अमेरिकेने व्हिसा नाकारल्यावर थेट अमेरिकेमध्येच सुरू केली स्वत:ची कंपनी

प्रथमेश कोरगांवकर या आपल्या उद्योजक मित्राची गोष्ट अनेक नवउद्योजकांना बरंच काही शिकवणारी आहे. प्रथमेशचा उद्योजकीय प्रवास हा रंजक तर आहेच, तसाच तो आव्हानात्मक आणि अनेक अडचणींनी भरलेलाही आहे. या नव्या पिढीच्या आणि नव्या दमाच्या या उद्योजकाचा आत्मविश्वास त्याला या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी सदैव तयार ठेवतो.

प्रथमेशच्या तीन कंपन्या आहेत. या तीनही कंपन्या सेवा क्षेत्रात कार्यरत आहेत. कंपनीचे मूळ उद्दिष्ट हे प्रत्येक ग्राहकाला ‘डिजिटल मार्केटिंग’द्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे हे आहे. नाशिक, पुणे आणि अमेरिकेतील डेलावेर येथे प्रथमेशच्या कंपनींची कार्यालये आहेत. लहान वयात एवढा मोठा पल्ला गाठणार्‍या प्रथमेशचा प्रवास खूप काही शिकवणारा आहे.

मूळचा नाशिककर असलेल्या प्रथमेशचे शिक्षण पुण्यातील आळंदी येथे झाले. तो आयटी इंजिनिअर झाला. त्याला लहानपणापासून कॉम्प्युटरची आवड होती. सहावीत असताना कॉम्प्युटर पाहिला आणि प्रथमेश म्हणतो मला त्याचे वेडच लागले जणू. त्याचवेळी ठरवले आपले करिअर कॉम्प्युटरमध्येच करायचे. लहानपणी माझा आदर्श ‘बिल गेट्स’ होते. त्यातूनच मी उद्योजक व्हायचे मनाशी पक्क केलं.

पुढे कॉलेजमध्ये असताना ‘पायरेट्स ऑफ सिलिकॉन व्हॅली’ हा चित्रपट पाहिला आणि त्या चित्रपटानुसार बिल गेट्स यांनी स्टिव्ह जॉब्स यांची संकल्पना चोरून ती जगासमोर आणली असे होते. त्यातच स्टिव्ह जॉब्स यांचे कार्य, त्यांची कल्पनाशक्ती, त्यांच्या आयुष्यातील चढउतार हे माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी ठरत गेले आणि त्यावेळेपासून माझा आदर्श हे ‘स्टिव्ह जॉब्स’ झाले.

प्रथमेशला लहापणापासूनच चौकटीत काम करायला आवडत नसे. आपण जगाच्या पाठीवर कोठेही असलो तरी आपल्याला आपला उद्योग चालवता आला पाहिजे हे त्याचे स्वप्न होते. त्याचे म्हणणे आहे की आपण उद्योगातही नोकरीसारखेच काम करत राहिलो तर एक उद्योजक आणि नोकरदार यात फरक तो काय?

पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना प्रथमेशने पहिला उद्योग केला. आपल्या चार मित्रांना सोबत घेवून त्यांनी स्वत:ची सोशल मिडीया नेटवर्किंग वेबसाइट सुरू केली. त्या वेबसाइटचे नाव होते slamdiary.com आपल्या मित्रांचे वाढदिवसाचे नोटिफिकेशन एसएमएसद्वारे कळवण्याचे फिचर या वेबसाइटमध्ये होते.

चार मित्रांनी यात आर्थिक गुंतवणूक केली होती आणि पहिल्याच दिवशी ती वेबसाइट हॅक झाली. ती वेबसाइट पुन्हा सुरू करायची तर ‘ट्राय’ने बल्क एसएमएसच्या नियमात बदल केला आणि एसएमएसचे दरही वाढवले. अशाप्रकारे प्रथमेश आणि त्याच्या मित्रांचा पहिला व्यवसाय पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही.

अशाप्रकारे वेबसाइट सुरू करण्यात प्रथमेशचा पुढाकार होता आणि त्याच्यामुळे मित्रांचे आर्थिक नुकसान झाले, परंतु त्यांच्यापैकी एकानेही त्याला कधीही त्याविषयी टोकले नाही अथवा दोषही दिला नाही. प्रथमेश म्हणतो, “त्याचमुळे माझ्यातील उद्योजकीय महत्त्वकांक्षेला तडा न जाता ती अजून घट्ट झाली. माझ्या संपूर्ण उद्योजकीय प्रवासात माझे कुटुंब, आई वडील, माझे मित्र, माझे मामा, माझी पत्नी ह्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

अमेरिकेने नामंजूर केलेला व्हिसा.

इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजिमध्ये इंजिनीरिंग केल्यानंतर मोठ्या कंपन्यांमध्ये कार्यप्रणाली कशी असते हे जाणून घेण्यासाठी मी काही वर्ष नोकरी करण्याचा निर्णय घेतला. कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या प्लेसमेंटमधील कॉग्निझंट कंपनीची नोकरीची ऑफर मी स्वीकारली. दोन वर्षे ‘कॉग्निझंट’मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून नोकरी केली. कंपनीत काम करताना तिथे एक कार्यप्रणाली होती त्यानुसार कॉम्प्युटरमध्ये लॉगइन करण्यासाठी आम्हाला डिजिटल टोकन दिले जाई. त्यातील पासवर्ड सतत बदलत असे.

पासवर्डशिवाय आम्ही आमच्या कॉम्प्युटरला लॉगइन करू शकत नव्हतो. अशात मी महिन्यातून दोनदा तरी माझे टोकन घरी विसरायचो. यातूनच मला एक संकल्पना सुचली. जर आपण आपले डिजिटल टोकन, क्रेडिट कार्ड, गाडीची डिजिटल चावी ह्या सगळ्या गोष्टी एका घड्याळ्यात सेव करू शकलो तर? कारण घड्याळ ही अशी गोष्ट आहे जी बहुतांश आपल्या सर्वांकडे असते. मी त्यावर अभ्यास सुरू केला आणि त्यातूनच २०१३ साली मी भारतात आणि अमेरिकेमध्ये माझ्या संशोधनाचे पेटंट फाईल केले.

पुढल्या प्रवासाविषयी सांगताना प्रथमेश म्हणतो, कॉग्निझंटमध्ये काम करत असताना माझा एक मित्र होता मयुरेश जाधव. एक दिवस तो मला म्हणाला मी आता नोकरी सोडून स्वत:चा उद्योग सुरू करतोय. त्यासाठी मला तुझी साथ हवीय.

माझी कॉग्निझंटमधील नोकरी नवीनच होती त्यामुळे मी त्याला नोकरी सांभाळून अर्धवेळ तुला सहकार्य करू शकेन असे सांगितले. आम्ही दोघांनी मिळून ‘सबसिस्ट सर्व्हिसेस’ म्हणून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची कंपनी सुरू केली. इथून खर्‍या अर्थाने माझ्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात झाली.

२०१४ साली कॉग्निझंट कंपनी सोडली आणि त्याने संशोधनासाठी फंडिंग गोळा करण्याच्या कामास सुरुवात केली. यासाठी दीडशेपेक्षा जास्त भारतीय गुंतवणूकदारांशी संपर्क साधला. माझी संकल्पना ही हार्डवेअरशी संबंधीत होती. त्यामुळे यासाठी आवश्यक भांडवलही तेवढेच मोठे होते.

माझी ही एक संकल्पना होती त्या संकल्पनेच्या संशोधनावर पैसे लावण्यास कोणीही तयार नव्हते. तो म्हणतो, आपल्याकडे भारतीय गुंतवणूकदार हा केवळ व्यावसायिक आहे त्याला त्याच्या गुंतवणूकीचा केवळ परतावा हवा. यासाठी पाश्चिमात्त्य देशातील एखाद्या कंपनीची हुबेहुब कॉपी करून सुरू केलेल्या व्यवसायावरही तो पैसा लावतो, परंतु नवीन संकल्पनेवर पैसे लावताना हात आखडता घेतो.

याचमुळे मी माझा मोर्चा पाश्चिमात्य गुंतवणूकदारांकडे वळवला. भरपूर लोकांनी माझ्या संकल्पनेचे कौतुक केले. सुप्रसिद्ध उद्योजक आणि गुंतवणूकदार विनोद खोसला यांनी माझे हे पेटंट विकत घेण्यात रूचीही दाखवली, परंतु माझे पेटंट हे अजूनही माझ्या नावाने मिळालेले नाही. पेटंट मिळण्यासाठी भारतात पाच वर्षाचा कालावधी तर अमेरिकेत तोच तीन वर्षांचा कालावधी लागतो.

भारतात पेटंट टाकून आता सहा वर्ष होत आली तरीही भारतातून माझे पेटंट अजून सिद्ध झाले नाही. अमेरिकेत भारतात फाईल केल्यांनतर सहा महिन्यांनी आपण तेच पेटंट नोंदवू शकतो. मागून नोंदवूनसुद्धा अमेरिकेने ठरलेल्या वेळेनुसार तीन वर्षात माझे पेटंट माझ्या नावावर सिद्ध केले. अजूनही मी माझ्या भारतातील पेंटन्ट मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे आणि त्यासाठी लढतो आहे.

