दृष्टिकोन ठेवते ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीला सांभाळून घेते व तिला अडीअडचणीत मदतदेखील आपणहून करते. त्यांचे बोलणे नम्र असणार व चूक झाली तर त्या मान्य करायला व त्या चुकांमधून शिकायला त्या व्यक्तीला फार वेळ लागत नाही.

बदल पटकन स्वीकारणारी व आत्मसात करणारी व्यक्ती ही कायम सकारात्मक असते, कारण मी नवीन गोष्ट शिकते आहे व मला ते जमेलच, कारण तिचा स्वतःवर विश्वास असतो. जी व्यक्ती इतरांचे मनापासून कौतुक करते ती कायम सकारात्मक असते, कारण तिला इतरांच्या यशाबद्दल मत्सर आणि हेवा वाटत नाही.

सकारात्मक दृष्टिकोन असलेली व्यक्ती फक्त एव्हरेस्टचे शिखर बघून त्यावर चढाई करते व यशस्वीदेखील होते; परंतु नकारात्मक दृष्टिकोन असलेली व्यक्ती फक्त खाली किती खोल दरी आहे व किती अंतर उरले यात अडकून शिखरापर्यंत पोचता पोचता मध्येच आपली यात्रा संपवते.

आपलं यश आपल्या हातात कधी असते. जेव्हा आपण निराशेचा सूर न आळवता ठीक आहे, पुढच्या वेळेस आणखी जोरदार प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया देऊन पुढे जातो. प्रयत्न केला, पण यश आले नाही आणि यश येणार नाही म्हणून प्रयत्न करत नाही.

प्रयत्न थांबले की यश लांब गेलेच म्हणून समजा. प्रत्येक वेळी परिस्थिती  आपल्या मनासारखी व आपल्याला अनुकूल असेलच असे नाही; पण आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेऊन आपल्या अंतिम ध्येयाकडे किंवा ध्यासामागे धावणाराच विजयी होऊ शकतो. त्याचा तो दृष्टिकोन त्याला विजयी बनवतो.

प्रसिद्ध लेखक आणि मॅनेजमेंट ट्रेनर शिव खेडा यांचे प्रसिंद्ध वाक्य आहे ‘विनर्स डोन्ट डु डिफरन्ट थिंग्स, डे डू थिंग्स डिफरंटली’ म्हणजेच त्यांचा दृष्टिकोन हा इतरांपेक्षा भिन्न असतो. आता भिन्न म्हणजेच काय, तर तो कायम सकारात्मकच असतो व प्रत्येक प्रसंगाकडे ते एका वेगळ्या नजरेने बघतात.

प्रत्येक आलेले संकट हे त्यांना पुढच्या विजयाची अधिकाधिक खात्री देत जाते व शेवटी तेच विजयी ठरतात. ते आलेल्या संकटामुळे खचून न जाता त्यापासून कायम नवीन गोष्ट शिकतात.

स्वत:मध्ये हा बदल करणे इतकं कठीण असते का?

नाही, ही आपली नकारात्मकता आपल्या मागे खेचते व स्वतःवरील अविश्वास ही आपली सर्वात मोठी कमजोरी असते. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ हे समर्थ रामदास स्वामी यांचे वाक्य आपल्याला खूप काही शिकवते. जेव्हा नकारात्मकतेकडून सकारात्मतेकडे आपला प्रवास सुरू होतो तेव्हा आपल्यात होणारा बदल आपल्याला हळूहळू जाणवायला लागतो.

मी करू शकत नाही, मी करू शकतो आणि मी सहज किंवा नेहमी  करतो. ‘शकत नाहीपासून सहज करतो’ हाच तो प्रवास. याकरिता बदलावी लागेल आपली मानसिकता.

सकारात्मकता आणि नकारात्मकता ही संसर्गजन्य रोगासारखी असते. मग तुमच्यासोबत असणारे, नकारात्मक विचार तुमच्या आणि सर्वांच्या मनात भरणारे लोक निवडून त्यांना हळूहळू आपल्यापासून दूर करावेच लागेल.

