लॉकडाऊननंतर व्यवसाय वाढवण्याची तयारी

सध्या आपण बघत आहोत कोरोना आणि इतर अनेक कारणांनी जागतिक मंदी सुरू आहे. भारताला अजून त्या मानाने याचा फटका बसला नाही, पण त्यासाठी एक उद्योजक म्हणून आपण तयार असायला हवे.

सर्वात आधी मंदी म्हणजे काय हे समजून घेऊ.

जेव्हा लोक खर्च कमी करतात किंवा खर्च करण्यासाठी लोकांकडे पैसेच कमी असतात, तेव्हा मंदी उद्भवते. लोकांनी खर्च न केल्याने माल विकला जात नाही, माल विकला न गेल्यामुळे मागणी कमी होते, परंतु पुरवठा तितकाच असतो व त्यामुळे वस्तू उरायला लागतात आणि स्पर्धा वाढू लागते.

आज लॉकडाऊनमुळे लोक खर्च कमीतकमी करत आहेत. फक्त अत्यावश्यक सुविधा सुरू आहेत. बाकी सर्वांचेच व्यवसाय बंद आहेत. अशा वेळी आपण नक्की काय करावे ज्याने आपल्या व्यवसायावर याचा फार प्रभाव पडणार नाही आणि लॉकडाऊन संपल्यावर आपला व्यवसाय पुन्हा सुरळीत चालू होईल?

प्रश्न खूप मोठा वाटत असला तरी या तीन गोष्टी केल्या तर हे सहज शक्य आहे.
१. सध्याच्या ग्राहकांना आपल्याजवळ ठेवा

या काळात सर्वात महत्त्वाचं आहे आपले जे नेहमीचे ग्राहक आहेत, त्यांना आपल्याशी जोडून ठेवणे. तुम्ही बघितले असेल ऍमेझॉन, फ्लिपकार्टपासून पेटीएम, स्विगी, झोमॅटो अशा वेगवेगळ्या apps ची सुविधा आता बंद असली तरी त्यांच्या बऱ्याच नोटिफिकेशन आपल्याला येत आहेत. तुम्ही सुरक्षित रहा, काळजी घ्या, असे काही मेसेज येतात किंवा कोरोनाशी दोन हात करायला आम्ही कोणती काळजी घेत आहोत अशाप्रकारचे अपडेट्स ते आपल्याला देत आहेत.

असंच आपल्यालासुद्धा करायचं आहे. ‘ग्राहक आपल्यासाठी केवळ खरेदी होईपर्यंत महत्त्वाचा आहे’ असा दृष्टिकोन ठेवणे अत्यंत चूक आहे. कारण यामुळे ग्राहक पुन्हा आपल्याकडे येणार नाही.

त्या ऐवजी आपल्या ग्राहकांशी ते व्यवस्थित आहेत ना, स्वतःची काळजी घेत आहेत ना हे विचारून आणि इतर वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्यांची काळजी आहे हे त्यांना जाणवून देणे गरजेचे आहे. यामुळे केवळ नफा कमवण्यासाठी नाही तर संकटकाळीसुद्धा आपण त्यांच्यासोबत आहोत, हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण होईल. हे करण्यासाठी सर्वात सोपे मार्ग म्हणजे WhatsApp व इतर सोशल मीडिया किंवा ई-मेलचा वापर.

२. वेगवेगळ्या गोष्टी मोफत द्या

सध्या लोक खर्च कमी करत आहेत. अशावेळी वेगवेगळ्या ऑनलाईन गोष्टी आपण लोकांना मोफत द्यायला हव्या. जसं, आपल्या व्यवसायाशी संबंधित माहितीपर ब्लॉग लिहिणे, वेगवेगळे व्हिडीओज बनवणे, वेगवेगळ्या apps चा वापर करून ऑनलाईन सेमीनार्स घेणे, इत्यादी. अर्थात ऑनलाईन आणि मोफत देता येईल, असं जे तुम्हाला सुचेल ते लोकांना द्या.

याने एकतर लोक आपल्याशी जोडलेले राहतील. दुसरं म्हणजे मोफत गोष्टी कुणाला नाही आवडत? या गोष्टी लोकांना आवडल्या तर ते तुमचे प्रमोशन एजंट्स बनतील. अर्थात त्यांना एखादी गोष्ट आवडली तर ते ती गोष्ट शेअर करतील. या गोष्टी जितक्या जास्त शेअर होतील तितकं तुमचं नाव जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचेल.

३. प्रमोशनवर खर्च करा

सध्या ना कच्चा माल घेण्यासाठी आपला खर्च होतोय, ना उत्पादनावर (प्रोडक्शन). बाकी इतर व्यवसायाला लागणारे सर्व खर्चसुद्धा बंदच आहेत. या वाचलेल्या पैशांचे दोन भाग करा. एक भाग म्हणजे आता व्यवसाय बंद असल्याने विक्री होत नाहीये आणि व्यवसायात पैसा येत नाहीये. त्यामुळे लॉकडाऊननंतर व्यवसाय जेव्हा पुन्हा सुरू करू तेव्हासाठी बॅकअप म्हणून ठराविक पैसे वेगळे काढा आणि यातून जे उरतील ते प्रमोशनसाठी वापरा.

तुमच्या व्यवसायानुसार आता लगेच प्रमोशन करणे योग्य आहे का, कोणत्या प्रकारचे प्रमोशन करायला हवे, अशा सगळ्याचा विचार करा. प्रत्यक्ष विक्रीपेक्षा आपल्या व्यवसायाचं नाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणारा मार्ग शोधा. यामुळे आता लगेच जरी विक्री झाली नाही तरी long run मध्ये अर्थात पुढील काही काळात याचा नक्कीच फायदा होईल.

या तीन गोष्टी तुम्ही विचार करून आणि खरोखर प्रयत्न करून केल्यात तर तुमचे स्पर्धक व्यवसाय बंद करून बसले असताना, तुम्ही त्यांच्या कितीतरी पुढे जाऊ शकाल.

लक्षात ठेवा, आलेल्या परिस्थितीला जे संधी मानतात तेच खरे उद्योजक असतात. त्यामुळे सुट्टी म्हणून आराम करा, परंतु तुम्ही एक ‘स्मार्ट उद्योजक’ आहात हे विसरू नका!

– शैवाली बर्वे
shaivalibarve@gmail.com

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

    View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?