निर्यात व्यवसायातील “नफा”


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आयात निर्यात व्यवसाय लेखमालेच्या या भागात आपण निर्यात व्यवसायातील एकंदर नफ्याचे प्रमाण याबद्दल जाणून घेऊ; कारण होणार्‍या नफ्याचा थेट संबंध हा जरी प्रत्यक्षपणे संस्थेच्या आर्थिक ताळेबंदाशी निगडीत असला तरी अप्रत्यक्षपणे ती संस्था कार्यरत असलेल्या उद्योगावर (Industry Sector) आणि पर्यायाने राष्ट्राच्या एकंदर अर्थकारणावर आंशिकदृष्ट्या परिणाम करत असतो.

नफा : (Profit)

व्यवसाय मग तो कोणताही असो; देशांतर्गत अथवा आंतरराष्ट्रीय.. तो सुरू करण्यामागचा एकमेव उद्देशच मुळात असतो तो नफा… “नफा (Profit)” म्हणजेच सोप्या भाषेत, ” एखाद्या उत्पादन अथवा सेवेच्या विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नातून सर्व खर्च तसेच कर वजा जाता उरलेली शिल्लक”.

प्रत्येक व्यवसायाचा मग तो लहान असो वा मोठा, मुख्य आधारस्तंभ असतो तो म्हणजे त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ग्राहकवर्ग आणि त्या सर्वांचे संस्थेमार्फत एकूण उपलब्ध केलेल्या उत्पादनखरेदी मधील एकंदर योगदान यावरून त्या संथेच्या नफ्याचे एकूण प्रमाण ठरत असते. परंतु, या नफ्याच्या प्रमाणाची टक्केवारी मात्र बहुतांशी बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा यातील समन्वय आणि एकंदरीत स्पर्धात्मकतेवरून ठरते.

निर्यात व्यवसाय आणि नफ्याचे प्रमाण :

आंतरराष्ट्रीय व्यापार हा व्यवसायाचा सर्वोच्च स्तर आहे. येथे विक्रेता हा निर्यातदार असून ग्राहक हा परदेशस्थ आयातदार असतो. येथे व्यवसाय हा महत्तम पातळीवर केला जात असल्याने उलाढाल होणार्‍या उत्पादनाची मागणी तसेच पुरवठा याचेही प्रमाण (Quantity) प्रचंड असेच असते; कारण येथे विचार एकंदरीत देशाच्या मागणीचा केला जातो.

विदेश व्यापारामध्ये नफ्याचे प्रमाण हे व्यवसायाच्या स्वरूपानुसार ठरत असते; कारण काही निर्यातदार हे थेट वस्तूंमध्ये (Commodity) तर काही उत्पादनांमध्ये (Products) व्यापार करण्यास प्राधान्य देतात. यासाठी आधी आपल्याला वस्तू आणि उत्पादन यातील मूलभूत फरक समजून घेतला पाहिजे.

निर्यात व्यवसायाच्या दृष्टीने, वस्तू म्हणजे उत्पादकामार्फत यथायोग्य प्रक्रियेअंती उत्पादित केलेली निर्यातक्षम गोष्ट. त्याचप्रमाणे उत्पादन म्हणजे उत्पादित निर्यातक्षम वस्तूला सुवेष्टित ( Well – Packaged ) करून संबंधित संस्थेच्या लेबल, लोगो व ट्रेडमार्कने व्यापारी दृष्ट्या मुद्रांकित (Branding) केल्यावर वस्तूचे उत्पादनात रूपांतरण होते.

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर वस्तू या Unbranded असतात तर सर्व उत्पादने ही Branded या श्रेणीत येतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत “वस्तू”ची उलाढाल ही प्रचंड घाऊक प्रमाणात होते. तसेच स्थायू वस्तूचे मोजमाप टन / मेट्रिकटन या एककात होते. उत्पादनाची उलाढाल ही नगावर होते. तसेच उत्पादनाचे मोजमाप हे त्या उत्पादनाच्या नगाच्या संख्येवर होते तसेच काहीवेळा मागणीनुसार त्या नगाच्या वजनाच्या एककातही केली जाते.

नफा प्रमाणाच्या टक्केवारीचा (Profit Margin) एकंदरीत विचार करता, उलाढाल होणार्‍या वस्तूचे प्रमाण प्रचंड घाऊक असल्याने येथे निर्यातदारास दर वस्तूमागील नफ्याची टक्केवारी (Profit Margin) तुलनेने कमी ठेवणे आवश्यक ठरते; परंतु येथे वस्तूचे प्रमाण (Quantity) प्रचंड असल्याने एकूण व्यवहारातील नफ्याचे प्रमाण उत्तम असते.

उत्पादनाच्या व्यवहाराबाबतीत परिस्थिती अगदी याच्या विरूद्ध आहे. उत्पादनाची उलाढाल ही नगावर होत असल्याने प्रत्येक नगामागील नफ्याची टक्केवारी ही तुलनने अधिक असते. कारण उत्पादन हे Branded असल्याने त्याचे बाजारमूल्य हे नैसर्गिकरीत्या वाढते आणि निर्यात व्यवसायही त्याला अपवाद नाही.

काही अवजड उद्योगातील उत्पादन म्हणजे मोठाल्या यंत्रसामुग्री असतात; त्यांची निर्यात एका वेळेस एक यंत्र अशाप्रकारे होते. अशा वेळी प्रत्येक उत्पादनामागील नफ्याचे प्रमाण (Profit Margin) भरघोस असू शकते.

होतकरू निर्यातदाराने आपल्या व्यवसायाचा, स्वरूपाचा, परदेशी बाजारपेठेचा, ग्राहकांच्या मानसिकतेचा, आणि स्वत:च्या क्षमतांचा सर्वंकष अभ्यास करून निर्यात करणे आवश्यक ठरते. अघोरी नफेखोरीची लालसा न करता उत्तम व्यावसायिकता जपून जास्तीत जास्त समर्पित ग्राहकवर्ग कसा आकर्षित करता येईल हे ध्येय ठेवणे सर्वदृष्टीने हितकारक आहे.

– सौरभ दर्शने
निर्यातदार व विदेश व्यापार सल्लागार, मुंबई
संपर्क : ८१०४० ५५४८९

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?