प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी वयाच्या ८६व्या वर्षी ब्रीचकँडी रुग्णालयात काल मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. टाटा उद्योगसमुहाचे चेअरमन एन चंद्रशेखर यांनी रतन टाटा यांच्या निधनाचे अधिकृत वृत्त दिले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते.
रविवारी रात्री उशिरा त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. वयोमानानुसार विविध प्रकारच्या प्रकृतीच्या तक्रारी चालू होत्या. त्यानंतर त्यांनी स्वतः त्यांच्या प्रकृतीविषयी ट्विट करून माहिती दिली होती, परंतु त्यानंतर त्यांची तब्बेत खालावत गेली व त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले गेले. मात्र काल रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.
रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत झाला होता. एक कर्मचारी म्हणून टाटा उद्योगसमूहात आपली कारकीर्द सुरू करून पुढे ते टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्षही झाले होते.
रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने खूप उंची गाठली. अनेक मानाचे तुरे रतन टाटांनी टाटा ग्रूपच्या शिरपेचात खोचले. १९९१ साली ते टाटा ग्रुपचे अध्यक्ष झाले. मग त्यांनी मागे वळून कधी पाहिले नाहीं. २०१२ पर्यंत त्यांनी हा पदभार सांभाळला.
१९९६ साली त्यांनी टाटा सर्व्हिसेस व २००४ मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपन्या सुरू केल्या. १९९८ साली संपूर्ण भारतीय बनावटीची ‘इंडिका’ कार टाटा मोटर्सनी बनवली. तर २००८ साली रतन टाटा यांनी नॅनो कार बाजारात आणली.
भारतीय उद्योग जगतात रतन टाटा यांनी खूप पोठी छाप सोडली आहे. त्यांना भारताचे दोन सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मविभूषण (२००८) आणि पद्मभूषण (२०००) प्रदान करण्यात आले आहेत.