सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या क्षेत्रातील यशस्वी उत्पादनासाठी कच्च्या मालाची गुणवत्ता आणि उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. कच्चा माल हा उत्पादन प्रक्रियेचा पाया आहे, कारण त्यावर उत्पादनाची गुणवत्ता, किंमत आणि बाजारातील स्पर्धात्मकता अवलंबून असते.
उच्च दर्जाचा कच्चा माल उत्पादनाची गुणवत्ता वाढवतो. छोट्या उद्योगांमध्ये, जसे की कापड, खाद्यपदार्थ किंवा हस्तकला, ग्राहकांना टिकाऊ आणि आकर्षक उत्पादने हवी असतात. निकृष्ट कच्च्या मालामुळे उत्पादनाची गुणवत्ता खालावते, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास कमी होतो आणि व्यवसायाला नुकसान होते. या उलट चांगल्या कच्च्या मालामुळे उत्पादने दीर्घकाळ टिकतात आणि बाजारात मागणी वाढते.
कच्च्या मालाची नियमित उपलब्धता उत्पादन प्रक्रियेत सातत्य ठेवते. एमएसएमइ क्षेत्रातील उद्योगांना अनेकदा मर्यादित भांडवल आणि साठवणूकच्या सुविधांची कमतरता असते.
जर कच्चा माल वेळेवर उपलब्ध नसेल, तर उत्पादन थांबते, वितरणास उशीर होतो आणि ग्राहकांचे नुकसान होते. या समस्येवर उपाय म्हणून भारत सरकारच्या ‘एनएसआयसी’ने एक विशेष योजना आणली आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची ‘कच्चा माल सहाय्यक योजना’ RMA (Raw Material Assistance Scheme) ही व्यावसायिकांसाठी असलेली एक योजना आहे. कच्च्या मालाच्या खरेदीसाठी वित्तपुरवठा मदत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यामुळे छोटे उद्योजक अधिक दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करू शकतात.
या योजनेची काही वैशिष्ट्ये
- एमएसएमइच्या व्यावसायिक गरजेनुसार कच्चा माल उपलब्ध करून दिला जातो.
- वेळेवर मालाची डिलिव्हरी दिली जाते.
- उत्पादनाच्या किंमतीवरच पुरवठा केला जातो.
- यामुळे आपसूकच मध्यस्थ गाळला जातो.
- अशा प्रकारे कमी किंमतीत वस्तूंची खरेदी केली जाते.
- ९० दिवसांपर्यंत कच्च्या मालाच्या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य (क्रेडिट) दिले जाते.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग महामंडळाने कच्च्या मालाच्या मोठया उत्पादकांसोबत करार केला आहे. त्यामुळे मालाच्या गुणवत्तेबाबत कोणताही प्रश्न उद्भवत नाही.
या योजनेचा फायदा कोण कोण घेऊ शकते तर उद्योग आधार मेमोरँडम असलेले कोणतेही उत्पादक एमएसएमई या योजनेंतर्गत मदतीसाठी अर्ज करू शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी कराल?
१. एनएसआयसीमार्फत कच्चा माल आवश्यक असलेल्या उद्योजक आणि कोणत्याही एमएसएमई ला विहित अर्जामध्ये कच्च्या मालाच्या सहाय्यासाठी एनएसआयसी क्षेत्र कार्यालयात अर्ज करावा लागेल.
२. हा अर्ज (www.nsic.co.in) एनएसआयसीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अथवा स्थानिक क्षेत्र कार्यालय विनामूल्य मिळू शकतो.
३. योग्यप्रकारे भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या एनएसआयसीच्या शाखा कार्यालयात सादर केला जाऊ शकतो. एनएसआयसी कार्यालयांचे तपशील व आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती येथे उपलब्ध आहेत : http://www.nsic.co.in/Schemes/Raw-Material-Against-BG.aspx
४. एनएसआयसी व व्यवसाय युनिटसोबत करार होतो.