उद्योगाची मानसिक परिभाषा

उद्योजक बनण्यासाठी व्यक्तीला ध्येयाधारित विचार व कृती करावी लागते. त्यानुसार त्याला मनात, स्वभावात, व्यक्तिमत्त्वात, सवयीत, वागणुकीत, दिनचर्येत बदल करावा लागतो. आतापर्यंत आपण जसे वागलो, त्यामुळे जे मिळाले, तसेच वागत राहिल्यास, आतापर्यंत जे मिळाले, तेच मिळेल, ह्या वाक्यात म्हटल्याप्रमाणे, काही वेगळे, मोठे मिळवायचे असेल, तर ते मिळवायची पद्धत, मार्ग, विचार, तत्त्व वेगळ्या प्रकारचे व पातळीचे असणार, हे नक्कीच.

उद्योजकानेही त्याला अपेक्षित यश, संपत्ती व सुबत्ता मिळविण्यासाठी, त्यानुसार आवश्यक विचार अधिकाधिक प्रमाणात केले पाहिजेत. आपण दिवसाला ५०,००० विचार करतो. प्रत्यक्ष घटना घडत असताना, कोणाशी बोलत असताना, एखादे काम करत असताना, त्या-त्या चालू विषय-मुद्द्याला सोडूनही, असंख्य विचार आपल्या मनात येत असतात व चालू असतात. यापैकी किती विचार महत्त्वाचे, उपयोगी, सकारात्मक किंवा विधायक स्वरूपाचे असतात?

तर, आता असं  समजून घ्या व ठरवा की, त्या  ५०,००० विचारांपैैकी जास्तीत जास्त विचार आपल्या ध्येयाचे (goal related thoughts) असतील, तरच आपली ध्येयपूर्ती (achievement) होण्यास व त्याकडे योग्य वाटचाल होण्यास मदत होते. इतर विषयांचे आणि / किंवा नकारात्मक विचार करण्याचे टाळण्यासाठी, आपल्या ध्येयपूर्तीसाठी उपयोगी विचार आपण मनात रुजवले पाहिजेत.

आपले लक्ष विचलित करणार्‍या व्यक्ती, घटना, विचार व भावना यांचा सामना तर वेळोवेळी आपल्याला करावा लागतोच. अशा वेळी आपल्या व्यवसायाशी संबंधित व त्याला पूरक असे अनेक विषय, समस्या, कल्पना वगैरे आपण मनात आणून त्यावर काम करावे, म्हणजे आपोआप विचलित करणार्‍या विचारांची तीव्रता कमी होते.

आपण ७०-९०% वेळा अनावश्यक, असंबंधित, भरकटलेले आणि/किंवा नकारात्मक विचार करतो, त्याचा आपल्या ध्येयाशी (असल्यास), काहीही संबंध नसतो. उदा. क्रिकेट, राजकीय, सिनेमा, नट-नट्या, सामाजिक/कौटुंबिक प्रसंग/विषय, संकटे/आजारपण, मजा-मस्ती, दुसर्‍यांची टिंगलटवाळी वगैरे.

मन अशा विषयात गुंतल्यावर ध्येयापासून दूर जाणे सहजच होते. यासाठी प्रत्येक वेळी तारतम्याने विचार करून अशी मन विचलित करणारी वेळ आल्यास, मनात उद्योगासंबंधी आवश्यक, उपयोगी, त्याच वेळी गरजेचा असणारा विचार चालू करावा. काहीच न सुचल्यास आपल्या ध्येयाचा आकडा, तारीख, ग्राहकाची मोठी ऑर्डर असे विचार चालू करावेत.

