वैद्यकीय प्रॅक्टीस बंद करून उभारला ‘रक्षक’ ब्रॅण्ड
कथा उद्योजकांच्या

वैद्यकीय प्रॅक्टीस बंद करून उभारला ‘रक्षक’ ब्रॅण्ड

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


ध्येयाने पछाडलेली माणसे ध्येय गाठतातच याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. रमेश तिवारी. वैद्यकीय प्रॅक्टिस हा असा व्यवसाय आहे, जो कधीही बंद होऊ शकत नाही. जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत वैद्यकीय व्यवसाय सुरूच राहणार आहे; परंतु डॉ. रमेश तिवारी यांनी वैद्यकीय प्रॅक्टिस बंद केली आणि स्वतःचा ‘रक्षक’ नावाचा ब्रॅण्ड उभारला आहे.

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या एक छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. वडील शेतकरी होते. कमावणारे हात दोन आणि खाणारी तोंडे अनेक अशी परिस्थिती होती. म्हणूनच अगदी बालवयापासून रमेश तिवारी काम करू लागले. घरची परिस्थिती हलाखीची, त्यात मोठा भाऊ सुशिक्षित बेकार, एक लहान भाऊ आणि लग्नाच्या वयाच्या दोन बहिणी.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

बर्‍याचदा वडील थकल्यानंतर संसाराचा गाडा मोठ्या भावाला खेचावा लागतो; पण ही जबाबदारी रमेश तिवारी यांनी उचलली. त्यांनी अनेक प्रकारची कामे केली, अगदी ‘माती’सुद्धा विकली. घर चालवायचं होतं, बहिणींची लग्न करायची होती हा विचार मनात होता. काम करता करता शिक्षण पूर्ण केलं आणि ते एमबीबीएस झाले. हसतं-खेळतं बालपण त्यांच्या वाटेला कधी आलंच नाही.

हातात खेळणी घेऊन सवंगड्यांसोबत खेळायच्या त्या वयात कष्टाची कामे केली. घराची आर्थिक जबाबदारी सांभाळली आणि हे करत असताना शिक्षणाकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही, कारण आपलं शिक्षण एक दिवस आपल्याला उंचीवर घेऊन जाईल, हा विश्‍वास त्यांना होता. तो विश्‍वास अर्थात सार्थकी ठरला.

१९८९ मध्ये त्यांनी वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली. व्यवसाय करून पैसे कमवणे हा विचार तर होताच; पण शहरी भागात जाण्यापेक्षा ग्रामीण भागात काम करून लोकांची सेवा करण्याचं धाडस त्यांनी केलं. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा मिळणे ही एक दुर्मीळ बाब आहे.

म्हणून इथे वैद्यकीय सेवा सुरू करण्याचं त्यांनी ठरवलं. अल्प काळातच चांगला जम बसला. त्यांची प्रॅक्टिस चांगली चालत होती. त्यांच्या गावात त्यांना प्रचंड मानसन्मान होता. एक डॉक्टर म्हणून लोक आदराने पाहत होते; पण सर्वसामान्य डॉक्टरांप्रमाणे प्रॅक्टिस सुरू ठेवून आयुष्य व्यतीत करणं कदाचित त्यांना मान्य नव्हतं.

काही तरी नवीन निर्माण करण्याची ऊर्मी होती. प्रॅक्टिसदरम्यान त्यांना कीटकनाशकसंबंधित एक फॉर्म्युला सापडला आणि हाच तो क्षण होता जेव्हा त्यांनी प्रॅक्टिस बंद करण्याचा निर्णय घेतला. इतकी चांगली चाललेली प्रॅक्टिस बंद करणे हे घरच्यांना काही पटलं नाही; पण त्यांचा निश्‍चय झाला होता. त्यांच्यातला उद्योजक आणि कल्पक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.

२००१ मध्ये त्यांना फॉर्म्युला मिळाला

पण हा फॉर्म्युला लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तो सदोष असता कामा नये व आधीपासूनच मार्केटमध्ये इतके ब्रॅण्ड असताना लोक आपला ब्रॅण्ड का स्वीकारतील? हा विचार त्यांनी केला. एक वर्ष या फॉर्म्युलावर संशोधन केलं.

आपला ब्रॅण्ड इतरांपेक्षा वेगळा असेल, उपायकारक असेल, पण अपायकारक नसेल याची काळजी त्यांनी घेतली आणि २००२ साली त्यांनी आपला ‘रक्षक’ नावाचा ब्रॅण्ड लाँच केला. जो घराचे रक्षण करतो तो रक्षक.

कीटक, मुंग्या, झुरळं यामुळे सगळेच त्रस्त असतात. आपण या कीटकांचा नायनाट करण्यासाठी अनेक औषधे वापरतो, पण तरीही त्यावर व्यवस्थित उपाय होत नाही. ही कमतरता भरून काढली. चांगली चालणारी प्रॅक्टिस बंद करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला खरा; पण सुरुवातीच्या काळात प्रचंड अडचणी आल्या.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


अचानक आर्थिक मिळकत बंद झाली होती. पैसे येण्याचं साधन बंद झालं होतं. अशात सुरुवातीला ब्रॅण्ड लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं; पण कोणताही व्यवसाय सुरुवातीला शिशू अवस्थेत असतो. तो हळूहळू वाढत जातो. व्यवसाय सुरू केला आणि लगेच भरभराट झाली असं सहसा होत नाही. व्यवसाय बेबी स्टेजमध्ये असल्यामुळे काही काळ आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले.

