आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. या कृषीप्रधान देशात अनेक प्रकारच्या धान्याच्या जाती आहेत. बियाण्यांची वाण आहेत, परंतु आज देशात हायब्रिड शेती जास्त प्रमाणात वाढलीय. शाश्वत शेती करण्यासाठी जुन्या धान्याची वाणं आज खूप कमी ठिकाणी उपलब्ध आहेत.
पारंपारिक आणि देशी वाणाचं जतन करणाऱ्या राहिबाई पोपेरे या ‘देशी बियाण्यांची बँक’ चालवतात. शैक्षणिकदृष्ट्या निरक्षर असलेल्या राहिबाई खरंतर ज्ञानाने समृद्ध आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात राहिबाईंचा उल्लेख ‘मदर ऑफ सीड’असा केला होता.
अहमदनगर जिल्ह्यात कोंभाळणे हे एक आदिवासी खेडेगाव. या खेडेगावात आदिवासी शेतकरी आहेत. राहिबाई मुळच्या याच गावच्या. राहिबाईंच्या वडिलांकडून त्यांना खूप ज्ञान मिळाले, असे त्या सांगतात. वडिल नेहमी म्हणायचे, “जुनं ते सोनं” त्याचा अर्थ राहिबाईंनी खूप चांगला समजून घेतला. राहिबाईंच्या आजुबाजुच्या परिसरातील आजही ५० टक्के शेतकरी हा पारंपरिक पद्धतीची देशी वाणाचे बियाणे वापरूनच शेती करतो.
राईबाईंच्या ‘देशी बियाण्यांच्या बॅंकेत’ आज ५२ पिकांची ११४ वाण आहेत. राहिबाई स्वत: हे काम पूर्वी छंद म्हणून करत, परंतु काही काळापूर्वी त्यांची ‘बायफ’ या संस्थेशी भेट झाली आणि त्यांच्या या छंदाला एक दिशा मिळाली. त्यातूनच आज त्यांनी एवढ्या पिकांची वाण संग्रहीत करून बँक सुरू केलीय.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१२३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹३२१ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)सुरुवातीच्या काळात हे काम करताना अनेकांनी त्यांना वेड्यात काढले. कुठेही मिटिंग असली काही कार्यक्रम असला की राहिबाई त्या ठिकाणी पोहचत असतं. सुरुवातीला घरातल्या, बाहेरच्या अनेक लोकांकडून त्यांनी अनेक प्रकारची बोलणी ऐकलीयत.
पण त्यांनी आपला मार्ग सोडला नाही. त्या म्हणतात जर मी त्यावेळी अशी बोलणी ऐकली नसती तर आज जे दिसतंय ते म्हणजे माझी ही बियाणे बँक दिसली नसती.
त्यांच्या या बँकेत सफेद वांग, हिरवं वांग, सफेद तूर, कडधान्यांमधील घेवडा, वाल, उडीद, वाटाणा, तूर, हरभरा, हुलगा, भात, बाजरी, गहू, नागली, तीळ, भुईमूग, सूर्यफूल, जवस आदी अनेक प्रकारच्या पिकांची वाणं आहेत.
घराभोवती असणाऱ्या अडीच-तीन एकर परिसरांत विविध प्रकारची चारशे-पाचशे झाडे आज उभी आहेत. त्यांचे घर हे एक प्रकारचे रिसर्च सेंटरच आहे. राहिबाईंना त्यांच्याकडील प्रत्येक वाणाची खडानखडा माहिती आहे. जणू राहिबाई म्हणजे बियाण्यांचा ज्ञानकोशच.
आपल्याकडे आज संकरीत (हायब्रिड) बियाण्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो, परंतु त्याचा परिणाम हा आपल्या जीवनमानावर, आरोग्यावर होतो. म्हणूनच त्यांची ही बँक कार्यरत आहे. त्या म्हणतात देशी वाणाचं धान्य हे केवळ पाणी आणि हवेवर येतं. तर संकरीत बियाणं हे पाणी आणि खत या दोन्हीशिवाय रुजत नाही. त्याचा खूप खोलवर परिणाम होतो.
त्यासाठी देशी बियाण्यांचा वापर वाढला पाहिजे. राहिबाईंच्या बियाणे बँकेतील बियाणे आज राज्याच्या विविध भागांत पोहोचले आहेत. राहिबाईंच्या कामातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्याला उपलब्ध साधनांमध्ये शेतीला उपकारक ठरेल, असे काही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.