वीर बिल्डकॉनच्या प्रीतम प्रकाश वीर यांनी वयाच्या २४व्या वर्षी उद्योगाचा श्रीगणेशा केलाय. उद्योगाची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, पण उद्योग करायचा हे ठरलं होतं. सिव्हिल इंजिनीअर असलेले प्रीतम नोकरी आणि व्यवसाय दोन्हीचा मेळ साधतायत. येत्या वर्षात नोकरी सोडून पूर्णपणे उद्योगात उतरण्याचा त्यांचा मानस आहे. इकोफ्रेंडली आणि लो बजेट हौसिंग सेवा पुरवणे हे भविष्यातील ध्येय आहे.
बांधकाम व्यवसायात उतरायचे तर या व्यवसायात कामाचा अनुभवही गाठीशी हवा, त्यामुळे उद्योगात उतरण्यापूर्वी त्यांनी नोकरी सुरू केली. आपल्याच क्षेत्रात आपल्याकडे काम करणारा मुलगा व्यावसायिक म्हणून उतरू इच्छितोय यासाठी त्यांच्या नोकरीच्या ठिकाणीही त्यांना विरोध झाला नाही. याउलट वेळोवेळी त्यांचा आधारच मिळतो. अरविंद भालेकर हे स्वतः बांधकाम व्यावसायिक आहेत. ते आपले गुरू आहेत, असे प्रीतम सांगतात. बांधकाम क्षेत्रात येणार्या आधुनिक गोष्टींचा अभ्यास करून भविष्यात स्वतःच्या उद्योगात त्याचा उपयोग करून घे, असा मोलाचा सल्लाही त्यांचे गुरू त्यांना देतात.
वीर बिल्डकॉन प्रोजेक्ट डिझाइन, प्लॅनिंग, कन्स्ट्रक्शन, फॅब्रिकेशन, कलर अश्या सेवा देते. त्याचसोबत शासनाचे बांधकामसंबंधित रस्ते, ग्रामपंचायती बांधकाम यासाठी निविदा भरते. ही कामसुद्धा केली जातात. याशिवाय बंगले, छोटी घरे बांधकाम, रंगकाम, जमीन खरेदीविक्री, बजेट होम्स अशा वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात. शिरवळ, भोर, पिंपरी, चिंचवड, पुणे, खंडाळा आदी ठिकाणी त्यांचे काम चालते. छोट्या एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात लघुउद्योग आहेत. इथे काम करणारा मध्यमवर्गीय आहे ज्यांना कमी बजेटमध्ये घरं हवीत. त्यांच्यासाठी प्रोजेक्ट करायचे ध्येय प्रीतम यांचे आहे. कमीत कमी खर्चात, परवडणारी आणि आधुनिक सुखसोयींनीयुक्त घरे ग्रामीण भागातील लोकांना कशी देता येतील यावरही काम चालू आहे.
सुरुवातीला माणसे मिळणे, त्यातही कुशल माणसे, भांडवल या समस्या खूप होत्या. या उद्योगात खेळते भांडवल अत्यावश्यक असते. काम करताना येणार्या समस्या वेगवेगळ्या असतात. अशा वेळी अनेक वेळा नैराश्य येतं, अडचणी येतात; पण त्याला न घाबरता मार्ग शोधणे आपल्याच हातात असते. एकदा एक प्रोजेक्ट करताना केलेल्या कामाचे पैसे वेळेत मिळाले नाहीत. अशा वेळी कामगारांचे पैसे, इतर खर्च मॅनेज करणं कठीण होतं; पण मी कधीही त्यांचे पैसे मागे ठेवले नाहीत. वेळच्या वेळी त्यांना पैसे देतो म्हणजे ते आपल्या सोबत कोणत्याही वेळी काम करायला तयार असतात.
प्रीतम सांगतात, एक मोठा प्रोजेक्ट हातात आला; पण माझ्याकडे पुरेसे भांडवल नव्हते अशा वेळी मी माघार घेतली नाही. माझ्या माहितीत एक सप्लायर होते. मी त्यांना माझी अडचण सांगितली. काम सुरू झाल्यावर पैसे आले की, लगेच तुमचे पैसे देईन, असे त्यांना विश्वासात घेऊन सांगितले. त्यांनीही माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला माल पुरवला. मीसुद्धा माझ्या या शब्दाला जागलो आणि त्यांचे पैसे सांगितल्याप्रमाणे परत केले. सांगायचा मुद्दा एवढाच, की परिस्थिती हाताळता आली पाहिजे. कुटुंबसुद्धा सुरुवातीला साशंक होते; पण मी रोज त्यांच्याशी बोलायचो कामाचे अनुभव सांगायचो. यातून माझ्या निर्णयावर त्यांचा विश्वास पक्का झाला.
प्रवासाची आवड असणारे प्रीतम वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर तिथल्या नवीन प्रोजेक्ट पाहणे, नवीन बांधकामातले बारकावे अभ्यासणे यात रमतात. त्यांच्या उद्योगात याचा फायदाच होतो. याशिवाय वाचन सतत प्रेरणा देते. या आवडी उद्योगालाही बळ देतात.
सणांच्या मुहूर्तावर अनेक प्रोजेक्टची कामे मिळाली होती; पण लॉकडाऊन झाले आणि सारी कामं ठप्प झाली. काम बंद असल्यामुळे माणसे मिळणे कठीण. या सगळ्याचा व्यवसायावर नक्कीच परिणाम झाला; पण हळूहळू पुन्हा कामाला सुरुवात केली. लॉकडाऊनचा विपरीत परिणाम झाला; पण नव्या संधीही तयार झाल्या. अनेकांना स्वतंत्र वेगळं घर घेण्याच्या गरजा वाटू लागल्या. त्यामुळे आज जरी मार्केटमध्ये मंदी असली; तरी येत्या दोन वर्षांत बांधकाम व्यवसायात पुन्हा एकदा संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, हा विश्वास प्रीतम यांना आहे.
संपर्क : प्रीतम वीर – ९७६३०८०७६६
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia