कच्चा माल पुरवठा व्यवसायाच्या १५ कल्पना

मोठमोठ्या कंपन्या जेव्हा आपले उत्पादन बाजारात आणतात तेंव्हा त्यासाठी अनेक प्रकारच्या कच्च्या मालाची आवश्यकता असते. प्रत्येक वेळी स्वत:च ती गरज पूर्ण करणे प्रत्येक कंपनीला शक्य नसते अशा वेळी बाहेरून त्यांना तो घ्यावा लागतो.

आपण जर हे माध्यम झालो तर आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू होऊ शकतो. बहुतांश क्षेत्रात या कच्च्या मालाची मागणी असते. आपण ती योग्य वेळी आणि योग्य नियोजनाने पूर्ण करू शकलो तर आपण उत्कृष्ठ आणि फायदेशीर कच्चा माल पुरवठा व्यावसायिक बनू शकतो.

लेदर, रबर, कच्चे तेल, कापूस, औषधी वनस्पती, लोह, माती, किंवा अगदी पाणीसुद्धा कच्चा माल असू शकते. हे काही वानगीदाखल. परंतु प्रत्येक उत्पादन क्षेत्रात कच्चा माल लागतो. आपल्याला तो ओळखता यायला हवा.

कच्चा माल पुरवठा व्यवसायात भांडवल आवश्यक आहे, कारण डिलिव्हरी, सप्लाय यासाठी वाहतूक आणि आवश्यक सामग्रीसाठी पैसा हवाच; पण आपल्याकडे चांगली वाणी, प्रामाणिकपणा असेल आणि योग्य नियोजन असेल तर यावरही आपण मात करून कोणत्याही रोख रक्कमेशिवाय व्यवसाय चालवू शकतो.

आपणास फक्त घाऊक विक्रेत्याला खात्री देणे आवश्यक आहे की आपण पुरवठा केल्यानंतर पैसे आल्यावर लगेच त्यांना त्यांचे पैसे मिळतील. केवळ कल्पना आणि सचोटीने व्यवसाय सुरू करण्याचा हा एक मस्त मार्ग आहे. आपण खरोखरच कच्चा माल पुरवठा व्यवसाय सुरू करण्यास स्वारस्य असल्यास, येथे काही उत्कृष्ट कच्च्या मालाच्या पुरवठा व्यवसायाच्या कल्पना आहेत. या कल्पना असल्यामुळे याची तोंडओळख देत आहोत.

१. जनावरांचा कचरा

तुम्हाला माहिती आहे का की, सेंद्रिय शेतीत सेंद्रिय खत निर्मितीसाठी लागणार्‍या कच्च्या मालांपैकी एक प्राणी कचरा आहे. जर आपल्याकडे कुक्कुटपालन किंवा गुरेढोरे आहेत किंवा जनावरांचा कचरा मोठ्या प्रमाणात कसा मिळवायचा हे आपणास माहीत आहे तर आपण सेंद्रिय खत उत्पादक कंपन्यांना जनावरांचा कचरा पुरवठा यशस्वीरित्या करू शकता. ग्रामीण भागातील तरुणांना किंवा व्यवसाय करू इच्छिणार्‍यांसाठी ही मोठी संधी आहे.

२. चामड्याचा पुरवठा

जगभरात लेदर आणि प्राण्यांच्या त्वचेसाठी एक मोठी बाजारपेठ आहे. लेदर बेल्ट, शूज, पिशव्या, बॅग, मनगटी घड्याळ बेल्ट या आणि इतर अनेक प्रकारच्या चामड्याच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. दैनंदिन वापरातल्या अनेक वस्तू लेदरच्या असतात.

मजबूत टिकाऊ म्हणून लोकही खूप पसंती देतात. त्यामुळे उत्पादकांची या कच्च्या मालाची मोठ्या प्रमाणात मागणी असते. आपण संधी हेरून आपल्या आजूबाजूला यासाठी पूरक वातावरण असल्यास याचा विचार करू शकतो.

३. रबर पुरवठा

लेटेक्स हा एक कच्चा माल आहे जो प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक घटक, कार, मुलांची खेळणी किंवा रबर असलेले कोणतेही उत्पादन यात वापरला जातो. म्हणूनच, जर आपण कच्चा माल पुरवठा व्यवसाय सुरू करण्यासाठी शोधत असाल तर आपण लेटेक्स सप्लाय व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता जर आपल्याकडे रबरची लागवड असेल किंवा आपल्याला रबर कसे व कुठून मिळू शकते हे माहित असेल तर हा व्यवसाय आपल्यासाठी योग्य आहे.