उद्योगाच्या मानसिक परिभाषेतील शब्दांची यादीच तयार करावी व तेच शब्द व विचार मनात आणावे. जसे: यश, उत्तम आरोग्य, उत्तम-भरपूर उत्पादन व सेवा, मोठे ग्राहक व पुरवठादार, मोठे विक्रीचे आकडे, जाहिरात, करोडोंची उलाढाल, संपत्ती, आरोग्य, पैसा, योग्य माहिती, मार्गदर्शन, बक्षीस, फायदा, वाढ, विकास, प्रसिद्धी, मोठे घर, ऑफिस, भरपूर ग्राहक, मालमत्ता, समाधानी ग्राहक व कर्मचारी इत्यादी. कोणते शब्द मनात आणायचे नाहीत व त्यांचा विचार करायचा नाही, ते मी सांगतही नाही!

वास्तविक, ध्येयवादी उद्योजकाला विचार करावयास आवश्यक विषयांची कमतरता कधीच नसते. उद्योगाची संपूर्ण योजना, रचना, कर्मचारी, कच्चा माल, गुणवत्ता, विक्री, पैसा, वसुली, मार्केटिंग, गुंतवणूक, संशोधन व विकास, व्यवसाय वाढ, सरकारी कामे असे असंख्य विषय त्याला सतत हाताळायचे असतात. त्याविषयीच्या मानसिक कामांचा आढावा व त्यावर मनन, चिंतन व विचार करणे, म्हणजेच, व्यवसायाची मानसिक परिभाषा!

आपल्या उत्पादन व सेवांची रचना (product design), प्रकार, उपयुक्तता, त्याच्या वापरातील सहजता आणि समस्या, ग्राहकांनी दिलेले अभिप्राय (feedback) व सूचना ह्यावर विचार करावा. मन एकाग्र करून, त्यासंबंधी येणार्‍या कल्पना लिहून काढाव्यात. त्यातील वापरता येतील अशा कल्पनांची संबंधित तज्ज्ञांशी चर्चा करून, अधिक माहिती जमवून व अभ्यास करून, काही योजना (planning) तयार करावी व तिची अंमलबजावणी (execution) करावी.

आपण उत्पादन किंवा सेवा कोणत्या ग्राहकांसाठी तयार केली आहे? त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत? आपले उत्पादन त्यांच्या कोणत्या गरजा (Customer needs) पुरविते किंवा कोणत्या समस्या सोडविते? ग्राहकांची गरज, रुची, वापराची पद्धत बदलत आहे का?

त्यांच्या काही तक्रारी आहेत का? आपल्या उत्पादनात, त्याच्या पॅकिंगमध्ये, वितरणामध्ये काही बदल करायला हवेत का? ह्या मुद्द्यांचा सखोल विचार करावा लागतो व त्यासाठी मन लावून, विचार करून, मुद्देसूद योजना लिहून काढावी लागते.

आपली जाहिरात, प्रचार-प्रसाराची पद्धत, मार्केटिंग आपल्याला हवा तसा परिणाम देत आहे का? विक्रीचे उद्दिष्ट साध्य होत आहे का? मार्केटिंगमधील गुंतवणूक परतावा (Return On Investment) देत आहे का? उत्पादने, भौगोलिक विभाग, ग्राहक प्रकारानुसार ठेवलेली विक्रीची उद्दिष्टे सफल होत आहेत का?

स्पर्धकांचा आपल्या विक्रीवर काय परिणाम होत आहे? या प्रश्नांवर माहिती जमा करून त्याचे विश्लेषण (Sales analysis) करणे गरजेचे असते. त्यातून मार्केटिंगच्या नवीन पद्धतींचा विकास होतो. पैसा व अर्थविषयक धोरण (Financial policy), व्यवसायातील देणी-येणी (Payable-Receivable) यांचा वारंवार आढावा घेऊन, आवश्यक कारवाई करणे गरजेचे असते.

