'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची मुलाखत प्रसिद्ध करायची असल्यास, या लिंकवर क्लिक करा 👉 https://wa.link/p11pqe
दगडावर छन्नी हातोड्याचे घाव बसले की त्यालाही आकार प्राप्त होतो. तो घाव घालणारा त्याच्या विचाराने, कलेने दगडालाही एक मूर्त रूप देतो. अगदी मुलेही अशीच असतात त्यांना विद्यार्थीदशेत योग्य दिशा, मार्ग दाखवून घडवायला एका शिल्पकाराची गरज असते. प्रियांका गजानन गोरे ही उद्योजिका म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील शिल्पकारच जणू. ‘गोरे सर एज्युकेशन अकॅडमी’च्या त्या संचालिका आहेत. त्यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.
मूळ सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील गोरे कुटुंब हे शिक्षण क्षेत्राची पार्श्वभूमी असलेले कुटुंब आहे. गजानन गोरे यांच्या आजी भाग शिक्षण विस्तार अधिकारी तर आजोबा वरिष्ठ मुख्याध्यापक अशी पार्श्वभूमी असलेल्या गजानन गोरे यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि प्रियांका गोरे कुटुंबात दाखल झाल्या.
प्रियांका यांचे पती गजानन गोरे हे बारा वर्षे जाहिरात क्षेत्रात कार्यरत होते, परंतु त्यांच्या आजीची ईच्छा होती की त्यांनी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करावे. हीच ईच्छा पूर्ण करण्यासाठी अभ्यास करून गजानन यांनी शिक्षण क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.
अर्थार्जन व परमार्थ एकाच ठिकाणी याच क्षेत्रात मिळेल हे मनाला पटले मग सैनिक स्कूल, राष्ट्रीय मिलटरी स्कूल, जवाहर नवोदय विद्यालय आणि अन्य स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे त्यांनी ठरवले. शालेय विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षांसाठी घडवण्याचा त्यांनी जणू वसा घेतला. लग्नानंतर प्रियांकासुद्धा या कार्यात उतरल्या. स्पर्धकांच्या अडचणी व व्यवसायातील चढउतार या प्रवासात आले, पण न डगमगता मागील चार वर्षापासून त्या एकहाती अकॅडमी चालवतायत.
गोरे सर एज्युकेशन अकॅडमी ही तळेगाव दाभाडे येथे कार्यरत आहे. अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे निवासी, ऑफलाईन, ऑनलाईन अशा प्रकारे विद्यार्थी घडवले जातात. सध्या दीडशे विद्यार्थी निवाससाठी आणि ऑनलाईनसाठी दोनशेहून अधिक विद्यार्थी आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून व काही ऍडमिशन हे महाराष्ट्राबाहेरून म्हणजे सुरत बेळगाव गुजरात येथूनसुद्धा येतात.
सैन्य दलामध्ये अधिकारी होऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी आता एक हमखास पर्याय निर्माण झाला आहे. सैन्यात अधिकारी होऊन यशाची उत्तुंग शिखरे गाठायची असतील तर तुमच्या पुढे आता यशाचा राजमार्ग दाखवणारी वाट तयार झाली आहे ती म्हणजे ‘गोरे सर एज्युकेशन अकॅडमी’.
प्रियांका यांच्याशी बोलण्यातून हा संपूर्ण प्रवास उलगडत गेला. अकॅडमी कशी काम करते? या परीक्षा प्रक्रिया कशा असतात? कितवीचे विद्यार्थी या परीक्षा देऊ शकतात? अॅडमिशन कसे घेता येते? या आणि यासारख्या अनेक प्रश्नांची विस्तृत माहिती त्यांनी आपल्याला दिली.
जो विद्यार्थी सैनिक स्कूलची तयारी करतो तो राष्ट्रीय मिलिटरी स्कुल, नवोदय विद्यालयची आणि इतर शालेय स्पर्धा परीक्षा पण देऊ शकतो. त्याबरोबरच ऑलंपियाड, प्रज्ञा शोध, एमटीएस, बीडीएस, मंथन यासारख्या जितक्या खासगी परीक्षा होतात त्या विद्यार्थी देऊ शकतात. म्हणजे एक अभ्यासक्रम अभ्यासला तरी बाकीच्या या सगळ्या परीक्षेची तयारी होते. शिवाय स्कॉलरशिपसाठी व्याकरण हा महत्त्वाचा भाग असतो तो इथे वेगळा शिकवला जातो.
सैनिक शाळा, आरएमएस, नवोदयसारख्या स्पर्धा परीक्षा यात मुलांना चौथी आणि आठवीमध्ये स्पर्धा परीक्षा देता येते. चौथी ते पाचवीचे विद्यार्थी सहावीच्या परीक्षेसाठी पात्र असतात. तर सातवी आणि आठवीचे विद्यार्थी नववीच्या परीक्षेसाठी पात्र असतात. सैनिक शाळेच्या मुलांसाठी इथे विशेष लक्ष दिले जाते व त्या अनुषंगाने तयारी करून घेतली जाते. दहा ते बारा वर्षे वयोमर्यादा ही सहावीच्या मुलांसाठी आणि तेरा ते पंधरा वर्ष नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

गोरे सर एज्युकेशन अकॅडमीमध्ये पालक व विद्यार्थी यांच्याशी चर्चा करून अॅडमिशन घेतली जाते. निवासी वर्ग दरवर्षी मार्च महिन्यात सुरू होतात. दरवर्षी सैनिक शाळेची परीक्षा ही जानेवारीमध्ये असते त्यामुळे वार्षिक परीक्षा देण्यासाठी मुले शाळेत हजर राहू शकतात. या अकरा महिन्याच्या कालावधीत विद्यार्थ्यांना एकही सुट्टी नसते.