४. लोकरीचा पुरवठा / कापसाचा पुरवठा

वस्त्र / सुती कपड्यांचा उद्योग यासाठी लोकर, कापूस याशिवाय पर्याय नाही. कपड्यांच्या उत्पादनामध्ये लोकर, कापूस आवश्यक असलेल्या कच्च्या मालांपैकी एक आहे. म्हणूनच, जर आपण कच्चा माल व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपण लोकर, कापूस पुरवठा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला पाहिजे.

लोकरीप्रमाणेच सूत आहे. वस्तुतः वस्त्र उद्योगात कापूस हा एक प्रमुख कच्चा माल आहे. कापूस पुरवठा व्यवसायात जाण्यासाठी आपणास कापूस शेत करण्याची गरज नाही. आपल्याला कापसाचा व्यावसायिक प्रमाणात वापर कसा करावा, आणि कापड उत्पादन उद्योगातील खेळाडूंशी कसे सौदे करावे हे माहीत असायला हवे.

त्याचसोबत तुम्ही कापूस शेती करत असाल तर तुमच्यासाठी जास्त सोपे असू शकते. आपल्या माहितीतील इतर शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन योग्य अभ्यास आणि सचोटीने या व्यवसायात उतरता येऊ शकते.

५. कच्च्या तेलाचा पुरवठा

कच्च्या तेलाला काळे सोने म्हणूनसुद्धा ओळखले जाते. याचा वापर पेट्रोल, रॉकेल, डिझेल इत्यादी उत्पादनांमध्ये प्रमुख कच्चा माल म्हणून केला जातो. म्हणूनच, जर आपण कच्चा माल पुरवठा करणारा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल आणि आपण मान्यताप्राप्त गुंतवणूकदार असाल तर आपण क्रूड ऑईल सप्लाय व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. व्यवसाय चालू केल्याच्या थोड्याच कालावधीत व्यावसायिक उलाढाल पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

६. औषधी वनस्पती पुरवठा व्यवसाय

अशा अनेक औषधी वनस्पती असतात, ज्यांचा वापर विविध प्रकारच्या औषधनिर्मितीसाठी केला जातो. म्हणजेच अशा वनस्पती या कच्चा माल झाल्या. जर आपण शेती करत असाल तर आपण औषधी उत्पादनांमध्ये वापरल्या जाणार्‍या औषधी वनस्पतींची लागवड करू शकता. विविध औषधनिर्मिती कंपनी यासाठी तुम्हाला शोधावे लागतील. त्यांची गरज आणि आवश्यकता समजून आपण यात उतरू शकतो.

७. फळे पुरवठा व्यवसाय

औषधी वनस्पतीप्रमाणे फळ हाही एक कच्चा माल आहे. अनेक फळांचा रस उत्पादन करणार्‍या कंपन्या, औषध तयार करणार्‍या कंपन्या, व्हिटॅमिन सी, लहान मुलांसाठी मल्टि व्हिटॅमिन बनवणार्‍या कंपन्या या आपल्या ग्राहक असू शकतात. आपण शेतकरी असाल किंवा ग्रामीण भागात असाल तर या संधीचा नक्की विचार करू शकता.

८. पाणीपुरवठा

आपणास ठाऊक असेलच की बांधकाम उद्योग, बेकरी, पाणी विक्री कंपन्या, विविध कार्बोनेटेड पेय बनवणार्‍या कंपन्यांमध्ये पाणी हे सुद्धा कच्चा माल म्हणून आवश्यक आहे. म्हणूनच, आपण पाण्याच्या पुरवठ्यात जाण्याचा विचार करू शकता.

९. लिंबू आणि त्या प्रकारची साले पुरवठा

परफ्यूम आणि एअर फ्रेशनर्सच्या उत्पादनात लिंबूवर्गीय साली हे कच्चा माल म्हणून वापरले जाते. त्यामुळे त्यांच्या सालीला खूप मागणी असते. जर आपण आपल्या क्लायंटला हमी देऊ शकला की आपल्याला नियमितपणे लिंबूवर्गीय साली मोठ्या प्रमाणात मिळू शकतात तर ते आपल्याबरोबर काम करण्यास तयार असण्यापेक्षा अधिक उत्सुक असतील.