वडिलांनी सांगितलं की, ‘व्यवसाय करण्याचा तुझा नेम चुकला आहे. हे काही तुझं काम नाही. तू पुन्हा प्रॅक्टिस सुरू कर’.

डॉ. रमेश तिवारी आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी वडिलांकडे पाच वर्षे मागितली. पाच वर्षांत जर मी काही करू शकलो नाही, तर पुन्हा व्यवसाय सुरू करीन, असे वचन त्यांनी वडिलांना दिले.

संघर्षाच्या काळात नेहमी सहनशीलता हवी असते. भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवलंच आहे,

कर्म कर, पण फळाची चिंता करू नकोस

याचा अर्थ कर्म करणार्‍याला फळ मिळतंच; पण ते तत्काळ मिळेल असं नाही. त्यासाठी संयम आणि सहनशीलता हवी. या आर्थिक संकटाच्या काळात त्यांची पत्नी त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. त्या माऊलीने त्यांना धीर दिला आणि तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असा विश्‍वासही दाखवला. घरची लक्ष्मी आपल्या बाजूने उभी आहे म्हटल्यावर त्यांना आनंद झाला आणि त्यांनी आपलं पूर्ण लक्ष व्यवसायात लावलं.

त्यांना सिद्ध करून दाखवायचं होतं की, त्यांचा नेम चुकला नव्हता.

त्यांचा निर्णय चुकीचा नव्हता. आजही कीटकनाशकांमध्ये प्रचंड प्रमाणात विषारी द्रव्यं असतात. रमेश तिवारी यांनी तयार केलेल्या ब्रॅण्डमध्ये विषारी द्रव्य अगदीच कमी आहे. कधी कधी डॉक्टर त्यांना कॉल करायचे की, रुग्णाने चुकून तुमची पावडर खाल्ली आहे, तर आता काय करायचं? मग ते सांगायचे की, या औषधामुळे रुग्णाला कोणताच त्रास होणार नाही.

सुरुवातीला ते मार्केटिंगला स्वत: जात होते तेव्हा ते 50 ग्रॅम पावडर पाण्यात मिसळून खाऊन दाखवायचे आणि सिद्ध करून दाखवायचे की, ही पावडर पोटात गेली तरी कोणताही त्रास उद्भवणार नाही.

मग लोकांचे प्रश्‍न यायचे की, जर विषारी द्रव्यं नसतील तर कीटक कसे मरतात? तेव्हा ते समजावून सांगायचे की, विषारी द्रव्य अगदी कमी प्रमाणात आहे जे केवळ कीटकांवर काम करतात. मोठे जनावर किंवा माणसांसाठी हे अपायकारक नाही. म्हणून चुकून हे औषध पोटात जरी गेलं तरी कुणास त्रास होत नाही.

या व्यवसायाची सुरुवात झाली तेव्हा थर्ड पार्टी बेसिसवर मशीन बनवून घेतली. पावडर मिक्स करून ते पॅकिंग करून द्यायचे आणि मग रमेश तिवारी स्वत: दुचाकीवरून खेड्यात जाऊन प्रचार करायचे.

सुरुवातीला त्यांनी आपलं प्रॉडक्ट मेडिकल दुकानांना मोफत दिलं. हे प्रॉडक्ट बिनविषारी आहे, परवडणारं आहे म्हणून ग्राहकांच्या पसंतीस उतरलं. २००७ पर्यंत या प्रॉडक्टचं मार्केट तयार झालं होतं; पण एक अडचण अशी आली की, घाऊक व्यापारी उधारित प्रॉडक्ट विकत घ्यायचे. २०१२ पर्यंत सहा ते आठ जिल्ह्यांमध्ये प्रॉडक्ट पोहोचलं होतं. मागणी वाढली होती. अशा परिस्थितीत त्यांनी २०१३ मध्ये कॅशने व्यवहार करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळेस घाऊक व्यापार्‍यांनी कॅशमध्ये व्यवहार करणार नाही, असे सांगितले.

अनेक मित्रांनीही सल्ला दिला होता की, व्यवसाय उधारीवरच चालतात. या निर्णयामुळे व्यवसायाला फटका बसला आणि विक्री २५ टक्क्यांपर्यंत आली. तरी आपला निर्णय बदलायचा नाही असं त्यांनी ठरवलं. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ग्राहक रिटेलरकडे जाऊन प्रॉडक्टची मागणी करू लागले. थेट रिटेलर त्यांना फोन करू लागले. मग ते स्वत: गाडीने डोअर-टू-डोअर सर्व्हिस देऊ लागले.