स्वत:ला रोज सांगावे लागेल, हे आयुष्य माझे आहे व मी ते आनंदाने व जसे मला हवे आहे तसेच व्यतीत करणार. एखादी घटना किंवा प्रसंग घडला ज्याने आपले मन दु:खी झाले तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्गदेखील स्वत:ला शोधून काढावा लागेल.

सकारात्मक दृष्टिकोन हा सकारात्मक विचार करण्यातून विकसित होतो. लोक चांगलंपण बोलणार आणि वाईटदेखील. त्यात अडकून न पडण्याची मानसिकता हळूहळू मग स्वत:मध्ये विकसित झालेली पाहून आपली पाठ आपणच थोपटून घ्यायची.

सकारात्मक दृष्टिकोनाचे फायदे

सकारात्मक दृष्टिकोन असलेली व्यक्ती त्याच्या भोवतालच्या प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करून सहज व शांतपणे काम करून सहज यश प्राप्त करू शकतो व नकारात्मक दृष्टिकोन असलेल्या माणसावर भोवतालची परिस्थिती आरूढ होते व तो अनेक तक्रारी करून आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करतो.

सकारात्मक दृष्टिकोन असेल तर  आपली  निर्णयक्षमता, नातेसंबंध, मैत्र, सहकारी, आपले सर्व वरिष्ठांशी संबंध आणि सामाजिक बांधिलकी यातदेखील वाढ होते. या सर्वांचा आपल्या रोजच्या जीवनावर सकारात्मक व चांगला  परिणाम होऊन आपला दिवस अधिकाधिक छान, आनंदी आणि सुखकर व्हायला सर्वात जास्त मदत होते.

आयुष्यातील आनंदी गोष्टींना जास्त महत्त्व दिल्यामुळे आयुष्यात आनंदाचे प्रमाण वाढले आहे, या भावनेने ही व्यक्ती कायम सुखी आणि अधिकाधिक आनंदीच राहते. या दृष्टिकोनामुळे स्वत:मधील आत्मविश्वास व मनोबल  वाढून फाजील अहंकार खूप कमी होतो.

सकारात्मक व्यक्ती आपले ध्येय लवकर गाठून यश प्राप्त करते. सकारात्मक दृष्टिकोन असलेला माणूस संकटाचा सामना अधिक प्रभावीपणे करू शकतो. कुठलीही गोष्ट तुम्ही मध्येच सोडून देत नाही व तिचा शेवटपर्यंत पाठपुरावा करून आपले ध्येय गाठताच.

सकारात्मक दृष्टिकोन तुमच्यातील ऊर्जा वाढवतो व आंतरिक शक्तीचा विकास करतो. तुमचा सकारात्मक दृष्टीकोन दुसर्‍याला प्रेरणा देतो व त्याला संकटाशी सामना करायला अधिक उत्तेजित करतो.

सकारात्मक व्यक्तींना मानसिक ताणतणाव फार कमी वेळा त्रास देतात, कारण जी व्यक्ती सर्वाना घेऊन पुढे जाते त्या व्यक्तीला मानसिक ताण येण्याचे प्रमाणदेखील कमी असते. महत्त्वाचे म्हणजे लहानसहान गोष्टींमुळे तुमचे मन खचून जात नाही व निराशा, औदासीन्य, विषण्णता आणि खिन्नता यांसारखे मानसिक आजार तुमच्यापासून दूर पळतात.

आपल्या आयुष्यात आपला दृष्टिकोन हाच शेवटी आपल्या जीवनाची दिशा ठरवतो. यश आणि अपयश हेसुद्धा माझ्या दृष्टिकोनावरच बरेचसे अवलंबून असतात. आपण आपला भूतकाळ बदलू शकत नाही किंवा आपल्याला आपल्या भविष्यात काय होणार आहे हे मला ठाऊक नसते.

लोकांनी आपल्याशी कसे वागावे हेसुद्धा ठरवतो आपला दृष्टिकोन; परंतु कळतंय पण वळत नाही हीच अवस्था बरेच वेळा सगळ्यांची असते. पेला अर्धा भरला आहे किंवा अर्धा रिकामा पाणी तेवढेच असते महत्त्वाचा ठरतो तो माझा दृष्टिकोन.

– पराग घारपुरे
संपर्क : 9422842774

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?