दोन मराठी भावंडांनी उभ्या केलेल्या ‘Quickheal’ ची यशोगाथा
प्रगतिशील उद्योग

दोन मराठी भावंडांनी उभ्या केलेल्या ‘Quickheal’ ची यशोगाथा

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


कुठे जन्माला यावे हे कोणाच्याच हाती नसते; परंतु जन्मल्यानंतर जर परिस्थिती प्रतिकूल असेल तर तिला अनुकूल करणे मात्र आपल्याच हाती असते एवढे मात्र नक्की. ‘क्विक हील’चे संस्थापक कैलास काटकर आणि संजय काटकर या दोन भावांची यशस्वी उद्योजकीय प्रवासाची गोष्ट खूपच प्रेरणादायी आहे.

पुण्याच्या एका चाळीतून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास आज एक नावाजलेला ब्रँड बनून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वतःचे भक्कम पाय रोवून उभा आहे. अनेक चढउतारांसोबतच मार्गात आलेल्या प्रत्येक अडचणीला लीलया पार करत दोन भावांनी आज हे साम्राज्य उभारले आहे. त्यांची ही गोष्ट प्रत्येक नवोद्योजकाला प्रेरणा देणारी आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले कैलास आणि संजय हे दोन भाऊ. त्यांचे आईवडील फार शिकलेले नव्हते; परंतु त्यांच्या वडिलांना नेहमी वाटे, आपल्या मुलांचे आपल्यासारखे इंग्रजीमुळे काही अडू नये. त्यासाठी त्यांच्या खिशाला परवडत नसतानाही त्यांनी या दोघांना इंग्रजी माध्यमात टाकले. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात इंग्रजी माध्यमाच्या शाळेची लाट नव्हती. आजूबाजूला मराठी माध्यमात शिकणारी मुले आणि घरातही मराठी संभाषण यामुळे मनात या अभ्यासाचा खरं तर न्यूनगंडच होता.

मुलांना शिक्षणात अडचणी येऊ लागल्यावर वडिलांनी त्यांना क्‍लासला पाठवायचे ठरवले त्यामुळे आर्थिक बोजा आणखीन वाढला. वडिलांनी आर्थिक भार कमी व्हावा म्हणून घरातून स्क्रीन प्रिंटिंग, रेडिओ रिपेअरिंगची कामे सुरू केली.

परिस्थिती नजरेसमोर होती. त्यातही कैलास यांचे अभ्यासात मन रमत नव्हतेच. त्यामुळे त्यांनी दहावीनंतर स्वतःच शिक्षण सोडले आणि वडिलांना त्यांच्या रेडिओ रिपेअरिंगच्या कामात मदत करू लागले. हळूहळू त्यांना या कामात गती आली आणि या कामाची गोडीही वाटू लागली. रेडिओ रिपेअरिंचे काम कैलास यांना चांगले जमू लागले. चांगले उत्पन्नही त्यांना मिळू लागले; परंतु कैलास यांना त्याच त्याच गोष्टीत न रमता नवीन नवीन गोष्टीतील आव्हाने पेलायला आवडायची.

त्या काळी कॅलक्युलेटर दुरुस्तीची मागणी वाढू लागली. कैलास यांना आता ते शिकायचे होते; पण त्यासाठी त्यांना पूर्णवेळ नोकरी पकडणे गरजेचे होते. त्यामुळे महिना केवळ ३०० रुपयांच्या पगारावर त्यांनी नोकरी पत्करली. पुढे कॅलक्युलेटर दुरुस्ती शिकून घेतले. दरम्यानच्या काळात कॉम्प्युटरचे जग सुरू झाले आणि यातील संधी कैलास यांनी हेरली. त्यांनी कॉम्प्युटर दुरुस्तीही शिकून घेतली.

