नोकरी सोडून उद्योग सुरू करण्यापूर्वी…

मराठा (मराठी बोलणारा तो मराठा) समाज हा पूर्वापार देशाची सेवा करत आलेला आहे. इतिहास साक्षी आहे की, देशप्रेमापोटी या मराठी बोलणार्‍या माणसाने भारतवर्षातील अनेक राज्यांबरोबर शत्रुत्व ओढवून घेतले, मग ते मुघल असोत वा राजपूत.

प्रसंगी मराठा ब्राह्मण समाजानेदेखील आपल्या तलवारीच्या जोरावर भारतवर्षावर आक्रमण करणार्‍या शक, हूण, अफगाणी, इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज या परकीयांबरोबर दोन हात केले. स्वातंत्र्यलढ्यात तर मराठी माणसाचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, आद्य समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, भारताच्या राज्यघटनेचे प्रणेते बाबासाहेब आंबेडकर इत्यादी अगणित नेते, अनंत साहित्यिक, गावस्कर, तेंडुलकर आदी खेळाडू यांनी महाराष्ट्रच नाही तर देशाचीही मान उंचावली आहे.

सांगायचा मुद्दा हा की, इतर क्षेत्रांत अनंत हिरे असणारा हा प्रदेश व्यापार, उद्योगादी क्षेत्रात थोडा मागे पडल्यासारखा जाणवतो; पण आताचा तरुण मराठा थोडा वेगळा विचार करणारा नक्कीच आहे. त्याचा कल स्वत:चा उद्योग अथवा व्यवसाय चालू करण्याचा आहे.

उद्योग क्षेत्रात आपली गाडी थोडी थांबायची अनेक कारणे आहेत, त्या कारणांचा ऊहापोह करण्याचा या लेखाचा उद्देश नसल्याकारणाने आपण सद्य:परिस्थिती कशी बदलता येईल याचा विचार करणे जास्त संयुक्तिक होईल. नोकरी सोडून स्वयंरोजगाराची वाट चाखण्यास उत्सुक आहेत असा मराठा तरुण सद्य:परिस्थितीत विरळाच असेल.

‘स्मार्ट उद्योजका’च्या शुभारंभ अंकातील माझा ‘एकट्या माणसाच्या कंपनीची गोष्ट – One Person Company’ हा लेख वाचून एका वाचकाचा फोन आला. त्या व्यक्तीला काही तरी धंदा/व्यवसाय करायचा होता आणि त्यासाठी त्याला ‘एकल व्यक्ती कंपनी’ स्थापण्यासाठी मार्गदर्शन हवे होते.

मी त्याला विचारले की, आपणास कोणता व्यवसाय करायचा आहे? त्यावर त्याचे उत्तर होते- आपण सांगाल तो व्यवसाय मी चालू करण्यास उत्सुक आहे. त्यानंतरही त्याचे मला बरेच फोन आले, पण मग मी त्या व्यक्तीस समजावले की,आपल्याला कंपनी स्थापन करण्यासाठी धंदा करायचा आहे, की बरकत आलेल्या व्यवसायास आणखी मोठे करण्यासाठी कंपनी स्थापन करायची आहे.

सांगायचा मुद्दा असा की, आपला चालू व्यवसाय अथवा धंदा हा जर आपणास अधिक वाढवायचा असेल तर आपण एकल व्यक्ती कंपनी, सीमित दायित्व भागीदारी संस्था, प्रायव्हेट अथवा पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करण्याचा विचार करा. ज्या कोणास नोकरीकरून व्यावसायिक होण्याची इच्छा असेल त्यांसाठी सर्वप्रथम नोकरदार व्यक्तींना मिळणारे फायदे बघू.

नोकरदार व्यक्तीचे मासिक उत्पन्न ठरावीक असल्यामुळे त्याच्या गरजा व त्यावरील खर्च सदर उत्पन्नावरच अवलंबून असते. उत्पन्न आणि खर्च यातील तफावत एक तर त्याची बचत असते वा त्यास कर्ज काढावे लागते. एकंदरीत उत्पन्नस्रोत असल्याकारणाने, उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालणे नोकरदार व्यक्तीस सहज शक्य असते.

तसेच नोकरीत मिळणारे काही फायदे (fringe benefits) जसे मेडिक्‍लेम, ग्रुप इन्शुरन्स, इ. हे जरी अदृश्य असले तरी ते आपल्याच पगारातून वळते केले जातात. पगार आणि इतर फायदे यांना एकत्रितरीत्या Cost To Company (CTC) असे म्हटले जाते. अर्थातच एकदा नोकरी सोडून उद्योगधंद्याची वाट चोखाळली तर खर्चाचा सर्व भार उद्योजकावर येतो.

नोकरी इतक्या फायद्याची असतानाही ज्यांना स्वत:चा व्यवसाय उभा करायची जिद्द असेल तर त्यांनी नोकरी सोडण्याआधी खालील गोष्टी कराव्यात :

  • आपल्या मासिक खर्चाची, बारीकसारीक गोष्टींसहित यादी करावी. साधारण एक वर्षाचा खर्च भागविता येईल इतकी शिल्‍लक आपल्या बँक खात्यामध्ये असावी. नवीन व्यवसायातून साधारण सहा ते बारा महिने काहीही फायदा होणार नाही याची मानसिक तयारी करावी.
  • आपण जो व्यवसाय वा धंदा करणार असाल त्याची इत्थंभूत माहिती जमा करावी.
  • स्थिर व खेळते भांडवल हाती असावे.
  • व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतंत्र ऑफिस आवश्यक नसेल तर घरातूनच व्यवसाय चालू करावा, पण लवकरात लवकर स्वत:चे ऑफिस घेण्याची जिद्द बाळगावी.
  • व्यवसायास आवश्यक असणारे मनुष्यबळ असावे.
  • आपल्या संपूर्ण कुटुंबाला आवश्यक असेल तेवढ्या किमतीचा मेडिक्‍लेम, जीवन विमा उतरवून घ्यावा.
  • स्वत:चा टर्म जीवन विमा उतरवून घ्यावा.

नोकरी सोडून जर आपण व्यावसायिक होण्याचा विचार करत असाल तर माझे एकच म्हणणे आहे, विचार उत्तम आहे, पण परत एकदा विचार करा. जर आपला विचार पक्का असेल, तर मग स्वत:ला कामात झोकून द्या, कारण नवीन व्यवसायाची ‘रसाळ गोमटी’ फळे चाखण्यात जी मजा आहे ती इतर कशातही नाही. फक्त लक्षात ठेवा, फळे जरूर मिळतील, पण वाट बघण्याची व काम करण्याची जिद्द हवी.

– राहुल सहस्रबुद्धे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?