स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
सचिवालयाजवळच्या मनोरा आमदार निवासात एक मेडिकल स्टोअर आहे. सुप्रसिद्ध नातेसंबंध समुपदेशक पूनम खैरनार काही वर्षांपूर्वी त्या दुकानात फार्मासिस्ट म्हणून नोकरी करत होत्या. त्यांच्याबरोबर गोपाळ नावाचा बंजारा समाजातील एक अल्पशिक्षित गोपाळ नावाचा मुलगाही त्याच दुकानात काम करायचा.
पूनम खैरनार तेव्हा व्यावसायिक पातळीवर समुपदेशन करीत नसत; पण त्यांचा मूळ पिंड समुपदेशकाचा असल्याने हौस म्हणून त्या अनेकांच्या पारिवारिक समस्या सोडवीत. त्यांच्याबरोबर काम करणार्या या गोपाळचे तेव्हा लग्न ठरले होते. पूनम यांच्याच सल्ल्याने तो रात्रशाळेतून मॅट्रिकचे शिक्षण घेत होता.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
इतकेच नव्हे तर पूनम यांच्या प्रोत्साहनाने गोपाळने त्याच्या होणार्या पत्नीनेही तिचे शिक्षण पूर्ण करावे म्हणून आग्रह धरला. त्याप्रमाणे त्याची वाग्दत्त वधू गावाला एका वसतिगृहात राहून शिक्षण घेत होती. लग्नानंतर तिने मुंबईत येऊन काय करायचे याचंही नियोजन गोपाळने पूनम खैरनार यांच्यासोबत बोलून करून ठेवलं होतं.
लग्न ठरलेले असतानाच एक दिवस गोपाळच्या वाग्दत्त वधूचा अपघात झाला. स्टोव्हचा भडका उडाला आणि ती गंभीररीत्या भाजली. ती वाचली, पण तिचा चेहरा कुरूप दिसू लागला. तेव्हा गोपाळने तिच्याशी लग्न करू नये, असे त्याच्या घरातले म्हणू लागले. गोपाळही काहीसा विचलित झाला.
आपल्या होणार्या वाग्दत्त वधूशी लग्न करायला टाळाटाळ करू लागला. तेव्हा पूनम खैरनार यांनी त्याला विचारले, हाच अपघात जर लग्नानंतर झाला असता तर तू तिला सोडले असते का? त्यांनी व्यवस्थित समुपदेशन करून त्याला तिच्याशीच लग्न करायला राजी केले. आता गोपाळ व त्याची पत्नी व्यवस्थित संसार करीत आहेत. गोपाळची पत्नी शिक्षण पूर्ण करून मुंबईत नोकरीही करीत आहे. गंमत म्हणजे याच दाम्पत्याची एक कन्या पूनम खैरनार यांनी दत्तक घेतली आहे.
जेव्हा पूनम खैरनार व्यावसायिक पातळीवर समुपदेशक नव्हत्या तेव्हाची ही एकच घटना त्यांंची समुपदेशक म्हणून त्यांची क्षमता आणि व्यवसायाशी असलेली निष्ठा दाखवते. आता तर त्या मुंबईतील एक प्रमुख नातेसंबंध समुपदेशक आहेत. पोलीस, कोर्ट आणि इतर अनेक सरकारी विभाग व अनेक संस्था त्यांच्या सेवांचा लाभ घेत आहेत.
पूनम खैरनार समुपदेशनाच्या व्यवसायाकडे कशा वळल्या याचीही एक मनोरंजक हकीकत आहे. त्यांचे वडील मुंबईतील चुनाभट्टी येथे ‘अॅडव्हान्स्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ या केंद्र सरकारच्या उपक्रमात कार्यरत होते. याच एटीआयच्या कर्मचारी वसाहतीत आणि १५ जणांच्या संयुक्त कुटुंबात पूनम वाढल्या.
एकत्र कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी असल्याने लहानपणापासूनच लहान भावंडांना व सर्वांना सांभाळून घेण्याची जबाबदारी व जाणीव त्यांच्यात विकसित झाली. त्यामुळे घरातील-वस्तीतील मुलांची भांडणे सोडवणे, त्यांच्यातील वाद मिटवणे, मित्रांना अभ्यासाबाबत मार्गदर्शन करणे या गोष्टी त्या समुपदेशन हा शब्द माहीत होण्यापूर्वीपासूनच करीत असत.
वास्तविक त्यांना शिक्षिका व्हायचे होते; पण घरातल्यांच्या आग्रहामुळे त्यांना बी.फार्म.चे शिक्षण घ्यावे लागले. त्यातही कंपन्यांमध्ये नोकरी करण्यापेक्षा जनसंपर्काची आवड म्हणून त्यांनी रुग्ण समुपदेशनाचा मार्ग अवलंबला. फार्मसीच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांच्या दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाला. त्या घटनेचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला.
