आपल्या आयुष्याला टर्निंग पॉइंट ठरेल, अशी घटना कोणती?
मी १९८५ साली दहावीला होतो. प्रीलिम परीक्षा चालू होती, अभ्यासासाठी लवकर उठलो होतो. उठलो तेव्हा पाहिलं की वडील असह्य पाठदुखी झाल्यामुळे रडत होते. ते रिक्षा चालवायचे, तेही १६-१६ तास. हा माझ्या आयुष्यातला पहिला टर्निंग पॉइंट होता.
त्याअगोदर माझं आयुष्य अगदी छान चाललेलं होतं. इतकं की मी अगदी ‘अलबत्त्या-गलबत्त्या’ नाटकात कामही करत होतो. दिलीप प्रभावळकरांसोबतही मी काम करायचो. माझं नाटकामध्ये छान चाललं होतं आणि एकूणच माझे करीयर या क्षेत्राच्या दिशेने पुढे सरकत होतं.
शाळेतही सगळे छान होतं. त्या दिवशी मात्र वडिलांना रडताना पाहून मी हादरलो, कारण माझे वडील स्वभावाने खूप कडक होते. पुढे वडिलांना के.ई.एम. रुग्णालयात दाखल केलं आणि माझी दहावीची परीक्षासुद्धा पार पडली.
प्रकृतीमुळे वडिलांच्या रिक्षा चालवण्यावर बंदी आली, पण डोक्यावर बँक ऑफ महाराष्ट्रचं रिक्षाचं कर्ज होतं. त्याचा हप्ता चालू होता. मग आता करायचं काय असा प्रश्न उभा राहिला आणि त्यावर आमचं विचारचक्र सुरू झालं.
माझी आई जेवण खूप छान बनवायची. त्यातही चटणी खूप छान बनवायची, तेही खोबरं, लसूण व्यवस्थित खलबत्त्यात कुटून वगैरे. मग अशा चटणीची छोटी पाकिटं बनवून विकायची कल्पना वडिलांच्या डोक्यात आली.
दहावीच्या परीक्षेनंतर एक दिवस मी घरी आलो तर घरी आई-बाबा घरात नव्हते. घराच्या माळ्यावर चटणीची पाकिटं ठेवलेली. भावाने मला वडिलांचा निरोप दिला की, तुला ही पाकिटं घरोघरी विकायला सांगितली आहेत. माझ्यासाठी ५० पैशांची दहा पाकिटं ठेवली होती. ती विकून ५ रुपये मिळाले.
पुढे मी आम्ही राहतो त्या वस्तीत म्हणजे मुंबईला मालाड पश्चिमेला असलेल्या कुंभारवाड्यात चटणी घरोघर जाऊन विकायला सुरुवात केली. सुरुवातीला लाज वाटत होती या कामाची, पण मग सवय झाली. परिस्थिती सारं शिकवते असं म्हणतात ते काही खोटं नाही.
तुम्हाला अचानक व्यवसायात पदार्पण करावं लागलं, यातून तुमच्यात काय बदल झाले?
हाच ठरला माझ्या करीअरचा श्रीगणेशा! यातूनच मला विक्रीचं (सेल्स) प्रशिक्षण मिळू लागलं. बाबा रोज चटणीची पाकिटं बनवून देऊ लागले आणि मी वेगवेगळ्या भागांत जाऊन ती विकू लागतो. लोकांच्या मागणीनुसार चटणीसोबत, पापड, कुरडया, मसाले, हळद, लोणचीही विकू लागलो. एकीकडे कॉलेज आणि दुसरीकडे ही विक्री हाच नित्यक्रम झाला.
एके दिवशी माझी काहीच विक्री झाली नाही. मला हे सहन होत नव्हतं. मी रस्त्यात उभा राहून रडत होतो. मग मी स्वत:चे डोळे पुसले आणि निश्चय केला की, हा माल विकल्याशिवाय मी घरीच जाणार नाही आणि एका नवीन वस्तीत जाऊन पूर्ण माल विकूनच घरी गेलो.