बँकेत कॅलक्युलेटर दुरुस्तीसाठी जात असताना पहिल्यांदा तिथे कॉम्प्युटर पाहिला. काचेच्या एसी खोलीत ठेवलेला कॉम्प्युटर मला सुरुवातीला टीव्ही वाटायचा, असे ते सांगतात. त्याचे अप्रूपही वाटायचे. हळूहळू कॉम्प्युटरविषयी माहिती घेत गेले आणि मग एका क्षणी त्यांच्या लक्षात आले की, यापुढे कॅलक्युलेटर वगैरे सर्व लोप पावणार आणि त्यांची जागा कॉम्प्युटर घेणार. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे कॉम्प्युटर शिकण्याची.

त्याच दरम्यान संजय यांचे बारावीचे शिक्षण पूर्ण करून त्यांना इंजिनीअरिंगला प्रवेश घ्यायचा होता. भावाचे इलेक्ट्रॉनिक्समधील काम पाहून त्यांनी इलेक्ट्रोनिक्सला जायचे ठरवले; परंतु कैलास यांना कॉम्प्युटर क्षेत्रातील भविष्यातील संधी दिसत होती. त्यांनी आपल्या भावाला कॉम्प्युटरमध्ये शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. शिक्षणाच्या दरम्यान संजय यांची पहिल्यांदा virus या गोष्टीशी सामना झाला. बर्‍याच वेळा प्रॅक्टिकलच्या वेळी कॉम्प्युटर रूम्स एक तर वीज नसल्यामुळे बंद असायच्या किंवा virus मुळे कॉम्प्युटर बंद असायचे. यातूनच virus विषयी त्यांनी अभ्यास सुरू केला. यावर उपाय काय?

मग त्यासाठी त्यांनी वेगवेगळे टूल्स लिहिले. त्यामुळे तेव्हाच्या virus शी सामना करायचे सोल्यूशन मिळाले. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक ठिकाणांहून नोकरीसाठी संधी चालून आल्या; परंतु कैलास यांना भावाने लिहलेले टूल्स हे anti virus म्हणून स्वतःचे प्रॉडक्ट बनवून विकता येईल ही उद्योजकीय संधी यात सापडली. त्यांनी आपल्या भावाला म्हणजेच संजय यांना ही संधी दाखवली. संजय यांनाही ते पटले आणि इथूनच सुरू झाला एका आंतरराष्ट्रीय उद्योग साम्राज्याचा प्रवास.

१९९५ सालचा तो काळ. काळ कठीण होता. खूप अडचणी होत्या. आर्थिक पाठबळ नव्हते; परंतु त्यातूनच या दोघांचा प्रवास सुरू झाला. चाळीतील एका छोट्या खोलीतून कैलास यांचे कॉम्प्युटर दुरुस्तीचे काम आणि संजय यांचे anti virus तयार करण्याचे काम सुरू होते. कॉम्प्युटर दुरुस्तीच्या कामात चांगलाच जम बसला होता. त्यातून मिळालेल्या उत्पन्नावर खर्च भागत होते. हार्डवेअरचे पार्ट्स लोक विकत घ्यायचे; परंतु सॉफ्टवेअर विकत घेणे त्या काळी प्रचलितच नव्हते.

‘क्विक हील’च्या पहिल्या आवृत्तीचे लोकार्पण

त्या वेळी मोठमोठ्या मल्टिनॅशन कंपन्या या क्षेत्रात सर्वच बाजूंनी आघाडीवर होत्या आणि त्याच वेळी इथे मात्र अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत होते. त्या वेळी आयटी क्षेत्रात पगारही मोठ्या प्रमाणात मिळत होते. पण हे दोघे या तोडीचा पगारही लोकांना देऊ शकत नव्हते. त्याच सोबत मार्केट आणि टेक्नॉलॉजी अशा दोन्ही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जायचे होते आणि सोबतच आपले नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये कसे आणावे यासाठी विचारसुद्धा सुरू होता. त्या वेळी सॉफ्टवेअर विकणे ही कन्सेप्ट नव्हती. खूप मोठ्या प्रमाणात पायरसी व्हायची. लोक अँटिव्हायरस विकत घेण्यासाठी पैसे खर्च करण्याच्या मानसिकतेतच नव्हते.