एक गुंतवणूकदार कंपनी माझ्या निदर्शनास आली जी अमेरिकेतील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना अमेरिकेत स्वतःची कंपनी सुरू करण्यासाठी मदत करते. मी कंपनीशी संपर्क केला. जर तुम्ही अमेरिकेत विद्यार्थी असाल तर आम्ही तुमच्या संकल्पनेचा विचार करू, असे आश्वासन त्यांच्याकडून दिले गेले. त्यामुळे मी डिसेंबर २०१५ साली अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी गेलो.

कॅलिफोर्नियामधील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना माझे अमेरिकेतील माझे पेटंट माझ्या नावावर रजिस्टर झाले. चार महिन्यांचे एक सेमिस्टर पूर्ण झाल्यावर माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मी भारतात आलो आणि लग्न झाल्यावर अमेरिकेला परतत असताना सॅन फ्रॅन्सिस्को विमानतळावर मला अडवण्यात आले.

माझी कसून तपासणी करण्यात आली. अमेरिकेला शिक्षणासाठी जर तुम्ही स्वखर्चावर जात असाल, तर तुम्हाला तुमचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत लागणार्‍या खर्चाची रक्कम आपल्या बँक खात्यात ठेवावी लागते.

माझ्या अमेरिकेतील खात्यात एक महिना पुरेल इतकी रक्कम होती आणि भारतातील बँक खात्यात उर्वरित रक्कम होती. भारतातील बँक खाते पडताळण्याची आम्हास परवानगी नाही, त्यामुळे अमेरिकेतील वास्तव्यास माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत असे सिद्ध करून त्यांनी माझा प्रवेश नाकारला आणि अमेरिकेत पाच वर्षे प्रवेशबंदी केली.

अमेरिकेत पुढील संशोधनावर काम करून त्यासाठीची कंपनी सुरू करण्याच्या माझ्या स्वप्नावर अचानक पाणी फेरले गेले. ही घटना मी आणि माझ्या कुटुंबियांसाठी धक्कादायक होती. यावेळी माझे आईवडील, मित्रमंडळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी मला धीराने साथ दिली.

असा बाका प्रसंग जेव्हा येतो त्यावेळी खरी गरज असते भक्कम आधाराची. माझे पालक नेहमीच माझ्यासाठी उत्तम मार्गदर्शक आणि मित्रसुद्धा आहेत. प्रत्येक उद्योजकाला अशा आधाराची गरज असते. याचमुळे या अन्यायाच्या विरोधात मी लढा दिला.

अमेरिकेतील इमिग्रेशन कोर्टमध्ये फिर्याद नोंदवली. दोन वर्षे केस लढली. अखेर माझ्यावरची बंदी हटवली गेली. आता मी कधीही नवीन विझा घेऊन अमेरिकेत जावू शकतो.

अडचणी प्रथमेशचा पाठलाग सोडत नव्हत्या, परंतु तो म्हणतो, “आयुष्यात अडचणी आल्यावर जर तुम्ही निराश झालात आणि उद्योजकता सोडून दिली तर तुम्ही मुळात उद्योजकच नव्हतात. कारण जगातील प्रत्येक उद्योजकासमोर अडचणी ह्या येतातच. त्यावर मात करून पुढे जाता आले पाहिजे.”

अमेरिकेतून परतल्यावर आता काय करायचे हा विचार सतत चालू होता. पुन्हा नोकरी करणार नाही हे ठाम होते. परंतु उदरनिर्वाहासाठी काही तरी केले पाहिजे. त्यावेळी माझ्या मामांनी माझ्यातील सोशल मीडियाच्या आवडीलाच उद्योगात रुपांतरीत करण्यात सल्ला दिला. मग मी ऑनलाईन प्रशिक्षण, विविध कोर्स करून डिजिटल मार्केटिंगमध्ये अधिक ज्ञान मिळवायला सुरुवात केली आणि त्याविषयी अभ्यास करत राहिलो.

२०१७ साली त्याने स्वत:ची ‘फोकस मिडीयम सोल्युशन्स’ नावाची डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरू केली. ज्याद्वारे विविध कंपन्यांना ते डिजिटल मार्केटिंगची सेवा पुरवतात. २०१८ साली ‘360 टूर बॉक्स’ ही कंपनी निलेश काठे या मित्रासोबत भागीदारीत सुरू केली. व्यवसायासाठी ३६० अंशातील फोटो काढून ते सोशल मीडिया, वेबसाईट आणि मॅप्स आणि virtual reality चे प्रोजेक्टमध्ये टाकले जातात.

ते गूगलचे अधिकृत पार्टनरसुद्धा आहेत. २०१८ मध्येच ऑनलाईन ‘इ-कॉमर्स’मध्ये सॉफ्टवेअर बनवण्यास सुरुवात केली. त्यासाठी प्रथमेशने अमेरिकेमध्ये ‘किक टेक बॉक्स’ नावाची कंपनी सुरू केली. ह्यामध्ये इ-कॉमर्स मार्केटिंगवर सॉफ्टवेर आणि सर्व्हिसेस दिले जाते.

