अनेक बॅंकांकडून नकार मिळाला, तरी निराश न होता स्थापन केली स्वतःची ऑनलाइन पेमेंट कंपनी

त्यांच्या पहिल्या प्रोटो टाइपला बँकेकडून मंजुरी मिळण्यासाठी सुमारे एक वर्ष लागले, त्यामुळे त्यांनी कुणाची तरी मंजुरी मिळवण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा ई-कॉमर्स किंवा तत्सम क्षेत्र निवडण्याचा विचार केला होता. कारण ई-कॉमर्समध्ये त्यांना फक्त एक ॲप तयार करून ते लाॅंच करावं लागणार होतं. पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत.

‘रेझरपे’ची स्थापना शशांक कुमार आणि हर्षिल माथूर यांनी केली. ‘रेझरपे’ या कंपनीची स्थापना करण्यापूर्वी शशांक कुमार मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर होते. ते ‘एसडीएस लॅब्ज’मध्येदेखील एक वर्षासाठी उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते.

हर्षिल माथूरदेखील आयआयटी रुरकीचे पदवीधर आहेत आणि ‘एसडीएस लॅब्ज’मध्ये कर्मचारी होते. त्यांनी काही महिने श्‍लंबरगर येथे वायरलाइन फील्ड इंजिनिअर म्हणूनही काम केले. सध्या हर्षिल ‘रेझरपे’ येथे सीईओ पदावर आहेत.

हर्षिल आणि शशांक यांची आयआयटी रुरकी येथे एकमेकांशी ओळख झाली होती आणि या दोघांनी २०१४ मध्ये ‘रेझरपे’ची स्थापना केली. नवीन स्टार्टअप्सना ऑनलाइन पैसे स्वीकारण्यात याआधी आलेल्या अडचणींचा अंदाज येताच त्यांनी पेमेंट प्रक्रियेत मदत करणाऱ्या व्यवसायांशी संबंधित संधी शोधण्यास सुरुवात केली.

तेव्हा भारतात फारच कमी पेमेंट प्रोसेसिंग कंपन्या होत्या आणि त्यासाठी स्टार्टअप्सना मोठ्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक होते.

‘रेझरपे’ हे भारतातील एक ऑनलाइन पेमेंट सोल्यूशन प्लॅटफॉर्म आहे जे व्यवसायांना डिजिटल पद्धतीने पेमेंट स्वीकारण्यासाठी आणि वितरित करण्यासाठी जलद, सुरक्षित, सुलभ आणि किफायतशीर मार्ग आहे.

‘रेझरपे’वर व्यावसायिकांना क्रेडिट आणि डेबिट कार्ड, नेट बँकिंग, युपीआय सुविधा, तसेच जियो मनी, मोबी क्विक, एअरटेल मनी, फ्री चार्ज,‌ओला मनी, तसेच पेझॅप अशा भारतातील आघाडीच्या वॉलेट्ससारख्या विविध ऑनलाइन पेमेंट पद्धती उपलब्ध आहेत.

‘रेझरपे’ची सुरुवातीची टीम फक्त ११ लोकांची होती, जे एका अपार्टमेंटमधून काम करायचे, कारण कंपनीचे सहसंस्थापक बँकांना भेटून त्यांना आपली योजना पटवून देण्यासाठी संघर्ष करत होते. चर्चा संथ गतीने सुरू होती आणि बऱ्याच काळापासून होत राहिली.

२०१७ मध्ये कंपनीने ‘रेझरपे’ रुट, ‘रेझरपे’ स्मार्ट कलेक्ट, ‘रेझरपे’ सबस्क्रिप्शन्स आणि रेझर पे इनव्हाॅइसेस ही चार उत्पादने लाँच केली. ही उत्पादने रोख प्रवाह, पैशाचे वितरण, स्वयंचलित एनइएफटी, बँक वायर तसेच नियोजित पेमेंटचे संकलन यासारखी कामे हाताळतात.

‘रेझरपे’ या प्लॅटफॉर्मची आणखी एक उपकंपनी आहे ‘रेझरपे कॅपिटल’. हा एक कर्ज देणारा प्लॅटफॉर्म आहे जो व्यवसायांना त्यांच्या रोख पैशाच्या समस्यांचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी झटपट कर्जे देऊन पाठबळ देतो.

रेझर पे सेवांमध्ये ‘आंशिक पेमेंट’ आणि ‘बॅच अपलोड’ या दोन नवीन वैशिष्ट्यांचादेखील समावेश केला आहे. आंशिक पेमेंट अंतिम वापरकर्त्यांना संपूर्ण पेमेंट करण्याऐवजी छोट्या हिश्शांमध्ये पेमेंट करण्याची परवानगी देते आणि बॅच अपलोडचे वैशिष्ट्य म्हणजे व्यावसायिक संस्थांना बॅचमध्ये लिंक्स तयार करण्यास आणि त्यावर प्रक्रिया करण्यास परवानगी देते.

या प्लॅटफॉर्मचे आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन म्हणजे ‘रेझरपे एक्स’ जो एक बँकिंग प्लॅटफॉर्म आहे. हे उत्पादन पूर्ण-कार्यरत चालू खाते असलेल्या व्यवसायांना स्वयंचलित वेतन, बँक हस्तांतरण, पावत्या सामायिक करणे इत्यादी सुविधा पुरवते.

‘रेझरपे’द्वारे सुमारे ५ दशलक्ष व्यावसायिक कंपन्या पेमेंट करतात ज्यात एअरटेल, ओला, झोमॅटो, बुकमायशो आणि इतरांचा समावेश आहे. कंपनीने अलीकडेच लहान व्यवसायांसाठी एक नवीन कर्ज सेवा उपलब्ध केली आहे ज्यांना सुलभ आणि सोयीस्कर क्रेडिट हवे आहे त्यांच्यासाठी ही उपयुक्त सेवा आहे.

कंपनीच्या महत्त्वाच्या गुंतवणूकदारांमध्ये रिबिट कॅपिटल, टायगर ग्लोबल, वाय कॉम्बिनेटर, मॅट्रिक्स पार्टनर्स, सिंगापूरचा सार्वभौम संपत्ती फंड जीआयसी, तसेच सिक्वोया इंडिया यांचा समावेश आहे.

– चंद्रशेखर मराठे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?