पुरुषी वर्चस्व असलेल्या उद्योग क्षेत्रात जम बसवतायत प्रणिता गायकवाड

pranita gaikwad story

हॉटेल, रेस्टॉरंट किंवा पॅकेज फूड विक्रीपूर्वी सगळीकडे फूड टेस्टिंग करणे बंधनकारक असते. याविषयी आपल्या देशात कडक नियम आणि कायदे आहेत. त्यामुळे यासाठी फूड आणि वॉटर टेस्टिंग करणार्‍या अनेक लॅबोरेटरीज आज आहेत. आज या क्षेत्रात खूप मोठ्या संधी आहेत, परंतु नव्वदच्या दशकात टेस्टिंग लॅबोरेटरी हे क्षेत्र खूप मागे होते. याच काळात एक उद्योजिका घडत होती.

खरंतर बालवयात कळत-नकळत मनावर उद्योगाचे संस्कार झाले की पुढे ती वीण घट्ट व्हायला वेळ लागत नाही. आपल्या आईवडिलांचे स्वप्न आपण आपल्या डोळ्यांनी पाहू लागतो आणि मग आपली मत पक्की होतात. यामुळे आपण करियर काय करावे नोकरी की उद्योग? यामध्ये स्पष्टता लवकर येते आणि कामाचा आनंद घेता येतो.

अशाच आपल्या उद्योजिका प्रणिता गायकवाड या फूड टेस्टिंग लॅबोरेटरी एका वेगळ्या आणि सुरुवातीला पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रात मागील तेरा वर्षं व्यवसाय करत आहेत आणि त्यांचा या क्षेत्रातील अनुभव हा २५ वर्षापेक्षा अधिक आहे.


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)

काही वर्षांपूर्वी बहुंतांश मुलांची स्वप्ने ही डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचीच असायची. कदाचित माझेही असेच होते, पण माझ्या वडिलांचा खूप चांगला पाठिंबा मला होता. मुलगी आणि तिच्या क्षमता याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कसे पाहावे आणि स्वत:ला कुठेच कधी कमी लेखू नये, हे माझ्या वडिलांनी मला शिकवले.

माझ्यात विविध विचारांची बीज वडिलांनी पेरली आणि पुढे काम करत करत त्याची मुळ घट्ट झाली आणि मग नोकरी ते व्यवसाय हा प्रवास चालू झाला, असे प्रणिता सांगतात. प्रणिता गायकवाड यांची टेस्टिंग लॅबोरेटरी आहे. ‘सिगो फुड अँड वॉटर टेस्टिंग लॅबोरेटरी’ ही एनएबीएल प्रमाणित लॅबोरेटरी आहे.

बी.एस्सी. मायक्रो बायोलॉजीमध्ये शिक्षण झाल्यावर स्वत:च्या पायावर उभे राहायचे, या विचाराने एका बहुराष्ट्रीय कंपनीत त्या नोकरीला लागल्या. तो काळ होता १९९५ चा. कंपनी घरापासून एक तासाच्या अंतरावर होती, पण काम करायचंय हा विचार पक्का असल्याने लगेच नोकरी सुरू केली.

या कंपनीत प्रणिता या एकमेव महिला कर्मचारी होत्या. बहुराष्ट्रीय कंपनी असल्याने सुरुवातीला खूप काही शिकता आले. अनुभव मिळाला, अनेक संधी आल्या. यातून त्या घडत गेल्या. मग मागे वळून त्यांनी कधी पाहिलेच नाही. पुढे अजून एक-दोन कंपनीत नोकरी केली. नोकरीत कामाचे समाधान मिळत नव्हते.

पैसेही कमी मिळत याशिवाय जो मोबदला मिळत असे तो कामाच्या मानाने तुटपुंजा होता. असे असले तरी नोकरीत चांगला अनुभव त्यांनी गाठीशी बांधला. नोकरी करता करता आपण काय व्यवसाय करू शकतो याचा शोध घेतला. सुरुवातीला स्वत:चे प्रॉडक्ट बनवून प्रदर्शनात भाग घेऊन पाहिला. असे अनेक प्रयोग त्या करत राहिल्या.

मला काही तरी वेगळे करायचं आहे, हे मात्र त्यांच्या मनाशी पक्के होते. त्या काळात फूड लायसेन्स मिळवणे थोडे कठीण होते. अनेक अडचणी येत होत्या मग प्रॉडक्शनचा नाद सोडला व फूड ऑडिटचा कोर्स केला. संपूर्ण भारतभर मग त्यांनी फूड ऑडिटर म्हणून काम केले.

याच दरम्यान त्यांच्या लक्षात आले की फूड क्षेत्रात आपण काम करू शकतो. याच्या संबंधित सेवा आपण ग्राहकांना देऊ शकतो. मग त्यांनी विविध कोर्स करत स्वत:ला विकसित करत राहिल्या.

आतापर्यंत दहा ते बारा वर्षांचा अनुभव गाठीशी जमा झाला होता. आतापर्यंत कौटुंबिक जबाबदार्‍या वाढल्या होत्या. अनेक बदलही झाले होते. २००६ साली फूड सेफ्टी अ‍ॅक्ट लागू झाला आणि मग फूड, वॉटर टेस्टिंग, त्याची नुट्रिशनल व्हॅल्यू हे सगळे कम्पल्सरी चेक करणे गरजेचे झाले. ही एक जमेची बाजू झाली.