याशिवाय ‘मराठी तरुण आणि उद्योजकांसाठी, “शिका डिजिटल मार्केटिंग मराठीमध्ये” हा उपक्रम सुरू केला आहे. ह्यामध्ये मराठी आणि भारतातील उद्योजकांना सोप्या शब्दात डिजिटल मार्केटिंगची ओळख करून दिली जाते. यामध्ये मराठी भाषेत ऑनलाइन कोर्स आणि मराठी ई-बुक्स अगदी वाजवी दरात उद्योजकांना उपलब्ध करून दिले आहेत. marathidigitalbox.com इथे अधिक माहिती मिळवू शकता.

सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. प्रत्येक उद्योजकाला सुरुवातीचा काळ भरपूर कठीण असतो. आपल्या देशात कॉम्प्युटर इंजिनिअरींग क्षेत्रातील उद्योजकांविषयी असणारी मानसिकता खूप उदासीन आहे.

सुरुवातीच्या काळात एका सुप्रसिद्ध कंपनीतून आम्हाला फोन आला. आम्ही त्यांच्यासोबत मिटिंगसाठी गेलो. वरिष्ठांशी चर्चा करून सॉफ्टवेअरची आखणी वगैरे बोलणी झाली.

त्यानंतर त्यांच्या सीईओंना भेटण्यास सांगितले. आम्ही केबिनमध्ये गेल्यावर त्या व्यक्तीने इतरत्र फोन करून बोलण्यात दहा मिनिटे वेळ घालवला. त्यानंतर म्हणाले, आम्हाला जसे हवे तसे सॉफ्टवेअर बनवून द्या. आम्ही एक महिना वापरून पाहतो आणि त्यानंतर जर आवडले तर तुमचे जे काही चार-पाच हजार असतील ते घेवून जा.

आपल्याला कोणी तरी कानशिलात मारली असा मला आणि माझ्या मित्राला अनुभव आला. त्यावेळी आम्ही त्या सीईओंना म्हणालो, “तुमच्या दुकानात आलेला एखादा ग्राहक जर असं म्हणाला की, मी सोन्याचा हार घेऊन जातो, एक महिना वापरून पाहतो आणि नाही आवडला तर परत देतो.”

व्यवसाय आमचा आहे, ग्राहकाकडून किती पैसे अॅडव्हान्स घ्यायचे, किती महिने सेवा द्यायची या सगळ्या गोष्टी आम्ही ठरवू. आमचा ग्राहक तुम्ही ठरवू शकत नाही.

आपल्या उद्योगाची तत्त्व, मूल्य आपण ठरवली पाहिजेत. त्या दिवसानंतर आमचे ग्राहक आम्हीच निवडतो, समोरची व्यक्ती प्रोफेशनल असेल तरच आम्ही करार करतो. म्हणून प्रथमेश म्हणतो, “आपला ग्राहक स्वत: निवडण्याचे सामर्थ्य तुमच्यात ठेवा. फक्त पैश्यासाठी काम करू नका.”

उद्योगात जसे ठरवतो तसेच घडेल असे होत नाही. नशीब, भौगोलिक गोष्टींची साथही मिळावी लागते. आजही सहा वर्षे झाली तरीही माझे भारतातील पेटंट माझ्या नावावर नाही. यासाठी सरकारी यंत्रणेतील संथपणा, संशोधनावरील उदासीनता या गोष्टी कारणीभूत आहेत. म्हणून मी हार मानलेली नाही. त्या व्यवसायाला बाजूला ठेवून मी नवीन संधी शोधली.

आपण जे करतो त्यात इतरांपेक्षा काहीतरी वेगळेपण असावे लागते तरच त्याकडे ग्राहक आकर्षित होतो. डिजिटल मार्केटिंग ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आम्ही ग्राहकाला प्रत्येक गोष्टीची माहिती देतो त्याचसोबत त्याला प्रशिक्षणही देत असतो.

आपण लहानपणी बघिलतलेल्या स्वप्नांचा आपण प्रत्यक्षात पाठपुरावा करता आणि ते करत असताना मिळणारे मानसिक समाधान आणि आनंद ही माझ्या उद्योजकीय जीवनातील सर्वात मोठी उपलब्धी आहे.

जगाच्या पाठीवर कोठेही असलो तरी मला माझे उद्योग चालवता आले पाहिजे आणि भारतातील उद्योजकांना आणि तरुणांना डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व पटवून त्यांना अधिकाधिक उद्योगात यश मिळवून देणे हे माझे ध्येय आहे. या पाच वर्षांत एक लाख उद्योजकांशी जोडले जाण्याचा प्रथमेशचा संकल्प आहे.

संपर्क : ९१३००४५३३३
Email: prathamk7@gmail.com

 

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?