१०. ऊस पुरवठा

ऊस हा साखर उत्पादनासाठी वापरला जाणारा कच्चा माल आहे. महाराष्ट्रात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात उसाची लागवड बर्‍याच मोठ्या प्रमाणात आहे. साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करता येतोच शिवाय आपण स्वतः याची लागवड करू शकतो.

११. नारळाचा पुरवठा

आपल्या देशात, राज्यात नारळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. कोकणातील व्यावसायिकांसाठी नारळ एक कच्चा माल म्हणून पुरवण्याची मोठी संधी आहे. नारळ विविध पेय, क्रीम, तेल, औषध, खाण्याचे पदार्थ इत्यादी उत्पादनांमध्ये वापरले जाते. यामुळे हे सिद्ध होते की नारळाला कच्चा माल म्हणून पुरवठा करणे हा एक भरभराट करणारा आणि फायदेशीर व्यवसाय आहे. नारळाच्या खोबर्‍या व्यतिरिक्त अन्य गोष्टींचाही विविध पद्धतीने उपयोग होतो.

१२. मेण पुरवठा

मेणाचा व्यावसायिक प्रमाणात पुरवठा हा आणखी एक भरभराट करणारा आणि फायदेशीर कच्चा माल पुरवठा व्यवसाय आहे. मेणबत्त्या तयार करताना मेण हे एक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते. जर तुमच्या शेजारी किंवा तुमच्या आसपास मेणबत्त्या बनविणार्या कंपन्या असतील तर तुम्ही जास्त भाग्यवान. मोठ्या प्रमाणात मेण कसे मिळवावे हे जर तुम्हाला माहीत असेल तर याचा तुम्हाला फायदाच होईल.

१३. फायबर आणि फोम्सचा पुरवठा

आपण कच्चा माल पुरवठा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपल्या पर्यायांपैकी एक म्हणजे फायबर आणि फोमच्या पुरवठ्यात जाणे. मॅट्रॅसेस, गाद्या आणि उशा उत्पादनात फायबर आणि फोम प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते.

खरं तर, भारत किंवा जगाच्या पाठीवर एकही घर नसेल, जिथं तुम्हाला किमान मॅट्रॅसे आणि उशी सापडणार नाही. उशा आणि मॅट्रॅसेससाठी खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. या उद्योगाला मरण नाही. जागतिक बाजारपेठ यासाठी मोकळी आहे. त्यामुळे हा कच्चा माल पुरवठा तुमचीही खूप भरभराट करू शकतो.

१४. रॉ अ‍ॅल्युमिनियमचा पुरवठा

असाच एक व्यवहार्य आणि फायदेशीर कच्चा माल पुरवठा व्यवसाय म्हणजे कच्चा अ‍ॅल्युमिनियमचा पुरवठा. खिडक्या, दारे, छप्पर, पॅन, इत्यादीसारख्या अल्युमिनियममधून कित्येक उत्पादने तयार केली जाऊ शकतात. आपण कच्चा माल पुरवठा व्यवसाय सुरू करण्यासाठी शोधत असाल तर आपण कच्चा अ‍ॅल्युमिनियमच्या पुरवठ्यात जाण्याचा विचार करू शकता.

१५. वापरलेल्या टायर्सचा पुरवठा

वापरलेल्या टायरचे किंवा जीर्ण झालेल्या टायरचे recycled म्हणजेच पुनर्वापर करता येऊ शकते. विमान, ट्रक, कार, दुचाकी, वगैरे द्वारे टायर्सचा वापर केला जातो. टायर्ससाठी मोठी बाजारपेठ आहे. हे खरं आहे की जगात असं एकही शहर अथवा गाव नाही जिथे तुम्हाला ऑटोमोबाईल सापडणार नाहीत आणि म्हणूनच टायर्सची विक्री आणि मागणी मोठ्या प्रमाणात होते.

जर आपण मटेरियल सप्लाय व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असाल तर वापरलेले टायर, जीर्ण झालेले टायर रिसायकल करणार्‍या कंपन्यांना पुरवण्याचा नक्की विचार करू शकता.

– प्रतिभा राजपूत

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?