Advertisement
संकीर्ण

मन विश्लेषणासाठी प्रश्न

गेल्या काही लेखांत आपण मनाची जाणीव, मनाची कार्ये, भावनांवर नियंत्रण असे विविध विषय अभ्यासले. ध्येय ठरवण्यासाठी, आराखडा आखण्यासाठी, आत्मविश्वास व कल्पनाशक्तीचा वापर कसा करावा, त्याचाही आपण विचार केला. आता पुढे अजूनही काही विषयांना आपण अभ्यासणार आहोत; पण पुढे जाण्याआधी, पूर्वीच्या झालेल्या विषयात आपण मनावर काही संस्कार किंवा विचार करण्याच्या पद्धतीत बदल करू शकलो का, ते तपासणे गरजेचे आहे, कारण नुसती एखादी गोष्ट वाचून व समजून उपयोगी नाही, ती आचरणातही आणली जावी लागते.

मनातील बदल अदृश्य असून, प्रामाणिकपणे व योग्य हेतूने स्वत:हून केल्यासच ते बदल घडू शकतात. अदृश्य बदल सदृश्य परिस्थितीत बदल घडवून आणत असतात. म्हणून, बाह्य परिस्थितीत बदल घडून तो सर्वांना दिसण्याआधी, मानसिक अवस्था व सवयीतील बदल स्वत:च्याच लक्षात येतो, किंबहुना तो आपणच स्वत:ला पटवून घेऊन केलेला असतो. तो बदल झाला की नाही हे आता तपासायचे आहे. त्यासाठी, आपण अभ्यासलेल्या, साधारण प्रत्येक विषयाच्या प्रश्नांची यादी दिली आहे. हे प्रश्न स्वत:ला विचारून त्याबाबत आपण काय विचार करतो, तो आपल्या हिताचा आहे का, असे विश्‍लेषण करायचे आहे. प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे स्वत:लाच द्यायची आहेत, ती कोणाला सांगायची गरज नाही, कारण आपल्या जीवनात घडणार्‍या घटनांना आपणच जबाबदार आहोत व आपण आवश्यक मानसिक सवयी बदलल्या नसतील तर अपेक्षित प्रगती झालेलीही दिसणार नाही.


मनाची मशागत करून त्यात उद्योजकीय संस्काराचे बीज पेरणारे नितीन साळकर यांचे 'उद्योजकीय मानसिकता' हे सदर वाचा 'स्मार्ट उद्योजक' मासिकात. मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://goo.gl/D3CmYr (Advt)

Smart Udyojak | e-Magazines | All Issues

मन आणि त्याची कार्ये

 • तुमचे मन शरीराहून वेगळे आहे, हे तुम्हाला कळले का?
 • तुम्ही मनात आणल्याशिवाय काहीही करू शकत नाही, करत नाही, हे अनुभवले का?
 • सकाळी उठल्यापासून दिवसभर किती व कोणते विचार करता याचे निरीक्षण केलेत का?
 • काय उपयोग होतो त्या विचारांचा?
 • कोठून व कसे विचार येतात मनात?
 • तुमच्या कोणत्या सवयी तुमच्या मनात घट्ट बसल्यात?
 • विचार, कल्पना, नियोजन, भावना, माहिती संकलन ही मनाची कार्ये तुम्हाला स्पष्ट झाली का?
 • मनावर नियंत्रण ही यशस्वी जीवनाची पहिली पायरी आहे, असे तुम्हाला वाटते का? त्यासाठी तुम्ही काय करता?

ध्येय व आराखडा

 • तुमचं आयुष्याचं, १०, ५, १ वर्षाचं ध्येय ठरवलंत का?
 • तुम्हाला काय करायला आवडेल, तुमचा छंद काय, हे शोधून काढलंत का? ते तुम्हाला का हवंय?
 • तुमच्या ध्येयाचं परिमाण काय? कसं मोजणार तुम्ही ते?
 • ध्येयाचा निश्चितपणा कशात आहे? तारीख, आकडा, रक्कम, भौतिक अवस्था, यश, नाव, नैपुण्य-कुशलता
 • आवश्यक साधने, वस्तू, माणसे यांची यादी केलीत का?
 • SWOT विश्लेषण केलंत का?
 • पुढील कालावधीचा ध्येयाचा महिनावार आराखडा तयार केलात का?
 • मध्ये येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी कोणते उपाय योजणार? त्यावर मात कशी करणार?

भावनांवर नियंत्रण

 • तुमच्या सकारात्मक व नकारात्मक भावना तुम्हाला ओळखता येतात का?
 • सकारात्मक भावना निर्माण होण्याची कारणे कोणती?
 • नकारात्मक भावना निर्माण होण्याची कारणे कोणती?
 • म्ही कृतज्ञता अमलात आणलीत का?
 • तुम्ही दुसर्‍याला माफ करू शकता का?
 • तुम्ही तुमच्या चुकींची माफी मागितलीत का?
 • भावनांच्या खेळात तुमचं ध्येयावरचं लक्ष कमी होत नाही ना?
 • तुमची मानसिक शक्ती नको तिथे खर्च होत नाही ना?

आत्मविश्वास व कल्पनाशक्ती

 • तुमचा तुमच्या ध्येयावर पूर्ण विश्वास आहे?
 • दुसर्‍याच्या बोलण्याचा तुम्ही तारतम्याने विचार करता का?
 • अडचणी आल्या म्हणून तुम्ही ध्येयाच्या वाटेवरून मागे फिरण्याचा विचार करता का?
 • तुमची प्रेरणा कोणती? तुमचा उत्साह कशाने वाढवता?
 • साधनांच्या वापरात तुम्ही कल्पकता कशी वापरता?
 • संभाषणात कल्पकता कशी वापरता?
 • तुमच्या उत्पादनाच्या प्रसारासाठी कल्पनाशक्तीचा वापर कसा करता?
 • समस्या सोडवण्यासाठी तर्क व कल्पना कशा निर्माण करता?

वरील प्रश्नांची सरळ सोपी उत्तरे नसतीलही, पण प्रश्न पुन्हा विचारल्यास, आवश्यक काल्पनिक परिस्थिती समोर उभी केल्यास, आपण कसा विचार करतो, त्याचा अंदाज बांधता येईल व त्यावरून स्वत:च्या विचारांचे, व्यक्तिमत्त्वाचे, स्वभावाचे मूल्यांकन करता येईल. तुमच्या जवळील व्यक्तींची, मित्राची किंवा सहकार्‍याची मदतही तुम्ही घेऊ शकता.

गरज वाटल्यास प्रश्नांची उत्तरे लिहून काढा, पुन: पुन्हा विचारा, तपासून पाहा. आवश्यक वाटेल व पटेल तिथे विचार करण्याची पद्धत बदला. कोणतीही मदत किंवा सल्ला हवा असल्यास मला ssscons@gmail.com किंवा ९८२०३४४७२५ वर whatsapp करा.

मग, करा सुरुवात व बसा स्वत:च्याच परीक्षेला.

– सतीश रानडे
९८२०३४४७२५
sssdadar@gmail.com


Subscribe ‘Smart Udyojak’ Magazine

Optimization WordPress Plugins & Solutions by W3 EDGE
Help-Desk
%d bloggers like this: