Advertisement
कथा उद्योजकांच्या

प्रदीप लोखंडे म्हणजे ग्रामीण बाजारपेठेचे प्रवेशद्वार

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


प्रदीप लोखंडे, एक असं व्यक्तिमत्त्व ज्यांना ‘पोस्ट कार्ड मॅन’, ‘सेल्फ-मेड मॅन’ किंवा ‘मॅन विथ वन लाइन अ‍ॅड्रेस’ असं ओळखलं जातं. ग्रामीण भारतात राहून, ग्रामीण लोकांच्या संगतीने आज त्यांनी ‘रुरल रिलेशन्स’ ही एक संस्था उभी केली; ज्याची दखल देशी-विदेशी कंपन्यांनी घेतली आहे. ग्रामीण महाराष्ट्राला जगभरातील कंपन्यांनी जोडणार्‍या या हरहुन्नरी व्यक्तीबद्दल व त्याच्या कार्याबद्दल जाणून घेऊ या त्यांनी ‘स्मार्ट उद्योजक’ला दिलेल्या या विशेष मुलाखतीत…

पोस्ट कार्ड मॅन, सेल्फ-मेड मॅन किंवा मॅन विथ वन लाइन अ‍ॅड्रेस असे ऐकल्यावर कसे वाटते?

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

खूप छान वाटते. लोकांनी प्रेम, आशीर्वाद खूप दिले. विशेष आभार आपल्या पोस्ट खात्याचे, त्यांनी माझ्या प्रयत्नांना छान साथ दिली. जवळजवळ २० हजार पोस्ट कार्ड्स माझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवली. कित्येक पोस्ट कार्ड्सवर तर पिन कोड, मार्ग यांचा उल्लेख नसतानादेखील ती मला मिळाली. पत्ता म्हणून फक्त माझे नाव, ही पोस्ट कार्ड्ससुद्धा मला मिळाली. सर्वांची साथ आणि उत्साह पाहून अजून कामाची उमेद मिळते.

पोस्ट कार्डची निवड का व कशी झाली?

१९९३ साली मी लोकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. पोस्ट कार्ड संवाद साधण्याचे एक स्वस्त व सोपे साधन म्हणून मी निवडले. आर्थिकदृष्ट्या मला ते अनुकूल होते. त्या काळी एका पोस्ट कार्डची किंमत १५ पैसे होती.

लोकांचा सहभाग कसा मिळवला? उत्तरे खरी असतील कशावरून?

सुरुवात खडतरच असते आणि म्हणूनच उत्साह वाढतो. सुरुवातीला किरकोळ प्रतिसाद मिळाला, पण प्रयत्न चालू होते आणि यश लाभले. एका गावातील तीन लोकांना मी प्रत्येकी दोन पोस्ट कार्ड्स पाठवत असे. तिघांना समान तीन प्रश्न विचारले जात आणि त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे मला लिहून पाठवणे एवढीच आशा. म्हणून दोन पोस्ट कार्ड्स, एक त्यांना आणि एक मला उत्तरे लिहून पाठवण्यासाठी. त्यांना याचा खर्च नको म्हणून. प्रश्न सोपे व सरळ असल्याकारणाने मला योग्य उत्तरे मिळत गेली. एकाच गावातील तीन लोकांनी एकच व समान माहिती पाठवली, त्यामुळे तफावतेची शंका उरली नाही.

प्रश्नांचे स्वरूप कसे होते? काही उदाहरण देऊ शकता का?

तुमच्या गावचा बाजार कधी व कुठल्या दिवशी भरतो? तुमच्या गावचे सरपंच कोण? तुमच्या गावाची लोकसंख्या किती? असे प्रश्न मी त्यांना विचारीत असे.

‘रुरल रिलेशन्स’ हे काय आहे?

रुरल रीलेशन्स ही एक संस्था आहे. गैरसरकारी संघटना (एनजीओ) नाही. आमची कार्यपद्धती थोडी वेगळी आहे, अर्थात आम्ही लोकांना वेगवेगळ्या विषयांवर माहिती देतो.

उदाहरणार्थ : ‘ओरल’ एज्युकेशन हे लोकांना माहीत नाही. किती वेळ आणि किती वेळा दात स्वच्छ करणे गरजेचे आहे या संदर्भात संपूर्ण माहिती त्यांना सांगण्यात येते. जी कंपनी आमच्याशी संपर्क साधते ती स्वत: आपल्या वस्तूंची माहिती त्यांना देते. इथे एक टूथ पेस्ट कंपनी आपल्या उत्पादनाविषयी सखोल माहिती देते. जे उत्पादन गावातील लोकांना आवश्यक आहे व त्यांच्या विकासाशी निगडित आहे त्याच उत्पादनांना आम्ही गावापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो.

‘रुरल रिलेशन्स’ नक्की काय करते?

आम्ही कंपन्यांना गावाकडची सर्व माहिती पुरवतो; अर्थात एका गावाची ओळख करून देतो. त्यांचे उत्पादन त्या गावासाठी कितपत योग्य आहे व ते कसे स्वीकारले जाईल हे सांगतो. उत्पादन गावात कसे वापरले जाईल किंवा ते राबवण्याची प्रक्रिया सांगतो. अशाने गावाचा विकास होण्यास मदत होते आणि कंपनीलाही नवीन बाजारपेठ उपलब्ध होते.