घाऊक व्यापार्‍यांनी हात वर करूनही प्रॉडक्टची मागणी कमी झाली नाही. हे सर्व होलसेलर विक्रेते यांना कळलं आणि शेवटी कॅश व्यवहार करण्याचे त्यांनी मान्य केले. पुढे डॉक्टरांनी ‘लक्ष्मणरेषा’ चॉक निर्माण केला. हे प्रॉडक्टसुद्धा प्रचंड चाललं.

गंमत अशी की, गावाकडे जमीन शेणाने सारवली जाते. लोक शेणात पावडर मिसळायचे आणि जमीन सारवायचे. लोकांचा अनुभव असा की पुढची सारवणी करेपर्यंत मुंग्या वगैरे यायचे नाहीत. ही पद्धत लोकांनीच शोधून काढली. हे प्रॉडक्ट लोकांना आवडलं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हे बिनविषारी आहे.

अन्नामध्ये पडलं तरी नुकसान होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा घाणेरडा वास येत नाही. म्हणून घरात व ऑफिसमध्ये वापरण्यासाठी हे उत्तम प्रॉडक्ट आहे. पुढे २०१५ मध्ये त्यांनी होम क्लिनिंग प्रॉडक्ट निर्माण केले. फ्लोअर क्लीनर, हँड वॉश असे प्रॉडक्ट बाजारात आणले. या उत्पादनांनाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. २०१६ मध्ये थर्ड पार्टीकडून काम करवून घेणं बंद केलं व स्वतःची मशीन घेतली.

एक प्लॉट घेऊन फॅक्टरी बांधली. आता मराठवाडा-कर्नाटकमध्ये बारा जिल्ह्यांत हे प्रॉडक्ट तुफान चालतंय. हे प्रॉडक्ट यशस्वी झाल्यावर त्यांना वेगळाच अनुभव आला. लोक ‘रक्षक’ या नावाने ड्युप्लिकेट उत्पादन निर्माण करू लागले, पण ड्युप्लिकेट उत्पादनांमुळे त्यांच्या व्यवसायावर वाईट परिणाम झाला नाही. उलट ‘रक्षक’ची मागणी प्रचंड वाढली.

जसं मायक्रोसॉफ्ट कंपनी ड्युप्लिकेट सॉफ्टवेअर अनेक लोक वापरतात; पण जगात मायक्रोसॉफ्टचा खप प्रचंड आहे. आपल्या प्रॉडक्टची लोक नक्कल करतात म्हणजे आपला प्रॉडक्ट उंचीवर पोहोचला आहे. कारण लोक शाहरुख, अमिताभची नक्कल करतात, सामान्य माणसाची नव्हे, असं ते अभिमानाने सांगतात.

त्यांच्याकडे सहा कामगार आणि चार विक्रेते काम करतात. आपल्यामुळे कुणाचं तरी घर चालतंंय या आनंदाची तुलना कशाशीच करता येत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात, कोणताच व्यवसाय फेल जात नाही, फेल जातो तो माणूस. एकच व्यवसाय दोन माणसांनी केला तर एक माणूस यशस्वी ठरतो तर दुसरा अपयशी. याचाच अर्थ व्यवसायात निष्ठा व मेहनत हवी तर माणूस यशस्वी होतोच, हा संदेश ते तरुणांना देतात.

आज व्यावसायिक म्हणून ते खूप मोठे झाले आहेत, परंतु आजही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. त्यांच्या कुटुंबात यशस्वी व्यक्ती म्हणून त्यांना मान आहेच; पण गावातही त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं. त्यांना तीन मुली आहेत. यासाठी ते स्वतःला भाग्यवान समजतात. त्यांचा मुलगा एमबीए करतोय.

ते आपल्या मुलाला एमबीए पूर्ण करून सुरुवातील नोकरीचा अनुभव घेऊन आपला व्यवसाय सांभाळण्याचा सल्ला देतात, कारण व्यवसाय सांभाळणे सोपी गोष्ट नाही ही जाणीव त्यांना मुलाला करून द्यायची आहे. यशस्वी उद्योजक असूनही त्यांचा अध्यात्माकडे ओढा आहे.

आपल्या व्यवसायातून वेळ काढून ते ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रशिक्षण लोकांना देतात. मुलाने व्यवसायाची जबाबदारी पूर्णपणे सांभाळल्यानंतर उर्वरित सबंध आयुष्य ते अध्यात्म साधना आणि लोकांना आध्यात्मिक अनुभूती देण्यासाठी व्यतीत करणार आहेत. म्हणजेच ते आध्यात्मिक वृत्तीचे व्यावसायिक आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

डॉ. रमेश तिवारी यांनी आपली वैद्यकीय प्रॅक्टिस सोडून व्यवसाय सुरू केला. आज त्यांचे वडील हयात नाहीत; पण वडिलांना त्यांनी दिलेला शब्द सत्यात उतरवला. त्यांचा नेम चुकला नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. आज खर्‍या अर्थाने त्यांच्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. डॉक्टरांनी ‘रक्षक’ नावाचा ब्रॅण्ड बाजारात आणला. एका अर्थाने डॉ. रमेश तिवारी हे आपल्या घरांचे रक्षकच आहेत.

– डॉ. रमेश तिवारी
9822537773


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!