उद्योजकतेच्या सुरुवातीला प्रत्येक नवोदित उद्योजकाला पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे व्यवसायाचं, ब्रँडचं नाव काय ठेवायचं? कारण हा एक असा निर्णय आहे ज्याच्या तुमच्या व्यवसायाच्या अस्तित्वावर, भविष्यावर आणि वाढीवर सर्वात जास्त परिणाम होणार असतो. त्यामुळे आपल्या व्यवसायचं किंवा ब्रँडचं नाव ठेवण्यापूर्वी खालील सात मुद्द्यांचा जरूर विचार करा.
१. ब्रँड आयडेंटिटीचा विचार करा : नावाचा विचार करताना ही गोष्ट लक्षात घ्या की आज तुम्ही जे नाव निवडता आहात उद्या तोच तुमचा ब्रँड म्हणून प्रस्थापित होणार आहे. तुमची ओळख होणार आहे. त्यामुळे तुमचे ध्येय, मूल्ये, संभाव्य ग्राहक आणि तुमच्या युनिक सेलिंग पॉईंटचा विचार करा आणि त्यानुसार नाव ठराव.
२. विचारमंथन : कागद, पेन घेऊन बसा. तुमच्या व्यवसायाशी संबंधित एक एक शब्द, त्याचा अर्थ, त्याला पर्यायी शब्द, इतर भाषेत त्याच्यासाठी असलेले पर्यायी शब्द असे कागदावर उतरवा.
एकेका शब्दाचा, त्याचा अर्थाचा आणि तो ब्रँड म्हणून तुमची कशी ओळख निर्माण करू शकतो याचा विचार करा. या विचारमंथनातून तुमच्या समोर काही नावं येतील, ज्यांचा तुम्ही ब्रँड नेम किंवा व्यवसायाचे नाव निश्चित करण्याचा निर्णय घेऊ शकता.
३. ट्रेडमार्क शोध घ्या : नावाचा पक्का विचार झाला की सर्वात प्रथम ट्रेडमार्क एजन्टची मदत घेऊन संभाव्य नावांपैकी कोणता ट्रेडमार्क होऊ शकतो हे पहा आणि सर्वात प्रथम ट्रेडमार्क रजिस्टर करून घ्या. त्यानंतरच त्यावर काम सुरू करा.
४. नाव मनावर कोरलं गेलं पाहिजे : व्यवसायाचं किंवा ब्रँड चं नाव असं असलं पाहिजे की जे समोरच्याच्या मनावर कोरलं गेलं पाहिजे. ब्रँड नेम सोपं आणि संस्मरणीय असावं.
५. नाव विश्वव्यापी असावं : ब्रँड नेम म्हणून संस्कृत किंवा अन्य प्राचीन शब्द ठेवण्याचा सध्या ट्रेंड आहे. तुम्ही नाव कोणत्याही भाषेत ठेवा, पण त्याचा अर्थ आणि मर्म जगाला पटवून देता आलं पाहिजे.
६. दीर्घकालीन विचार केलेलं असावं : नावात एखादी घटना, वर्ष, ठिकाण असं काही असेल तर त्याच्या विस्ताराला अडचण येऊ शकते. आजपासून शंभर वर्षानंतरसुद्धा त्याच ब्रँड नेमने व्यवसाय करता आला पाहिजे. जसे की टाटा, बिर्ला ही नाव आज शंभर वर्षांनंतरसुद्धा उद्योग क्षेत्रात ठामपणे उभी दिसतात.
७. विस्तारासाठी पूरक असावं : आज तुम्ही एखाद्या क्षेत्रात व्यवसाय सुरू करत असाल, पण भविष्यात त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात आपला विस्तार कराल तेव्हाही तुमच्या ब्रँडचे नाव समर्पक राहिले पाहिजे.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.