तेव्हा त्यांना स्वत:ला समुपदेशनाची गरज होती; पण त्या काळी समुपदेशकाची मदत घेणे कमीपणाचे मानले जात असे. त्यामुळेत भविष्यात समुपदेशक बनायचा त्यांचा निश्चय दृढ झाला. पुढे वैयक्तिक आयुष्यात काही अप्रिय घटना घडल्याने काही वर्षांनी त्या व्यावसायिक दृष्टीने समुपदेशनाकडे वळल्या.
त्यांनी भायखळ्याच्या डॉ. राजन व मिनू भोसले यांच्या हार्ट टू हार्ट इन्स्टिट्यूटमधून कॉग्निटिव्ह बिहेव्हिअर थेरपी, रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअर थेरपीचे काही कोर्सेस केले. नंतर त्यांनी एका लॉ फर्मशी टायअप करून घटस्फोट घेऊ पाहणार्या जोडप्यांचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली. त्यात त्या अनेक घटस्फोट टाळण्यात यशस्वी ठरल्या.
त्यानंतर बीएनआय, एमआयसी (मराठी इंटरनॅशनल क्लब), सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट वगैरे काही व्यवसायवृद्धी समूहांमध्ये सामील होऊन त्यांनी आपल्या सेवांचे प्रमोशन केले. काही काळ मोफत समुपदेशनही केले. मॅजिक बस व डॉन बास्को शेल्टर या समाजसेवी संस्थेबरोबर दीर्घकाळ मोफत काम केले.
हळूहळू समुपदेशक म्हणून त्यांची ख्याती होऊ लागली. दरम्यान ठाणे पोलिसांकडून एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांकडूनच झालेल्या लैंगिक छळाबद्दलची एक गुंतागुंतीची केस त्यांच्याकडे आली. त्यात मुलीचे योग्य ते समुपदेशन करून त्यांनी तिला कोर्टात कायदेशीरदृष्ट्या टिकेल अशी जबानी द्यायला तयार केले. त्यामुळे तिच्या वडिलांना सात वर्षांची शिक्षा झाली. या केसमुळे पोलीस डिपार्टमेंट फारच प्रभावित झाले व पुढे पोलिसांकडून लैंगिक आणि इतर प्रकारच्या अनेक केसेस त्यांच्याकडे पाठवल्या जाऊ लागल्या.
आज पूनम खैरनार या मुंबईतील एक नावाजलेल्या समुपदेशक म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्याकडे इतक्या विविध प्रकारच्या केसेस येतात की, त्या सगळ्यांना मिळून त्या स्वत:ला नातेसंबंध समुपदेशक म्हणवतात. क्षणिक आकर्षणाने होणारे प्रेमविवाह व नंतर आकर्षण ओसरल्याने होणारे घटस्फोट यांच्यासंबंधी अनेक केसेस त्यांच्याकडे येत असतात.
लग्न हा माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे; पण सध्या वैवाहिक संबंधात अनेकदा तणाव निर्माण होतो. अनेकदा पार्टनरचे दुसर्या कोणाशी असणारे अनैतिक संबंध हेही पती-पत्नी तणावाचे कारण असते. अशा प्रकारच्या अनेक केसेस त्या दररोज हॅण्डल करतात.
मुले पालकांचे ऐकत नाहीत, अभ्यास करीत नाहीत, ही आजकालची घराघरांतील समस्या आहे. याच बरेचदा कुटुंबातील सुसंवाद कमी पडतो. मुलांच्या स्वैर वागणुकीसंबंधी हजारो केसेस त्यांनी आजवर हाताळल्या आहेत. त्याचबरोबर इन बॉर्न मेटॅबोलिक डिसऑर्डर म्हणजे जन्मजात वैगुण्य असणार्या मुलांच्याही समस्या त्यांच्याकडे येत असतात. काही मुले नॉर्मल दिसतात; पण त्यांच्यात गंभीर उणिवा असतात. अशा मुलांच्या समस्या त्या सोडवतात.
मानवी समस्या इतक्या गुंतागुंतीच्या असतात, की त्यांच्यावर विश्वास ठेवणेही कठीण असते. लग्नानंतर पंचवीस वर्षांनी व तरुण मुले असणारी जोडपी काही वेळा घटस्फोट घेण्याचे ठरवतात. अशा वेळी त्यांच्या मुलांच्या मानसिकतेचा विचार करावा लागतो. एकदा एका एलआयसीच्या डेव्हलपमेंट ऑफिसरने त्याच्या हाताखाली काम करणार्या पंचवीस एजंट्सचा परफॉर्मन्स कमी झाला म्हणून त्या सर्वांचे पूनम खैरनार यांच्याकडून समुपदेशन करवून घेतले. तेव्हा प्रत्येक एजंटच्या आयुष्यातील वैयक्तिक समस्यांमुळे परफॉर्मन्स कमी झाला आहे असे त्यांना आढळून आले. मग त्यांनी प्रत्येकाला योग्य असा उपाय सुचवून सगळ्यांचा परफॉर्मन्स सुधारून दाखवला.