बाजारात काही मोठ्या कंपन्याही संपूर्ण तयारीनिशी उतरल्या होत्या. त्यांच्या प्रॉडक्टमध्ये विविध आणि चांगले फीचर्स होते; पण तरीही ग्राहकांना काही तरी नवीन हवे होते. संजय यांनी त्याचे कारण शोधायला सुरुवात केली. छोट्या छोट्या गोष्टींचा नीट अभ्यास केला आणि त्यांना काय हवंय तेवढेच द्यायला सुरुवात केली. मग ग्राहक प्रॉडक्ट घेऊ लागले.

सुरुवातीला ‘क्विक हील’चे नाव CAT Computer Services होते. २००७ साली ‘क्विक हील टेक्नॉलॉजिस लिमिटेड’ असे त्याचे नामकरण झाले. ग्राहकाने हे उत्पादन घेण्यासाठी काय काय करायला हवे हे कळत नव्हते. त्यामुळे विक्रीसाठी कैलास यांनी एक माणूसही नेमला; परंतु चार महिने फिरूनही त्याला एकही अँटिव्हायरस विकता आला नाही. मग कधीही विक्री न केलेले कैलास स्वतः विक्रीसाठी उतरले. नोकरी करताना मिळालेले अनुभव गाठीशी होतेच. त्याचा इथे त्यांना उपयोग झाला. समोरच्याला काय हवे आहे तेच हेरून त्यानुसार प्रेझेंटेशन देऊ केले. यातूनच ग्राहकांचा विश्वास निर्माण झाला आणि विक्री सुरू झाली.

उद्योगात सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे ग्राहक. ग्राहकाला आपण जर संतुष्ट करू शकलो तर त्याहून मोठा आनंद कोणताच नसतो. आपण हेच लक्षात ठेवून काम केले, की आपोआप माणसे जोडली जातात. ग्राहक हीच खरेतर प्रत्येक व्यवसायाची गुरुकिल्ली असते.

कैलाश म्हणतात, चांगल्या पगाराची नोकरी मिळत असूनही आम्हाला न सोडून जाता सोबत देणार्‍या आमच्या सहकार्‍यांना आम्ही काही तरी वेगळे आणि चांगले काम करतोय याचा विश्वास होता. त्यांच्यासाठी आणि मग विस्तारत जाणार्‍या कामासाठी आम्ही आमच्या उद्योगाला कॉर्पोरेट लुक दिला. आम्हाला चांगले काम करणारी माणसे हवी होती. त्यांना जे हवे ते त्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि एक चांगली टीम तयार झाली.

उद्योग विस्तारताना सुरुवातीला आम्ही पुण्यात चांगले विक्री करू लागलो; परंतु इतरत्र हवी तशी विक्री होत नव्हती. त्या वेळी मी नीट आमच्या कामाचा अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आले की, पुण्यात काम करणार्‍यांना काही मदत लागली तर आम्ही लगेच त्यांना ती देऊ शकत होतो; पण इतरत्र ते शक्य नव्हते. मग मी छोट्या छोट्या शहरांत आमची कार्यालये सुरू केली आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात आमचा व्याप वाढवला. पुण्याबाहेर सर्वात प्रथम आम्ही नाशिक शहरात आमचे कार्यालय सुरू केले. तिथे कामासाठी जोडले गेलेल्या लोकांना काम करताना येणार्‍या अडचणी आम्ही समजून घेऊ लागलो.

त्यांना वेळच्या वेळी अडचणी सोडवून द्यायचो. त्याचा परिणाम असा झाला की, आमचा माल जास्तीत जास्त विकला जाऊ लागला. अशा प्रकारे आम्हाला एक मार्ग सापडला आणि सर्व छोट्या शहरांना आम्ही लक्ष्य केले. याचा आम्हाला चांगला फायदा झाला सर्वात शेवटी मुंबईकडे मोर्चा वळवला आणि आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आमचा विस्तार झाला आहे. संपूर्ण भारतभर 33हून अधिक शाखा आहेत आणि जगभरातून ८० शहरांतून ‘क्वीक हील’चे ग्राहक आहेत.

(सदर लेख हा एबीपी माझावरील उदय निरगुडकर यांच्या मुलाखतीवर आधारित आहे.)


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!