समस्येवर उपाय शोधणाराच यशस्वी होतो


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


समस्येवर तक्रार करणारे हे नेहमीच अपयशी असतात, पण यातीलच एखादा तक्रार करण्यापेक्षा समस्येवर उपाय शोधतो, त्यावर अंमल करतो आणि स्वत:ची प्रगती साधतो आणि त्याचे मोठेपण पाहून हे तक्रारकर्ते त्याचा तिरस्कार करायला लागतात. कारण आपण यशस्वी होऊ शकत नाही हे त्यांना माहीत असते आणि दुसरा यशस्वी झालेला त्यांना बघवत नसतो.

तो आपल्यातूनच पुढे गेलाय हे त्यांच्या लक्षातही येत नाही, अशा मोठ्या लोकांचा आदर्श घ्यायला सांगाव तर त्याची प्रगती हे नशिबाचा भाग आहे, असे सांगून ते झिडकारतात, त्यांचे उदाहरण द्यायला जावे तर आम्हाला शिकवू नका आम्ही वर्षानुवर्षे हेच केलंय एवढीच कॅसेट वाजवतात, काही नवीन सांगायला जावं तर भाषेची पातळी सोडतात, काही सल्ला द्यावा तर तुमची अक्कल काढतात.

आमची समस्या ही दुसर्‍याची देण आहे, अशा अविर्भावात जगतात, पण समस्या सोडवण्यासाठी काडीचाही प्रयत्न करत नाहीत. हे तक्रारकर्ते नेहमीच अपयशी ठरतात आणि आपल्या अपयशासाठी ज्यांनी समस्येवर उपाय शोधून आपली प्रगती साधली आहे अशांना जबाबदार धरतात. अशा समस्यांना उद्योजकांना नेहमीच सामोरे जावे लागते.

हे उद्योजक आपल्यातलेच आहेत, कष्ट करून मोठे झालेत याच्याशी या तक्रारकर्त्यांना काहीही देणे घेणे नसते, उद्योजक आपल्यापेक्षा श्रीमंत होतात, ही खंत या लोकांना असते, पण उद्योजक हे स्वत:च्या हिमतीवर मोठे झालेले असतात हे तक्रारकर्ते विसरतात; किंबहुना त्यांना ते पाहायचेच नसते.

मग या उद्योजकांची संपत्ती जप्त करून आमच्यात वाटप करा असली हाकाटी पिटतात, पण ही संपत्ती जप्त करण्यापेक्षा तुम्ही स्वत: मैदानात उतरा म्हटलं तर त्याला लगेच गरिबांचा द्वेष ठरवून मोकळे होतात. आमच्या अंगावर काहीही आले नाही पाहिजे, आम्ही गरीब आहोत म्हणजे देश आम्हीच चालवतो असा यांचा अविर्भाव असतो.

उद्योजक आहेत म्हणून देशाची तिजोरी भरते, हे यांच्या गावीही नसते. देशांतर्गत असो किंवा देशाबाहेर येणार जाणारा प्रत्येक माल हा उद्योजकाच्या कंपनीतून आलेला असतो. घरातील टाचणीपासून प्रत्येक गोष्ट उद्योजकाची देण असते, देशाला मिळणार सर्वात जास्त कर हा उद्योजकांमुळे मिळत असतो. जगभरात मिळणार्‍या 99.99 टक्के गोष्टी या एखाद्या कंपनीतूनच आलेल्या आहेत. जगभरात नोकर्‍या देणारे सर्वात मोठे माध्यम या कंपन्याच आहेत.

कंपन्याच नसतील तर नोकर्‍या निर्माण होणार कशा? चीनने एके काळी सगळं काही सरकारच्या ताब्यात घेतलं होतंच की! काय झालं? चीन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आला होता. सगळं काही जप्त करा म्हणणारा चीनसुद्धा कंपन्यांशिवाय जगू शकला नाही. त्यालासुद्धा उद्योजकांना प्रोत्साहन द्यावेच लागले. उद्योजक आहेत म्हणून चीनसारखा देश आज उभा आहे.