अशा तर्हेने त्यांच्याकडे येणारी प्रत्येक केस वेगवेगळी असते. पूनम खैरनार यांना प्रत्येकाची पार्श्वभूमी नीट समजून घ्यावी लागते. त्यासाठी प्रत्येकाशी अनेक तास चर्चा करावी लागते. समुपदेशनाचे एक शास्त्र आहे. त्यानुसार त्या प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतात व त्याच्या समस्येनुसार उपाययोजना सुचवतात.
त्यांनी सुचवलेल्या उपायांचा अवलंब केल्याने आजवर हजारो लोकांचा फायदा झालेला आहे. त्यांच्या समस्या निवारण झाल्या आहेत. अनेक कुटुंबांतले आपापसातले संबंध दृढ झाले आहेत. त्यांनी शेकडो घटस्फोट टाळले आहेत व कुटुंबव्यवस्था टिकवण्यास हातभार लावला आहे.
आता पोलीस, कोर्ट, इतर अनेक सरकारी आस्थापने त्यांच्याकडे केसेस पाठवतात. बॉलीवूड व मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले अनेक कलाकार त्यांचे क्लायंट आहेत. गोपनीयतेमुळे त्या त्यांची नावे सांगू शकत नाहीत. परदेशातून म्हणजे अगदी थायलंडमधूनही त्यांचा सल्ला घेतला जातो. तसेच त्या लेहर फाऊंडेशन, विश्वकर्मा संघ, आय रिस्पेक्ट ह्युमॅनिटी व मॅजिशियन फाऊंडेशन या समाजसेवी संस्थांबरोबर संलग्न आहेत.
पनवेलचे बोधीमिलन व घाटकोपरचे स्वयंवर डॉट कॉम या विवाह मिलन केंद्रांबरोबर त्या काम करतात. तिथे त्या प्री मॅरेज काऊन्सिलिंग करतात. एकूणच मानवी जीवनात बाळ जन्माला आल्यापासून ते पार उतारवयापर्यंत विविध टप्प्यांतील नानाविध समस्या समुपदेशनाद्वारे सोडवण्याचे काम पूनम खैरनार एक नातेसंबंध समुपदेशक या भूमिकेतून करतात.
चंगळवादी जीवनशैलीमुळे हल्ली प्रत्येक जण पैशाच्या मागे धावत आहे. पैसा, करीअर या गोष्टींना अवाजवी महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मानवी नातेसंबंधांकडे दुर्लक्ष होत आहे. ज्या वयात मुलांना आई-वडिलांचे प्रेम मिळायला पाहिजे तेव्हा ती पाळणाघरांत असतात. करीअरच्या पाठीमागे लागल्याने जेव्हा मानवी भावना उच्च कोटीच्या असतात तेव्हा लग्न केले जात नाही. नंतर वय उलटून गेल्यावर उपचार म्हणून लग्न केले जाते. त्यामुळे मानवी संबंधांत एक पोकळी निर्माण होते. त्यातून वर्तणुकीच्या अनेक डिसऑर्डर्स उगम पावतात. त्याच पुढे अनेक समस्यांना जन्म देतात.
पैसा जगण्यासाठी आवश्यक आहे; पण तोच काही सर्वस्व नव्हे. माणसाच्या जीवनात पैशांइतकेच त्याच्या पारिवारिक जीवनातील शांती, प्रेमही मोलाचे आहे. तेव्हा सुदृढ जीवन जगायचे असेल तर नाती जपली पाहिजेत. पारिवारिक व सामाजिक नातेसंबंधही टिकवले पाहिजेत, जोपासले पाहिजेत, असे पूनम खैरनार म्हणतात.
आपण भारतीय संस्कार व्यवस्था बदलू शकत नाही. मात्र त्या व्यवस्थेनुसार स्वत:ला बदलणे, आपल्या व्यक्तिमत्त्वात काही बदल घडवणे, स्वत:मध्ये निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे शक्य आहे. यासाठी प्रत्येकाने आपापल्या समस्यांविषयी एका तटस्थ, पूर्वग्रहविरहित समुपदेशकाशी आडपडदा न ठेवता, संकोच न बाळगता चर्चा करणे आवश्यक आहे. त्या चर्चेतूनच पुढचा समस्या निवारणाचा मार्ग प्रशस्त होत जातो.
संपर्क : पूनम खैरनार
९००४८७४०९३
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.