२००६ साली या व्यवसायावर मी शिक्कामोर्तब करून घराच्या बेडरुममधून स्वत:ची टेस्टिंग लॅबोरेटरी सुरू केली. पती आणि आईची साथ या प्रवासात खूप मोलाची ठरली. सुरुवातीला काम करताना आई म्हणून खूप त्रास व्हायचा. सुरुवातीची दहा वर्ष खूप कठीण गेली, पण घर आणि व्यवसाय करताना प्राधान्यक्रम ठरवून काम केले. त्यामुळे मी घर, कुटुंब, व्यवसाय याचा बॅलन्स सांभाळत गेले असे प्रणिता सांगतात.

फूड आणि वॉटर टेस्टिंग याला आज खूप मागणी आहे. सगळेच स्वत:ची लॅब टाकू शकत नाहीत, पण त्यांना दर सहा महिन्यांनी रिपोर्ट सादर करावे लागतात. त्यासाठी मग ‘सिगो फुड अँड वॉटर टेस्टिंग लॅबोरेटरी’ अशा टेस्टिंग लॅब त्यांच्यासाठी उपयुक्त ठरतात.

प्रणिता म्हणतात, अगदी सोसायटीच्या टाक्या, वैयक्तिक वॉटर प्युरिफायर याच्याही टेस्ट केल्या जातात. इथेही आमच्या सेवेची गरज असते. याशिवाय हॉटेल, रेस्टॉरंट्स, पॅकेज फूड या व्यवसायात आमच्या सेवेची गरज असते. प्रत्येक प्रॉडक्टला वेगवेगळे नियम असतात त्यामुळे आम्हाला सेवा द्यायला जास्त संधी तयार झाल्यात.

मी सेवा देत गेले आणि चांगली सेवा दिल्यामुळे माउथ टू माउथ पब्लिसिटी जास्त झाली आणि ग्राहक मिळत गेले. आतापर्यंत आम्ही शंभरहून अधिक टेस्टिंग सेवा देत आलोय. ‘सिगो फुड अँड वॉटर टेस्टिंग लॅबोरेटरी’ याशिवाय त्या विविध कंपन्यांना कन्सल्टन्सी सर्व्हिसेस देतात.

एखाद्याला सिस्टीम बसवून हवी असेल तर त्यासाठी मदत केली जाते. प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी मदत केली जाते. याशिवाय त्या फूड ऑडिट करतात. या क्षेत्रात शिकणार्‍या मुलांना त्यांच्याकडे ट्रेनिंग दिली जाते. अशा वेगवेगळ्या सेवा प्रणिता देतात.

सुरुवातीला त्यांनी घरातून व्यवसाय केला, पण मग हळूहळू कामं वाढत गेली. लॅब म्हटल्यावर टेस्टिंग आले. मग त्याचा थेट संबंध केमिकल वगैरे गोष्टींशी येतो. त्यामुळे अनेक नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. त्यामुळे त्यांनी वेगळी जागा भाड्याने घेऊन स्वतंत्र लॅब सुरू केली.

या ठिकाणी स्टाफसुद्धा त्या क्षेत्रातील शिक्षण असलेलाच लागतो. प्रणिता ग्राहकाला सेवा देताना स्वत: त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी चोवीस तास फोनवर उपलब्ध असतात हे विशेष.

व्यवसाय उभारताना अनेक अडचणी आल्या त्यांना खंबीरपणे त्यांनी तोंड दिले. लॅब सुरू करायची म्हणजे आर्थिक भांडवल, जागा, वेगवेगळी साधने लागतात. याची जमवाजमव सुरुवातीला मोठ्या प्रमाणात करता आली नाही. मग हळूहळू व्यवसायातल्या पैसा पुन्हा व्यवसायात गुंतवत एक एक करत आतापर्यंत त्यांनी ३० इक्विपमेंट घेतली.

प्रणिता सांगतात, कोरोनापूर्वी व्यवसाय वाढवण्यासाठी मी प्रयत्न केले मला त्यात यशही आले. व्यवसाय मोठ्या पातळीवर नेण्यासाठी एका बँकेकडून कर्जही मंजूर झाले. यादरम्यान मोठे ग्राहक माझ्याकडे आले होते, पण कोरोन आला आणि सगळे ठप्प झाले.

पुन्हा व्यवसायवाढीच्या स्वप्नाला ब्रेक लागला. पण न डगमगता आता पुन्हा जोमाने यातून बाहेर येतोय. विश्वासार्हता आणि लोकांमध्ये खाद्यपदार्थांबद्दल जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.

प्रतिकूल परिस्थितीत एका वेगळ्या व्यवसायाचे स्वप्न पाहून ते पूर्ण करण्यासाठी अनेक आघाड्यांवर लढणारी ही स्मार्ट उद्योजिका. अनेक कठीण प्रसंग आले पण त्यांनी माघार कधी घेतली नाही. त्यांचा हा प्रवास इतर महिलांना नक्कीच प्रेरणादायक आहे.

संपर्क : प्रणिता गायकवाड – 97302 00597

Author

  • यांनी पदव्युत्तर पत्रकारितेत पदविका केली आहे. प्रिंट माध्यमांत काही काळ काम केल्यानंतर त्यांनी स्मार्ट उद्योजक हे मासिक सुरू केले.

    View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?