आपल्याकडे उद्योजकांचा तिरस्कार करण्याची एक नवीच टूम मार्केटमध्ये आलेली आहे. एखादा श्रीमंत दिसला की त्याच्यावर लगेच भ्रष्टाचाराचा, लुटारूचा शिक्का मारून मोकळे व्हायचे! अशांनी एखादा घरगुती व्यवसाय सुरू करून दाखवावा. आठ दिवसात अक्कल ठिकाण्यावर येईल.

उद्योजक हे काही नोकरदारांसारखे निवांत ऑफिसमध्ये बसून काम करत नाहीत. प्रचंड मेहनत करतात. दिवस-दिवस ग्राहकाच्या शोधात फिरतात. ग्राहकाकडून चांगली ऑर्डर येण्यासाठी त्यांचे चोचले पुरवतात. कधी कधी पहिली तीन-चार वर्षं तर उद्योजक त्याचा कामगाराच्या पगाराएवढंसुद्धा कमवत नसतो. गरिबीतून उद्योगविश्व निर्माण केलेल्यांची कथा तर सांगायलाच नको.

१०-१२-१५-२० तास उद्योजक आपल्या कंपन्यात काम करतात. इथे लेबर साडेपाच वाजायला लागले की दहा मिनिटे आधीच उठायला सुरुवात करतात, पण कंपनी मालकाला ती सोय नसते, जोपर्यंत सगळे काम संपत नाही तोपर्यंत त्याला सुट्टी घेता येत नाही, कधीकधी स्वत: लेबर बनून काम करावं लागतं.

पेमेंट वसूल करण्यासाठी चकरा मारायच्या, कर्जाचे हफ्ते थकू द्यायचे नाही, कर्मचार्‍यांचे पेमेंट थांबवू शकत नाही, प्रत्येक महिन्याचे प्रोडक्शन संपलेच पाहिजे, यात अडचणीच्या काळात घराकडे लक्ष देता येत नाही, काही वेळेस पैशाची कमतरता इतकी असते घरच्यांच्या गरजासुद्धा पुर्‍या करता येत नाही; या सगळ्या दिव्यातून जाऊन जर आमचा उद्योजक श्रीमंत होत असेल तर तो त्याचा हक्क आहे.

श्रीमंत होणे हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि उद्योजकाचा तर आहेच आहे. कुणाला अशा उद्योजकांचा त्यांच्या समृद्धीमुळे तिरस्कार वाटत असेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे उद्योजकांचा नाही. अशांनी एकदा उद्योजक व्हायचा प्रयत्न करून पाहावं मग उद्योजकांबद्दल बोलावं.

हा वर्ग सगळं सहन करतो. राजकारण्यांचे हफ्ते देतो, सरकारी अधिकार्‍यांचे हफ्ते देतो, लेबर कॉन्ट्रॅक्टरची दहशत सहन करतो, लेबरचा माज सहन करतो, घरून साथ नसेल तर ते टेन्शन वेगळेच, वर्गण्या, देणग्या.. कुणाकुणाचे चोचले पुरवावेत? एवढं सगळं करूनही उद्योजकच गुन्हेगार?

आपल्या घरातली एक न एक गोष्ट उद्योजकांमुळे आहे. आपली प्रत्येक प्रगती उद्योजकांमुळे आहे. इथल्या ९० टक्के नोकर्‍यासुद्धा उद्योजकांमुळेच आहेत.

उद्योजक हा हत्तीसारखा असतो, तो त्याच्या कामात व्यस्त असतो. आसपास काय चाललंय, कोण काय म्हणतंय याच्याशी त्याला काहीही देणं घेणं नसत. तो कुठेही कधीही स्वतःला सामावून घेऊ शकतो. तक्रारकर्ते तक्रार करत राहतील त्यांच्यातीलच काही शहाणे उद्योजक बनत राहतील. जो समस्येवर उपाय शोधतो तोच यशस्वी होतो.

– डॉ. संतोष कामेरकर
संपर्क : 7303445454

Author

  • डॉ. संतोष कामेरकर

    डॉ. संतोष कामेरकर हे एक प्रतिथयश उद्योजक, प्रसिद्ध वक्ते व प्रशिक्षक आहेत. त्यांनी स्वतःला शून्यातून उभं करून आज करोडोंमध्ये पोहोचले आहेत. त्यांचा हा प्रवास अनेक नाउमेद तरुणांना प्रेरणा देणारा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?