कॉलेजची परीक्षा सुरू असतानासुद्धा रात्रभर अभ्यास आणि दिवसा कॉलेज आणि विक्री हे सुरू ठेवावं लागायचं, कारण रोजचा भाजीपाला, दूध हे याच विक्रीतून येत होतं. एकूणच या लोणचं-चटणी विक्रीच्या अनुभवातून माझी काहीही विकण्याची मानसिकता तयार झाली.
मग माहिमहून साबण आणून विकणे, कल्याणच्या कुंभारवाड्यातून हरितालिका आणून विकणे, अगदी सिग्नलवर उभं राहून रिक्षाचे टॅरिफ कार्डही विकले आहेत. दिवाळी सणांमध्ये रांगोळ्या, उटणेही विकले आहे.
आमच्या रेडी-टू-कूक अळुवड्या तर खूपच फेमस होत्या. वडील उंड्याचं छान पॅकिंग करून द्यायचे आणि मी ते विकायचो. श्रावणात या अळुवड्यांना इतकी मागणी असायची की, लोक ११-११ वाजेपर्यंत उपवास न सोडता माझी वाट पाहायचे. १९९० सालापर्यंत हे सगळे असंच चाललं होतं.
एकूण या प्रवासात आपण शिक्षण कसं पूर्ण केलंत?
१९९० साली माझी पदवी पूर्ण झाली. १९९२ साली माझा डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट हा कोर्स पूर्ण झाला. हे वर्ष माझ्या आयुष्याला दुसरी कलाटणी देऊन गेलं. बाबरी मशीद मुंबईत पडल्यामुळे दंगल उसळली होती आणि आजूबाजूला फक्त हिंसाचारच दिसत होता, पण हातावरच पोट असल्यामुळे मला विक्रीशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे तेवढ्या तप्त वातावरणातही माझं काम चालूच होतं.
बाबा पाकिटं बनवून द्यायचे आणि मी विकून यायचो. मुख्य म्हणजे सर्वत्र वाहतूक बंद असल्यामुळे लोक माझ्याकडून भरपूर विकत घ्यायचे. त्यामुळे हातात तलवार असलेल्या लोकांच्या गराड्यातून, दोन्ही बाजुला गाड्या पेटलेल्या आहेत अशा रस्त्यावरून मी विकायला गेलोय. आज मागे वळून पाहिलं की वाटतं मी हे काय केलं.
असेच एक दिवस विक्री पूर्ण करून येत असताना एका शीख मिलिटरी अधिकार्याने संशय आल्याने माझी झडती घेतली, नंतर चौकशी केली. संशय पूर्ण न मिटल्याने मला घरीही सोडायला आला. वाटेत मीनिर्दोष असल्याची खात्री झाल्यावर मला समजावलं की; अशी जिवावर जोखीम घेऊन काम करू नये.
घरी आल्यावर आई-बाबांना हे सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की, बस झालं आता लोणचं-पापड विकणं, आयुष्यभर आपल्याला लोणचं-पापड विकायचं नाहीय. मग बाबांच्या सांगण्यावरून त्याकाळी ५ हजार रुपयांचा नफा देणारा हा व्यवसाय थांबवला.
आपल्या एल.आय.सी.च्या प्रवासाला सुरुवात कशी झाली?
१९९२ मध्ये मी एल.आय.सी.ची एजन्सी घेऊन विमा विक्रेता झालो. घर लहान पडत असल्यामुळे महिना ५ टक्के व्याजाने कर्ज घेऊन एक घरही विकत घेतलं. पतपेढीचं डेली कलेक्शन आणि घरात ‘गुरुकुल क्लासेस’ नावाने क्लासेसही काढले. त्याकाळी संगणक नवीनच आलेले असल्यामुळे संगणक प्रशिक्षणही सुरू केलं.