बँकेकडून वा इतर संस्थांकडून आवश्यक पतपुरवठा (credit facility) होणे, त्या योग्य उत्पादक कामांसाठी वापर होणे, खर्चावर नियंत्रण (cost control) ठेवणे, पुढील तीन, सहा, बारा महिन्यांचे आर्थिक अंदाजपत्रक (periodical budgets) तयार करणे, त्याबाबत संबंधित व्यक्ती व संस्थांना सूचित करणे, ह्या सर्व बाबी हाताळण्यासाठी स्थिर चित्ताने बसून, शांत डोक्याने याबाबत आकडेमोड करून त्यानुसार कृती करावी लागते.

आपल्यासाठी काम करणार्‍या कर्मचारी, पुरवठादार, सेवा देणार्‍या संस्थांबरोबर सौजन्याचे व सहकार्‍याचे संबंध असणे नेहमी चांगले व हिताचे असते. त्यांच्या हिताचे रक्षण, समस्यांची सोडवणूक करून, आपल्याबरोबर त्यांचाही विकास व प्रगती होईल, अशा भावनेने काम करणे गरजेचे असते. या कोणाबरोबरही मन कलुषित झाल्यास आपली किती मानसिक ऊर्जा व वेळ खर्ची पडतो, त्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे.

कोणत्याही प्रसंगी दोन्ही बाजूंना मान्य असलेला तोडगा नसेल, तर वेगळे होऊन दुसरे उत्तर शोधावे व जुनी समस्या व त्याविषयीच्या भावना मनात ठेवू नयेत. भविष्याचा विचार करून पुढे काय करायचे ते ठरवावे. वरील चर्चेतून हे लक्षात येईल की, उद्योजक-व्यावसायिक हा सदैव आपल्या ध्येयाचे भान राखणारा असतो.

तो आपल्या उद्योगासंबंधी विचारांनी आपले मन भरून व भारून टाकतो. उद्योगासंबंधीचे विचार, काम याचा त्याला कधीही कंटाळा वा आळस येत नाही. सतत ध्येयाचा विचार करत असल्याने व त्यासंबंधी तत्पर (prepared) असल्याने, त्यासंबंधीची संधी (Opportunity) त्याला लगेच दिसते व तो ती घेतो; किंबहुना तो त्याला उपयोगी अशी माहिती, ज्ञान, व्यक्ती, संस्था, घटना त्याच्याकडे आकर्षित करतो.

यशस्वी व्यक्ती अधिक यशस्वी होतात किंवा श्रीमंत व्यक्ती अधिक श्रीमंत होतात, ह्याचे हेच कारण आहे, कारण सतत ध्येयाचाच विचार, बुद्धीचा वापर व त्यासंबंधीचीच कृती केल्याने, त्या व्यक्ती त्या विषयात अधिक कार्यक्षम, परिणामकारक, प्रभावी,  तरबेज व तज्ज्ञ होतात व त्यांचा प्रगती, विकास व समृद्धीचा वेग वाढतो.

याचा अर्थ असा नव्हे की उद्योजकाने एककल्ली, स्वयंकेद्रित, स्वार्थी किंवा कुंठित-कंटाळवाणे विचार करावेत किंवा तसे जीवन जगावे. त्याने जरूर मनोरंजन, आनंद, कौटुंबिक सौख्य, मित्रमंडळी, सहली-समारंभ याचा लाभ घ्यावा व त्यात जरूर रमावे; पण एकंदर वेळ, विचार, लक्ष, मेहनत, व पैसा यापैकी ६०-७०% साधने तरी ध्येयाच्या दिशेने खर्च करण्याकडे त्याचा कल असावा! कारण, आपण ज्याचा व जसा विचार करतो, ते आपल्या बाबतीत प्रत्यक्ष घडते व आपण तसे घडत जातो.

तर, ठरवा एखादं ध्येय, करा तयार त्याची योजना, व द्या झोकून मनाने, बुद्धीने व शरीराने तुमची ध्येयपूर्ती करण्यासाठी. तुम्ही यशस्वी होणारच!

– सतीश रानडे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?