विद्यार्थ्याचे पहाटे साडेपाच वाजता वेळापत्रक सुरू होते. मग योगा, व्यायाम, राहणे-खाणे, अभ्यास, विविध सामान्य ज्ञानविषयक लेक्चर्स, मेडिटेशन अशा विविध गोष्टी घेतल्या जातात. मुलांनी केवळ परीक्षा पास करून चालत नाही तर त्यांची शारीरिक तपासणीसुद्धा होते. यासाठीही त्यांना मुलांवर सातत्याने मेहनत घेऊन त्यांना घडवावे लागते.
गोरे सर एज्युकेशन अकॅडमीचा संपूर्ण कॅम्पस हा एक एकरमध्ये आहे. त्यामध्ये दोन बिल्डिंग आहेत त्या निवासी आहेत. त्याच्या बाजूला ऑफिस आहे आणि त्याच्यासमोर मैदान आहे. या अकॅडमीची शिकवण्याची पद्धत जरा वेगळी आहे. संपूर्ण गोरे कुटुंब या अकॅडमीमध्ये सहभागी आहे. यांचे कुटुंब कॅम्पसमध्येच राहायला आहे. त्यामुळे एक कौटुंबिक वातावरण आहे त्यामुळे प्रत्येकाचे मुलांकडे वैयक्तिक लक्ष तर राहतच शिवाय मुलांनाही एकटेपणा वाटत नाही.
प्रत्येक उद्योजक असायलाच हवा 'स्मार्ट उद्योजक - प्राईम मेंबर'!
गोरे कुटुंब एकत्रित काम करते. मुले आपल्याच घरातील आहेत असा सांभाळ ते करतात, हेच या अकॅडमीचे वेगळेपण आहे. अकॅडमीमध्ये साऊंड सिस्टिम आहे त्यामुळे शिक्षणाशी संबंधित जनरल नॉलेज विषयाचे ऑडिओ सतत चालू असतात. मुलांच्या कानावर सतत ते पडत राहते आणि त्यांच्या ते लक्षात राहायला मदत होते.
एकूण पंचवीस लोकांचा स्टाफ कार्यरत आहे. प्रत्येक विषयाला दोन शिक्षक. मराठी माध्यमातून सैनिक शाळेची परीक्षा देता येते. सहावीसाठी चार विषय आहेत तर नववीसाठी पाच विषय आहेत. भारतात पाच राष्ट्रीय मिलिटरी शाळा आहेत. तळेगावच्या कॅम्पसमधून दरवर्षी तिथे दोन मुले जातातच.
तो एक त्यांचा इतिहास बनत चाललेला आहे. बाकीच्या बर्याच अकॅडमी आहेत, पण त्यांच्याकडून कधीच आरएमएसला मुलं जात नाहीत ती गोरे सर अकॅडमीमधून जातात. विद्यार्थ्यांची मानसिकता बदलणे हे सगळ्यात जास्त चॅलेंजिंग असते. या कॅम्पसमध्ये कोणालाही मोबाईल वापरता येत नाही.
मुलांना स्क्रीनवर मुव्हीज दाखवतो तेच त्यांच्यासाठी काय ते मनोरंजन असते. तसेच इथे जे सेशन होतात त्यामुळे मुलांवर संस्कार होतात व इतका बदल होतो की मुलं घरी गेल्यानंतरसुद्धा मोबाईल वापरत नाहीत. दरवर्षी भारतातून दीड लाख मुलं परीक्षेला बसतात अंदाजे साडेतीन ते चार हजार जागा असतात. त्यामुळे मुलांवर अपार मेहनत घ्यावी लागते. त्यातूनच चांगला रिझल्ट मिळतो.
दरवर्षी दोन मुले राष्ट्रीय मिलिटरी स्कुलमध्ये जातातच म्हणूनच आज गोरे अकॅडमीची या वर्षीही दोन मुलं राष्ट्रीय स्कुलसाठी निवडली आहेत तर मागील वर्षी ४६ मुलं सैनिक स्कुल आणि पाच मुलं ही नवोदयमध्ये गेली आहेत. मुलांची संख्या बघता हा रिझल्ट दरवर्षी अफलातून लागतो.
आपल्या कौटुंबिक जबाबदार्या सांभाळत प्रियांका आज संपूर्ण अकॅडमी एकहाती सांभाळतात. हे काम नक्कीच सोपे नाही, पण जिद्दीने स्टाफ, पालक आणि कुटुंबाला सोबत घेऊन रोजच्या आव्हानांना सामोरे जात त्यांचा हा प्रवास चालू आहे. ज्यांना निवासी, ऑफलाईन वर्ग करणे शक्य नाही ते ऑनलाईन वर्गसुद्धा करू शकतात.
मुलांच्या सोई पाहून, शाळेच्या वेळा पाहून वेळ ठरवली जाते. खरे तर अल्पावधीत गोरे सर अकॅडमीला सैनिक स्कुल आणि राष्ट्रीय सैनिक स्कुलसाठी भरपूर प्रतिसाद मिळत आहे. अकॅडमीमध्ये घरातील वातावरण आहे त्यामुळेच जाहिरातीची आजपर्यंत गरज भासली नाही. जवळपास ६० ते ७० टक्के अॅडमिशन अगोदरच्या पालकांच्या शिफारशीतूनच पूर्ण होतात.
संपर्क : 7387518100

