मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही, असे म्हटले जाते. त्यात तथ्यही आहे. मुंबईतला मराठी माणसांचा टक्का सातत्याने कमी होत आहे. मराठी माणूस मुंबईतल्या जागा विकून विरार, कल्याणला राहायला जाऊ लागलाय. मुंबईतल्या मोक्याच्या जागांवरही अमराठी माणसांचा कब्जा झालाय.
मुंबईची आर्थिक नाड्या अमराठी माणसाकडे गेल्या आहेत. अशा परिस्थितीत एका मराठी तरुणाने मात्र प्रवाहाच्या विरुद्ध सूर मारला आहे. बदलापूरसारख्या अर्धग्रामीण परिसरातून आलेल्या प्रसाद पल्लीवाल यांनी आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रात अवघ्या चार वर्षांत अशी काही उंची गाठली की फोर्टसारख्या मुंबईतल्या अतीमहत्त्वाच्या ठिकाणी त्यांचे स्वत:च्या मालकीचे प्रशस्त ऑफीस आहे.
प्रसाद पल्लीवाल यांचा जन्म ४ जुलै १९८७ रोजी झाला. त्यांचे वडील साधे कामगार होते. घरची परिस्थिती गरीबीची होती. आई साड्यांना फॉल-बिडींग करीत असे. प्रसाद पल्लीवाल यांचा लहानपणापासून स्वतंत्र व्यवसायाकडे ओढा होता. त्यांनी बालवयात अनेक प्रकारचे छोटे व्यवसाय केले. दिवाळीत, फटाके, उटणे, कॅलेंडरे विकली. त्यांना एक लहान भाऊ आहे. तो चार्टर्ड अकाउंटंट आहे.
बदलापूरच्या द्वारकाबाई नाईक विद्यालयातून २००२ साली प्रसाद मॅट्रीक झाले. नंतर त्यांनी अभिनव कॉलेजमधून विज्ञान शाखेत बारावी केले. आपल्या माजी मुख्याध्यापिकांच्या सांगण्यावरून त्यांनी मुंबई विद्यापीठाचा डिप्लोमा इन ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम मॅनेजमेंट केला.
यात त्यांना भारतातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती, संवाद कौशल्य व ट्रॅव्हल एजन्सी कशी चालवावी याचे प्रशिक्षण देण्यात आले. कोर्स संपताच त्यांना सचिन ट्रॅव्हल्स कंपनीत टूर मॅनेजरचा जॉब मिळाला. अष्टविनायकाच्या सहलीने त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीचा श्रीगणेशा झाला.
त्यानंतर कंपनीतर्फे नैनिताल-कार्बेट-मसुरी येथील सहली पार पाडण्यासाठी त्यांची दिल्लीत नेमणूक झाली. या सर्व टूर्स त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळल्या. त्याने त्यांचे ट्रॅव्हल एजन्सीबाबतचे ज्ञान वाढत गेले. प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
प्रसाद पल्लीवाल यांचे वैशिष्टय असे की ते सर्व ग्राहकांशी वैयक्तिक पातळीकर संबंध जोडत. टूर संपल्यावरही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात राहत. ते ग्राहकांना इतकी चांगली वागणूक देत की पहिल्या टूरला आलेल्या लोकांशी त्यांचे आजही जिव्हाळ्याचे संबंध आहेत. याचा पुढे त्यांना स्वतंत्र व्यवसाय करताना त्यांना फार लाभ झाला.
उज्ज्वल भविष्यासाठी २००७ साली ते राज ट्रॅव्हल्समधे रुजू झाले. तिथे आंतरराष्ट्रीय टूर्सची पॅकेजेस विक्री करण्याची व टूर मॅनेज काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन विश्वव्यापक झाला.
राज ट्रॅव्हल्समध्ये त्यांना ट्रॅव्हल एजन्सीशी संबंधित सेल्स, अॅडमीन, अकाउंटस, आयटी, एचआर अशा सर्व पैलूंचा अनुभव मिळाला. त्यांच्याकडे पर्यटन व्यवसायाशी संबंधित मोठा डेटाबेस जमला. ग्राहकांशीही त्यांचे वैयक्तिक पातळीकर संबंध निर्माण झाले.
२०१२ साली राज ट्रॅव्हल्स बंद पडली. तेव्हा प्रसाद यांनी स्वतंत्र ट्रॅव्हल्स एजन्सी सुरू करावी असे त्यांच्या संबंधितांचे म्हणणे होते. मात्र भांडवलासाठी गाडी अडली होती. ती अडचण एका हितचिंतकाने सोडवली. त्यांना मुंबईच्या फोर्ट परिसरातच ऑफीस हवे होते. तेही त्यांना ट्रॅव्हल्स रिलेटेड कनेक्टद्वारेच मिळाले.
सर्वांच्या सदिच्छेने प्रसाद पल्लीवाल यांनी जानेवारी २०१३ मध्ये ‘क्वालिटी ट्रॅव्हल वर्ल्ड’ या नावने आपली ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली. पर्यटन विश्वातील जागतिक दर्जाची आणि गुणवत्तायुक्त सेवा देणारी कंपनी म्हणून त्यांनी हे नाव दिले. एका राजपत्रित अधिकार्याचे शिर्डीसाठी बुकींग करण्याच्या कामाने पहिल्याच दिवशी कामकाजाला सुरुवात झाली. मग त्यांनी मागे वळून बघितलेले नाही.
या कंपनीद्वारे ते आंतराष्ट्रीय दर्जाची गुणवत्तापूर्ण पर्यटन सेवा देतात. फॅमिली व ग्रुप इंटरनॅशनल टुर्स आयोजित करणे ही त्यांची खासियत आहे. कंपन्यांच्या इन्सेन्टीव्ह टुर्सही ते आयोजित करून देतात. मोठ्या कंपन्या आपल्या वितरकांना इन्सेन्टीव्ह म्हणून परदेशात पर्यटनाला घेऊन जातात. तेव्हा शंभर ते पाचशे जणांचा ग्रुप असतो.
प्रसाद पल्लीवाल अशा सहली आयोजित करून देतात. त्यांनी सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई येथे आयोजित करून दिल्या आहेत. भारतातील काश्मीर, हिमाचल प्रदेश, नैनिताल, जिम कार्बेट सँक्चुरी, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, नॉर्थ इस्टची सेव्हन सिस्टर्स राज्ये यांच्या टूर्स ते आयोजित करतात, बारा ज्योतीलिंगे, चारीधाम यात्रा, अष्टविनायक व इतर धार्मिक सहलींचे व्यवस्थापन ते करून देतात.
आंतरराष्ट्रीय सहलींत युरोप, अमेरिका, दक्षिण आफ्रिका व दक्षिण-पूर्व आशिया यांवर त्यांचा भर असतो. पर्यटनविषयक सर्व गरजा ते पूर्ण करतात. ग्राहकांच्या गरजांनुसार ते रेल्वे-बस-विमानांचे बुकींग करतात. गेल्या चार वर्षांत त्यांनी ५ हजार लोकांना सेवा पुरवली आहे.
स्वत: प्रसाद पल्लीवाल यांनी अठरा देशांना भेट दिली आहे. त्यामुळे ते विदेशगमनाबद्दल ग्राहकांशी आत्मविश्वासाने बोलू शकतात. कर्मचार्यांना त्यांनी योग्यरीत्या प्रशिक्षित केलेले असून सर्व सेल्स मॅनेजर्सना ते अनुभव घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय टुर्सना पाठवतात.
प्रसाद पल्लीवाल यांची आता मुंबईत फोर्ट येथे दोन ऑफीसेस आहेत. त्यांपैकी एक त्यांच्या मालकीचे आहे. तसेच त्यांची अधेरी व बदलापूर येथेही ऑफीसेस आहेत. लवकरच नाशिक, पुणे, औरंगाबाद येथे ‘क्वालिटी ट्रॅव्हल वर्ल्ड’च्या शाखा उघडणे व महाराष्ट्रभर ‘क्वालिटी ट्रॅव्हल’चे नाव नेणे हे त्यांचे स्वप्न आहे. प्रसाद पल्लीवाल यांच्या वाटचालीत पत्नी प्रियांका यांचे मोलाची साथ आहे.
प्रसाद पल्लीवाल मराठी तरुणांना ते सल्ला देतात की शिक्षणानंतर दोन-तीन वर्षे कार्यक्षेत्राचा अनुभव घ्या. त्यात पैशाच्या मागे न लागता ज्ञान संपादन करा. पर्यटन क्षेत्र आकर्षक वाटले तरी त्यात चोवीस तास काम करावे लागते.
परदेशात गेल्यावर फिरण्यापेक्षा अभ्यासकाची दृष्टी असायला हवी. भारत पर्यटनाच्या दृष्टीने जगातील सातवा देश आहे. देशाच्या उत्पन्नातला मोठा भाग पर्यटनातून येतो. तेव्हा हे करिअरचे व व्यवसायाचे मोठे क्षेत्र आहे. प्रसाद पल्लीवाल यांना अल्पावधीत एवढे यश मिळण्याचे कारण म्हणजे त्यांनी लोकांशी ठेवलेले चांगले संबंध. तेच बर्याचशा समस्यांवरचे उत्तर आहे.
संपर्क : प्रसाद पल्लीवाल – ९८३३१४४४४४
इ-मेल : prasad@qualitytravels.in
संकेतस्थळ : www.qualitytravels.in
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.