याच दरम्यान मी वेगवेगळ्या म्हणजेच बँकिंग, एमपीएससी यासारख्या २२७ स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या, पण यश काही मिळालं नव्हतं. पुढे १९९६ साली वर्तमानपत्रात एल.आय.सी. विकास अधिकारी पदासाठी जाहिरात आली. २२७ वेळा अपयश आल्यामुळे माझी ही परीक्षा देण्याची इच्छा नव्हती.
फक्त आईच्या सांगण्यावरून अभ्यास न करता या परीक्षेला गेलो. पुढे तीन-चार महिन्यांनी मी पास झाल्याचं कळलं. त्या वेळी मात्र आनंदाने माझे पाय जमिनीवर राहिलेच नाहीत. पुढे मुलाखतीला गेलो. सोबत अजून तीन जण होते. मुलाखत घेणारेही तीन जण होते.
मुलाखत सुमार झाली. फार काही उत्तरं देता आली नाहीत; पण नशिबाने मी मुलाखतीची फेरीही यशस्वी पार करून मी एल.आय.सी. विकास अधिकारी झालो. विकास अधिकारी म्हणून एल.आय.सी.मध्ये रुजू झालो, पण मला या कामाबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे माझा एका टेबलावरून दुसर्या टेबलावर फुटबॉल व्हायचा.
आपल्याहून दुर्बल असलेल्यांना छळण्यात मिळणारा आनंद घेणारी माणसं मला इथे पहायला मिळाली. त्यांची अवहेलना, टोलवाटोलवी, अपमान अनुभवायला मिळाला. २००४ पर्यंत हे असंच चालू होतं.
एल.आय.सी.मध्ये इतक्या बिकट परिस्थितीत तुम्ही यशस्वी कसे झालात?
२००४ ला माझ्या आयुष्यात अजून एका व्यक्तीने बदल घडवला, ती व्यक्ती म्हणजे गोकर्ण सर (गुरू गोकर्ण). यांची पहिली भेट झाली ती पुण्याच्या इप्सर्ट या विम्याचं ट्रेनिंग देणार्या संस्थेमध्ये. त्यांच्याबद्दल मला खूप भीती वाटायची. यांना कधी भेटू शकेन का, याबद्दल साशंकता होती.
त्यांना मी माझी पुढे जाण्याची इच्छा सांगितली आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं. त्यांनी मला समजावले की; एल.आय.सी. विकास अधिकारी म्हणजे नेमकं काय रसायन असतं, त्याचा जॉब काय, लोकांची प्रगती कशी करायची, एजंट्ससोबत संबंध कसे बनवायचे.
इथून माझ्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. २००४ पासून माझा माझ्या ब्रँचमध्ये पहिला क्रमांक कधीच सुटला नाही. आज मला जो मानसन्मान मिळतो, त्याचं श्रेय गोकर्ण सरांना जातं. ट्रेनिंग का? ते कसे घ्यायचं? ट्रेनिंगला कसं जायचं? याहून पुढे एजंट्सना कसं हाताळायचं हे सर्व गोकर्ण सरांनी मला शिकवलं.
साधी सायकलसुद्धा घेऊ न शकणारा मी पुढे ओमनी (२००४), वॅगन-आर (२००७), एसएक्स-४ (२०११) आणि एर्टिगा (२०१६) अशी प्रगती करत आहे आणि अजूनही माझा प्रवास चालूच आहे. ज्याच्याकडून मी सायकल खरेदी केली होती, त्याचंच ऑफिस आज मी खरेदी केले.
या प्रवासात काही चुकाही झाल्या. महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे मी मोठं ऑफिस खरेदी केलं आणि त्याच्या ई.एम.आय.मुळे माझा महिन्याचा खर्च वाढला. याच्या तणावात चार-पाच वर्षेही गेली, पण माझा पहिला नंबर कधी चुकला नाही.
आपल्या या यशात कोणाकोणाचे सहकार्य आपल्याला लाभले?