जमा केलेल्या माहितीमधून आर्थिक अडचण कशी भागवली?

१९९६ ते २००० पर्यंत मी हा एक व्यवसाय म्हणून आर्थिक बाबींकडे संपूर्ण लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे मिलेनीअम (२००१) वर्षाची छान सुरुवात झाली. नंतर मी माझा वेळ हा तीन गोष्टींत विभागला. ४० टक्के वेळ व्यवसायाला, ४० टक्के वेळ समाजकल्याणाला आणि उरलेला २० टक्के वेळ हा शिकवण्यासाठी. मागील सतरा वर्षे मी हेच करीत आहे आणि यापुढेही करणार आहे.

सामान्यतः लोक गावाकडून शहराकडे जातात? तुम्ही ग्रामीण भारताकडे का वळला?

मला ‘लेस ट्रॅव्हल्ड पाथ’ हवा होता म्हणून. अर्थात, असा मार्ग जिथे लोक वळली आहेत, पण सुधारणा झाली नाही. मला असे क्षेत्र हवे होते जिथे खूप वाव आहे आणि आपल्या गावाशिवाय दुसरे मला सुचले नाही. इथे कमी स्पर्धा होती, खूप काही करण्यासारखे होते जे मला खुणावत होते.

कसा होता हा प्रवास?

खूप सुंदर प्रवास होता. माहिती गोळा करताना खूप छान अनुभव आले. खूप वेगवेगळ्या लोकांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. लोकांनी आपुलकीने सर्व योग्य आणि खरे सांगितले. सतत आणि नेहमी संवाद साधल्यामुळे एक विश्वास निर्माण झाला. सुरळीत सर्व पार पडले आणि पडत आहे. ६७०० गावांची माहिती आम्ही एका जुन्या संगणकावर पद्धतशीर तयार केली.

तुमच्या कार्याला यश कधी व कसे मिळाले?

अशा प्रकारची माहिती आमच्याकडे आहे असे आम्ही दोनशे कंपन्यांनाा कळवले. मला यश तिसर्‍या प्रयत्नांत आले. ‘टाटा टी’ने माझ्याकडून माहिती २५ हजार रुपयांना विकत घेतली आणि ‘पार्ले जी’ने २० हजार रुपयांना. त्यानंतर मी कधी माझी माहिती विकली नाही.

‘ज्ञान-की’ हा प्रोजेक्ट काय आहे?

त्याबद्दल थोडे सांगा? ‘ज्ञान-की’द्वारे शाळकरी मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त ग्रंथालये असावीत असा माझा मानस आहे. आपली बोलीभाषा, प्रादेशिक ठेव, संस्कृती पुढच्या पिढीला थोडी तरी समजावी म्हणून माझा प्रयत्न चालू आहे.

‘नॉन रेसिडंट व्हिलेजर’ या थीमचा कसा फायदा झाला?

थीमला चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांना आपल्या मुळाशी जोडण्यास आनंद वाटू लागला. काही कार्य करून जर गावाचा उद्धार होत असेल तर ते त्यात सहभागी होत होते.

वेगवेगळ्या लोकांना भेटता. सगळ्यांचे स्वभाव वेगळे, समतोल कसा जमवता?

खरे तर माझे काम बोलते. मी २० हजार जुने संगणक शाळेत लावले. सात ते आठ हजार लोकांना नोकर्‍या मिळाल्या. ग्रंथालये स्थापित झाली, त्यात पुस्तके होती वाचायला. मुलांना सांगितले, संगणक वापरा आणि शिका. ते त्याला स्पर्श करू शकत होते. जुने होते म्हणून कोणी मुलांना थांबवले नाही. ते संगणकाचा मनसोक्त आनंद घेऊ शकत होते. माझ्या कामांनी मला लोकांच्या जवळ नेले.

अपयशाला कसे सामोरे जाता?

अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अपयश येते, कारण कुठे तरी काही तरी चुकलेले असते आणि माणूस हा चुकणारच. मनुष्य तोच खरा जो चुका सुधारून पुढे चालत राहतो. माझ्या मते प्रयत्न करत राहणे जास्त योग्य. काम ही एक निरंतर गोष्ट आहे. त्याला पूर्णविराम नाही.

एकाच कामाचा, पद्धतीचा कंटाळा येत नाही?

नाही. जे काम आपल्याला आवडते ते करण्यात कसला कंटाळा. आपल्या आवडीला आपले काम बनवा, थकवा जाणवणार नाही. मी तर माझी आवड जगत आहे. आयुष्यात मागे पहिले की समाधानी वाटते. प्रदीप लोखंडे म्हणून परत जन्मायला आवडेल, तोच प्रवास परत करायला मजा येईल.

पुढील लक्ष्य काय आहे?

देशातील ८५ हजार गावांपर्यंत पोहोचायचे आहे. ९४ हजार ग्रंथालये उभारायची आहेत. हे लक्ष्य गाठण्याची माझी तयारी सर्वांच्या मदतीने चालू आहे.

मुलाखत : सुजाता नाईकुडे

स्मार्ट उद्योजक पोर्टलवर तुमची यशोगाथा मांडण्यासाठी येथे क्लिक करा

Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!