या सर्व प्रवासात माझ्या बाबांचा मोठा हात आहे. ते जे सांगत गेले ते मी अंधपणे ऐकत गेलो. काही गोष्टी आयुष्यात करता आल्या नाहीत, याचं दु:खही आहे. नाटकाचं वेड होतं, पण ते करता आलं नाही, कॉलेज- जीवनाची मजा घेता आली नाही; पण एक सांगावंसं वाटतं की, तुम्ही योग्य वयात पैसे कमवायला शिकलं पाहिजे.
बरेच लोक हातचं राखून काम करतात, कामात स्वत:ला झोकून देत नाहीत, स्वत:चा कम्फर्ट झोन सोडायला तयार नसतात, संघर्ष करायला घाबरतात, मग त्यांना आयुष्यात यश कसं मिळेल? बाबांशिवाय आरती मांडाळकर, झिलू घाडीगावकर, गोकर्ण सर, भगवान मांडाळकर, रवींद्र कदम, किरण नार्वेकर, मनीष देसाई, जगन्नाथ गावडे, दत्ता चव्हाण, विणेरकर कुटुंबीय ही काही ठळक नावं आहेत ज्यांनी मला हातभार लावलाय.
मी राहायचो त्या कुंभारवाड्यातल्या बर्याच जणांनी बरंच सहकार्य केलं. संतोष नायर या माणसाच्या ट्रेनिंगचा माझ्या आयुष्यवर खूप खोल परिणाम झाला. एकलव्याप्रमाणे मी त्यांना गुरू मानतो. बिझनेस कसा करायचा हे मी त्यांच्याकडून शिकलो.
त्याचे एक वाक्य ‘बिझनेस करना है, तो बेरेहमी से करो’ मी माझ्या उद्योजकीय आयुष्यात उतरवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. मग तुम्हाला किती का आजारपण असेना, चार गोळ्या खा आणि कामाला लागा हे मी त्याच्याकडून शिकलो.
माझ्या या उद्योजकीय आयुष्यात माझ्या एजंट्सचा खूप मोठा वाटा आहे. कारण एकवेळ माझा त्यांच्यामुळेच मी आज सुखाने घास घेऊ शकतो. त्यांच्यामुळेच मी आज सुखसोईंचा आनंद घेऊ शकतोय. असा माझा प्रवास एल टू एल म्हणजेच ‘लोणचे पापड ते एल.आय.सी’ आहे.
मराठी तरुणांना उद्योजकतेसाठी काय संदेश द्याल?
मराठी माणूस हा भांडवलाच्या कमतरतेमुळे उद्योगात येऊ पहात नाही. त्यामुळे अवघ्या एक हजारच्या परीक्षा फीच्या भांडवलावर एल.आय.सी. एजन्सी हा उदयोग सुरू करता येतो. यामध्ये आर्थिक भांडवलापेक्षा डोक्यावरती बर्फ, जीभेवर साखर आणि पायाला चाक या त्रिसूत्रीचा वापर आवश्यक आहे.
याच्या वापरानेच करोडो रुपये कमावणारे एजंट आज एलआयसीमध्ये आहेत. आज माझ्या माणसे घडवण्याच्या कारखान्यात जे ७३ एजंटस् आहेत, त्यामध्ये अगदी रस्त्यावर दगड फोडणार्यांपासून ते गुंड-मवाली असे सर्व आहेत आणि ते आता लाखो-करोडो कमवण्यापासून ते अगदी विदेशी जाण्यापर्यंत अशा सर्व गोष्टींना पात्र झाले आहेत. काम शिकवण्याची जबाबदारी माझी, तुम्हाला गुंतवायची आहे ती फक्त तुमची निष्ठा आणि इमानदारी. मेहनत तुमची, मार्गदर्शन माझं.
(राजेश जाधव हे एल.आय.सी.मध्ये Senior Business Assosiate या पदावर कार्यरत आहेत.)
संपर्क : राजेश जाधव – ८७७९६४८८८६ / ९८२१५९६०६१
ई-मेल : gurulic123@gmail.com
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.